ती चिमुरडी आज भलतीच खुश होती. आता त्यांचा दर आठवड्याचा प्रोग्राम सुरु होणार होता. नेहमीसारखा.
आगोटी. साधारण चार-साडे चारशे घरांचं खेडेगाव. जरा लहान असलं तरी चांगलं विकसनशील गाव होतं. बऱ्याच सुखसोयी उपलब्ध झाल्या होत्या. बऱ्याच होऊ घातल्या होत्या. अशा या गावच्या एका छोट्याशा गल्लीत राहणारी ही मुलं. सगळ्यांची घरं एकमेकांपासून थोड्याच अंतरावर होती. त्यामुळे ते एकत्रच असायचे. एकत्र शाळेत जायचे. एकत्र खेळायचे. गल्लीभर बागडायचे. आणि एकत्रच हिवाळ्यातल्या रात्री, गल्लीच्या मध्यावर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली तयार केलेल्या शेकोटीखाली जमून सखू आजीच्या गोष्टी ऐकायचे.
त्या पिंपळाच्या झाडाच्या मागे जवळच सखू आजीचं घर होतं. म्हातारी एकटीच होती. सोबतीला कामासाठी एक गडी असायचा. रात्री नऊ सव्वा नऊच्या सुमारास जेवणे वगैरे आटोपली, की सगळे एक एक करत झाडाखाली जमा व्हायचे. सखू आजी आधीपासूनच शेकोटी पेटवून शेकत बसलेली असायची. मग त्यांच्या गोष्टी रंगायच्या. बरं गोष्टी म्हणजे चिऊ काऊच्या, राजा राणीच्या थोडीच असायच्या ? तर गोष्टी असायच्या भुताखेताच्या. अशाच गोष्टी मुलांना खूप आवडायच्या. भीत भीत, एकमेकांना चिकटून बसत ; पण अगदी मन लावून ते भुताच्या गोष्टी ऐकायचे.म्हातारीही हुशार होती. एखादी गोष्ट कशी रंगवत न्यायची, हे तिला चांगलं माहीत होतच ; पण समोर लहान मुले आहेत तर कुठे, कसं जपायचं तेही कळत होतं. तिच्या गोष्टींत जांभळाच्या झाडावरची विस्कटलेल्या केसांची, लालभडक डोळ्यांची, सुळ्यांसारखे दात असणारी, विद्रूप, भयानक दिसणारी हडळ होती ; पण तिने आपल्या तीक्ष्ण दात आणि नख्यांनी कुणाला ओरबाडलं नव्हतं. रात्री उशिरा दुसऱ्या गावाहून परतणारा विजू निर्जन रस्त्यावर भेटलेल्या त्याच्याच गावच्या खंडू पैलवानाच्या भुतापासून थोडक्यात बचावलेला. ही भुते मुलांच्या मनात बराच काळ घर करून बसायची ; पण त्यांचा धसका घेऊन कोणतंही मूल रात्री मध्येच उठून रडायला लागलं नाही.
पण यावेळी कधी नव्हे ते सखू आजी जवळच्या गावातील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. आता आजी नाही तर त्यांना भूतांच्या भयानक पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी सांगणार कोण ? अर्थात, त्यांच्या गप्पागोष्टी रोजच व्हायच्या अशातल्या भाग नाही ; पण जवळजवळ पंधरा दिवस होत आले तरी आजी आल्या नव्हत्या. म्हणून पोरं जरा हिरमुसली होती. पण त्यांची नाराजी फार वेळ राहिली नाही. घडलं असं -
दिवाळी सुरू झाली होती. हळूहळू थंडीची चाहूल लागू पाहत होती. एरवी, दुपारी कडक राहणारं उनही आता सौम्य पडू लागलं होतं. त्यामुळे दुपारच्या वेळी गल्लीतली मुलं बिनदिक्कतपणे रस्त्यावर खेळत होती. पळत होती. त्यांच्यात सगळ्यात लहान असलेल्या मिनीच्या खोड्या काढत होते. शेवटी ती लहानगी गाल फुगवून आणि हातांची घडी घालून कडेला जाऊन उभी राहिली. मागे त्या मुलांच्या खुसखुसण्याचा आवाज येताच तिच्या रागात भरच पडली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवला. ती काहीतरी ऐकवण्यासाठी एकदम आवेशात मागे वळाली ; पण मागे शिवानी दिदीला पाहून ती एकदम गप्प झाली. शिवानी तिची लाडकी दीदी होती. चांगली उंच. नाजूकशी. गोरीपान. नाकी डोळी नीटस अशी शिवानी दीदी मिनीला खाऊ द्यायची. तिचे लाड करायची. खेळताना जेव्हा मुलं खोडी काढत, आणि ती अशी रूसून बसायची तेव्हा शिवानी त्या मुलांना रागे भरून मिनीची समजूत काढत असे. आजही तसंच झालं होतं.
" ए मिनू. अगं कितीवेळा म्हटलं ना तुला. त्यांच्या चिडवण्याकडे लक्ष नाही द्यायचं. ते तुझी मस्करी करतात गं. आमची लाडकी आहेस ना तू मिनूताई." तिचा गालगुच्चा घेत प्रेमळ स्वरात शिवानी म्हणाली ; पण मिनूताई बहुतेक खूपच रागावली होती. तिनं भुवया आक्रसून झटक्याने मान फिरवली. आणि तिचा चेहरा हळूहळू बदलला. ती नवलाने, आणि किंचीत भीतीने तिकडे बघत राहिली.
" ए मिनी. चल ना." शिवानी.
" दीदी..." नजरेनेच पुढे पाहण्याची खूण करीत काहीशा खालच्या आवाजात मिनी म्हणाली. तिची तशी प्रतिक्रिया पाहून मिनीला आश्चर्य वाटलं. तिनेही मान वळवून पाहिले. आणि तिच्याही मनाला किंचीत भीतीचा स्पर्श झाला. रस्त्यावरून एक जख्खड म्हातारी दमा दमाने चालत त्यांच्याच दिशेने येत होती. मिनी आणि शिवानीच्या भिण्याचं कारण म्हणजे त्या म्हातारीचा एकदम उरात धडकी भरवणारा भयावह चेहरा. पिंजारलेले करडे केस, सुरकुतलेला चेहरा, मोठे, बटबटीत डोळे, लांबट नाक. थरथरत्या ओठांमधून डोकावणारे पिवळे धम्मक दात, असं तिचं रूप बघून लहान मुलंच काय मोठी माणसंही तिच्या पासून दूर दूरच राहिली असती. ती म्हातारी त्या दोघींजवळ येऊन पोहोचली.
" काय गं मुलींनो. तुम्ही इथंच राहता ना ? " हसत हसत आपल्या खरखरीत आवाजात तिने विचारलं. शिवानी आणि मिनीने एकमेकींकडे पाहिलं. मिनीच्या चेहऱ्यावर नापसंती स्पष्ट दिसत होती. म्हातारी कडे वळून ओठांवर जरासं हसू आणत शिवानी म्हणाली -
" होय आजी. आम्ही इथे जवळच राहतो."
" अस्सं. नाव काय गं तुझं ? "
" माझं नाव शिवानी."
" वा वा." पसंतीने म्हातारीनं मान डोलावली. आणि मिनीला प्रश्न केला. " आणि तुझं गं काय नाव छोटे ? "
" मिनी." गंभीर चेहऱ्याने, शांतपणे मिनी एवढंच म्हणाली. शिवानीला गंमत वाटली. मिनीला ही आजीबाई फारशी आवडली नाही हे तिनं ओळखलं.
" हो का ? बरं." मिनीचा ठसकेबाजपणा पाहून त्या म्हातारीलाही आश्चर्य वाटलं. एव्हाना त्या बाकीच्या मुलांचही त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं. खेळ थांबवून तेही या तिघींकडे आले होते. मात्र सगळे थोड्या अंतरावरच थांबले. त्या सर्वांच्या प्रतिक्रियाही फारशा अनुकूल दिसत नव्हत्या. जे फार लहान होते, त्यांचे चेहरे काहीसे भेदरलेले दिसत होते. तर जे थोडेसे मोठे होते त्यांच्या चेहऱ्यावर जरा नापसंतीच होती.
" आजी." त्या मुलांकडे बोट दाखवून शिवानी म्हणाली " हे सगळे आमचे मित्र आहेत. हेसुद्धा इथे जवळच राहतात."
" अस्सं का ? अरे मुलांनो तिथेच का उभे राहिलात. या की पुढे." आपले मोठमोठे डोळे त्या मुलांवर रोखत, पिवळट दात दाखवून हसत म्हातारी म्हणाली." मात्र ती मुलं जागेवरून तसूभरही पुढे सरकली नाहीत. म्हातारीचा तो कळकट, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भयानक अवतार बघून त्यांना जवळ जाण्याची इच्छाच झाली नाही. आणि का कोण जाणे म्हातारीचं ते तसं हसणं त्यांना जरा खोटं खोटं, नाटकीच वाटलं.
ते पुढे येत नाहीत असं पाहून म्हातारी जरा नाराज झाल्यासारखी वाटली ; पण क्षणभरच. पुन्हा हसत ती म्हणाली -
" बरं मुलांनो तुम्हाला ठाऊकच नसेल ना. तुमची लाडकी सखू आजी आहे ना, तिची मी धाकटी बहीण. ठकूबाई माझं नाव. तुम्ही सगळे मला ठकूआजी म्हणा."
तिने असं म्हणताच एकदम मिनी सोडून सगळ्याच मुलांचे चेहरे उजळले. खासकरून शिवालीला खूप आनंद झाला.
" आजी पाया पडते." तिने चटकन खाली वाकून म्हातारीला नमस्कार केला. मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांना आनंद झाल्याचं स्पष्ट दिसत होतच ; पण तरी पुढे त्या ठकू आजीच्या जवळ जाण्याचं धाडस त्यांना होईना.
" अरे अरे." शिवानी पायावर वाकताच म्हातारीला आनंद झाला. शिवालीला तिने खांदे धरून उठवलं " वा. तू तर खूपच शहाणी आहेस गं. खूप गोड आहेस." तिच्या गालांवर, खांद्यावर, पाठीवर आपला काटकुळा, खरखरीत हात लगबगीने फिरवत म्हातारी म्हणाली. बोलताना तिची मान तिरकी झाली. डोळ्यांत जरा वेडसर झाक उमटली. ओठ थरथरु लागले. तिची तशी प्रतिक्रिया छोट्या मिनीलाही खटकली. शिवानीलाही म्हातारीच्या स्पर्शात, तिच्या हावभावांत काहीतरी वेगळं वाटलं. मात्र ते वेगळं म्हणजे काय हे तिचं तिलाच समजत नव्हतं. तिच्या कोवळ्या शरीरावरून आवेगाने फिरणाऱ्या त्या खरखरीत हाताच्या स्पर्शांत, आणि त्या वेडगळ भाव पसरलेल्या चेहऱ्यावर एकप्रकारची लालसा होती. वखवखलेपणा होता, हे समजण्याचं छोट्या शिवानीचं वय नव्हतं. मात्र शरीर आक्रसून घ्यावंसं वाटत होतं. संकोच वाटत होता. पण ओठांवर हसू कायम ठेवत ती शांत राहिली. एकतर कुणाला दुखावण्याचा तिचा स्वभाव नव्हता. आणि ही आजी त्यांच्या लाडक्या सखू आजीचीच तर बहीण होती.
मग म्हातारीची नजर मिनी वर पडली.
" काय गं छोटे, अशी काय पाहतेस ? " असं म्हणत ठकू आजीने हात पुढे केला ; पण मिनी चटकन एक पाऊल मागे सरली. आणि भुवया आक्रसून तिच्याकडे बघू लागली. ते पाहून शिवानीला तर खुदकन हसूच आलं ; पण म्हातारीकडे पाहताच तिच्या ओठांवरचं हास्य मावळलं. म्हातारी एकदम गंभीर झाली होती. क्षणभरच तिच्या डोळ्यांत क्रूरता, जहरी संताप उमटला. मात्र लगेच तिने स्वतःला सावरलं.
" हात लावलेला आवडत नाही वाटतं छोटूबाईला, अं ?? बरं, बरं. असू दे." ती ठकू आजी मोकळं हसत म्हणाली ; पण मघाशी तिच्या नजरेत उमटलेले भाव मिनीच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हते. तिला जरासा धक्काच बसला होता.
" बरं मुलांनो, तुमच्या सखू आजीने मला सांगितलं. की ती तुम्हाला गोष्टी सांगते. तुम्हाला भुताखेतांच्या खूप आवडतात ना."
" हो." त्या मुलांमधला एक जण पटकन म्हणाला. " पण आता खूप दिवस झाले आजीला दुसऱ्या गावी जाऊन."
" हम्म." म्हातारी हुंकारली. " पण आता मी आलीये ना. मी सांगेल तुम्हाला गोष्टी. भुताच्या."
" खरं..." तो मुलगा आश्चर्याने म्हणाला. " तुम्हाला येतात भुताच्या गोष्टी."
" येतात का ? हीहीही." म्हातारी गंमत वाटल्यासारखी खदाखदा हसली. तिचं तसं हसणही जरा भीतीदायकच होतं. " बघालच. कधी तुमच्या कानावर पडल्या नसतील अशा गोष्टी सांगेल. रात्री अंथरुणात सूसू कराल, भितीने. हीहीही." पुन्हा ती खदखदून हसली. पण आता कुणी घाबरलं नाही. आता ही नवी आजी गोष्टी सांगणार म्हटल्यावर सगळ्यांचेच चेहरे उजळले. अगदी इतकावेळ रागात असलेली मिनीही आनंदली. आणि शिवानी म्हातारीची ती मघाची नजर, आणि मनातली भीती एकदम विसरून गेली.
" काय ? मग, आज रात्री या हं. पिंपळाच्या झाडाखाली."
" हो." मुलं एकसुरात ओरडली.
" बरं चला. जा आता खेळायला. मी घरी जाऊन जरा आराम करते. आणि हो... दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! "
" हो, तुम्हाला पण." " हॅप्पी दिवाली." पुन्हा सगळी मुलं एकत्रच म्हणाली. आणि खेळायला गेली.
काही क्षण म्हातारी त्यांच्याकडे बघत राहिली. अन् एकदम तिच्या डोळ्यांत एक निराळीच चमक येऊन गेली. ती नजर चांगली नव्हती. बिलकुल नव्हती.
क्रमशः
© प्रथमेश काटे
छान सुरुवात...!
छान सुरुवात...!
तुमची शैली दिवसेंदिवस सफाईदार
तुमची शैली दिवसेंदिवस सफाईदार होत चालली आहे. ठकू आजी डोळ्यांसमोर उभी राहिली. आता आजीचा काय डाव आहे? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
क्रमशः
क्रमशः
© प्रथमेश काटे>>> पुढचा भाग ?
तुमची शैली दिवसेंदिवस सफाईदार
तुमची शैली दिवसेंदिवस सफाईदार होत चालली आहे. ठकू आजी डोळ्यांसमोर उभी राहिली. आता आजीचा काय डाव आहे? पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. >> इतकं Detailed कौतुक पहिल्यांदाच अनुभवतोय थॅंक्यू.
पुढील भाग पोस्ट केला आहे.