
बगारा खाना:
- कर्नूल सोना मसूरी* किंवा एचएमटी तांदूळ - तीन वाट्या
- पुदिन्याची पाने - एक वाटी
- हिरव्या मिरच्या - पाच-सहा
- लसूण अद्रक पेस्ट - एक चमचा
- मध्यम कांदे - दोन, उभे चिरलेले
- जिरे - दोन चमचे
- दालचिनी - दोन इंच
- तमालपत्र - चार-पाच
- विलायची - दोन
- तेल - एक-दीड चमचा
- मीठ - एक-दीड चमचा
- कोथिंबीर - थोडीशी, बारीक चिरून
- पाणी - साडेसात वाट्या*
कद्दू का दालचा:
- चणाडाळ - पाऊण वाटी
- कद्दू - अर्धा, मध्यम आकाराचा, डायमंड आकाराच्या फोडी करून*
- लाल टोमॅटो - दोन, मध्यम आकाराचे, मध्यम आकाराच्या फोडी करून
- कांदा - एक, मध्यम आकाराचा, बारीक चिरून
- हिरव्या मिरच्या - पाच-सहा
- लसूण अद्रक पेस्ट - एक चमचा
- कोथिंबीर - थोडीशी, बारीक चिरून
- तिखट - दोन-तीन चमचे
- हळद - एक चमचा
- गरम मसाला - एक चमचा
- तेल - दोन-तीन चमचे
- मीठ - तीन चमचे
- साखर - चिमूटभर
- चिंच - दोन-तीन बोटूक
- पाणी - दहा वाट्या*
तेलंगाणा बैंगन मसाला या धाग्यावर बगारा खाना या भाताच्या प्रकारचा उल्लेख आला होता. तिथे अनेक मायबोलीकरांनी बगारा खाना ची पाकृ विचारली होती ती इथे देत आहे.
तेलंगाणा खाद्यसंस्कृती ही बहुविध आहे. बगारा खाना हा पदार्थ गणेशोत्सव, बोनालू, बतुकम्मा इ प्रसंगांच्या सार्वजनिक भंडाऱ्यांत, लग्न-कार्य अश्या प्रसंगी हमखास केला जातो.
बगारा खानासोबत कद्दू का दालचा, मिरची का सालन किंवा बैंगन मसाला हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. नेहमीच्या जेवणात दालचा आणि विशेष प्रसंगी सालन / मसाला असा सर्वसाधारणपणे बेत असतो. आमच्या घरीही आठवड्यातून एकदातरी बगारा खाना, कद्दू का दालचा / सालन हे पदार्थ होतातच.
खाना हा साधारणतः फारसा मसालेदार नसतो आणि दालचा हा काहीसा तिखट, आंबट असा असतो. सर्वसाधारण पाककृती खाली देत आहे, यामध्ये आवडीप्रमाणे बदल करता येईल.
पाककृती:
चणाडाळ आणि तांदूळ वेगवेगळे स्वच्छ धुऊन एक तास* भिजत घाला.
बगारा खाना
एका जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा तेल घाला. गरम झाल्यावर तमालपत्र, दालचिनी वगैरे खडा मसाला घाला. १०-१५ सेकंद परतून झाल्यावर एक चमचा लसूण-अद्रक पेस्ट घाला. अंदाजे २५-३० सेकंद परतून झाल्यावर उभा चिरलेला कांदा व दोन चमचे जिरे घाला. दीड दोन मिनिटे, कांदा पारदर्शक होईपर्यंत अधूनमधून परता. तोपर्यंत पुदिन्याची पाने पाण्याने धुऊन घ्या आणि दाबून त्यातील पाणी काढून टाका. मिरच्यांचे दोन-दोन, तीन-तीन तुकडे करून घ्या. आता पुदिना आणि मिरच्या पातेल्यात घाला आणि अजून एक मिनिटभर परता. खमंग वास सुटल्यावर एक चमचा मीठ आणि गरम पाणी घाला. उकळी आली की तांदूळ उपसून त्यात घाला. मध्यम गॅसवर अंदाजे पंधरा मिनिटांत बगारा खाना शिजून तयार होईल. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
कद्दू का दालचा
तासभर भिजवलेली चणाडाळ कुकरमध्ये किंचित हळद व दोन-तीन थेंब तेल घालून शिजवून घ्या. पळीने घोटून, थोडे पाणी घालून, मुलायम पेस्ट करून ठेवा.
चिंच अर्धी वाटी गरम पाण्यात भिजायला ठेवा. कद्दूची साल काढून, आतील बिया काढून टाकून त्याच्या डायमंड आकाराच्या तीन इंच X एक इंच अश्या आकाराच्या फोडी करून घ्या. मिरच्यांचे तिरपे चिरून प्रत्येकी दोन-तीन तुकडे करून घ्या.
एका पातेल्यात दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर, मोहरी, जिरे, दोन चमचे लसूण-अद्रक पेस्ट, बारीक चिरलेला कांदा या क्रमाने घाला. कांदा पारदर्शक झाला की गॅस कमी करा. चिमुटभर साखर, एक चमचा हळद, दोन-तीन चमचे तिखट घालून किंचित परता. मध्यम आकारात चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी व कद्दूच्या फोडी घालून दोन-तीन मिनिटे परता. गॅस मोठा करून गरम पाणी, चणाडाळीची पेस्ट, मीठ घाला. चांगले हलवून एकजीव करून घ्या. अंदाजे पंधरा मिनिटांनी, कद्दूच्या फोडी शिजत आल्या की चिंचेचा कोळ काढून पाणी घाला. एक चमचा गरम मसाला घाला. गॅस बारीक करून अजून पाच मिनिटे शिजू द्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
वाफाळता बगारा खाना आणि कद्दू का दालचा वाढा. तोंडी लावायला कांदा आणि वाळकाचे लोणचे द्या.
नक्की करून पहा आणि आपापल्या पाकृचे फोटो इथे टाका!
- तेलुगु खाद्यसंस्कृतीची कल्पना, दही-भाताशिवाय करणे केवळ अशक्य आहे. मुख्य पदार्थ हा कोणताही असो, जेवणात शेवटी पांढरा भात, दही, आंब्याचं लोणचं किंवा इतर कुठलं तोंडीलावणं याशिवाय पोट भरल्याचं समाधान होतच नाही! त्यासाठी या पाककृतीसोबत थोडासा पांढरा भात वेगळा शिजवून ठेवल्यास उत्तम.
- फोटोंमधील साहित्य प्रमाणात नाही. फोटो काढताना तमालपत्र, चक्रफुल उपलब्ध नव्हते. तोही खडा मसाला वापरता येतो.
- कद्दूच्या फोडी मोठ्याच हव्यात. बारीक फोडी केल्यास त्यांचा लवकर शिजून लगदा होतो. मग त्या खायला ठीक लागत नाहीत.
- खाना / पांढरा भात पातेल्यात किंवा राइस कुकरमध्ये शिजवण्यासाठी एक वाटीस अडीच वाट्या तर प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यासाठी एकास दोन वाट्या असे प्रमाण लागते.
- बगारा खाना हा शक्यतो बासमती तांदुळाचा करत नाहीत. म्हणजे, किमान मी तरी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती यांच्या घरी किंवा त्यांचे समारंभ, कार्यक्रम वगैरे ठिकाणी पाहिलेला नाही. बगारा खाना हा कर्नुल सोना मसूरी तांदूळाचाच. हा तांदूळ रोजच्या भातासाठी वापरला जातो.
- आंध्र -तेलंगणात, पांढरा भात किंवा कोणताही भात हा प्रेशर कुकरमधे क्वचितच शिजवतात. भात हा राइस कुकर किंवा पातेल्यामध्ये शिजवतात. प्रेशर कुकरच्या उपयोग वरणासाठीची डाळ शिजवण्यासाठीच होतो.
- हा बगारा खाना राइस कुकरमध्ये शिजवायचा असेल तर ज्या पातेल्यात दालचा करायचा आहे त्याच पातेल्यात सुरुवातीची फोडणी करून घ्यायची आणि मग शिजवायला राइस कुकर मध्ये घालायचा. तेच पातेले किंचित विसळून घेऊन त्यात दालचा करायचा.
यापूर्वीचे फोटो -
सोबत श्रीखंड आहे.
सोबत काही नाही.
बगारा खाना मिरची का सालन
राईस कुकरमध्ये शिजवलेला बगारा खाना
(पाकृ यापूर्वी इतरत्र प्रकाशित केलेली आहे. इथे लिहिण्यासाठी संपादित केली आहे.)
विकु, सुंदर फोटो!
विकु, सुंदर फोटो!

पण पोर्शन साईझ किती छोटा आहे!
हे पाहून , आपण खूपच जास्ती खातो की काय असा कॉम्प्लेक्स आला!
जमलाय विकु.
जमलाय विकु.
<<मी अमेरिकेत कांदा कापत असताना तिथे भारतात आईच्या डोळ्यात पाणी आले'>>
'कसा झालाय' हे चाखून बघायला
'कसा झालाय' हे चाखून बघायला आम्ही हे बाऊल्स वापरतो. कॉम्लेक्स घेऊ नये
@ vijaykulkarni
@ vijaykulkarni
मस्त जमलेला दिसत आहे; प्लेटचा घाटसुद्धा टिप्पिकल हैदराबादी दिसतो आहे!
पहिल्यांदाच केल्यामुळे माझी
पहिल्यांदाच केल्यामुळे माझी जरा धावपळ झाली. २-४ वेळा केल्यावर सवयीने सहज होईल.
विकु, कांद्यामुळे तुमच्याच
विकु, कांद्यामुळे तुमच्याच काय पण कॅमेर्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं दिसतय
या सुख के आसूओंने कॅमेरेको धुंधला बना दिया?
Pages