रक्तपिपासू भाग २

Submitted by प्रथमेश काटे on 18 November, 2024 - 10:04

*आज पौर्णिमा होती. टिपूर चांदण्याची झिल‌ई गावावर पसरलेली. आज बऱ्याच दिवसांनी मुलांना आजी कडे गोष्ट ऐकायला जायचं होतं. रस्त्यात एकत्र जमून ते आजीच्या घरापुढे असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले. रस्त्यावर दिव्यांचे खांब होतेच. शिवाय आजूबाजूची घरं रोषणाईने झगमगलेली. त्यामुळे त्यांना कसलीही भीती नव्हती. पण काही अंतर चालून जातात न जातात तोच एकदम मागून आवाज आला -

" ए पोरांनो ? "

आवाज स्त्रीचा होता. मुलं एकदम थबकली. दचकली. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं ; पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं. तो आवाज त्यांच्या चांगल्याच ओळखीचा होता. मुलं पटकन मागे वळाली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच त्यांच्यापुढे रूपा होती. सडपातळ बांध्याची, जराशी सावळी ; पण अत्यंत रेखीव अशी रूपा नावाप्रमाणेच रूपवान होती. देखणी होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यांत नेहमीच खोडकरपणा दडलेला असे. आणि ती होतीही जराशी अवखळ आणि बालिश. आणि म्हणूनच चोवीस वर्षांची असूनही तिची या लहानग्यांबरोबर चांगलीच गट्टी जमली होती. अगदी इतकी, की त्यांच्यातील जरा वयाने मोठी मुलं तर तिला बिनदिक्कत नावाने हाक मारायची.

" रूपाताई..." म्हणत मुलं धावत तिच्या जवळ गेली. त्यांच्यामध्ये सर्वात मोठा असलेला रोहित क्षणभर तिच्याकडे बघत बसला. मग तोही पुढे येऊन जरा अंतरावर उभा राहिला. त्याला रूपाने विचारलं -

" काय रं कुठं चाललात, एवढ्या अंधाराचं ? "

" म्हणजे तुला अजून माहीत झालं नाही ? " विचारणाऱ्या चिमुरड्याच्या आवाजात आश्चर्य होतं.

" काय रे छोटू ? " त्याची हनुवटी बोटांच्या चिमटीत धरून रूपा म्हणाली.

" अगं आज दुपारी आपल्या सखूआजीची बहीण ठकूआजी आलीये, इकडे रहायला. आता ती आम्हाला गोष्टी सांगणार आहे."

" हम्म... मज्जाय आता तुमची.‌ न्हाईतर इतके दिवस तोंडं बारीक करून फिरत होतात." रूपा चेष्टेने म्हणाली.

" काय गं तू पण." शिवानी हसत म्हणाली. " बरं चला आता पटकन. रूपाली तूपण येते का ? "

" हां मग ! असं अंधाराचं तुम्हाला एकटं बरी जाऊ देईल मी ? चला."

" थंडी वाढलीये ना." तो छोटू अंग आक्रसून म्हणाला. " स्वेटर घालून पण..."

" पण आता मी आहे ना." त्याच्या दिशेने बाहू पसरून हसत रूपाली म्हणाली. तसा तो चटकन तिला बिलगला. आणि ते निघाले‌.

ते झाडापाशी येऊन पोहोचले खरे ; पण पाहतात तर तिथे ठकूआजी पण नव्हती आणि शेकोटीही पेटवली नव्हती.

" ऑं ! आजी आली नाही." चिंकी आश्चर्याने म्हणाली. " सखू आजी तर आपण यायच्या आधी शेकोटी पेटवून शेकत बसलेली असायची."

" हो ना." तो छोट्या म्हणाला.

" अरे म्हातारं माणूस हाय. प्रवास करून दमल्या असतील. म्हणून लवकर झोपल्या असतील. चला..."

हताश सुस्कारे सोडून मुलं मागे वळाली. आणि आता निघणार तोच मागे थोड्या अंतरावरून आवाज आला -

" अरे पोरांनो."

सगळ्यांनी चटकन वळून पाहिलं तर सखूआजीच्या घराच्या पडवीच्या दारात ठकू आजी उभी होती. पडवीत मंद उजेड दिसत होता. आजीने पडवीतच शेकोटी पेटवलेली दिसत होती.

" पोरांनो.. अरे कुठं चाललात ? इकडं या."

त्या सगळ्यांनी प्रश्नार्थक नजरेने एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. मग ते घराकडे गेले.

" या." त्यांना आत येताना बघून शेकोटी पलिकडे बसलेली ठकूआजी हसत म्हणाली. तिचं हास्य आताही तसंच होतं. खोटं खोटं वाटणारं ; पण गोष्टी ऐकायला उत्सुक असणाऱ्या पोरांचं आता तिकडे लक्ष नव्हतं. मात्र पहिल्या नजरेत तिचं ते काहीसं भीतीदायक रूप, ते बटबटीत डोळे बघून रूपाच्या चेहऱ्यावर क्षणभर कडवट भाव पसरले ; पण मग तिला स्वतःचीच जरा शरम वाटली. शेवटी म्हातारं माणूस. उतारवयात रूप पालटतच.

" अरे प्रवास करून जरा कंटाळाच आलेला. म्हणून बाहेर यायचं टाळलं. अन् इथंच शेकोटी पेटवली."

" अहो आजी कंटाळा आला असला तर आज आराम करायचा ना ? गोष्टी बिष्टी काय उद्या पण सांगता येतील."

" अं..." म्हातारीचं पहिल्यांदाच तिच्याकडे लक्ष गेलं. " तू कोण गं मुली ? " हसत तिने विचारलं.

" आजी ही रूपाली. आमची मैत्रीण आहे." रूपालीने काही उत्तर देण्याआधी तिचा दंड पकडून छोटूच उत्साहाने म्हणाला. रूपाली हसली.

" अस्सं होय." म्हणून म्हातारी रूपालीला वरून खालपर्यंत न्याहाळू लागली. अन्... पुन्हा तिच्या नजरेत चमक येऊ लागली ; पण ती आत, खोलवर होती. अगदी बारकाईने पाहणाऱ्यालाच दिसू शकली असती. तिचे ओठ पुन्हा थरथरू लागले ; पण हलकेच. मान तिरकी झाली‌. हलकीशीच.

" बरं बरं. या बसा."

सगळे शेकोटीपाशी बसले.

*****

" पोरांनो, तुम्ही सखुआजी कडून हडळ, खवीस वैगेरेंच्या गोष्टी ऐकल्या असतील ; पण मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. काऊंट‌ ड्रॅक्युलाची..."

" काऊंट ड्रॅक्युला ? ते काय असतं ? " चिंकीने उत्सुकतेने विचारलं.

" हो हो. मला माहिती आहे. या ड्रॅक्युलावर पिक्चर्स पण आहेत. मी पाहिला आहे. तो माणसाच्या मानेचा चावा घेऊन त्याचं रक्त पितो. मग तो माणूसही त्याच्या सारखाच बनतो. आणि ते माणसाच्या रक्तावरच जगतात."

" बरोब्बर. हुश्शार दिसतोय हीहीही." समाधानाने होकारार्थी मान हलवत, किंचितसं हसून ठकूआजी म्हणाली.

तिच्याकडे बघताना छोटूला का कोण जाणे तिच्या किंचीत उघडलेल्या तोंडातून डोकावणारे समोरचे दात जरासे लांबट आणि टोकदार वाटले. काउंट ड्रॅक्युला सारखे. जोरजोरात मान झटकून तो रूपालीला अजूनच बिलगला.
क्रमशः
© प्रथमेश काटे

* उशीर लागल्यामुळे कथेतील काळही पुढे ढकलावा लागला.

भाग एक - https://www.maayboli.com/node/85937

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा भागही जमलाय. पण पटकन संपला.
" काय गं तू पण." रूपाली हसत म्हणाली. " बरं चला आता पटकन. रूपाली तूपण येते का ? "
इकडे जरा लक्ष द्या.