प्रशस्त वाडे वर्सेस ‘फ्लॅट संस्कृती’

Submitted by ब्लू कोलंबसे on 27 April, 2024 - 02:05

शहरात कॉलेजला शिकायला गेलो त्यानंतर ग्रामीण भागात आपणच राहत असलेल्या मित्रांच्या जुन्या वाड्यांचे महत्त्व समजलं आणि सौंदर्यदृष्टी आली. चौसोपी, दगडी, मराठी वाडे आवडू लागले आणि शहरांमधील त्याचवेळी वाढणारी सिमेंटच्या ठोकळ्यांची गर्दी बघून मन विषण्ण होऊ लागले. तेव्हाच बालमित्राबरोबर असा एक छोटासा संकल्पही करून झाला की, पैसे मिळतील तेव्हा दगडी, चौक असणारा, मस्त वाडा बांधायचा.

या संकल्पानंतर माझ्या जुन्या वाड्यांबद्दलच्या मतांमध्ये प्रचंड फरक पडत गेला. कालांतराने समजलं, वास्तुमध्ये आनंद नसतो तर तो राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात असावा लागतो.

त्यामुळे दिल्लीमध्ये बारा महिन्यांसाठी Isdm मध्ये आलेल्या माझ्या काही मैत्रिणींनी आपापली रूम इतक्या उत्तमपणे सजवली होती की, मला वाटले बारा महिन्यांच्या वास्तव्यासाठी हे लोक आपले वास्तव्य स्थान, खोल्या एवढ्या कष्टाने सजवू शकतात तर मग आपण जिथे कायमचे राहतो तिथे आपल्याला हवी तशी फ्रेश सजावट का नाही करत?

त्यातून 'सिमेंटच्या ठोकळ्यांबद्दलचा नाराजीपणा, आधुनिक स्थापत्य शैलीला शिव्या घालणे, बदल पाहून हळहळ करणे' बंद झाले आणि त्याचबरोबर 'बदल होतात, पण त्याबद्दलचा विचार हा असा लव-हेट स्वरूपाचा नसून तटस्थ असावा', या भावनेत बदलला.

पुढे या अशा 21व्या शतकातील या 'स्थापत्य सजावटी'ची हटके संस्कृतीची दिल्लीमध्ये ओळख झाली. पुण्यामध्ये ती वाढली, बाळसं धरू लागली. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये आणि तेथील कॅफेमध्ये जाऊन तिकडच्या खाण्याबरोबरच काही अतिरिक्त पैसे हे मन शांत करणारे अशा मंद संगीताच्या आणि आदर्श सजावटीच्या जागेसाठी देण्याची मानसिकता वाढली. 'कसंतरी, काही पण, कुठेही खायचं', ही संकल्पना बदलत गेली, याविषयी जगण्याचाही मनामध्ये स्वीकार झाला आणि एक मनातील मध्यमवर्गीय चौकट मोडीत निघाली.

जगण्याचा पुरेपूर आनंद घेणे आणि योग्य गोष्टी खरेदी करण्यासाठी पैशाकडे न बघणं व त्याचवेळी आर्थिक चंगळवाद टाळणे हे मनामध्ये स्थिरावलं.

पुढे कालच कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून प्रवास करत असताना जाणवलं, स्त्रीवादी आणि स्त्रीच्या सुविधा यांचा विचारच न करता जुने वाडे आणि त्यातली अंधारी माजघरे, स्वयंपाकघरे बांधली असतात.

खरंतर स्त्रियांसाठी एक प्रकारची स्थापत्यशैलीतील आणि वावराची मुस्कटदाबी करणारी ही छळछावणीच म्हणायची, कारण यामध्ये पुरुषांच्या उठाबसायच्या जागा या पुरेशा हवेशीर, उजेडाच्या, खिडकी असलेल्या आणि या जुन्याच वाड्यांमध्ये अंधाऱ्या मोऱ्या आणि इतर अशा अंधाऱ्या जागांचा विचार करता मला प्रश्न विचारू वाटल. मध्ययुगीन काळापासून या प्रकारचे वाडे बनत आहेत, त्यांनी स्त्रिवर्गावर मुस्कटदाबी तर केलीच, पण त्याचबरोबर स्वच्छ उजेड, प्रकाश न येऊ देण्याची व्यवस्था करत सामंती घरंदाज परंपरांना जपणे आणि निसर्गाशी प्रतारणा करत हवा, उजेडाला येऊ न देण्याची चुकीची रचना झाली हे कळालं.

त्यामुळे माझा विचार हा ‘ सुंदर वाटणारे वाडे‘ ते ‘पर्यावरणास पाठ ठेवून उन, हवा, उजेड पुरेसा खेळला न जाण्याची रचना’ असा बदलत गेला.
(अर्थात हा एकांगी विचार आहे. प्रत्येक गोष्ट 'ग्रे शेड'मध्ये असते.)

याच वर्षी मी माझ्या घरामध्ये फ्रेंच विंडो बसवून घेतल्या. त्यामुळे घरात उजेड वाढलाच आणि त्याचबरोबर हवाही खेळती राहून चक्क लाईट बिल कमी येऊ लागले. हे सर्व घडले आमच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये.(फोटो वर जोडला आहे.)

त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन माझा ‘प्रशस्त जुना वाडा’ याच्याकडे बघण्याचा विचारकोन बदलला आणि मी चिकित्सक दृष्टीने माझ्याच विचारांना आव्हान देत ‘फ्लॅट संस्कृती’कडेही बघू लागलो.

सेपियन वाचल्यानंतर समजले की ‘जुनं ते सोनं’ हा विचार सोडून सतत नव्याचे निर्माण करायला हवे, त्या नव्या गोष्टींचा खुल्या दिलाने आणि मनाने स्वीकार करायला हवा आणि तेच मी करतोय आणि हा माझा वाड्यांबद्दल विचार हा स्त्रीवादी साहित्य वाचल्यानंतर आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीबद्दलचा आदर आणि त्याचबरोबर चिकित्सक विचार याच्या मिश्रणातून तयार झाला.

Group content visibility: 
Use group defaults

Buildings are statements of “power”. कोर्ट्स, राज्यकर्त्यांची घरे/ workplaces, चर्च- मंदिरे सर्वत्र पावर कुणाकडे आहे, किती आहे याचे प्रच्छन्न प्रदर्शन असते.

पारंपरिक घरातील स्त्री वापरत असलेला भाग अंधारा, inconvenient असणे हा योगायोग नाही.

तुमचा विचारप्रवास आवडला.

आवडलं. स्वतःची बदललेली मनोभुमिका त्रयस्थपणे पाहता व मांडता येणे हे मॅचुरिटीचे लक्षण आहे.

बरेचदा नॉस्टॅल्जिक लिखाणात अंधारं स्वयंपाकघर, माजघर म्हणजे उबदार अशा आठवणी रंगवलेल्या असतात. दिवसाचे १०-१२ तास वावरायच्या ठिकाणी अंधार किती गैरसोयीचा व डिप्रेसिंग हा विचारच होत नाही.

शिवाय अंधाऱ्या जागी साप विंचू इत्यादी इतर धोके वेगळेच.
नॉस्टॅलजिया लेखात लेखक हा जनरली कस्टमर, कन्झ्युमर किंवा स्टेकहोल्डर असतो, मूळ वर्कर नसतो.

छान लिहिले आहे.. अगदी मनातले.
माझाही विचारांचा प्रवास हल्ली सेम झाला आहे.
माझे चाळीतले बालपण विरुद्ध मुलांचे सोसायटीमध्ये बालपण..
त्यामुळे या विषयावर माझा रुमाल..
जेव्हा पुन्हा धागे काढायला सुरुवात करेन तेव्हा यावर जरूर लिहेन

आवडलेच! प्रांजळपणे मांडलेला विचारांचा प्रवास , त्यानुसार नव्याचा विचारपूर्वक केलेला स्विकार हे फारच भावले.

लेख आवडला - त्याहीपेक्षा जास्त विचारातलं संक्रमण आणि ते मांडण्यातलं प्रांजळपण अधिक आवडलं.

हो आपली संस्कृती ‘फ्लॅट’ एवं उथळ होत चालली आहे.
‘फ्लॅट’ला उंबरठा नसतो.
त्याच काय?
ह्या ह्या . ख्या ख्या . हो हो .
असे एका विदुषीचे मत आहे. हे माझ्या शर्टाच्या टोकाचे नाही.

जर कोणाला रहात्या घरांच्या स्थापत्य शास्त्रात रुची असेल तर बिल ब्रायसन चे At Home: A short history of private life हे पुस्तक जरूर वाचावे असे आहे.

सर्वांचे आभार. बऱ्याच वर्षांचे हे विचार फ्रेंच खिडकी बसवण्याच्या निमित्ताने बाहेर आले. मलाही आश्चर्य वाटते, असे बदललेले विचार समजून घेताना!

छान लेख आणि विचार...

जागा आहे तेव्हढीच रहाणार आहे आणि लोकसंख्यावाढ प्रक्रिया सुरुच आहे, त्यामुळे वाडा/ बंगलो शैलीतली घरे आता परवडणारे नाही. बहुमजली इमारतींना पर्याय नाही. आकाशांत कितीही उंच इमारत नेता येते. Happy

विचारप्रवर्तक अन खरे सांगू , त्या विनाकारण .... किंवा त्या काळास व अर्थार्जनास अनुरूप व पूरक चाळ संस्कृतीस.... ग्लोरिफाय करून गळे काढतात..... त्या संस्कृतीत आपुलकी होती अन शारिरिक गैरसोयच गैरसोय होती, कालानुरूप आजच्या फ्लॅट संस्कृतीत अनेक प्रकारे ती आपुलकी आलेली आहे॥स्वच्छ प्रकाश, वारा असलेले घर, स्वतःचे स्वच्छता घर कोणत्या गृहिणीस नको होते??? त्यात पुरुष प्रधान संस्कृती- म्हणजे सहवास व प्रायव्हसी केवळ संतती जननासाठी असायचे.... अगदी तत्कालिन श्रीमंतांच्या घरात देखील
खूप वेगळे लिहिले आहे.... उत्तम.... उत्क्रांती यालाच म्हण तात

@रेव्यु ; अगदी खरे. मी सुद्धा काही काळ त्या स्मरण रंजनात हरवलो होतो, सुदैवाने माझ्या पदव्युत्तर शिक्षणात ' अवलोकन '(reflection) विषय आला आणि बंधाऱ्यातील साचलेला गाळ प्रवाहित होतो, तसे मनाचे विचार वाहते, प्रवाहित झाले.

त्या काळास व अर्थार्जनास अनुरूप व पूरक चाळ संस्कृतीस.... ग्लोरिफाय करून गळे काढतात..... त्या संस्कृतीत आपुलकी होती अन शारिरिक गैरसोयच गैरसोय होती, कालानुरूप आजच्या फ्लॅट संस्कृतीत अनेक प्रकारे ती आपुलकी आलेली आहे॥स्वच्छ प्रकाश, वारा असलेले घर, स्वतःचे स्वच्छता घर कोणत्या गृहिणीस नको होते??? >>> + १

त्याकाळच्या गृहिणींना जर आपला नवरा आणि मुलं इतक्याच लोकांबरोबर स्वतंत्र छताखाली 6 महिने जरी मोकळेपणाने संसार करण्याची संधी मिळाली असती , तर 6 महिने संपल्यानंतर कितीजणी सासू सासरे दीर भावजया त्यांची मुलं अशा गोतावळ्यात पुन्हा परत जायला उत्सुक असत्या , राजीखुषी तयार झाल्या असत्या असाही एक प्रश्न पडतो .... दिवसातून बराच वेळ कामासाठी बाहेर राहणे आणि घरातही एकमेकांशी मतभेद , वादाचा प्रश्न येईल अशी परिस्थिती पुरुषांसाठी दिवसातून कितीवेळा निर्माण होते .. उलट एकत्र राहणाऱ्या बायकांना पावलोपावली एकमेकींशी जुळतं घ्यावं लागतं , मनाला मुरड घालावी लागू शकते .. आपल्या मुलाच्या आवडीची भाजी देखील वाटली त्यादिवशी केली अशी परिस्थिती असेल असं नाही बाकी लाड पुरवणंही सतत सगळ्यांना ध्यानात धरून .. पुरुषांना भरल्या घराच्या आठवणींनी गहिवरायला काय जातं , नाइंटी परसेंट ऍडजस्टमेंट घरातल्या बायका करत होत्या ... आता ज्या त्यातून सुटल्या त्या मोकळा श्वास घेत जगू शकत आहेत .

खरं आहे.अगदी साध्या साध्या गोष्टीत राजकारण.एकमेकांवर कुरघोडी.'बायकाच बायकांच्या शत्रू असतात' म्हणणाऱ्या लोकांना एकाच वर्क फिल्ड वर, अंधाऱ्या 10 बाय 10 जागी उकाड्यात पूर्ण अनेक लेयर साड्या नेसून स्वयंपाक, भांडी, खरकटं, उरलं सुरलं झाकपाक हे वर्षानुवर्षे करायला लावलं तर तेही 'पुरुषच पुरुषाचा मुख्य शत्रू असतो' मोड मध्ये जातील.कोणत्याही संस्थेला, व्यवस्थेला नीट टेस्ट करण्याचा मुख्य मार्ग त्यात अडचणी,ढवळाढवळ निर्माण करणे हा आहे.

मी कल्याणच्या वाड्यातल्या एका खोलीत लहानाची मोठी झाले. खायला - प्यायला कधीही कमी नव्हतं. नीट शिक्षण, हौसमौज सगळं होतं. पण शांतता, आपली अशी स्वतंत्र जागा नव्हती. लहानपण अभावात गेलं नाही. पण सगळ्यांची आपल्या आपल्या पातळीवर कुचंबणा होत होती. तेव्हा इतकं काही कळत नव्हतं. आता फ्लॅट मधे राहताना, वयाने मोठी झाल्यावर कळतं. मला आजिबात चाळी आणि वाड्याच्या प्रेमाचे उमाळे येत नाहीत. स्वतंत्र, सुरक्षित आणि स्वच्छ टॉयलेट, आपल्याला बसा-उठायला-झोपायला जागा असणे आणि प्रत्येक गोष्ट सार्वजनिक नसणे, हे भाग फार म्हत्त्वाचे वाटतात.

mi_anu हेच आलं होतं डोक्यात.. एकत्र स्वयंपाक करायला लावला तर 4 पुरुषांचं एकमेकांत किती काळ पटेल Lol तो कधीतरी सुटीच्या दिवशी करतात तसा नाही , किचनभर पसारा घालून 4 भारीपैकी पदार्थ करायचे आणि मागची आवराआवरी निम्मी बायकांनी करायची घरातल्या . तसा नाही .. दिवसामागून दिवस , साग्रसंगीत पोळीभाजी , भात आमटी असा .. झाकपाक , आवराआवरी , उद्याची भाजी निवडणं , विरजण - दही दुधाचं बघणं अशा सगळ्या किचकट कामांसकट .... आणि एक दिवस स्वयंपाक केल्यावर होतं तसं तोंडभर कौतुक होणार नाही , उलट बाबा भाजी अशी काय लागतेय असलं काहीतरी ऐकून घ्यावं लागेल ... चार जणांच्या सतरा आवडीनिवडी पुरवत , सांभाळत वेळेत स्वयंपाक हजर करण्याची जबाबदारी पडली तर किती हसूनखेळून काम करतील ?

आज मी करतो , उद्या तू , परवा तू अशी विभागणी करतील बहुतेक पण एकत्र काम करणं अशक्य ... स्वयंपाकघर मॅनेज करणं, स्वयंपाक करणं कठीण नाही पण एकहाती करता आलं तर किंवा ऑथोरिटी आपल्याकडे असली तर.

उदा . मदतनीस बाई सांगू ते आणि तेवढंच काम करते , सजेशन देत नाही किंवा मोडता घालत नाही किंवा हे तुम्ही करा , ते मी करते असं काही असत नाही ... सासू किंवा भावजयीच्या बाबतीत तसं नसतं . किमान किचन प्रत्येकीला स्वतंत्र हवंच .

Pages