
तुरीचे दाणे - (१ मोठी वाटी )
हिरव्या तिखट मिरच्या - ३-४
लसूण - १ लहान गठ्ठा सोलून
आले - १ इंच
कोथिंबीर - २५ ग्राम
कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला
हिंग, हळद, धणेपूड, लाल तिखट, मटण मसाला, गरम मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा
मीठ - चवीनुसार
फोडणीसाठी तेल
एका लोखंडी कढईत ४ थेंब तेल घालून त्यावर जिरे, हिरव्या मिरच्या, आले व लसणाच्या कळ्या भाजून घ्याव्या. हे करताना त्यावर किंचित (चिमूटभर) मीठ भुरभुरावे. असे केल्याने कोणताही जिन्नस खमंग भाजला जातो. लसूण लाल झाला कि त्यातच तुरीचे सोललेले दाणे घालून दाण्यावर डाग दिसेपर्यंत परतावे.
जरा थंड झाल्यावर त्यात बचकभर कोथिंबीर घालून मिक्सरला जाडसर भरड वाटून घ्यावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे व ओलसर पेस्ट करून घ्यावी.
आता त्याच कढईत नेहमीच्या भाजीला वापरता त्यापेक्षा चमचाभर अधिक तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंगाची फोडणी करून घ्यावी. यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा लाल होईपर्यंत परतावा पण जळू देऊ नये. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, मीठ व मटण मसाला घालून माध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतावे. टोमॅटोच्या फोडी दिशेनाश्या होऊन सारे मसाले एकजीव झाले कि यात तुरीच्या दाण्यांची पेस्ट घालून मध्यम आचेवरच २ मिनिटे परतावे. हे मिश्रण नीट शिजले कि कढईपासून सुटून येते (परतताना अजिबात भांड्याला चिकटत नाही).
या स्टेजला कडकडीत गरम पाणी घालून उकळी आणावी. आपल्याला रस्सा जितक्या प्रमाणात दाट/पातळ हवा असेल त्यानुसार पाण्याचे प्रमाण असावे.
२ मिनिटे मध्यम आचेवर उकळी आली कि झाकण ठेऊन १ मिनिट कमी आचेवर शिजवावे (व गॅस बंद करावा
) .
वऱ्हाडी पद्धतीची तुरीची आमटी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत ओरपून / काला मोडून किंवा गरम गरम वाफेवरल्या भातासोबत खावी.
१. तुरीच्या शेंगा निवडताना दाणे पूर्ण भरलेल्या व जरा जून झालेल्या निवडून घ्याव्या.
२. ताजे दाणे/ शेंगा नाही मिळाल्या तर तुरीचे कडधान्य ५-६ तास भिजवून नंतर प्रेशर कूक करून घ्यावे.
३. झाकण न ठेवता आधी मध्यम आचेवर उकळी आणायची आणि मग झाकण ठेऊन १ मिनिट मंद आचेवर शिजवावे. या पद्धतीने कोणतीही आमटी शिजवल्यास भाजीवर / आमटीवर झणझणीतपणा दाखवणारी व वऱ्हाडी जेवणाचा USP असणारी तर्री येते.
छान आहे रेसिपी, फ्रोजन तुरीचे
छान आहे रेसिपी, फ्रोजन तुरीचे दाणे मिळतिल बहुधा..नाहि तर हरभरे/सोलाणे मिळतायत
मस्त रेसिपी आहे.
मस्त रेसिपी आहे.
करून बघेन. सध्या तुरीच्या शेंगा मिळतायत.
बाजारात यावर्षी आताच तुरीच्या
बाजारात यावर्षी आताच तुरीच्या शेंगा दिसू लागल्या आहेत. तुरीचे सोललेले दाणे नाही दिसले अजून. ते आले की तुमची रेसिपी वापरून करणार. Can’t wait.
BTW, तुरीच्या शेंगा सोलणे फार बोअर आणि बोटं रंगवणारे चिकट काम आहे.
Pages