मराठी : लेखन घडते कसे?

Submitted by हेमंतकुमार on 26 February, 2024 - 22:20

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :

ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.

या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.

वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !

टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.

अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा जरा वेगळ्याच ट्रॅकवर गेलेला दिसतोय. ज्या मुली मायबोलीवर ईतके छान लिहितात त्यांना असेही अनुभव आले आहेत वा झेलावे लागतात हे बघून खिन्नता आली. पण हे धक्कादायक नाही. ऑफिसमध्ये सोबत काम करणार्‍या ऊच्चशिक्षित मुलींचेही असे अनुभव या आधी त्यांच्या तोंडून ऐकले आहेत.

यावर आपण आता ईतके तरी नक्की करू शकतो की हे लोन आपल्या पुढच्या पिढीत जाण्यापासून रोखू शकतो.
आमच्या दोन्ही घरात सुदैवाने अशी वा ईतकी वाईट परीस्थिती नाहीये, पण तरीही मुलगा-मुलगी भेद मागच्या पिढीतील पुरुषांच्या विचारात आहेत याची कल्पना आहे. म्हणून सुरुवातीपासूनच एक पाळत आलोय ते म्हणजे आमच्या मुलांनी, स्पेशली मुलीने काय करायचे आणि काय नाही हे आम्हीच ठरवणार, त्यात दोन्ही घरातील कोणत्याही वडीलधारी व्यक्तीचा हास्तक्षेप चालणार नाही. बरेचदा मुलीला जी सूट देतो ती त्यांना रुचत नाही, पण आम्ही ठाम असतो. दोघात चर्चा करून निर्णय घेतो, पण ईतर कोणालाच एंटरटेन करत नाही. मुलीला देखील माय लाईफ माय चॉईस नुसार तिच्या वयाला साजेश्या गोष्टी तिलाच ठरवू देतो.. आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे, पण आपल्या घरात तिला बिलकुल थारा द्यायचा नाही हे मुलीला सुद्धा याच वयात पक्के समजले आहे.. असो, व्यापक विषय आहे.

मी परत थोड मूळ धाग्याकडे वळते .

कुमार१ तुम्ही सुरू केलेल्या उपक्रमा निमित्ताने केलेल एक सिंहावलोकन..

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२०२१ मध्ये Covid काळात सगळी कडे Lockdown होत. रोज येणाऱ्या धक्कादायक बातम्या, आकडे हे सगळं मन सुन्न करणारं होत. त्यावेळी विरंगुळा म्हणून थोडे स्मरणरंजन करताना रोजच्या दैनंदिन आयुष्यात ही मजेशीर घटना घडतात त्या लिहून काढल्या. सहजच कौटुंबिक Whatsapp ग्रुप वर टाकल्या त्यांना पण आवडल्या… एव्हढ्या ताणात कोणाला किंचितसा विरंगुळा मिळाला तर का नको ह्या विचाराने fb वर पण टाकल्या.
अर्थात सुरुवातीला दडपण होत, कोण काय म्हणेल, आवडतील का इ. इ. पण छान प्रतिसाद मिळाला.. तसा हुरूप आला.
पुलं च्या “ राजहन्साचे चालणे…” ह्या वाक्याने नेहमीच बळ दिलंय. मग अजून लिहत गेले.
सुरुवातीला मराठी कीबोर्ड ची विशेष माहिती नव्हती म्हणून इंग्लिश मध्येच लिहिलं… पण मराठी context असताना इंग्लिश मध्ये तेवढं खुलून येत नाही हे जाणवलं मग हळू हळू मराठीत लिहायला सुरुवात केली.

त्याच दरम्यान बऱ्याच मोठ्या गॅप नंतर परत नोकरी करायची ठरवली तर परत संगणक क्षेत्रात जाण्याऐवजी, आधीचा तंत्रज्ञानाचा अनुभव आणि नवीन गवसलेले लिखाण कौशल्य ह्याच्या बळावर टेक्निकल writing सुरू करायचं ठरवलं.
पण प्रत्यक्ष अर्ज करताना लक्षात आलं की सगळे portfolio मागतात.
मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तेव्हा Medium सापडलं.
त्यावर ब्लॉकचेन, ai वगैरे विषयांवर लिहिताना मन मात्र गोष्टी, little moments ( छोटे छोटे क्षण) मध्ये अडकलेल.

त्यामूळे न राहवून माझी little मोनेंट्स ही लिहत राहिले.

मग कधीतरी मनात येणारे इतर विषय, आवडलेल्या जागा, एखादी सुचलेली कथा, ललित, इकडे अमेरिकेत घेतलेल्या अनुभवांवर आधारित अमेरिका डायरी असे बरेच प्रोजेक्ट्स केले.

यंदाच्या BMM convention निमित्ताने निघणाऱ्या स्मरणिकेचे (उप) संपादनाचे कामही केलं.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही
इलेक्ट्रॉनिक

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

FB, Medium, मायबोली
Momspresso, IRA वरती पण लिहिलेलं आहे.
स्वतःचा ब्लॉग सुरु केला होता..

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

“Life is made of millions of little moments” अस काहीतरी मनात रुतलेल,
त्यातील छोट्या छोट्या क्षणांना शब्दबध्द केलं, जे काही कारणाने विशेष लक्षात राहिले,
ललित लेख, कथा, मनोगत लिहिली.
Technical writing मधे बलॉकचेन, ai, रोबोटिक्स वरती थोडेसे लेख लिहिले .
फूड ह्या माझ्या अत्यंत आवडत्या विषयावरतीही थोडफार लिखाण केलं. आपली धान्य ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे ह्या लोकांना माहीत नाहीत तर हे ग्लूटेन फ्री आणि सकस पर्याय त्यांच्यापर्यंत पोहचवायचे हा त्यामागील उद्देश. ती series पूर्ण नाही झालेली.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

थोडे विरंगुळ्याचे क्षण किंवा आनंद वाटून घ्यावा म्हणून लिहायला सुरुवात केली होती.
पण हळू हळू लिखाणात गुंतत गेले.
कितीतरी वेळा आत्मशंका उत्पन्न होतात, पण
एखादा ट्विस्ट, तरलता, एखादा विशिष्ट शब्द किंवा कथा, लेख पूर्ण झाल्यावरच समाधान अशा कितीतरी गोष्टी आहेत की मन परत परत काही न काही लिहायला धावत…

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

अगदीच अल्पकाळ झाला आहे खर तर.
सोशल मीडियावर लिखाण केलं की इन्स्टंट gratification मिळत, हे एक झालच. पण ते अल्पजीवीही असतं.
अर्थात त्या स्तुतीने छान वाटत पण हरखून जायला होत नाही.

२-३ माझ्या मनाला स्पर्शून गेलेल्या गोष्टी

अमेरिका डायरी मधील वाचनालयावरील लेख थोडा क्लिष्ट होता. मी तो वाचनवेडा ग्रुप वर टाकलेला. एक दिवस माझा डोळ्यांवर विश्वास बसेना, लाईक करणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये साक्षात वीणा गवाणकर होत्या.
ज्यांचं कार्व्हर लहान पणी वाचलं होत त्यांच्या दृष्टीला ( चरणस्पर्श म्हणावं तस) आपण लिहिलेल काही पडावं, त्यांची दाद मिळावी, स्वप्नवत वाटल सगळं.

एक ‘नोकरीच्या रहाट गाडग्यात अडकलेली आई” अशा सकलपनेवर आधारित गोष्ट होती त्यावर एका ताईंचा प्रतिसाद होता, “ कथा वाचून बहिणाबाईंची माय आठवली. ”
तेव्हा भरून पावल्यासरख वाटलं होत.

Medium वर एक कथा टाकली होती, “ लाल गुलाब..” ती मी आधी मराठीत लिहिली होती. मग इंग्लिशमध्ये केली आणि Medium वर टाकली.
ती जरी प्रेमकथा म्हणून.मी लिहिली होती तरी त्यात प्रणय वगैरे काहीच नव्हतं, खूप सौम्य आणि पारंपरिक प्लॉट होता.
आता इकडे बऱ्याच देशातील लोक वाचत असतात त्यामुळे त्यांना हे कितपत रुचेल किंवा कस अशा अनेक शंका होत्याच.
एका महिलेचा प्रतिसाद आला, तिचा नवरा तिला असच कितीतरी प्रसंगी लाल गुलाब द्यायचा, त्याची खूप आठवण झाली वगैरे वगैरे तिने मनापासून इतकं छान लिहिलं होत. ती सौम्य, तरल प्रेमकथा तिच्यापर्यंत पोहोचली, भिडली आणी तिच्या हळुवार आठवणी जागृत केल्या… तेव्हा पण खूप भारी वाटलं होत.

हा लेखन प्रवास अनपेक्षित पणें कधीतरी सुरू झाला, तो कधीपर्यंत चालू राहील? माहीत नाही, त्यात सोबतीला वाचक असतील का? माहीत नाही, पण जमेल तेव्हढा जमेल तसा जिथपर्यंत तो आनंददायी आहे, आव्हानात्मक वाटतोय तिथपर्यंत करत राहीन अस वाटत..

धागा काढल्याबद्दल धन्यवाद!

गेल्या काही प्रतिसादांमधून स्त्रिया मोकळेपणाने व्यक्त झाल्यामुळे त्यांच्या आंतरिक वेदना समजल्या.

१. बाप रे हे तर भयंकर वातावरण होते म्हणायचे ! >>>> +१११ अरेरे..
..
२. छन्दिफन्दि >>> लेखनप्रवास-मनोगत उत्तम !

आज वेळ मिळाल्यावर इतर प्रतिसाद वाचले. मनोगतं आवडली सर्वांचीच. कुमार सरांचा प्रयत्न ध्यानात आला. कदाचित मी इथे दिलेले प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर असायला हवेत. प्रशासकांना ते हटवण्याची विनंती करतो. वेगळ्या धाग्यावर ही चर्चा करूयात.

अस्मिताच्या प्रतिसादावर काय प्रतिक्रिया द्यावी समजेना. नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यावर नक्की बोलूयात या विषयावर. अनेक समजुतींना धक्का बसला.

समारोप
गेल्या वर्षीच्या १मे रोजी प्रकाशित केलेल्या “वाचन घडते कसे” या धाग्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या जानेवारी महिन्यात एकदा पहाटे पाच वाजता उठून पलंगावरच पडलो होतो. तेव्हा मनात एकदम कल्पना चमकली, की मागच्या धाग्याचा भाग 2 सम “लेखन घडते कसे” हा भाग काढावा. मग असे ठरवलं की तो बरोबर तो एक वर्षांनेच, म्हणजे यंदाच्या १मे ला घेऊया. याचे कारण म्हणजे 27 फेब्रुवारीला इथे परंपरेनुसार गौरव दिन उपक्रम असतात. या उलट १मे ला तशी शांतता असते. म्हणून मग याचे लेखन करून ते फायलीत ठेवून दिले होते.

परंतु 26 फेब्रुवारीला जेव्हा स्पष्ट झाले की यंदा आपला अधिकृत उपक्रम नाही तेव्हा मग मला राहवेना. म्हणून हा विषय आत्ता घेतला. गतवर्षीच्या ‘वाचन’ धाग्याच्या तुलनेत सुरुवातीला याचा वेग संथ होता. ते अपेक्षित होतं कारण प्रत्येक जण वाचक असतोच; त्यात काही वाद नाही. पण एकदा ‘लेखक’ असं म्हटल्यावर अनेकांना अवघडल्यासारखे होते. तसे होऊ नये म्हणूनच आपल्या संस्थळापुरती (आणि अनेकांनी लिहावे म्हणून ) सोप्यात सोपी अशी लेखकाची व्याख्या दिली होती.

सुरुवातीस किल्ली यांनी उद्घाटन केल्यानंतर दोन-तीन मनोगते आली. 28 फेब्रुवारीला एसआरडी यांनी मनोगत लिहिले आणि त्यानंतर 27 तास धाग्यावर काहीच हालचाल नव्हती. मला वाटले की आता इच्छुक संपले असावेत. म्हणून मी माझ्या मनातला क्रम बदलून माझे मनोगत सादर करून टाकले.

त्यानंतर मात्र अक्षरशः लाट यावी तशी आपल्या लेखकांनी उत्तमोत्तम मनोगते सादर केली. त्यापैकी काहींना पुरेसे व्यक्त व्हायला स्वतंत्र लेखातून लिहावेसे वाटले ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे !

या मनोगतांतून आपल्या लेखकांचे अंतरंग, त्यांच्या लेखनप्रेरणा, निर्मितीकाळात होणारी मनाची घालमेल आणि लेखन पूर्ण झाल्यानंतर, जणू काही एक जीव जन्माला घातल्याचा आनंद असे अनेक विचार आपल्याला वाचायला मिळाले. काही वाचकांनीही यात अन्य काही मुद्द्यांची मोलाची भर घातली. अशा तऱ्हेने हा धागा सुफळ संपूर्ण झालेला आहे. गतवर्षीच्या वाचनधाग्यात २० जण व्यक्त झाले होते तर यंदा हा आकडा १६ आहे. ही देखील समाधानाची गोष्ट.

सर्वांना लेखन शुभेच्छांसह धन्यवाद !

सर्वच मनोगते आणि आचार्यांचं चिंतन आवडलं. कुठंतरी आपण नक्की काय करतो ह्याची तुलना केली गेली. थोर कवी- लेखक काय करायचे याचा अंदाज घेता आला. तरीही कुणाचीच निर्मितीप्रक्रिया नक्की काय असू शकते हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. कारण ज्याची कलाकृती असते, त्यालाही हे स्पष्ट नसतं आणि बरेचदा निर्मितीप्रक्रियेवर आपलं यत्किंचितही नियंत्रण नसतं. आपल्याला भ्रम असतो की नियंत्रण आहे पण नसतं. बरेच लेखन, चित्र, संगीत आणि इतर कलाही कुणीतरी त्या व्यक्तीकडून 'करवून' घेतल्यासारख्या असतात. निसर्गाच्या आवेगात आपण जितकी कमी ढवळाढवळ करू तितकी ती कलाकृती रसिकांच्या अंतरंगात जास्त पोचते.

या निमित्ताने मला काही तरी अंतरंगातील लिहावं वाटलं त्यासाठी कुमारसरांचे आभार. इथं सगळा हौशेचा मामला असला तरी आपण एकमेकांमधल्या काहीतरी सुरेख- तरल भावना बाहेर काढू शकतो. We bring out the best or worst in each other sometimes. Choice is always ours ...!!

छान झाला उत्सव, यावर्षी होणार नाही याची रुखरुख मिटली. Happy

त्यानंतर मात्र अक्षरशः लाट यावी तशी आपल्या लेखकांनी उत्तमोत्तम मनोगते सादर केली.>>> मला वाटतं शुक्रवार, शनिवार, रविवार थोडा मोकळा वेळ मिळू शकतो म्हणून त्या दरम्यान जास्त लोकांनी लिहिले असावे.
चांगला उपक्रम होता, त्या निमित्ताने सेल्फ ॲप्रेजल झाले. पुढील शॉर्ट term (अल्पकालीन) आणि लाँग term ( दीर्घ कालीन) उद्दिष्टे / लक्ष्य
ह्यांचा पण अदमास घेता आला.
मुख्य म्हणजे बाकीच्या लोकांचे विचार, विचार प्रवाह, त्यांचा प्रवास कळला.

नेहेमी प्रमाणे डॉक्टरांचा विचार प्रवर्तक धागा. त्यांचे वैद्यकीय विषयांवरचे धागे देखील माहितीप्रद आणि सर्वसामान्यांना समजतील असे असतात.
हे सगळॆ आणि विशेषतः प्रतिक्रिया वाचून लक्षात आले कि ह्या सर्व इंद्राच्या ऐरावतांपुढे मी तर शामभटाची तट्टाणी देखील नाही.

लिहावे कसे हे शिकवणारे कोर्सेस असतात हे वाचून नवल वाटले होते परंतु हा धागा वाचल्यावर त्याची किमान माझ्यासाठी तरी आवश्यकता आहे असे वाटले.

वरील सर्व विश्लेषण-प्रतिसाद आवडले.

या प्रकारचे दोन धागे काढल्यानंतर त्यातून एक सुधारणा सुचली. इच्छुकांना एखाद्या विषयावर लिहिताना काही मार्गदर्शक प्रश्न दिलेले होते. त्याचबरोबर अशीही टीप दिली होती की, जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही. तरीसुद्धा बऱ्याच जणांनी संपूर्ण प्रश्न उतरवून घेऊन त्याखाली उत्तर अशी लेखनपद्धत ठेवली.

हे लिहिणाऱ्याच्या दृष्टीने सोपे असते Happy परंतु जेव्हा एखादा वाचक सलग बरेच प्रतिसाद वाचतो तेव्हा सतत मध्येमध्ये येणाऱ्या प्रश्नांमुळे त्याचा रसभंग होतो.

इथून पुढे असा धागा काढल्यास त्यात एकाखाली एक असे प्रश्न न देता निव्वळ चार-पाच मुद्दे एकाच ओळीत लिहून देता येतील. म्हणजे लेखकाला आपल्या शैलीनुसार एक स्वतंत्र परिच्छेद लिहिता येईल.

धागा काढल्याबद्दल कुमार सरांचे आभार. त्यानिमित्ताने मागे वळून बघणं झालं.
ह्या धाग्याइतरांच्या प्रतिक्रिया वाचायलाही मजा आली.

प्रतिक्रिया वाचून लक्षात आले कि ह्या सर्व इंद्राच्या ऐरावतांपुढे मी तर शामभटाची तट्टाणी देखील नाही. + १०००

छान होता धागा >> +1
सगळ्यांचा प्रवास आणि दृष्टिकोन जाणून घ्यायला मजा आली

कबूल केल्याप्रमाणे मी 'माझा लेखन प्रपंच' हा लेख (https://www.maayboli.com/node/84745) टाकला आहे. कुमारने हा धागा काढला नसता तर कदाचित मी यावर कधीच काही लिहीले नसते. त्यामुळे कुमारला धन्यवाद!

छान उपक्रम. डॉ कुमार वाचकांच्या कळफलकाला हात घालतात आणि लिहितं करतात. इथे आलेले लेखनप्रवास आणि त्यामागच्या भूमिका आवडल्या. पराग was a surprise. यातलं काहीच माहीत नव्हतं. छान वाटलं.
प्रतिसाद वाचता वाचता मलाही लिहू की नको असं होत होतं. रघू आचार्य यांचं म्हणणंही त्यावेळी फार पटलं. पण मग असंही वाटलं की आपल्याला जे वाटतं ते नेमकेपणे व्यक्त करता येणं हे लेखनकला नाही तरी किमान कौशल्य आहेच. आणि ते सगळ्यांनाच लाभतं असं नाही.

आता मी मी करायला सुरुवात करतो. मी शाळाकॉलेजात असताना सगळे निबंध माझ्या मनाने लिहायचो. कोणतीही पुस्तकं कधी वापरली नाहीत. ज्युनियर कॉलेजात असताना आपणहूनच दोन लेख लिहून मराठीच्या प्राध्यापकांना वाचायला दिले होते. त्यांनी कौतुकही केलं. ते कोणीतरी विद्यार्थी लिहितोय ना? मग प्रोत्साहन देऊ या , यापेक्षा किंचित जास्त होतं. त्याच प्राध्यापिकेने एक हायकू विशेषांक वाचायला दिला. तो वाचून मला हायकू झाले. पुढे कविता झाल्या. रंग माझा वेगळा वाचल्यावर गझलेचा फॉर्म आवडला. परिशिष्टात गझलेची बाराखडी होती. ती वाचली होती का ते आठवत नाही. पण ठोकून ठोकून दोन गझला केल्या. हे सगळं लिहिलेली डायरी अजून आहे. वाचताना कधी , इतकंही वाईट नाही, तर कधी काय हा कचरा असं वाटतं.
शेवटच्या वर्षी कॉलेजच्या छापील मॅगॅझिनमध्ये माझी एक वृत्तबद्ध कविता आणि एक पाडलेला विनोदी लेख प्रकाशित झाले होते. शिवाय म वा मंच्या एका अभिनव स्पर्धेचा वृत्तान्तही लिहिला होता. तीन लेखनांखाली एकच नाव नको म्हणून तो वृत्तान्त कार्यवाह असलेल्या मुलीच्या नावे छापला गेला. म्हणजे त्या वयात घोस्ट रायटिंगही करून झालं.

मायबोलीवर थोडंफार लिहिलं. सुचलं , लिहावंसं वाटलं म्हणूनच लिहिलं. आपली म्हणून एक शैली आहे, शब्दांशी खेळायला जमतं. उपहास, तिरकस लिहिता येतं हे कळलं. पण आताशा काही लिहिलं तर शब्द बोथट आणि लिखाण पसरट होत आहेत असं वाटतं. हा प्रवास अस्मिता यांच्या प्रवासाच्या बरोबर उलट आहे. आणि त्यामागचं मानसिक कारणही.

वैयक्तिक गोष्टी पब्लिक फोरमवर लिहिणं फारच अवघड. याबाबत माझं माझ्या लेखनगुरू शान्ता शेळक्यांसारखंच आहे. पर्सनल गोष्टी क्वचित लिहिल्या तरीही त्यातले तपशील वगळून थोडं गूढ वाटेल असंच लिहिलं गेलं. तरीही ते पोचलं हे पाहून बरं वाटलं.
तीनचार महिन्यांपूर्वी डोळे आणि मन ओसंडून वाहत असताना एक मोठा लेख लिहून काढला आणि सेव्ह न करता विंडो बंद केली.

हायला ! या आशयाची एक कविता मी कॉलेजात असताना लिहिली होती. म्हणजे इतक्या वर्षांत याबाबत काहीच फरक पडलेला नाही.

पडदे

माझ्या मनात डोकावून पाहताय तुम्ही?
पण तिथे तुम्हांला फक्त पडदेच दिसतील.
(तुम्हांला कळायचं नाही -
-- ते पडदे आहेत.)

रंगीबेरंगी फुले आहेत त्यावर.
अगदी खरीखुरी भासणारी.

या पडद्यांपलीकडे तुम्हांला येता येत नाही -
आणि माझं मन-
ते बंदी होऊन पडलंय हो
या पडद्यांआड!

भरत छान मनोगत. कविताही सुरेख.
.
तुमचा लेख save न झाल्याचं प्रचंड वाईट वाटत आहे. .
कधी ही आधी ctrl s करायचंच. Happy
( मी हे सांगतेय पण मागच्या महिन्यात prod वरची file बॅकअप न घेता उडवली होती, local वरून कुणाला कळू न देता restore केली आणि वाचले. तात्पर्य : बॅकअप आणि save महत्वाचं )

किल्ली, मी तो लेख समजून उमजूनच सेव्ह केला नाही. मायबोलीवरच टाइप केला होता. It was too personal. मनाच्या खूप आतलं लिहिलं होतं. लिहून भावनांचा निचरा झाला. ते पुरलं.

भरत, छान मनोगत.
आपल्याला जे वाटतं ते नेमकेपणे व्यक्त करता येणं हे लेखनकला नाही तरी किमान कौशल्य आहेच
>>>> अ -ग - दी ! +१११

भावनांचा निचरा झाला हे महत्वाचं. >>>>

यावरून सॉमरसेट मॉम यांचे एक प्रसिद्ध मनन आठवले. ते माझे खूप आवडते असल्यामुळे लिहितो :

I have put a lot of myself into this narration. I could get rid of many memories by writing about them. They were harbouring inside me for too long. It was a kind of catharsis, the purging of emotions. It was most liberating.


लेखक याचसाठी लिहीत असतो !! Happy

भरत, वा मनस्वी लिहिलत. कविताही भिडलीच.>> +१.

पर्सनल बद्दलही शेकडो अनुमोदन. एकदा आपण इथं लिहिलं की लोक इथे आपल्याला आपल्याच अनुभवाबद्दल नक्की काय वाटायला हवं, हे सांगण्याची शक्यता असते. मलाही माझ्या 'गाभाऱ्यात' कुणी पाऊल ठेवलेलं आवडत नाही. बरेचदा त्यांना ते अनुभव आलेलेही नसतात. मग मनात येतं, तुम्ही ज्या गावाला गेलेला नाहीत त्या गावचा रस्ता मला दाखवू नका. 'टेरिटोरिअल' होते एकदम. एकएकट्याने मोकळं बोलायला मात्र आवडतं.

लेखन आपल्याला आपल्या अनुभवाकडे त्रयस्थपणे बघायला मदत करते आणि त्यापासून थोडं विलग करते. Reliving and relieving.

----------
हा धागा एका वेगळ्या उंचीवर जात आहे, ज्याचं आश्चर्य व आनंद दोन्ही वाटतो आहे. Happy

१. ७वी / ८वी मध्ये असल्यापासून लिहीत आहे. शाळेत असताना गोष्टी लिहायला आवडत असे. मित्र वगैरे नंबर लावून गोष्टीची वही वाचायला घ्यायचे. त्याचे अप्रूप वाटायचे. १० वी च्या सुट्टीत गोष्टी लिहिण्याचा क्लास पण लावला होता (पुण्यातील नूमवि शाळेत मे महिन्यात वर्ग असत) कॉलेज सुरु झाल्यावर कविता लिहू लागलो आणि मग प्रवास वर्णनं . ट्रेक करायला लागलो तेव्हा मग ट्रेक ची वर्णनं लिहू लागलो. सध्या भावानुवाद हा प्रकार ट्राय करतोय. ज्यांना रस असेल त्यांनी पॉडकास्ट जरूर ऐका :

https://open.spotify.com/show/4YS6PdHHnnrPaAukxuQI1g?si=f1b4b73260f64b90

https://youtu.be/0N32NODImOs?si=AujfVMaN1zgYT_NE

२. हाताने वहीत लिहायला नेहमीच जास्त आवडतं , पण सध्या इलेक्ट्रॉनिक लिहायला सोपे जाते (लॅपटॉप हाताशी असतो किंवा फोन वर सहज मराठी टाईप करता येते )

३. ब्लॉग

https://unmeshjoshi.blogspot.com/

https://unmeshnaringideshat.blogspot.com/

४. कविता, ट्रेक/प्रवास वर्णने .

५. मराठी भाषेवर प्रेम आहे आणि अलंकारिक लिहायला आवडतं

६. बहुतेक लेखन मित्रांनीच वाचलं आहे काही निवडक लेखन ब्लॉग वरील वाचकांनी वाचले आहे. प्रतिक्रिया बहुतेक सकारात्मक असल्यामुळे कधी सुधारणा करता आली नाही किंवा जे लिहिले ते चांगलेच आहे असे वाटत राहिले. मायबोलीवर नवीन आहे आणि थोड्याच कविता शेअर केल्या आहेत , त्यामुळे अजून वाचक मिळायला वाव आहे Wink

भावानुवाद हा प्रकार ट्राय करतोय >> छानच !
इथेही लिहीत राहा
शुभेच्छा !
..
हा धागा एका वेगळ्या उंचीवर जात आहे, ज्याचं आश्चर्य व आनंद दोन्ही वाटतो आहे >>>>
+११
पूर्वीच्या 'वाचन' धाग्याच्या तुलनेत याचे प्रतिसाद अधिक होतील असे वाटले नव्हते. त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !

कुमार सरांच्या या धाग्यावर नक्की प्रतिसाद द्यायचा अस ठरवलं खर पण नंतर बघतो तर त्यावर एकाहून एक भारी प्रतिसाद आले. त्यात आपला तो काय प्रतिसाद द्यायचा आणि त्यानंतर सरांचे सामोरोपाचे विवेचन, यामुळे आता तर नकोच नको असा विचार आला. पण आता पुन्हा काही जणांचे प्रतिसाद पाहून माझे हे वरातीमागून घोडे.......
तर फार काही विशेष म्हणावा असा लेखनप्रवास नाही माझा. शाळेत मराठी आवडीचा विषय आणि वाचनाची आवड यामुळे सुरुवातीला शाळेतल्या वाचनालयात मधल्या सुट्टीत मी "सुंदर वासालीसा" "तेरेखोलचे रहस्य" या पठडीतील बरीच पुस्तके वाचली. याच काळात मला एक वाईट (?) सवय लागली. जेवताना मला काहीतरी वाचायला लागे त्याशिवाय घास गळ्याखाली उतरत नसे. मग मी वर्तमानपत्र, मराठीच पुस्तक, चिटोरा असं काहीही घेऊन बसे. पाहुण्यांकडे गेल्यावर माझी पंचाईत होत असे. ही सवय जायला बरीच वर्षे लागली. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर पुलं, खांडेकर, जीए, कुसुमाग्रज, शांता शेळके यांच्या पुस्तकांनी वाचनाची भूक भागवली. आत्तापर्यंत वाचनमात्र असलेल्या मला आता मराठी वाङ् मय मंडळाने लिहिते केले. कविता, चारोळ्या, काही प्रवास वर्णने अशी सुरवात झाली पण त्याचा दर्जा फार खास नव्हता. त्यानंतर भटकंती, ट्रेकिंग यात मग लेखन मागे पडले. पण मग पुन्हा काही वर्षांनी प्रवासवर्णने लिहायला सुरुवात केली. मग काही माहितीपर ललित लेख लिहिले त्यातले काही व्हाट्स अपवर तर काही साप्ताहिकात, वृत्तपत्रात, इ अंकात, पुस्तकात प्रकाशित झाले. त्यानंतर बरेचदा काही माहितीपर लेख लिहिले. या नंतर बरेचदा एखाद्या लेखकाचं वाचलं कि त्यानंतरच लेखन केल्यावर त्या लेखकाची शैली, विचार लेखनात उतरत असे. मग मात्र मी लेखन करताना ते तसे होऊ नये याकडे लक्ष देत असे. कुणी एखादा विषय दिला तर शक्यतो लगेच सुचत नाही त्यासाठी काही विचारमंथन डोक्यात घोळते आणि मग त्यातून काहीतरी सुचते. अभ्यासोनि प्रकटावे असे नेहमी वाटते, तरीही एखाद्या विषयावर उत्स्फूर्तपणे काही सुचल्यास लगेच न लिहिता त्यावर मनन, चिन्तन करून मग ते लिहावे असे लिखाण चालू केले आहे. त्यामुळे मला तरी अजूनही माझे लिखाण हे "रखडलेले खरडणे" असेच वाटते आहे.

याच काळात मला एक वाईट (?) सवय लागली. जेवताना मला काहीतरी वाचायला लागे त्याशिवाय घास गळ्याखाली उतरत नसे. मग मी वर्तमानपत्र, मराठीच पुस्तक, चिटोरा असं काहीही घेऊन बसे.
पाहुण्यांकडे गेल्यावर माझी पंचाईत होत असे>>>मला झोपताना वाचण्याची सवय होती.. त्याशिवाय झोप येत नसे.. प्रत्येकाकडे काही न काही असे. फक्त एकदा एकांकडे गेले होते त्यांच्याकडे एकही (मराठी) पुस्तक नव्हतं ( बहुदा माझ्या ३-४ च्या मुलांसाठी) मग त्यांनी मला मराठी वृत्तपत्र दिलं. माझ्या आठवणीत मी पहिल्यांदाच तेव्हा पेपर हातात धरला असेल. एक दोन मथळे वाचले आणि मग झोपले.

Pages