
- कैऱ्या - चार किलो
- लसण - अर्धा किलो
- अद्रक - अर्धा किलो
- तिखट - एक किलो
- मीठ - एक किलो
- मोहरी पूड - ५० ग्राम
- जिरे पूड - ५० ग्राम
- मेथी पूड - ५० ग्राम
- शेंगदाण्याचे तेल - तीन किलो
.
नमस्कार मायबोलीकरांनो!
महाराष्ट्रात कैरीचे लोणचे == आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे कैरीचे लोणचे ही कृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा.
कृती:
आंब्याच्या फोडी दोन-तीनदा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या. कपड्यावर टाकून कोरड्या करून एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात घाला.
अद्रक-लसणाची पेस्ट करून त्यावर घाला. नीट हलवून चांगले एकत्र करा. त्यावर मीठ, तिखट, मोहरी पूड, जिरे पूड, मेथी पूड घाला. पुन्हा चांगले एकत्र करून घ्या. झाकून ठेवा. शेंगदाण्याचे तेल चांगले गरम करून थंड करून घ्या. थंड तेल वरील मिश्रणात घालून नीट हलवून एकत्र करून घ्या. काचेच्या / चिनीमातीच्या हवाबंद बरण्यांत घालून झाकण लावून ठेवा.
तीन-चार दिवसानंतर, पुढचे वर्षभर खाण्यासाठी लोणचे तयार होईल.
बोनस रेसीपी:
या लोणच्यातील एक किलो वेगळे घेऊन त्यात अंदाजे १०० ग्राम गूळ घाला. अप्रतिम चवीचे आंबट-गोड लोणचे तयार होईल.
.
- कच्चे आंबे (कैऱ्या) ह्या निबर, गडद हिरव्या सालीच्या, आतून पांढऱ्या, आंबट अश्या बघून घ्याव्यात. मऊ, पिवळट, गोडसर अश्या घेऊ नयेत.
- लसण हा चांगल्या घट्ट गड्ड्यांचा, तीक्ष्ण चव व वासाचा असा घ्यावा.
- अद्रक हे चांगल्या प्रतीचे, मोठमोठ्या खांडांचे, तीक्ष्ण चव व वासाचे घ्यावे.
- तिखट हे लाल रंगाचे, तिखट चवीचे घ्यावे. तेलुगु लोक लोणच्यासाठी Three mangoes हेच तिखट वापरतात; आम्हीही वापरतो.
- बरण्यांत घातल्यावर नेहमीच लोणच्यावर तेलाचा वर थर असावा. फोडी उघड्या पडू नयेत, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते.
- काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालावे.
- वरील साहित्याचे मोजमाप हे, तयार लोणचे चार जणांच्या कुटुंबाला पैपाहुणे, शेजारी-पाजारी यांसहित वर्षभर पुरेल अश्या हिशेबाने दिले आहे. आपापल्या गरजेप्रमाणे त्यात कमी अधिक बदल करावा.
- फोटोंतील दिसणारे साहित्य प्रमाणात दिलेल्या असेलच असे नाही.
- सदर पाककृती माझ्या अर्धांगिनीने सिद्ध केली आहे.
विसु: यावर्षी अजून लोणचे घातले नाहीय. बहुधा पुढच्या आठवड्यात घालणे होईल. फोटो मागच्या वर्षीचे आहेत. यावर्षीचे फोटो नंतर टाकीन. कदाचित कुणाला उपयोगी पडेल म्हणून रेसिपि आताच लिहीत आहे.
(पाकृ यापूर्वी इतरत्र प्रकाशित केलेली आहे. इथे लिहिण्यासाठी संपादित केली आहे.)
बाजारातील कैऱ्या
फोडून घेतलेल्या कैऱ्या
तिखट मीठ मसाला, चार शिंगं कशाला?
अद्रक लसण पेस्ट घातली
फोडींवर मसाला घातला
फोटोसाठी
एकत्र केल्यानंतर
तापवून थंड केलेले तेल
एवढे तेल पुरेसे नाही, अजून घालावे लागेल
एक रँडम फोटो
बरणीत भरायला तयार लोणचे
.
जाता जाता:
- मराठवाड्यात, "पहिला पाऊस पडून गेल्यावर आंब्याचे लोणचे घालावे म्हणजे टिकते. उन्हाळ्यात घातले तर उष्णतेने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
- आंध्र-तेलंगाणात, "आंब्याचे लोणचे उन्हाळ्यातच घालावे म्हणजे टिकते. एकदा पावसाळा सुरु झाला की मग दमटपणाने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
आमच्या घरी दोन्ही ठिकाणांची लोणची टिकतात!
भारी..
भारी..
प्रेझेंटेशन आणि सर्व फोटोज् नेक्स्ट लेव्हल
Pages