दडपे पोहे

Submitted by लंपन on 22 January, 2024 - 07:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पातळ पोहे- ३ वाट्या
कांदे -दोन बारीक चिरलेले
टोमॅटो -एक बारीक चिरलेला
भाजलेले शेंगदाणे - आवडीनुसार
खवणलेला ओला नारळ- दीड वाटी
मिरची आलं वाटण- चवीनुसार
नारळ पाणी- दीड वाटी
एका मोठ्या लिंबाचा रस
धणे भरड - एक चमचा
मीठ आणि साखर -चवीनुसार
कोथींबीर बारीक चिरलेली
तेल आणि जिरे -फोडणीसाठी
डाळिंब दाणे आणि सांडगी मिरची

क्रमवार पाककृती: 

पातळ पोहे प्रथम चाळून एका परातीत घ्यावेत. त्यात दीड वाटी नारळ पाणी घालावे, एकदम कोरडे वाटले तर साध्या पिण्याच्या पाण्याचे दोन तीन हबके मारावेत. त्यात आता एक वाटी ओले खोबरे घालावे. लिंबू पिळावे. कांदा, टोमॅटो, कोथींबीर आणि मिरची आले वाटण लावावे. धणे भरड घालावी. शेंगदाणे घालावेत. डाळिंब आणि सांडगी मिरची घालावी. आता हे सगळे नीट हलक्या हाताने एकत्र करावे. आता ह्यावर ताट ठेऊन त्यावर वजन ठेऊन हे सारे अर्धा -पाऊण तास दडपावे. खाण्याआधी उरलेला अर्धा वाटी ओला नारळ घालावा. वरून जिऱ्याची फोडणी घाला, दडपे पोहे तयार.

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

धणे भरड घालायचीच आहे. ओला नारळ कमी करू शकता. फारच कोरडे वाटत असेल तर जास्तीचा ओला नारळ घालू शकता (पण हे प्रमाण योग्य होते). जाड पोहे वापरू नयेत. हळद मोहरी फोडणीत वापरू नये. काकडी गाजर घालू नये. फोटो मध्ये दिसणाऱ्या पोह्यात काही जिन्नस नाहीत.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैद्राबाद कडे पण पोहे लावतातच. इतका ताम झाम जमत नसेल तर सरळ फक्त तेल तिखट पोहे. अडी न डीला पोटाला आधार. मस्त चव.

20240204_192951.jpg
धागा पाहून कित्ती दिवस झाले खाल्लेच नाही म्हणून जीव हळहळत होता. शेवटी काल करून खाल्ले. ... आत्मा तृप्त झाला

धारवाडला एका मराठी बोलू शकणाऱ्या घरात खाल्लेले बहुधा दडपे पोहे.. तशी रेसिपी सापडली तर मी खूप खुश होईन..

त्या पोह्यात हिंग, डाळवे, हळद, हिरवी मिरची तळून कोरडी असलेली, दाणे, लिंबाचा रस एवढे जिन्नस नक्की होते. एका मोठ्या घमेल्यात/ टोपलीत केलेले होते, आणि खूप कोरडे म्हणजे हबका असेल एखादा नारळाच्या पाण्याचा पण चामट नव्हते. मी बऱ्याचदा ट्राय केले पण ती चव जमली नाही.

Happy तुमच्या त्या धारवाड च्या पोह्यांत....... चव इतकी खास लागायला....... पोह्यातील जिन्नसांच्या प्रमाणा सोबतच त्यावेळी लागलेली भूक, प्रवासाचा थकवा, यजमानांचे प्रेमळ आतिथ्य, तुमची त्यावेळची मनस्थिती ...हेही घटक कारणीभूत असणार.
ते पुन्हा सगळे साधू न शकल्याने...तशी चव जमणार नाहीच!

Pages