प्रिया आज माझी....(छोटीशी भयकथा)

Submitted by प्रथमेश काटे on 16 October, 2024 - 12:21

" प्रिया आज माझी...
नसे साथ द्याया.."

रात्रीच्या शांत, स्तब्ध वातावरणात तो मंजुळ आवाज मंद मंद वाऱ्यावर तरंगत, चहूकडे पसरला. चांदण्यांच्या मंद, चंदेरी झिलईने जणू टेकडीवर पांघरूण घातलं होतं. त्या टेकडीवर तो उभा होता. एकटाच. आजूबाजूला दूर दूरपर्यंत चिटपाखरूही नव्हतं. मंजुळ आवाजातील त्याची गायकी ऐकायला, त्याचं कौतुक करायला, त्याला प्रोत्साहित करायला तिथे कुणीही नव्हतं ; पण त्या तरूणाला त्याची फिकीर नव्हती, अन् गरजही नव्हती. त्याला एकांत हवा होता. त्यासाठीच तो इथे आला होता. गावापासून जरा दूर, या निर्जन टेकडीवर. इथे फक्त त्याचे भावदर्शी सूर त्याच्या सोबत होते.

पण फक्त एकांताची गरज म्हणून तो इथे आला नव्हता. ही त्यांची नेहमीची, ठरलेली जागा होती. तो आणि त्याची पत्नी बऱ्याचदा रात्रीचे इथे यायचे. इथे तो तिला आपल्या गोड आवाजात गाणी ऐकवायचा. ती ऐकण्यात ती तल्लीन होऊन जायची. मग इथेच त्यांच्या प्रणय चेष्टा रंगत. अशा कितीतरी रात्रींच्या, आणि तिच्या गोड आठवणींमध्ये तो गुंग होऊन गेला होता. भावूक झाला होता. ती भावूकता हळूहळू स्वरात उतरत होती.

" नको पारिजाता धरा भुषवू ही.
पदांची तिच्या.. आज चाहूल नाही.
प्रियेविण..."

तो गाण्यात असा गुंग झालेला असताना मध्येच त्याला पाठीमागे कुणाचीतरी चाहूल लागली. अगदी अस्पष्ट. दूरवर. तो गाता गाता मध्येच थबकला. तो कुणाच्या पावलांचा आवाज होता का ? मनात एकदम विचार आला ; पण अशा आडवेळेला या निर्जन जागी कोण येणार ? त्याने तो विचार झटकून टाकला ; पुन्हा त्याचं मन गतकाळातील आठवणींमध्ये हरवलं. आणि त्यात पुन्हा ती, 'त्या' रात्रीची आठवण आली. झंझावातासारखी.

•••••••

तो गात होता, अन् त्याच्या घट्ट मिठीत असलेली ती नेहमीसारखी तल्लीन होऊन ऐकत होती. कुठलंसं हिंदी रोमॅंटिक सॉंग तो म्हणत होता. शब्दांमधली आतुरता त्याच्या आवाजातही उतरली होती. ती आतुरता जणू आपल्याला साद घालत आहे, असं तिला वाटून गेलं. आपण त्याच्या जवळच आहोत हे व्यक्त करण्यासाठी ती त्याला अजूनच बिलगली. गाता गाता त्याने तिच्याकडे पाहिलं, आणि तिच्या मनातलं ओळखून तिला अजूनच जवळ ओढलं. ती सुखावली. पुन्हा तो गाण्यात गुंगला. गाणं पूर्ण झालं. क्षणभर स्तब्धता. तो समोर पाहत होता. अन् तिची नजर त्याच्यावर खिळलेली. त्याच्या गालावर हात ठेवून त्याचा चेहरा तिनं स्वतःकडे वळवला. दोघांची नजर एकमेकांना भिडली. आणि... तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याला बिलकूल कल्पना नसल्याने तो आधी जरा गडबडला ; पण मग त्यानेही तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आपल्या कणखर बाहूंनी तिला बद्ध केलं. जरा वेळाने ते एकमेकांपासून अलग झाले. तो नवलाने तिच्याकडे पाहत होता. तशी ती बऱ्यापैकी बिनधास्त होती. या टेकडीवर, रात्रीच्या एकांतात तिने त्याला कधी फार अडवलं नव्हतं. उलट, आधी ' अशा जागी हे सगळं बरं दिसत का ? ' असं लटक्या रागाने दटावून मग प्रतिसादच दिला होता ; पण आज तर तिने स्वतःहून पुढाकार घेतला होता. म्हणून हे नवल होतं. त्याचा चकित झालेला चेहरा पाहून ती लाजली. त्याच्या नजरेला नजर देणं अशक्य होऊन ती चटकन उठली, आणि धावत जराशी दूर जाऊन उभी राहिली. त्याने जागेवरूनच क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. त्याच्या ओठांची कड वर चढली. तोही उठून हळूच तिच्या जवळ गेला. आणि त्याने तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले. तिने हलकेच डोळे मिटले. ती ते सुख अनुभवत असतानाच त्याने खसकन तिला आपल्याकडे वळवलं. त्याचा तो रांगडा आवेशही तिला आवडायचा. त्याने पुन्हा तिला किस करण्याचा प्रयत्न करताच ती चटकन मागे सरली. तो जसजसा तिच्या जवळ जायचा तशी ती मागे सरायची ; पण एकदम हात वर करून त्यानं तिला थांबवलं. मागे टेकडी ची कडा असणार हे लगेच तिच्या लक्षात आलं. त्याची काळजी पाहून ती सुखावली. तिच्या ओठांवर हसू उमटलं. नजरेनेच तिनं त्याला जवळ बोलावलं ; पण पुढे न सरता त्याने हात पुढे करून तिच्या गालावर ठेवला, आणि अंगठा हळूच तिच्या ओठांवरून फिरवला. तिने पुन्हा डोळे मिटले. तिच्या मऊशार गळ्यावरून त्याची बोटं अलगद खाली सरकू लागली. तिच्या शरीरावर उठलेला शहारा त्याला जाणवला. मग त्याने पुढे पाऊल टाकलं ; पण बहुदा त्याचा पाय खड्यावर पडला. त्याचा जरासाच तोल गेला ; पण... त्याच्या धक्क्याने ती मागे कोसळली. त्याने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला ; पण तो व्यर्थ ठरला.

•••••••

त्या आठवणीने पुन्हा त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याने डोळे झाकले. जवळ कदाचित पुन्हा हालचाल जाणवली ; पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. तो स्वतःच्याच तंद्रीत होता. त्याच्या रूद्ध कंठातून स्वर जरासे अडखळत बाहेर पडले.

" न शांती जीवाला...
न प्राणास धीर..
कसा आज कंठात येईल सूर ? "

त्याच्या तोंडून शेवटचा शब्द बाहेर पडतो न पडतो तोच मागून हाक आली.

" मनोज."

आवाज अगदी ओळखीचा होता. तो गर्रकन मागे वळला. त्याच्या समोर ती उभी होती. सोनाली ! त्याची बायको !! पण.. पण हे कसं शक्य होतं ? सोनाली तर... इथेच...

" सो.. सोनाली. तू." तो आश्चर्याने उद्गारला. त्याच्या शब्दांत नवल, शंका, भीती असे संमिश्र भाव होते.

" हो. मीच. सोनाली. तुझी लाडकी सोनाली." ती अत्यंत नरमाईच्या, प्रेमळ स्वरात म्हणाली.

" पण... पण तू तर.."

" हो. माझा मृत्यू झाला ; पण तूच म्हणायचास नं. प्रेमात खूप ताकद असते. त्या ताकदीमुळेच मी पुन्हा या जगात परतू शकले."

" नाही." तो मोठ्याने म्हणाला. " हे शक्य नाही. हा.. हा नक्कीच माझा भास आहे."

" नाही मनु. खरंच मी आलीये. तुला भेटायला. आणि... आणि तुला माझ्यासोबत न्यायला." तिच्या आवाजात काहीतरी हरवलेलं गवसल्याचा आनंद होता.

" क्... काय ?? " तो जवळ जवळ किंचाळलाच.

" होय."

तो जोरजोरात नकारार्थी मान हलवू लागला.

" असं रे काय करतोस मनू. कशी राहू मी तुझ्याशिवाय ? आणि तू तरी कसा राहशील ? बघ काय हाल करून घेतले आहेस स्वतःचे."

" मी... मी. त्..ते. प..पण."

" पण काय ? तुझ्या सोनालीचं ऐकणार नाहीस का ? चल ना.

" नाही... नाही.. नको." त्याच्या आवाजात स्पष्ट भीती झळकत होती.

" असा नकार नको ना रे देऊस." तिच्या स्वरात वेदना होती. " खरंच तुझ्याशिवाय राहणं शक्य नाहीये रे मला. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर."

" पण... पण माझं नाहीये तुझ्यावर प्रेम." तो जवळजवळ किंचाळलाच. मग आपली चूक त्याच्या लक्षात आली‌ ; पण आता उशीर झाला होता.

काही क्षण त्या निर्जन टेकडीवर शांतता पसरली. स्तब्ध नि:शब्द शांतता.

" मनोज.." तिच्या आवाजाने ती शांतता भंगली ; पण मघाचं दु:ख, वेदना गेली होती. होता फक्त कोरडेपणा.

" हो. हो सोनाली. माझं तुझ्यावर प्रेम नाही. मला दुसरी एक मुलगी आवडते." त्याची मान खाली झुकलेली‌.

" आणि म्हणून तू मला इथून खाली ढकललंस‌." तिचा आवाज थंड, भकास, चमत्कारिक होता. ते शब्द कानावर पडताच त्याने चटकन मान वर करून तिच्याकडे पाहिलं.

" मला संशय आल्याचं तुला समजलं होतं." ती त्याच थंड, भकास आवाजात म्हणाली. " म्हणूनच त्या रात्री आपण इथे बसलो असताना तू मला विचारलं होतंस. की जर मला दुसरी कुणी मुलगी आवडत असल्याचं तुला समजलं, तर माझ्यावरच्या प्रेमासाठी तू आमच्या वाटेतून दूर होशील का ? आणि मी सरळ नकार दिला होता‌."

ती बोलत होती, आणि तो गप्प राहून ऐकत होता. मान वर करायचीही त्याची मुळीच हिंमत होत नव्हती.

" काय चुकलं रे माझं ? " तिच्या आवाजात उद्वेग होता. " आपण काय एकमेकांचे प्रियकर प्रेयसी होतो. की लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो ? कि नाही गोष्टी जमल्या, किंवा दोघांपैकी एकाच्या आयुष्यात कुणीतरी तिसरं आलं की व्हा वेगळे. नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण एकमेकांशी लग्न केलं होतं. पुढच्या सात जन्मांसाठी एकमेकांसोबत बांधून घेतलं होतं‌. हे पवित्र बंधन तोडून दूर व्हायचं ? तुझ्या बाहेरख्यालीपणामुळे ? "

त्याची मान पुन्हा वर आली. त्याला राग आलाही असेल. तो बोलू मात्र काहीच शकला नाही.

" पण तुला या गोष्टींचं काहीच महत्त्व नाही‌. माझा नकार ऐकताच, तुला चीड आली असणार. तुझं लकही जोरावर होतं. मी स्वतःहून कडेपाशी उभी राहिले. आणि तू... मला मात्र अगदी शेवटच्या क्षणी समजलं. कोसळताना तुझ्या ओठांवरचं छद्मी हसू आणि नजरेतला असुरी आनंद पाहिल्यावर. " पुन्हा क्षणभर ती थांबली. तो गप्पच होता.

" त्यानंतर अधूनमधून रात्री इथे येत राहिलास. कारण आपण दोघे पूर्वी इथे येत असल्याचं काही जणांना ठाऊक होतं. त्यामुळे तू माझा खून केला असावास असा पोलिसांना दाट संशय होता ; पण कुणी साक्षीदार नव्हता, आणि त्यारात्री आपण उशीराने इथे आलो होतो. दुसऱ्याच वाटेने. कुणीच आपल्याला पाहिलं नव्हतं. शिवाय महत्वाचं म्हणजे तुझा एक मित्र तू त्यारात्री त्याच्याकडे असल्याचं शपथेवर सांगत होता. याचा अर्थ तू सगळं आधीच‌ ठरवलं होतंस. त्यानंतर तू निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी, तुझं माझ्यावर खरच प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी, माझ्या जाण्याने व्याकुळ झाल्याचं दाखवण्यासाठी तू सगळी नाटकं केलीस. हे मध्येमध्ये रात्रीचं इथे येणं हाही त्यातलाच एक भाग."

" सोनाली... हे.. हे बघ. मी..."

" आता मी तुला सोडणार नाही. " ती विलक्षण‌ चिडलेल्या, खुनशी, भयाण सुरात उद्गारली. तिचा चेहरा बदलला. कपाळाची शिर ताणली गेली. डोळे आग ओकू लागले. नाकपुड्या थरथरू लागल्या. दातावर दात रोवले गेले. संतापाने तिचा चेहरा विद्रूप झाला. तिने संथपणे पुढे पाऊल टाकलं.

" नाही... नाही.." तो मागे सरता सरता भयभीत स्वरात म्हणाला.

काहीच क्षणात एका मोठी, भयाण किंकाळी त्या निर्जन परिसरात घुमली. आणि पुन्हा सारं काही शांत झालं.

समाप्त

प्रिय वाचक मित्रहो. मला कल्पना आहे माझी ' द्वेष ' या कथा मालिकेतील पुढील भागाला खूपच उशीर होतो आहे. त्यासाठी मी खरंच दिलगीर आहे. ती कथा मालिका मी शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तूर्तास माझ्या या नव्या छोट्याशा भय गूढकथेचं आपण सर्वांनी स्वागत करावं आणि या कथेला भरभरून प्रतिसाद द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.

आपला
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थॅंक्यू Bw

@माबो वाचक - आभारी आहे.

कथा छान! कथन शैली खूप सुरेख!
=====

प्रतिसाददात्याचे आभार मानणारी पोस्ट आधी येणे आणि नंतर प्रतिसाददात्याचा प्रतिसाद येणे हे विलक्षण अभूतपूर्व दृश्य बघायला मिळाले.

(संपादनामुळे आहे हे माहीत आहे)

@ऋन्मेष - खूप आभारी आहे सर Bw

थॅंक्यू @बेफिकीर जी आणि @केशवकूल

प्रतिसाददात्याचे आभार मानणारी पोस्ट आधी येणे आणि नंतर प्रतिसाददात्याचा प्रतिसाद येणे हे विलक्षण अभूतपूर्व दृश्य बघायला मिळाले.

( संपादनामुळे आहे हे माहीत आहे) >>> माहीत नाही काय डोक्यात आलं होतं ते Lol Lol

छान कथा.
प्रेडिक्टेबल होती तरीही वाचायला मजा आली

या कथेमधला अमानवी भाग काढून त्याजागी - ती स्त्री म्हणजे त्याच्या बायकोसारखी दिसणारी व्यक्ती पोलिसांनी प्लांट केलेली असते . कबुलीजबाब / पुरावा मिळविण्यासाठी . असे असते तर. हा एक वेगळा अँगल .

@माबो वाचक - आयडिया छानच होती ; पण पोलिस त्याला पुराव्यानिशी
पकडण्यासाठी एवढं काही करतील का ? ( तिच्या सारख्या दिसणाऱ्या मुलीचा पोलिस शोध घेतील ? ) तेही एका कारणाने आलेल्या संशयावरून ?