द्वेष : एक भय गूढकथा, भाग ८

Submitted by प्रथमेश काटे on 24 February, 2024 - 10:12

जणू काहीच वेगळं घडत नाही अशा अविर्भावात, संथ बेफिकीरपणे श्री पायऱ्या चढून वर आलाआला. राजाभाऊ ही मनाची तयारी करीत मागून आले. अगदी सहजगत्या श्री कडी बाजूला सरकवून दरवाजा पुढे लोटला. आजूबाजूच्या पूर्ण शांततेत तो दरवाजाचा करकरण्याचा आवाज राजाभाऊंना पुढील भयानकतेचा सूचक वाटला ; पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. एव्हाना दिव्यांची झकपक थांबली होती. दारं कडे कडेला आत गेली. तसा आतला काळोख एका नव्या, निराळ्या अधिकच गडद रूपात त्यांच्यासमोर साकार झाला. हात मागे घेऊन श्री जागेवर उभा राहिला त्याचे टप्पोरे, निळे डोळे त्या अंधारावर खिळलेले. - राजाभाऊ मात्र अनिच्छेमुळे समोर पाहणं टाळून त्याचं निरीक्षण करत होते. - अंधारात त्या डोळ्यांतले भाव दिसणं शक्य नव्हतं ; पण तो अगदी एकटक समोर बघत होता. त्याच्या उभं राहण्यात एक ताठपणा, सावधपणा आला होता. जणू समोरचं एखादं संकट वा एखादा शत्रू उभा ठाकला होता ! किंवा त्याची चाहूल लागली होती. अभावितपणे भाऊंची नजर पुन्हा आतल्या दिशेला वळाली. काहीच क्षण पण तेवढ्यात त्या अंधारात काहीतरी हलवल्यासारखं...!! शरीराला बारीक असा झटका बसून राजाभाऊंनी मान फिरवली. त्या अंधारात खरंच काही दिसलं ? की केवळ भ्यायलेल्या मनाचे खेळ ? शहानिशा करायची त्यांची इच्छा नव्हती.

" चला." असं म्हणून श्रीने आत पाऊल टाकलं. जरासे दबकतच राजाभाऊ ही आत गेले. त्यांनी आपल्या मागे दरवाजा लावून घेतला. हातातला टॉर्च श्रीने ऑन केला. बटनांच्या पॅनलवर त्याचा झोत टाकून हॉलमधील दिवा लावला. आणि ते पुढे पाऊल टाकणार तोच... पुन्हा तो झकपक करू लागला. यावेळी अजूनच जोरजोरात. ते दोघे होते तिथेच थांबले. खरंतर यात फार आश्चर्य वाटायला नको. कारण त्या दोघांच्या जवळीकीच्या नुसत्या जाणिवेनेच काय प्रतिक्रिया झाली होती हे राजाभाऊंनी पाहिलंच होतं. आता तर ते या घराच्या आत होते ; पण शेवटी तेही साधे माणूसच.‌ असा प्रकार काही रोजच्या जीवनाचा भाग नक्कीच नाही. नाही म्हटलं तरी थोडी भीती मनात होतीच. तिला दाबण्याचा ते प्रयत्न करत होते ; पण एवढ्यानेच होत नव्हतं. त्या भीषण प्रकाराला आता आवाजाचीही साथ मिळू लागली होती. ' खड् खड् ,' ' खण्ण् खण ' असे आवाज खोलीभर होऊ लागले. भिरभिरत्या डोळ्यांनी राजाभाऊंनी सगळीकडे नजर फिरवली. हॉलमधील लाकडी फर्निचर लाकडी वस्तू काचेची शो पीसेस, आणि इतर छोट्या मोठ्या वस्तू हलत होत्या. दिव्यांची झकपक आता अगदीच जलदगतीने होऊ लागलेली. अगदी ती लाईटची ट्यूब फुटते की काय असं वाटण्या इतपत जोरजोरात लाईट बंद चालू होत होती. राजाभाऊंनी आवंढा गिळला. मनाच्या तयारीला निश्चयाला पुन्हा पुन्हा आव्हान मिळत होतं. त्याला तोंड देण्याइतकं धैर्य त्यांच्यात होतं का ? मनात या शंकेने शिरकाव केला. नाही... असं होऊ देता कामा नये.

आतापर्यंत शांत, काहीसा बेफिकीर दिसणाऱ्या श्रीचा चेहरा आता बदलला होता. गंभीर झाला होता. आता त्याने लगेचच एक कृती केली. कोटच्या खिशातून एक छोटीशी कुपी काढली. त्यातील पाण्यासारखं रंगरूप हीन द्रव्य थोडे हातावर घेऊन तो समोर सगळी कडे, सर्व वस्तूंवर शिंपडू लागला. वस्तू खूप जोरजोरात हलत होत्या हिंदकळत होत्या.

" राजाभाऊ बी अलर्ट. " तो हळू पण तीक्ष्ण सुरात म्हणाला. तेवढ्यात एका बाजूची खुर्ची वेगाने भिरभिरत त्यांच्याकडे लोटली गेली. राजाभाऊंनी चटकन बाजूला सरत तिचा धक्का चुकवला. पाठोपाठ छोट्या मोठ्या वस्तू जागेवरून आपोआप उचलल्या जाऊन त्यांच्या दिशेने भिरकावल्या जाऊ लागल्या. खुर्च्या इकडून तिकडे लोटल्या जाऊ लागल्या. श्री वेगाने हालचाल करून, स्वतःचा बचाव करत कुपीतील द्रव्य चारी बाजूला शिंपडत होता. राजाभाऊ या अनपेक्षित आक्रमणाने गोंधळले होते. मात्र हळूहळू हॉलमधल्या वस्तू, सामानांची ती (अनैसर्गिक) खळबळ कमी कमी होत गेली. आणि शेवटी सर्व जागच्या जागी स्थिरावल्या. मग पुतळ्यासारख्या स्तब्ध उभ्या असलेल्या राजाभाऊंकडे वळून त्यांच्या खांद्यावर हलकसं थोपटत म्हणाला." राजाभाऊ..." रिलॅक्स."

झालेल्या प्रकाराने गोंधळलेल्या, बावरलेल्या राजाभाऊंना चित्त थाऱ्यावर आणण्यासाठी काही क्षण लागले. ते सावरल्यासारखे वाटताच श्री त्यांना काही सूचना करणार तोच लाईट्स पुन्हा बंद झाल्या. पुन्हा सगळीकडे काळामिच्च, गडद अंधार झाला.

" थांबा. मी करतो." असं म्हणून राजाभाऊ बटणांच्या बोर्ड कडे गेले. आणि बटण दाबलं तरी यावेळी लाईट ऑन झाली नाही. त्यांनी पुन्हापुन्हा प्रयत्न करून पाहिला ; पण उपयोग झाला नाही.

" लाईट्स गेल्या वाटतं." राजाभाऊंच्या स्वरात निराशा आणि भीती होती. " आता...? "

" हरकत नाही." श्री किंचित हसत म्हणाला. " दरवाजा आणि खिडक्या नीट लावून घ्या." आणि मग मागे त्याच्या पावलांचा आवाज आला. राजाभाऊंना त्याच्या या सूचनेमागचं कारण समजेना ; पण त्यावर फारसा विचार न करता त्यांनी दरवाजा कडी लावून बंद केला. खिडक्या नीट लावून घेतल्या.

मागे परत श्रीची चाहूल लागताच ते मागे वळले. एका टी पॉयवर त्याने काहीतरी वस्तू ठेवली.

फट्ट..चर्रर्रर... हवेत एक बारीकशी ज्योत प्रज्वलित होऊन मोठी मोठी झाली. तिच्या प्रकाशात श्रीचा चेहरा उजळला. श्रीने खाली वाकून टीपॉयवर ठेवलेल्या मेणबत्तीवर ती ज्योत धरली. मग हात जोरात हलवून काडी विझवली. मेणबत्तीवर स्थिर होऊन ती ज्योत संथगतीने, सरळपणे तेवत राहिली. तिचा मंद नारिंगी पिवळा प्रकाश आजूबाजूला पसरला. त्यानंतर श्रीने राजाभाऊंकडे नजर टाकली. राजाभाऊंनी हातातली फुलांची परडी पुढे केली. त्यात रातराणीची दाट गुलाबी रंगाची, सुंदर, छोटी छोटी फुले होती. ती श्रीने मेणबत्तीच्या भोवती गोलाकार रचून ठेवली. अंधकार बाजूला सारून सुरक्षिततेची भावना देणाऱ्या त्या मंद, पिवळसर प्रकाशाच्या जोडीला या फुलांचा तरल, चित्ताकर्षक सुवासही सगळीकडे पसरला. वातावरणातील या सकारात्मक बदलामुळे राजाभाऊंच्या मनावरील ताण काहीसा हलका झाला. छान, प्रसन्न वाटू लागलं. श्रीने त्यांच्याकडे पाहत मंद स्मित हास्य केले. त्यांनीही हसून प्रतिसाद दिला. मग तो टी पॉय श्रीने एका कडेला सारत श्री म्हणाला -

" राजाभाऊ आता या प्रयोगाची प्राथमिक तयारी करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला फार काही सांगण्याची जरूरी नाहीच. फक्त एक गोष्ट. जागा मात्र बिलकूल सोडू नका." त्याच्या शेवटच्या शब्दांत गंभीर सूचना होती, सावधानतेचा इशारा होता. त्या शब्दांनी पुन्हा स्थळकाळाची, सद्यस्थितीची जाणीव दिली. नाही म्हटलं तरी अंशतः भीती मनाला शिवलीच.
एवढंच बोलून श्री टी पॉय समोर जमिनीवरच पद्मासन घालून बसला. त्याने आपले डोळे सावकाश मिटून घेतले. आणि हात जोडून काही क्षण रामनामाचे स्मरण केले. मग दोन्ही हात मांडीवर आकाशाच्या दिशेने करून ठेवत तो ध्यान करू लागला.

आता काही वेळ अगदी मोकळा होता. त्यांच्या एखाद्या ' मोहिमेत ' कधी अशी वेळही यायची. पूर्ण मोकळी. काहीही विशिष्ट काम करण्याचं बंधन नाही. जरूरी नाही. मग वाटल्यास या वेळात विचार करत बसावं. श्री सोबत अनेकदा झालेल्या तात्विक चर्चांवर. किंवा इतर कशावर. किंवा सरळ मोबाईल घेऊन बसावं. कारण श्री सोबत अशा प्रकरणांमध्ये शिरताना जी एक गंभीरता, सावधानता आपोआपच मनावर, विचारांवर व्यापली जायची, ती अशा क्षणी जरा बाजूला करता येई. खरंतर तेच करणं योग्य असे. तेही नाही तर श्री सोबत ते स्वतःही ध्यानाला बसत. अर्थात अशा वेळी त्यांच्या ध्यानाचं स्वरूप वेगवेगळे असे.

राजाभाऊ तिथल्या सोफ्यावर बसले. हातातल्या रिस्टवॉच वर त्यांनी नजर टाकली. नऊ वाजून पंचावन्न मिनिटं. थोडीशी रेस्ट घेऊन साडेनऊ वाजता ते दोघे घराबाहेर पडले होते. पंचवीस तीस मिनिटांमध्ये काय काय घडलं होतं ! पुन्हा... नको. 'अशा' वेळी काहीही करायला ते स्वतंत्र असत ; पण फक्त दोन गोष्टी करायच्या नाहीत. एक म्हणजे जसं मगाशी श्रीने सांगितलं. जागा सोडायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे - त्यांनी स्वतःलाच एक दंडक घालून घेतला होता. तेव्हा जे काही त्यांच्या समोरचं कार्य असे, त्याबद्दल कुठलाही विचार एकदम वर्ज्य.

बरोबरच होतं. रात्रीची वेळ. सगळीकडे एकदम शांतता. फक्त मेणबत्तीच्या मंद, मर्यादित उजेडाची सोबत. शिवाय अशा जागी. अन् ते एकटेच ( बोलू चालू शकणारे ) फक्त‌. यावेळी जर 'त्या' गोष्टींबद्दल विचार करत राहिलं तर काय अवस्था होईल ?

आपल्या कुर्त्याच्या खिशातून मोबाईल काढून त्यात ते पाहू लागले.
वेळ मंदगतीने पुढे सरकत होता. जणू त्याला कसलीही घाई नव्हती. आसपासची ही गंभीर शांतता, हा मख्ख, दाट अंधार या साऱ्याचं आयुष्य अजून किती होतं कुणास ठाऊक ? राजाभाऊंची नजर समोरच्या मोबाईलच्या स्क्रीनवर होती. आता ती प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवावी लागत होती. लक्ष नीट लागत नव्हतं. या जागेतील वेगळेपणाची, भयाणतेची जाणिव सतत मनाला डाचत होती. अर्थात त्याला पर्याय नव्हता हे खरं ; पण सारं समजत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत नव्हतं. भीती वाटतच होती. अन् कदाचित म्हणूनही असेल. एक प्रश्न त्यांच्या मनाला शिवत नव्हता. या घरात काहीतरी वेगळा प्रकार असल्याची त्यांना आधीपासून कल्पना होतीच.‌ किंबहुना त्यांच्या आता इथे असण्याचं कारणही हेच होतं. असं असूनही आताच ही जाणीव इतक्या प्रकर्षाने त्यांना का सतावत होती ? हा विचार मनात यायला हवा होता. यातली विसंगती, वेगळेपणा समजायला हवा होता ; पण तसं होत मात्र नव्हतं.

क्रमशः
© प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults