द्वेष : एक भय गूढकथा भाग २

Submitted by प्रथमेश काटे on 8 February, 2024 - 12:57

...माझे पपा. इथेच आहेत ! या घरात ! पण ; वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत का ? ती खोली तर... नाही ; पण ते आता महत्त्वाचं नाहीये. ते माझे पपा असतील तर मला त्यांना भेटायला हवं. झटक्यात अंगावर पांघरलेली चादर फेकून देऊन ती ताडकन बेडवरून उठली. पळतच तिने बेडचा दरवाजा उघडला. आणि ती हॉलमध्ये आली. हॉल अंधारात होता. खिडकीच्या पडद्याच्या एका बारीकशा उघड्या फटीतून दूरवरच्या लाईटच्या उजेडाची तिरीप आत आलेली. त्याचाच परिवर्तित अतिमंद उजेड हॉलमध्ये पसरला होता. स्वतःभोवती फिरत प्रिया भिरभिरत्या नजरेने तिच्या पपांना शोधण्याचा प्रयत्न करत होती.

" पपा... प्रियाच्या तोंडून आवेगाने साद निघाली. " कुठे आहात तुम्ही ? "

मात्र तिच्या प्रश्नाला उत्तर आलं नाही. त्या अंधारात भयाण शांतताच भरून राहिली होती. ती अधिकच भावूक होऊन म्हणाली -

" पपा मला ठाऊक आहे, की तुम्ही आहात इथे. मग मला उत्तर का देत नाही आहात ? पपा मी परत आलीये.. तुमची प्रिया आलीये... तुमच्या लाडक्या प्रियाशी बोलणार नाही का तुम्ही ? "

तिचं शेवटचं वाक्य संपतं न संपतं तोच जणू तिला उत्तर म्हणून एक आवाज आला. फक्त त्या आवाजात शब्द नव्हते‌ तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं. उजव्या बाजूला असलेल्या शेल्फ मधली एक लाकडी मुर्ती हलत होती. तिच्या जवळपासच खिडकीबाहेरच्या उजेडाचा कवडसा पडला असल्याने तो भाग बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होता. एखाद्या शिपायासारखी दिसणारी ती मुर्ती जरा एका बाजूला तोंड करून उभी होती, ती हलत हलत तिच्या बाजूला वळाली. प्रिया जागेवर स्थिर राहून त्या मुर्तीकडे बघत होती. तिच्या डोळ्यांत आशा होती. काहीच क्षण.. ती मुर्ती. आणि प्रिया. आपापल्या जागी स्तब्ध उभ्या राहून एकमेकांकडे बघत होत्या. आणि एकदमच ती मुर्ती हवेत वर उचलली जाऊन वेगाने तिच्या दिशेने फेकली गेली. वेळीच खाली झुकून तिने स्वतःचा बचाव केला. पुन्हा सरळ उभी राहून ती बोलू लागली तेव्हा तिचा स्वर सद्गदित झाला होता.

" पपा... काय हो झालंय तुम्हाला ? का मला मारण्याचा प्रयत्न करताय ? तुमच्या प्रियावर रागावला आहात का, तुम्हाला सोडून गेले म्हणून. मला नाही हो समजू शकलं की तुम्ही इथेच आहात. नाहीतर कध्धीच तुम्हाला सोडून गेले नसते हो. विश्वास ठेवा माझ्यावर. आय... आय रिअली लव यू पपा."

तिचं बोलणं संपताच पुन्हा शांतता झाली. आता मात्र ही शांतता प्रियाला जाचू लागली होती. थोडा वेळ गेल्यावर पुन्हा तिने हळूवार आवाजात पण अत्यंत आवेगाने हाक मारली.

" पपा..."

मात्र तिच्या तोंडून शब्द निघताच हॉलमध्ये वेगवेगळ्या जागी ठेवलेल्या छोट्यामोठ्या वस्तू तिच्या अंगावर जोरात आदळू लागल्या. कुणीतरी अत्यंत संतापाने फेकून मारल्यासारख्या‌. ती मागे मागे सरकू लागली. पाठीला भिंतीचा स्पर्श होताच तिला थांबावच लागलं. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हात पुढे आडवा केला. आता ती घाबरली होती. एकदम तिच्या अंगावर वस्तू आदळणं थांबलं ; पण आता इथे ती सुरक्षित नसल्याचं तिच्या चांगलच लक्षात आलं होतं. मनात खूप प्रश्न होते ; पण याक्षणी सुरक्षितता महत्त्वाची होती. ती दरवाजाकडे धावली. थरथरत्या हाताने तिने कडी काढली. आणि दरवाजा उघडू लागली. मात्र तितक्याच वेगाने दार पुन्हा पुढे ढकललं गेलं. तिने पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न केला ; पण तिला ते जमेना. जणू जशी ती दरवाजा आत उघडत होती, तसं कुणीतरी ते पुढे ढकलत होतं. त्याच्या ताकदीपुढे तिचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. आता ती गांगरून गेली. तिला बाहेर पडता आलं नाही तर...? नाही. असा धीर सोडून चालणार नव्हतं.

' राम...राम... राम " तोंडाने पुटपुटत तिने पुन्हा जोर लावून दरवाजा ओढला. आणि सहजरीत्या दरवाजा उघडला गेला. झटकन ती बाहेर पडली. आपल्या मागे तिने दरवाजा कडी लावून बंद केला. आणि ती घाईघाईने धावत सुटली. कुठे जायचं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. अशी एकच व्यक्ती होती ; जिच्याकडे ती अशा अवेळी ही जाऊ शकत होती, आणि जी तिला तिच्या समोर उभ्या राहिलेल्या संकटातून सोडवण्यास मदतही करू शकत होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ' श्री ' होता.
प्रियाने धावतच श्रीचं घर गाठलं. त्याच्या बेडरूमची लाईट ऑन असलेली तिने पाहिलेली. तो बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत जागा असायचा हे तिला माहीत होतं. तिने डोअर बेल वाजवली. काहीच सेकंदात दरवाजा उघडला गेला. श्रीचे सहकारी राजाभाऊ दारात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती ; पण आश्चर्य नव्हतं. त्यांनी प्रियाला आत घेतलं. आणि तिला श्रीच्या खोलीकडे नेऊ लागले. मात्र मध्ये माईंच्या खोलीपाशी ते थांबले, आणि ती नको नको म्हणत असतानाही त्यांनी माईंना उठवलं आणि कॉफी करण्याची विनंती केली. त्या किचन कडे गेल्या आणि राजाभाऊ प्रियाला घेऊन श्रीच्या खोलीत आले.
श्री खिडकीपाशी पाठमोरा उभा होता. मात्र त्याची उंचपुरी, तगडी शरीरयष्टी, रूंद खांदे आणि दोन्ही पाय जरासे फाकून, हात पाठीमागे धरून उभे राहण्याची त्याची पोझ यांमुळे त्याची पाठमोरी आकृतीही नजर खिळवून ठेवत होती. विचारमग्न झाल्यावर तो खिडकीपाशी, असा उभा राहायचा. त्याच्याशी इतका निकटचा संबंध असूनही प्रियालाही त्याला असंच बघत राहावंसं वाटत होतं. मघाशी तिच्यासोबत घडलेल्या गोष्टीही क्षणभर ती विसरून गेली.

" श्री " राजाभाऊंनी दिलेल्या हाकेने ती भानावर आली. श्रीने त्यांच्या दिशेने मान वळवली.

" प्रिया आली आहे."

त्यांचं वाक्य पूर्ण होताच श्री चटकन मागे वळाला. रात्रीच्या वेळीही त्याचा अंडाकृती, गोरापान चेहरा एखाद्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखा टवटवीत होता. जराशा दाट भुवया अगोदर किंचित आक्रसलेल्या ; पण वळता वळता त्या स्थिर झाल्या होत्या, हे प्रियाच्या लक्षात आलं नाही. त्याचे निळेशार, भेदक डोळे तिच्यावर एकवटलेले. त्याचे डोळे म्हटलं तर बोलके होते. म्हटलं तर गूढ. सदैव हसऱ्या असणाऱ्या त्याच्या डोळ्यात याक्षणी मात्र जाणवते न जाणवतेशी काळजीची छटा‌ होती‌. तेही फक्त राजाभाऊंना समजत होतं.

क्रमशः
© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

(हे आपलं उगीच)
याचं चित्रीकरण झालं तर प्रिया क्रिटि सेनॉन
श्री कोण ठेवावा बरे, अंडाकृती चेहरा: वरूण धवन/रणबीर/विक्रांत मासे?

सर्वांचे आभार Bw

याचं चित्रीकरण झालं तर प्रिया क्रिटि सेनॉन
श्री कोण ठेवावा बरे, अंडाकृती चेहरा: वरूण धवन/
रणबीर/विक्रांत मासे? >> मॅम प्रिया ही नायिका नाही. श्री कथांची मी सिरीज करणार आहे. त्यात ती पुढे येईल न येईल ; सांगता येत नाही. श्री हे charector मी तरी दुसऱ्याच माझ्या एका आवडत्या अॅक्टर ला imagine करून लिहिले आहे. संपूर्ण वर्णन पुन्हा वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. बाकी तुमचे म्हणणे ही स्तुत्य आहे.

श्री हे charector मी तरी दुसऱ्याच माझ्या एका आवडत्या अॅक्टर ला imagine करून लिहिले आहे. >> ह्या कॅरॅक्टर बद्दल वाचताना बर्‍यापैकी समर्था आठवतात. असेच लिहित राहा. थोडे मोठे एपिसोड लिहिता आले तर बघा.