डायरीतलं पान २: दिव्याखाली अंधार

Submitted by नवदुर्गा on 20 August, 2024 - 03:57

They gives us some of the key pointers that we use in our teaching.
-----------
This is really a great session conducted by Dr. XXXXXX that was useful in terms of modern computer technology.
-----------
Let us congratulate the Mr. XXXXXX for his great achievements in research.
-----------
Can you analysis this code?

कसं वाटलं ही वरची वाक्यं वाचून? काही खटकलं? म्हणजे आम्ही टेक्निकल विषय शिकवतो, इंग्लिश साहित्याचा तास नाही घेत असं जर म्हणायचं असेल तर बोलणंच खुंटलं! पण अजूनतरी, व्यावसायिक अभ्यासक्रमात उच्चशिक्षणाची अधिकृत भाषा इंग्रजीच आहे. स्थानिक भाषांमधून शिक्षणाचे प्रयत्न केले जावेत यासाठी विद्यापीठानेही पावलं उचलली आहेत आणि काही खरोखरच स्तुत्य उपक्रमही सुरू केले आहेत, पण अजून ते पूर्ण आकाराला आलेले नाहीत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे निदान तोवर तरी, नीट समोरच्याला समजेल आणि व्याकरणातही योग्य ठरेल असं कामापुरतं/ शिकवण्यापुरतं इंग्रजी यायला हवं यात दुमत असायचं कारण नाही. ही वरची वाक्य मात्र या सगळ्याला पुरून आणि गाडून उरतायत. They gives us?? seriously??
Is a really great session...was conducted by??
The Mr. XXXXXX ?

काय चाललंय हे? आणि ही सगळी वाक्यं आचार्यकुळातून आलेली आहेत. हे सगळे उद्गार प्रोफेसर लोकांचे आहेत. किमान मास्टर्स डिग्री घेतलेले , पी एचडी करू घातलेले लोक जेव्हा असं बोलतात तेव्हा हताश वाटतं निदान मला तरी. इथे मातृभाषेचा अस्थानी पुळका येणार्‍यांनी जरा लांबच रहा. पण जेव्हा तुम्ही कष्ट करून मास्टर्स करता तेव्हा निदान थोडा वेळ तरी चांगल्या प्राथमिक बिनचूक इंग्रजीसाठी देऊ शकत नाही का?
आत्ता जे शिकवायच्या भूमिकेत आहेत ते त्यांच्या शिकायच्या भूमिकेत होते तेव्हा त्यांनाही असेच चुकीचे इनपुट्स मिळालेले असूच शकतात. भारतातली शिक्षण पद्धती ही विषय आता हाताबहेरच गेलाय. पण त्यामुळे होणारं नुकसान हे अजून किती पिढ्या गेल्यावर मग आपल्याला समजणार आहे? चकचकीत सेमिनार हॉल, ब्लेझर घालून मिरवणारी मंडळी, कडक इस्तरीचे कपडे घालून, गळ्यात झकपक आयकार्ड असलेली "ऑर्गनाईझिंग कमिटी", गुळगुळीत कागदावर छापलेली श्रेयनामावली आणि आमंत्रणं, मान्यवरांचा शाल-श्रीफळ-सत्कार ... यापलिकडे जाऊन खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळेल असे इव्हेंट्स दुरापास्त होत चाललेत आता. नक्की काय चुकतंय हे कळत नाही असं नाही, पण थोडाही पुढाकर घेऊन ते दुरुस्त करावंसं वाटणंही कमी झालंय. शिक्षकांचीच जर ही स्थिती असेल तर मुलांना मोटिवेट काय करणार कप्पाळ!!

विद्यापिठाने मुलांसाठी म्हणून एक विषय अभ्यासक्रमातच घेतलाय. म्हणजे निदान संगणक विषयात तरी तो आहे, बाकी मेकॅनिकल ब्रांचसाठी आहे का वगैरे मला माहिती नाही. त्यात मुलांना स्वतःच्या आवडीचा काँप्युटर क्षेत्रातल्या विविध आणि अद्ययावत अ‍ॅप्लिकेशनमधला कोणताही एक विषय निवडून त्याचा संपूर्ण अभ्यास करून सेमिस्टरच्या अखेरीस एक सेमिनार द्यायचा असतो. म्हणजे प्रत्यक्ष कोडींग, प्रोजेक्ट रन करून दाखवणं वगैरे नाही, जो विषय निवडाल त्यातली संपूर्ण माहिती नीट प्रेझेंटेशन स्वरूपात द्या, त्याचा लहानसा रिपोर्ट तयार करा (रेडीमेड फॉर्मॅटही आहे) आणि सबमिट करा इतकंच आहे. त्याचा अभ्यासही करायचा मुलांनाही कंटाळा येतो. म्हणजे उदासीनता दोन्हीकडून आहे. खरंतर जेव्हा मी हा विषय शिकवला तेव्हा मी ग्रूपडिस्कशन, कोणताही विषय निवडून १५ मिनिटं माहिती घेऊन १ मिनिटात तो मांडणं, डिबेट असे विविध प्रकार घेत होते. विद्यापिठाच्या फारशा काही गाईडलाईन्स तेव्हाही नव्हत्या आणि आजही नहीत. पण इतकं असूनही मुलं तो तास बुडवणं योग्य मानतात. मग हीच मुलं "Good in academics, but disqualified due to lack of communication" किंवा "need to work hard for betterment in English Language" असे रिमार्क्स घेऊन आली की दोष नक्की कुणाला द्यावा हेच कळत नाही. जिथे शिक्षकच "can you explain this code" ऐवजी "can you analysis this code" असं म्हणतात तिथे विषयच संपतो.

आमच्याकडे ना मुलं येतात ती विविध पार्श्वभूमीची असतात, diversified backgrounds म्हणतो ना, तशी. मराठवाड्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांपासून ते स्वत:च्या अलिशान कारने कॉलेजला येणार्‍या मुलांपर्यंत. पिअर प्रेशरने दबलेली असतात बरेचदा. त्यात इंग्रजीचा न्यूनगंड. मला खूप वाईट वाटतं. मी मुलांना माझ्या तासाला तरी, तोडकंमोडकं का असेल, पण इंग्रजीत बोला असंच सांगत असते. माझा तरी काय, खारीचा वाटा. एरवी मीही शिकवताना मराठीपण खूप बोलते, पण मूळ मुद्दा नीटच इंग्लिशमधून सांगून मगच मराठी. कारण विश्वास ठेवा, मुलांना खरंच काही वेळा मराठीतूनच समजतं!

आपण काही एक काम करून पैसे मिळवतो तेव्हा ते काम जास्तीत जास्त बिनचूक व्हावं ही तळमळ जर आमच्यातच नसेल तर तशी अपेक्षा मुलांकडूनही आपण करू नये. माझया सुदैवाने मी function at() { [native code] }इशय रंजक पद्धतीने विषय मांडणारे, सुरेख ओघवत्या इंग्रजीत कठीण विषय खुलवून सांगणारे एक्सपर्ट्स ऐकले आहेत विविध सेमिनार्समधे. आणि दुसरा प्रकारही बघितला आहे. मी स्वतः चुका करत शिकले, अजूनही शिकतेच आहे. पण जेव्हा मुलांसमोर किंवा समव्यावसायिक मंडळींसमोर बोलायची वेळ येते तेव्हा नक्की काय बोलायचंय, विषय कसा मांडायचा आहे, माहिती किती सविस्तरपणे द्यायची किंवा नाही, थेट त्याच विषयात काम करणारे किती आहेत, हा विषय नवीन असलेले किती आहेत असं जाणून घेतलं तर जास्त योग्य प्द्धतीने बोलता येतं असा माझा अनुभव आहे.

हे पान थोडं अस्ताव्यस्त झालंय कारण कठोर आहे की नाही माहिती नाही, पण आत्मपरीक्षण नक्की आहे यात. आणि एकूणच हे जे काही आहे ते भयाण वास्तव आहे. कुठे, कोणी आणि कसं सुधारायचं याचे ठराव टेबलावर पास होत असतील तर असोत बापडे, पण प्रत्यक्षात मात्र जे आहे ते नक्कीच सुखावह नाही.

असो.
लिहिताना ३-४ वेळा मुलंच आली होती म्हणून ब्रेक घेत लिहिलंय. अजून काही नवीन आणि सलग लिहिता आलं तर धाग्यातच भर घालीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही म्हणतात तसे (किंबहुना त्यापेक्षाही वाईट) इंग्लिश इथे अमेरिकस्थित भारतीय बंधू भगिनींकडून ऐकले आहे. त्यामूळे अमेरिकन व्हिसाच्या इंटरव्ह्यू मधे टॉफेल देणे बंधनकारक असावे असे बरेचदा वाटते.

किती प्रामाणिकपणे लिहीलंय. लेखन आवडलं.
माझ्या नात्यातल्या मुलामुलींकडून शिक्षकांच्या भाषेबद्दल तक्रारी ऐकल्या होत्या, आज एका शिक्षकाकडूनच ऐकते आहे.
एक किस्सा तर असाही ऐकलेला आहे की एका 3rd year च्या शिक्षकाने विषय इंग्रजीतून असूनही वर्षभर मराठीतूनच शिकवलं आणि नंतर बर्‍याच मुलांना पेपर लिहीताना याचा त्रास झाला.

प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार.
या सगळ्याचा परिणाम असा होतो की मुलं त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात! म्हणजे कोडिंग क्रताना भान हरपून करणारी मुलं "प्रेझेंटेशन द्या" म्हटलं की घाबरतात. (आधीच अशी भान हरपून अभ्यास करणारी जनता कमी होत चालली आहे, त्यात असा इंग्लिश भाषेचा गोंधळ Uhoh )

>>>>>>This is really a great session conducted by Dr. XXXXXX that was useful in terms of modern computer technology.

इथे is व was असा गोंधळ आहे की काही चुकलय?
कारण ग्रामरली काही चूक दाखवत नाहीये Sad
----------------
कितीही इंग्रजी पुस्तके वाचा, अस्खलित इंग्रजी वाचा, संवादाअच्या सरावाला पर्याय नाही. संवादाकरता सरावच हवा. शिवाय अंगात रेटून बोलण्याची एक सवय हवी. मग भले का चुकेना. बोलताना तुम्ही कचरलात की कॅस्केडिंग इफेक्ट होतो कचरता म्हणुन चुकता आणि चुकता म्हणुन कचरता. सेल्फ-फिडिंग डाऊनवर्ड स्पायरल होते.

डॉ 'was' असले तरी सेशन 'is' आणि 'will be' great.हो वाक्य बरोबर वाटतेय.'हे एक सेशन आहे बघा, मला उपयोगी पडले होते'असा संभाषण सूर असेल तर.
आक्षेप 'really 'a' great' वर असावा.
लेख मस्त लिहिलाय.तळमळ जाणवली.

तसेच असावे कदाचित अनु. really ला ग्रामरलीने आक्षेप घेतला पण indeed ला नाही घेतला.
ओह ओके 'a' ला आक्षेप असेल.

प्लीज सांगा नक्की काय आक्षेप आहेत ते कारण इथेही दिव्याखाली अंधारातच चाचपडतोय आम्ही (मी) Happy

सॉरी, मी सगळे प्रतिसाद उशिरा बघितले.

ज्या वाक्याची चर्चा सुरू आहे त्याचा संदर्भ इथे द्यायला हवा होता हे लक्षात नाही आलं माझ्या. ४ दिवसांचं एक वर्कशॉप झालं (ज्यात IIT/ अन्य संस्थांच्या संशोधन क्षेत्रातले) अनेक वरिष्ठ प्रोफेसर्स हे मुख्य स्पीकर म्हणून सेशन घेत होते, त्यातलं शेवटच्या दिवसाचं शेवटचं सेशन दुपारी ३ वाजता संपलं. १० मिनिटांच्या ब्रेकनंतर सहभागी प्राध्यापकांपैकी कोणाला काही मनोगत/ फीडबॅक द्यायचा असेल तर ५ मिनिटं स्टेजवर येऊन बोलता येईल असं सांगितलं होतं. एक मॅडम बोलण्यासाठी आल्या आणि "This is really a great session conducted by Dr. XXXXXX " हे वाक्य त्यांनी १५ मिनिटांपूर्वी संपलेल्या सेशनसाठी म्हटलं होतं.
"that was useful in terms of modern computer technology." म्हणजे " इथून पुढे शिकवताना उपयोगी येईल" अशा अर्थाचं त्या बोलत होत्या कारण ४ दिवसांत जे १०-१२ सेशन्स झाले त्याबद्दलही त्या असंच म्हणत होत्या आणि दुर्दैवाने प्रत्येक सेशनच्या उल्लेखासाठी वेगवेगळी वाक्यरचना चालू होती.
एक वाक्य म्हणूण व्याकरणदृष्ट्या हे फारसं चूक नसेल, पण ३ ला कार्यक्रम संपतोय, ३:२० ला तुम्ही बोलताय आणि आढावा घेताना प्रत्येक प्रोफेसरचं नाव घेऊन सेशनबद्दल बोलताय तर नक्की काय बोलायचंय हे ठरवून बोलायला हवं होतं ना?
"प्रो. XXXXXXX यांनी आत्ता जे सेशन घेतलं ते खूप माहितीपूर्ण असून कॉम्प्यूटर क्षेत्रातल्या नवीन गोष्टींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळाला जो आम्हाला पुढे मुलांना शिकवताना उपयोगी येईल" असं साधं मराठीत बोल ल्या असत्या तरी चाललं असतं असं वाटलं. कारण सेशनस्पीकर सुद्धा अधेमधे अनौपचारिक बोलताना मराठीत बोलत होत.

केशवकूल, शरद, तुमच्या मताचा आदर आहे.
मॅडमचं सगळं बोलणं मी इथे लिहू शकत नाही कारण ते जसंच्या तसं लक्षात नाही. जेवढं लक्षात राहिलं तेवढं लिहिलंय. शिवाय मी त्या ठिकाणी होते आणि लिहितानाही तेच वातावरण डोक्यात होतं
पण इथल्या वाचकांपर्यंत ते तसंच पोचवणं मला जमलेलं नाही. मॅडमच्या भावना प्रामाणिक होत्या आणि मांडणी मात्र खूप गडबडली होती.
असो. लेखाचा मूळ हेतू हा होता, की सद्य परिस्थिती काय आहे हे सांगावं. मी पहिलं पानही याच हेतूने लिहिलंय. आणि यात एकच एक बाजू बरोबर/ चूक असा सूर नाही.
बहुतेक मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल.
त्या निमित्ताने विचारमंथन झालं हेही छानच.

मी माझे अनुभव सांगतो.
१) हल्लीच्या शिक्षण semester पद्धती प्रमाणे प्रत्येक सहा महिन्यात एव्हढे जड विषय दे दनादण संपवले जातात. कॉलेज hardly दोन महिने असते. बिचारे विद्यार्थी. काय करणार मग tech max ही सहारा. नोकरीच्या ठिकाणी एक विषय शेवटी कामाला येतो. एक ना धड भारा भर चिंध्या. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच सगळ शिकावे लागते. ह्यावर काही इलाज आहे का?
२) माझ्या मते टेक्निकल विषय मराठीत शिकवू नयेत. मातृभाषेत शिकणे हे सगळ्यात उत्तम. पण एक विचार करा आपल्या देशात २० एक तरी मातृभाषा आहेत. म्हणून कुणावरही अन्याय न करता. कुणालाही undue फायदा होऊ न देण्या साठी इंग्रजी हीच लिंक भाषा असावी.
अजूनही लिहायचे आहे. आठवले कि लिहीन.

लेखातील बहुतांश मुद्द्यांशी एकदम सहमत .
उत्कृष्टता जाउदेत , निदान प्रमाण भाषा आत्मसात करण्याची इच्छा सुद्धा आजकाल विद्यार्थ्यांमधे सोडाच पण शिक्षकांमधेच दिसत नाही.. हे खरेच आहे.