रक्तपिपासू भाग ३

Submitted by प्रथमेश काटे on 21 November, 2024 - 12:21

रक्तपिपासू
भाग ३

" पोरांनो ही काही खोटी, रचून सांगितलेली गोष्ट न्हाई बरं का ? एकदम खरीय. अगदी आमच्या गावातच घडलेली आहे‌." ठकूआजीने सांगायला सुरुवात केली.

" काय ? खरंच ?? " शिवानीने चकित होऊन विचारलं.

" हंहं. हो तर." ठकूआजी हसत उत्तरली. " तर ऐका. माझ्या शेजारच्याच घरात एक मुलगी राहते. या शिवानी इतकीच असेल. मोठी गोड, गुणाची मुलगी. हां... तर ती रस्त्याने घरी चालली होती. संध्याकाळची रात्र व्हायला आलेली. रस्त्यावर आता फारशी ये जा नव्हती. पोरीला भीती वाटणारच. शिवाय, हिवाळ्याचेच दिवस होते. थंडी वाढायला लागलेली. दोन्ही हातांची घडी घालून, कुडकुडत ती झपाझप चालली होती. अचानक मागून आवाज आला -

" शुक् शुक."

तिची पावलं मंदावली. मनातली भीती अजूनच वर येऊ लागली.‌ पण कदाचित भीतीमुळेच भास झाला असणार असा विचार करून ती अजूनच वेगानं चालू लागली.

" शुक् शुक. ए मुली..." मागून थेट माणसाच्या आवाजात हाक ऐकू आली. तशी ती पटकन थांबली ; पण मागे वळून बघायची तिला हिंमत होईना. कोण जाणे मागे...! ती तशीच खिळून राहिली. तिच्या छातीचे ठोके वाढू लागले. पुन्हा तो आवाज आला -

" ए मुली, कोण गं तू ? इकडे पहा ना ? " आवाज अगदी हळूवार, प्रेमळ होता. ती धीर करून मागे वळून पाहिलं. मागे एक उंच, मजबूत अंगकाठीचा, गोरापान तरूण उभा होता. त्याचे केस जवळपास मानेपर्यंत येत होते. त्याचे कपडे पण जरा विचित्रच होते. सफेद शर्ट, लांब, काळा सूट, काळी पॅंट. आणि त्याचे ते डोळे... धारदार, आणि पाणीदारही. ते डोळे पाहून ती हरखूनच गेली. तिच्याही नकळत जराशी हसली.

" काय गं मुली, नाव काय तुझं ? आणि यावेळी एकटीच कुठे चाललीस." त्याचा आवाजही गोड होता.

" मी गीता. माझ्या घरी चालले होते."

" अगं पण एवढ्या अंधाराचं घराबाहेर रहायचं नाही. तुला भीती नाही वाटत का ? "

" वाटते ना. पण..."

" आणि हे काय ? किती कुडकुडत आहेस ? हे घे..." त्याने आपला सूट उतरवून तिच्या पाठीवरून पांघरला.

" अहो कशाला ? तुम्हाला थंडी वाजेल ना."

" हंहं... नाही. मला थंडी नाही वाजत."

" ऑं... कसं काय ? "

" कारण मी स्ट्रॉंग आहे."

" हो..." त्याच्याकडं कौतुकानं बघत ती म्हणाली. त्याच्याशी बोलता बोलता तिच्या मेंदूवर नकळत कसलीशी झिंग पसरते आहे असं तिला वाटू लागलं.

" तुमचं नाव काय ? "

" माझं नाव डेव्हिड. मीपण माझ्या घरीच चाललो होतो. तर तू दिसलीस. म्हटलं बघावं तरी, कोण आहे ही ब्रेव्ह मुलगी. जी एवढ्या अंधाराची एकटीच रस्त्यावरून चालली आहे. "

त्याच्या बोलण्यानं खुश‌ होऊन ती खुदकन हसली. अशाच त्यांच्या गप्पा सुरू राहिल्या. आपण रस्त्यावर उभे असल्याचंही तिला भान राहिले नाही. पण मग बोलता बोलता तिला काय झालं कळलंच नाही. तो गोड आवाजात प्रेमानं काहीतरी सांगत होता, अन् ती होकार देत होती.त्याचं बोलणं तिला नीट समजतही नव्हतं. तिनं डोळे मिटले, आणि एकदम तिच्या मानेला काहीतरी टोचल्यासारखी वेदना झाली. पुढचं तिला आठवत नव्हतं. शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या घरी होती. आईने सांगितलं की खुप रात्र होऊनही घरी आली नाही, म्हणून तिचे वडील दोन‌ तीन माणसांबरोबर शोधायला बाहेर पडले, तर त्यांना ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेली दिसली."

मध्येच थांबून ठकूआजीने सगळ्यांवरून नजर फिरवली. आजीने जे काही सांगितलं ते आश्चर्यजनक, भीतीदायक होतंच.
मुलं भारावून गेली होती. त्यात आता म्हातारीने आपल्या मोठाल्या डोळ्यांनी फिरवलेल्या नजरेने त्यांच्या भीतीत भरच घातली. काही मुलांनी नकळत हातांची घडी घालून अंग चोरुन घेतलं. छोटू रूपालीला अजूनच बिलगला. रूपाली हलकेच हसत त्याच्या केसांवरून हात‌ फिरवू लागली

" मग काय झालं ? " शिवानीने धीर करून विचारलं.

" तिला जेव्हा घरी घेऊन आले तेव्हा बरीच रात्र झाली होती. मी अशावेळी बाहेर पडत नाही, त्यामुळे मला काही माहितीच नव्हतं. मध्यरात्री मला माझ्या घराबाहेर कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. मी लगबगीने उठून बाहेर जाऊन पाहते तर, बाहेर गीता गुडघ्यांत डोकं खुपसून रडत बसली होती. मी तिच्या जवळ जाऊन तिला हलवत काय झालं ते विचारलं. तिने रडवेल्या चेहऱ्याने वर माझ्याकडे पाहिलं. मी तिला धीर देऊन काय झालं ते विचारल्यावर तिने मला सगळं काही सांगितलं, आणि मानेवरची बारीकशी जखमही दाखवली. नक्की काय झालं असेल हे तिला माहीत नव्हतं. त्यामुळे ती घाबरली होती. ' मला काही होणार नाही ना...' असं ती विचारत होती. मी तिला धीर देऊन काही होणार नाही असं सांगितलं. तसं तिने शांत होऊन हसत मला मिठी मारली. आणि..." शेवटच्या शब्दाला म्हातारीचा चेहरा एकदम बदलला. मोठे डोळे अजूनच मोठे झाले. कपाळाला आठ्या पडल्या.

" आणि.‌.. आणि काय झालं ? " रोहितने भयमिश्रित कुतुहलाने विचारले‌.

" आणि ती मला चावली." चिरक्या, विचित्र आवाजात म्हातारी ओरडली. आणि तिने मान खाली घातली.

पोरं काही वेळ एकमेकांकडे बघत शांत बसली. मग रोहितच उसनं अवसान आणून म्हणाला.

" हॅ ! त्या गीताने पण माझ्यासारखाच ड्रॅक्युलाचा एखादा पिक्चर पाह्यला असेल. आणि रात्री तिला असं स्वप्न पडलं असेल."

" काहीपण बोलतोस तू रोहित." त्याचं बोलणं खोडून काढत शिवानी म्हणाली. " असं असेल तर तिच्या मानेला जखम कशी झाली ? "

" हम्म.." रोहित जरा विचारात पडला. " पण हे कसं शक्य आहे. ड्रॅक्युला तर विदेशातलं भूत आहे. ते इकडे कसं येईल ? "

" का नाही येणार ? " एकदमच, शांत, थंड आवाजात ठकूआजी म्हणाली. सगळ्यांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. तिची मान अजूनही खाली झुकलेली‌ होती. त्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल, किंवा नसेल ; पण ठकूआजीची बोलण्याची ढब एकदम बदलली होती.

" काय ? काय म्हणालात आजी ? " शिवानीने जरा भीत भीतच विचारलं. मात्र आजीने काहीच उत्तर दिलं‌ नाही. काहीच हालचाल केली नाही. सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

" आजी... ठकूआजी.." रूपालीने थोड्या मोठ्या आवाजात हाक मारली. तशी म्हातारी एकदम हळू आवाजात हसू लागली. आता रूपालीलाही काहीतरी वेगळं वाटू लागलं. पोरं तर भेदरून गेली.

" आजी..." पुन्हा रूपालीने आवाज दिला. तशी म्हातारीने मान वर केली. सगळे एकदम दचकून मागे सरकले. म्हातारीच्या मोठ्या बटबटीत डोळ्यांत वेडसर चमक आली होती. आणि... आणि तिच्या वासलेल्या तोंडात पिवळट दात नव्हते. तर त्याजागी पांढरेफटक, बारीकसे ; पण टोकदार सुळे शेकोटीच्या उजेडात चमकत होते.

सगळे धडपडत उठले, आणि दाराच्या दिशेने पळाले. तशी म्हातारी चटकन उठून त्यांच्यामागे धावली. रूपालीने थांबून चपळाईने शेकोटीतलं एक लाकूड ओढून काढलं.

" तिथेच थांब." रूपालीच्या ओरडण्याने म्हातारी जागीच थांबली. आणि मुलंही थांबली.

" रूपाली..." छोटू काळजीने म्हणाला.

" पोरांनो तुम्ही जा. मी येतेच." रूपाली.

मुलांना तिला एकटं सोडून जावंसं वाटेना ; दुसरा पर्याय नव्हता. छोटू आणि बाकीची लहान मुलं आधी ऐकेनाच ; पण शिवानीने त्यांना कसंबसं समजावलं, आणि सगळे बाहेर पडले. मग रूपालीही दरवाजाकडे पळाली. तसं झेप घेऊन तिचा पाय पकडत म्हातारी नरमाईच्या, मऊ आवाजात म्हणाली.

" पोरी... थांब ना."

तसं रूपालीने एकदम थबकून तिच्याकडे पाहिलं. म्हातारी उठायचा प्रयत्न करू लागली‌. रूपालीने तिला मदत करून उभं केलं.

" पोरी मी वाईट न्हाई गं. आता माझ्याबरोबर असं झालं त्याला मी तरी काय करू ? " केविलवाण्या आवाजात म्हातारी म्हणाली. रूपालीचा त्वेष जरा ओसरला. म्हातारीच्या नजरेला नजर भिडताच शरीर आपोआप सैलावू लागलं.

" जगणं पण अवघड झालंय. इच्छा नसून पण माणसाचं रक्त प्यावं लागतंय. मी काय करू ? " म्हातारी रडवेली झाली. रूपालीच्या मनात तिच्याविषयी कणव दाटून आली. खरंच या म्हातारीची काय चूक ? काय हालत झालीये बिचारीची. असा विचार करताना तिची नजर म्हातारीच्या डोळ्यांत गुंतत होती. आता त्या भयानक वाटणाऱ्या डोळ्यांतही तिला काहीतरी जाणवलं. हवंहवंसं वाटणारं.

" पोरी... पोरी मला.." म्हातारी आशेने, आणि जरा शरमेने म्हणाली. रूपालीने हातातलं लाकूड टाकून दिलं. आणि म्हातारीला जवळ घेतलं. हलक्या हाताने तिची काटकुळी मान पकडून तिचं तोंड आपल्या मानेजवळ आणलं. तिच्या शरीराला म्हातारीच्या काठीसारख्या हातांचा विळखा पडला. आणि... तिच्या मानेत ते सुळे रूतले गेले.

" आह् अं..." वेदनेने ती हलकेच विव्हळली. म्हातारीच्या मानेवरचा तिचा हात सैल झाला ; पण तिच्या शरीरावरचा त्या हातांचा विळखा अजूनच घट्ट होत गेला. मग वेदना शमली. आणि जाणवू लागली एक वेगळीच सुखद संवेदना. रूपालीने डोळे मिटून घेतले. त्या संवेदनेत हरवताना ती उभ्या उभ्याच कधी खाली कोसळली हे तिचं तिलाही समजलं नाही.

क्रमशः
© प्रथमेश काटे

भाग दोन - https://www.maayboli.com/node/86011

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बाप रे. शेवटी छान ट्वीस्ट. पुढे काय होणार? पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...