बीटरूटची गुलाबो

Submitted by अनिंद्य on 13 November, 2024 - 03:55

काही घरात कुणालाच बीटरूट आवडत नाहीत. मग त्या घरातलेच काही लोक मुद्दाम बीटरूट आणतात बाजारातून. एक दोन न आणता चांगले ४-५ आणतात. तो पदार्थ कुणाच्याही घश्याखाली नाही उतरत ना ? मग असे सर्वच पदार्थ जास्त प्रमाणात आणायचे असतात, तसा नियमच आहे. बीटरूटचा अपवाद करता येत नाही. का करावा ?

IMG_7527.jpeg

पुढचा संपूर्ण दिवस बीटरूट पिशवीतून काढणे, त्यांना दोन तीन पाण्यात न्हाऊनमाखून स्वच्छ करणे, कोरडे करून एका जागी ठेऊन मग काही वेळाने ती जागा बदलणे असे काहीजण करतात. तसे करायलाही पाहिजे. मग तोपर्यंत संध्याकाळ होते. मग आपले जे काही ठरले असेल ते डिनर रांधावे, खावे, झोपी जावे असा परिपाठ आहे.

सकाळी बीटरूट दिसले की “कौन नामुराद ये खाएंगा क्या जाने” असे मोठ्याने म्हणतात, म्हणावे. याऐवजी दुसरे सुयोग्य शब्द योजण्याची मुभा आहे, ती सोय वापरता येते. काहीही म्हटले तरी कुणीच ते ऐकत नाही किंवा ऐकले तरी न ऐकल्या सारखे करतात, त्याकडे दुर्लक्ष करावे लागते.

किचनमधली आपली सर्व कामे उरकून नोकरी-धंदा, wfh, क्लिनिक, ऑफिस, शाळा- कॉलेज जे काही असेल ते करण्यासाठी मेंबरं पांगतात. तत्पूर्वी कुणीतरी सर्व बीटरूटांना आठवणीने फ्रिजमधे ढकलावे लागते कारण बाहेर ठेवले तर ते लवकर पिकतात. या स्टेजला बीटरूट ऑलरेडी लाजू लागलेले असतात. सेम टू सेम टमाट्यांसारखे. Blushing Beetroot Red असे उगाच नाही म्हणत साहेबाच्या भाषेत. त्या भाषेला आपल्याकडे आधी वाघिणीचे दूध असे म्हणत. आता आपण ते दूध नासवून त्याचं पनीर केलयं. पण तो आपला चर्चाविषय नाही. एक मिनिट, That reminds me - फ्रिजमधे फ्रेश दुधाचं केलेलं पाढरं शुभ्र पनीर आहे ठेवलेलं. त्याचं कांपोस्ट ख़त होणार की ते मनुष्यमुखी पडणार हे गुपित ब्रम्हदेवालाच माहिताय. ब्रम्हदेवांना आणि त्यांच्या पिताश्रींना ठाउक असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी हा एका गंभीर चर्चेचा विषय आहे. पण ते आत्ताच नको.

Cut to evening.

आता बहुतेक कामं संपली आहेत. नेहेमीपेक्षा थोडी लवकरच. चहासाठी दूध पाहिजे म्हणून ते शीतकपाट उघडले जातेय. (Refrigerator ला फ्रिज आणि मग शीतकपाट असे चढत्या भाजणीने भारी शब्द लेखक वापरतो आहे, त्याचं लॉजिक समजून घ्या) तर तिथे जुन्या जमान्यातल्या नवीन नवरीसारखे लाजून चूर झालेले बीटरूट सलज्ज मुखाने तुमच्याकडे बघतील, बघतात. “आँखों की गुस्ताखीयाँ माफ हों” असे गाणेही वाजेल, वाजते ब्यागराउंडला. कैसे बचोगे ? सोचो सोचो.

आता चहा तर झाला. भूक लागलीच आहे. ते लाजरे साजरे बीटरूट कधीही मुसमुसून रडायला येतील या स्टेजला आहेत. चढती जवानी मेरी .. तू ने कदर ना जानी रामा असे गाणे ब्यागराउंडला वाजते आहे. उस दर्द को समझो. फ्रिजच्या पडदयाआड असले तरी बीटरूट डोळ्यांसमोरच आहेत. “ये जो चिलमन है दुश्मन है हमारी” गात आहेत.

बहुत हो गया. हीच ती वेळ. फैसले की घडी. आता तो प्रश्न उभा ठाकलाय. यक्ष की गंधर्व प्रश्न म्हणतात तोच. तारुण्याने मुसमुसलेले, मदनभार मज सोसवेना अशी अवस्था असलेले बीटरूट आता आत्महत्या करतील त्याआधी त्यांचा काहीतरी खाणेबल पदार्थ रांधण्याचे काम ज़बरदस्तीने ओढवून घेणारा नरपुंगव कोण ? (नारीपुंगवी असा शब्द आहे का? कुठाय रे तो मराठी बृहद्कोष ? ) कोण हे गांडीव उचलणार ? लाख टके का सवाल. सीता-द्रौपदीच्या स्वयंवरासारखे रामार्जुनाच्या धनुष्याचे रोमांचक टणत्कार ह्या कर्णसंपुटांना कधी चुंबणार ? Time freezes. समय जैसे रुक गया है.

तेव्हढ्यात वीज लकाकते. समस्त सरीसृप जागीच थबकतात. एक पुरंध्री आणि तिचा प्राणसखा दोघे ताडकन उठतात. उतणार नाही मातणार नाही असे मूक आश्वासन एकमेकांना देतात. आँखों आँखों मे.

युद्धाला तोंडच काय हात, पाय, नाक, कान फुटतात. चारदोन बटाटे उकडले जातात.त्यांच्या सोबतीला कॉर्न दाणे उकळत्या पाण्यात सती जातात. हिरव्या मिरच्या, कांदे आणि कोथिंबिराच्या जुडीचे निर्घृण हत्याकांड घडते. काट कर बोटी बोटी ! उडवीन चिंधड्या राई राई एव्हढ्या.

तिकडे बीटरूट हसतात, सवयीने पुन्हा लाजून चूर होतात. पण आता माघार नाही. त्यांना आधी स्टीम बाथ. मग हार्ड स्किन रब. मग किस द किसणीचा खेळ. सगळीकडे रंग गुलाबी ! आता ? अब पिया मिलन को जाना.

तापलेले, खुडलेले, भाजलेले वरचे सर्व कलाकार सब दुख दर्द भूल के एकत्र जमतात. “हम साथ साथ हैं” चे आश्वासक सूर शिंपतात. नेहेमीचे मसाले धावून येतात. हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं म्हणणारा black salt विशेष अतिथी. रायगडाप्रमाणे इथे ब्रह्मदेवाला जाग येते - मोक्षासाठी फ्रिजमधे कठोर तपस्या करित असलेले पनीर धावून येते, स्वत:ला या गर्दीत झोकून द्यायला. भेटी लागे जीवा चे एक आर्त आवर्तन !

इन सब रोमांचकारी घटनाओं का नतीजा : गुलाबो उर्फ़ पिंक टिक्की उर्फ़ blushing cutlets Happy गुल खिले गुलाबी, मौसम हुआ गुलाबी. जोडीला आनंदी आनंद गडे. सांगू मी सांगू कुणाला वगैरे.

Why should pink pasta and pink wine steal all the glam ? मेरे बीटरूट किसी से कम है के ? 869a6b5c-e507-432b-b7f2-de0b0260f1a3.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.. बीट स्वतःचीच वाटीभर साखर घेउन येते..

बरोबर. बीट high on sugar असतेच. ब्राझील आणि काही अफ़्रीकन देश बीटपासून साखर तयार करतात. आपल्याकडे इंदापुरमधे गुलाबी बीटसाखरेचा प्रयोग झालेला मी पाहिलाय, पण तो स्केल अप नाही झाला बहुतेक.

@ माधव,

ते ओले खजूर आता येतीलच. मुंबई उपनगरात विलेपार्ले-सांताकृज, बोरीवली, मुलुंड इथल्या भाजी मंडईत दिसतील. आणले- लोणचे केले तर जरुर लिहीन इथे सचित्र वृत्तांत.

@ रेडीमेड खजूर लोणचे विकतचे - बरेच ब्राण्ड विकतात पण ते सर्वच पिकलेल्या खजूराचे लोणचे विकतात ; too sweet for my tongue.

एक खुष्कीचा मार्ग ओल्या खजूराचे लोणचे आयते खायला - संयुक्त कुटुम्बात राहाणाऱ्या तुमच्या गुज्जू मित्रांकडे चौकशी / तारीफ करा, चान्स आहे.

Submitted by अनिंद्य on 14 November, 2024 - 22:22>>>>> कोकणात सोलकढी नामक एक पेय असते . त्यात गुलाबी रंग येण्यासाठी बीटचा एक तुकडा टाकतात . नवऱ्याच्या माहेरी पद्धत आहे.
कर्ली टेल्सचा आशा भोसले यांच्यासोबतचा एक व्हिडीओ आहे
त्यात त्यानीही बीटचा तुकडा घाला सोळकढी बनवताना असे सांगितलं आहे

आमसुलं / आगळ नवे असतील ( अंदाजे < ८-९ महिने) तर मस्त गुलाबी रंग येतो सोलकढीला. जुने असतील तर गढूळ पाण्यात थेंबभर पोटॅशिअम परमँग्नेट टाकल्यासारखा विचीत्र रंग येतो. चवीत मात्र काही फरक पडत नाही.

बीट वापरायची आयडीया एकदम मेंटॉस आहे.

आमच्या घरी बिटे येतात, रोज खायलाच हवी रक्त वाढते हा मंत्र जपत. आल्यावर काही दिवस ती शितकपाटात निद्रिस्त राहतात. आरोग्यदायी खायचा किडा जोरात चावु लागला की बाहेर येतात आणि टोमॅटोबरोबर संसार थाटतात. ते टोमॅटोही ‘आज आपले सुप होणारच‘ ही पैज रोज एकमेकांशी लावत असतात. पैजेत हरलेले टोमॅटो पानी पानी होतात.. हे पाणी टोपल्याखालुन दिसायला लागले की तो टोमॅटो टोपल्यातुन काढायचा व बाकिच्यांना परत पैज लावायला सोडुन द्यायचे. यथावकाश बिटांना कळते, टोमॅटोसोबतच्या संसारात काही राम नाही. संसारातील मन उडते, ते हिरमुसायला लागतात… हिरमसुन अगदी इवलाले झाले की माझे लक्ष जाते.. अरे देवा, हा कुठला प्राणी मरुन पडलाय टोमॅटोत असे म्हणत मी त्या प्राण्याला उलटासुलटा करुन पाहते तेव्हा लक्षात येते, हा तर हिरमुसुन सुकलेला बिट. असे पैसे वाया घालवणे बरोबर नाही, उद्याच बिट आणुया. केरळ स्ट्याईल भाजी नैतर कोशिंबीर रात्री करायचीच असे म्हणत मी आधी आणलेल्या बिटाला कंपोस्टात सद्गती देते. दुसर्‍या दिवशी परत मागील पानावरुन प्रकरण पुढे सुरु..

एका बिटाचे नशिब फळफळले आणि आज तो गुलाबो बनुन अवतरला एकदाचा…. Happy

लिखाण व रेसिपी दोन्ही भारी, धन्यवाद.

छान लिहिलंय साधना.
+ १

बीट आज गुलाबो बनुन अवतरला .. जय हो !

बिट सारखा चवदार प्रकार लोकांना का आवडत नसावा?

असे लेख पाडता यावे म्हणून केलेला त्याग आहे तो Lol

आज शीतकपाटात लपून बसलेल्या एका नाठाळ बीटरूटचा जीव घेतला. Lol

a046341f-ac13-4295-bb85-348f91fa3514.jpeg

खाणेबल झालेला बीटरूट पराठा + कोथिंबीर चटणी.

Hi please check jagu id recipe of nakshidar paratha very pretty

>>>>> एका नाठाळ बीटरूटचा जीव घेतला. Lol
हाहाहा
आम्ही कॉस्टको मधुन उकडलेले बीट आणतो. सँडविचमध्ये मस्त लागतात. म्हणजे बीट जितके मस्त लागू शकतील तितके. Happy

हुश्श आली एकदाची गुलाबो! मला वाटलं नुसतंच बिटींग अराउण्ड द बुश करताहात.

ट्राय केली पाहिजे गुलाबो. बाकी आमच्याकडे हिरवी मिरची, कढिपत्त्याच्या फोडणीत बीटाची कोशिंबीर व वरून मीठ, शेंगदाणा कुट आणि दही ही साधीसोपी रेसिपी आवडते. बाकी मेंब्रं दही + शेंकु जपून जपून खातात, मी मात्र ते सढळहस्ते घेते. सर्व जेवण संपवून चाखत माखत बीटाची कोशिंबीर खायला आवडते. माझी एक धारवाडी मैत्रिण बीटाची पानांसकट भाजी बनवते पण मला काही आवडत नाही. बीटाचा हलवा कुणी करून दिला तर खाईन.
नवमाता असताना लेकीसाठी बीटाचे पराठे करायचे. पण तिला नुसताच पहायला आवडायचा. मग बंद केलं.

हिरमसुन अगदी इवलाले झाले की माझे लक्ष जाते.. अरे देवा, हा कुठला प्राणी मरुन पडलाय टोमॅटोत. >> साधना, अगदी अगदी. आख्खे सालासकट उकडलेले बीट जास्त दिवस फ्रिजात राहिले की मेलेल्या उंदरासारखे दिसतात.

खुसखुशीत लेख आणि तेवढेच खुसखुशीत प्रतिसाद. मजा आली.
आमच्या कडे आवडतं बीट. म्हणजे एवढी मारामारी नाही करावी लागत. मी उकडून गरम असतानाच स्लाईस करून खाते, लेकाला पण आवडतं तसं. आणि मला कोशिंबीर पण खूप आवडते with or without दही. दोन्ही प्रकार आवडतात. कधी सुपात पण मोक्ष मिळतो बीटाला कधी कधी. फक्त फार बीट खाल्लं की दुसऱ्या दिवशी दचकायला होतं Lol
>>>हिरमसुन अगदी इवलाले झाले की माझे लक्ष जाते.. अरे देवा, हा कुठला प्राणी मरुन पडलाय टोमॅटोत. >> साधना, अगदी अगदी शेंडी तर शेपटीच वाटते.

साधनाची अख्खी पोस्ट, प्राणी, उंदीर, तिला नुसताच पहायला आवडायचा, दचकणे Rofl
बीट स्वतःचीच वाटीभर साखर घेउन येते..>>>>>>>> डायबेटीस असलेल्यांनी खाऊ नये का मग अजिबात?

.. डायबेटीस असलेल्यांनी खाऊ नये का मग अजिबात?…

मधुमेहाचे डॉ आणि आहारतज्ञ योग्य सल्ला देतीलच. सर्वसाधारणपणे मधुमेहींसाठी जे डाएट सुचवलेले असते त्यात बीटरूट

“ Eat sparingly “ विभागात असते.

हिरमुसलेला बीट जसा दिसतो त्यावरुन मला आणुन ठेऊ नका, लगेच काय ते करुन मोकळे व्हा हेच तो सांगतोय.. Happy

आख्खे सालासकट उकडलेले बीट जास्त दिवस फ्रिजात राहिले की मेलेल्या उंदरासारखे दिसतात. <<
सांभाळा मग..
पाठोपाठ सापही येतील..
म्हणजे पडवळ वगैरे..

Pages