दडपे पोहे

Submitted by लंपन on 22 January, 2024 - 07:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पातळ पोहे- ३ वाट्या
कांदे -दोन बारीक चिरलेले
टोमॅटो -एक बारीक चिरलेला
भाजलेले शेंगदाणे - आवडीनुसार
खवणलेला ओला नारळ- दीड वाटी
मिरची आलं वाटण- चवीनुसार
नारळ पाणी- दीड वाटी
एका मोठ्या लिंबाचा रस
धणे भरड - एक चमचा
मीठ आणि साखर -चवीनुसार
कोथींबीर बारीक चिरलेली
तेल आणि जिरे -फोडणीसाठी
डाळिंब दाणे आणि सांडगी मिरची

क्रमवार पाककृती: 

पातळ पोहे प्रथम चाळून एका परातीत घ्यावेत. त्यात दीड वाटी नारळ पाणी घालावे, एकदम कोरडे वाटले तर साध्या पिण्याच्या पाण्याचे दोन तीन हबके मारावेत. त्यात आता एक वाटी ओले खोबरे घालावे. लिंबू पिळावे. कांदा, टोमॅटो, कोथींबीर आणि मिरची आले वाटण लावावे. धणे भरड घालावी. शेंगदाणे घालावेत. डाळिंब आणि सांडगी मिरची घालावी. आता हे सगळे नीट हलक्या हाताने एकत्र करावे. आता ह्यावर ताट ठेऊन त्यावर वजन ठेऊन हे सारे अर्धा -पाऊण तास दडपावे. खाण्याआधी उरलेला अर्धा वाटी ओला नारळ घालावा. वरून जिऱ्याची फोडणी घाला, दडपे पोहे तयार.

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

धणे भरड घालायचीच आहे. ओला नारळ कमी करू शकता. फारच कोरडे वाटत असेल तर जास्तीचा ओला नारळ घालू शकता (पण हे प्रमाण योग्य होते). जाड पोहे वापरू नयेत. हळद मोहरी फोडणीत वापरू नये. काकडी गाजर घालू नये. फोटो मध्ये दिसणाऱ्या पोह्यात काही जिन्नस नाहीत.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाककृती!
फोटो मध्ये दिसणाऱ्या पोह्यात काही जिन्नस नाहीत.>>> हे लिहिले ते बरे केले. पाकृ वाचताना टोमॅटो-कोथिंबीर तर लिहिले आहे पण दिसत नाही असे झाले होते. Happy

मस्त! वजन ठेवून दडपतात आणि म्हणुन दडपे पोहे हे नाव, हे अद्याप मला माहित नव्हते, करताना कधी बघितले नाही.

वजन ठेवून दडपतात आणि म्हणुन दडपे पोहे एवढेच माहीत आहे. आमच्याकडे करत नाहीत. लहानपणी सातवीत एका मित्राकडे खाल्ले होते तेच. पण ही पाकृ शेअर करतो घरी... धन्यवाद !

मस्त पाककृती. मी वेगळेच करते हेही करून बघेन. धन्याची भरड कच्ची(न शिजवून) चांगली लागेल का ? मला उग्र वाटते.

आम्हीही दडपत नाही पण ते दडपतात म्हणूनच दडपे पोहे. काही जिन्नस आही घालत नाही, काही न लिहिलेले घालतो. टोमॅटो नसतो, भरड धणे नसतात, नारळाचं पाणी न घालला नुसता खवलेला नारळ असतो. तसंच आम्ही भाजलेला पापड घालतो चुरुन.

सायो सारखंच लिहिणार होतो.
द. पो प्रचंड आवडतात. आता असे करुन बघतो. फक्त नारळाचं पाणी मिळायचं नाही. ज्युस बॉक्स मधलं वापरु का काय करू? ते व्हिटा कोको बॉक्स मधलं शहाळ्यासारखं लागतं बर्‍यापैकी. अर्थात नारळाचं आपलं बरंच गोड असतं. थोडी साखर घालेनच.

दडपे पोहे आवडतात आणि गारच द्यायचे असल्याने कोणी यायचं असेल तरी करून ठेवलेले ही चालतात.
ह्यात तशी आपापल्या आवडी नुसार अनेक वेरियेशन करता येतात. एकच हार्ड आणि फास्ट रेसिपी नाहीये ह्याची. ही रेसिपी ही छान वाटतेय. फक्त तीन वाट्या पात्तळ पोह्याना दीड वाटी नारळ पाणी मला जास्त वाटतय जरा. खुप ओले होतील अस वाटतंय कारण ओल्या नारळाचा चव ही आहे, मीठ घातलं की कांदा टोमॅटोच ही पाणी सुटत म्हणून. असो.

मस्त रेस्पी अन फटू Happy
समहौ पोह्यांचा हा प्रकार आवडता असला तरी कधी केल्या जात नाही सहसा, नेहेमी फोपोच होतात.
आता मात्र करायला हवेतच. मी मात्र टोमॅटो नाही घालणार आणि कमी तिखट हिरवी मिरची बारीक चिरून घालणार. धण्यांची अ‍ॅडिशन जरा हटके वाटतेय सो ते करीन.

मी करते पण वेगळी रेस्पी: काकडी कांदा टोमा टो बारिक चिरुन एका डब्यात घेते. त्यावर पातळ पोहे. मग शेंगदाणे तळून घेते व त्यावर घालते.
लिंबू पिळ ते व कोथिंबीर बारीक चिरून. एक पोहा पापड/ मिरगुंडे तळून चुरडून घालते. नसले तर आंध्रा पापड पन चालतो. मग फो ड्णीत हळद मोहरी हिंग हिरवी मिरची बारीक कापून. ती गार झाल्यावर डब्यात ओतायची. सर्व हाताने मिसळून घ्यायचे. पाउण तास ठेवत नाही.

आंध्राकडे पोहे लावतात त्यात लोणच्या चा खार पण घालतात. आंब्याचे लो णचे आंध्रा पद्धतीचे. मस्त लागते.

नारळ पाणी/ ओले खोबरे फार नसते घरी, पुणेरी देशस्थ आहे.

रेसिपी छान पण हे आयतं खायला चांगलं. Happy
पहिल्यांदा कळालं होतं दडपे।पोहे विषयी तेव्हा मनात फारच शंका होत्या. असेच कच्चे खायचे? कसे लागतील? चामट नाही का लागणार वै?
पण एका कोपु माबो ग्रुपच्या एका gtg मध्ये माबोकर सई ने अप्रतिम चवीचे दडपे पोहे खाउ घातले आणि सगळ्या शंका मिटल्या.

मस्त पा कृ ! पण मी नेहेमी फोडणीत हळद घातलेले द पो च खाल्लेत! नारळाच्या पाण्याऐवजी ताकाचा शिपका पण मारतात काही जण. म मो ताईंनी लिहिलंय तसं यात खूप व्हेरिएशन बघायला मिळतात. मात्र ओला खोवलेला नारळ मस्ट!
मी असे पण ऐकले आहे की म्हणे या पोह्यांना जावई पोहे असे सुद्धा म्हणतात. का ? तर कोकणात जेव्हा जावई घरी येणार असतो तेव्हा special त्या दिवशी नारळ उतरवुन घ्यायचा (पाडायचा ) प्रोग्रॅम ठरलेला असतो त्यावेळी जे नारळ सोलताना किंवा पाडताना फुटतात त्यात पातळ पोहे भरून दाबून ठेवायचे म्हणजे करवंटीच्या अंगाला लागलेला रस ते शोषून घेतात आणि मग अशा पोह्यांचे द पो/ को पो करायचे तोच नारळ खवून!! म्हणून ते जावई पोहे. मी रत्नागिरीची आहे पण जावई येवो , सून येवो किंवा अजून कोणी कधीही आम्ही असे केलेले नाहीये Proud तो भाग वेगळा Wink

माझा सर्वात आवडता पदार्थ!
पद्धत थोडी वेगळी आहे. मी नेहमीच हळद - हिंग - मोहरीची फोडणी देते. सांडगी मिरची चुरून लावते. शिवाय कोकम सरबत शिंपडते. त्यामुळे आंबट गोड चव येते आणि दिसायला पिवळ्या रंगात मध्ये मध्ये लाल असं छान दिसतं. काही जणांना लिंबामुळे त्रास होतो, म्हणून हा पर्याय. वरून आयत्यावेळी पोह्याचा पापड चुरून घालायचा.

अत्यंत आवडता पदार्थ.
मीही टॉमेटो, धनेपूड घालत नाही, नारळाचं पाणीही घालत नाही आणि फोडणी नेहमी घालते. भरपूर ओला नारळ आणि कांदा मस्ट. फोडणीसाठी तापत ठेवलेल्या कढल्यातच आधी मिरगुंडं तळून ती पोह्यांसोबत खायची. पोह्यांवर लिंबू पिळून किंवा दह्यासोबत, दोन्ही आवडतं. कोकम सरबताची आयडिया नवीन आहे. करून बघायला हवी.

लोकहो खूप धन्यवाद. अस्मिता धणे भरड आजोळी आजी घालत असे आणि आई दरवेळी करताना, ' आई धणे भरड घालायची ह्यात ' हा डायलॉग मारते. चव छानच लागते. टोमॅटो, डाळिंब दाणे नाही घातले तरी चालेल. वावे, सायो पापड/ मिर्गुंड चुरून घालतात बरेच ठिकाणी. अनघा कोकम आयडिया भारी आहे. बघेन करून तसे एकदा. अमित ट्राय करून बघ त्या पाण्याने. योकु, आले हवेच नुसती मिरची नाही. सामो हो लिंबू रस हवाच. ममोजी नाही होत जास्त पाणी. बरेचदा कमी असेल पाणी की मग टोटरे बसतात. अंजली हे नवीन नाव माहीत झाले. Happy चामुंडराय Happy मानवजी ते वजन ठेवून दडपले की पाणी सुटते आतल्या जिन्नसना आणि ते मऊ होतात म्हणून दडपे पोहे Happy अमा खार आयडिया पण चांगली आहे दहीभात मध्ये पण खार मस्त लागतो. रूनमेश धन्यवाद.

लहानपणी खाल्ले आहेत , शैजारच्या काकू बनवायच्या. .
आता साबा थोडसं वेगळं version बनवतात.
पातळ पोहे परतून कुरकुरीत करायचे.
वरून हिंग जिरे तिखटाची फोडणी.
कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ ओलं खोबरे एकत्र करुनठेवायचंच
आयत्यावेळी एकत्र करून खायचं.

माझ व्ह्रर्जन वेगळ आहे थोड ...पातळ पोह्यात बारिक चिरलेला कान्दा,टोमॅटो,कोथिबिर थोड मिठ मिसळून दडपुन ठेवायचे मग त्यावर हि,मिरची कढिपत्त्याची फोडणी घालायची.वरुन ओल खोबर मिसळायच. आवडत असेल तर भाजलेला पापड चुरुन ... साइडला घट्ट दही, पोहे कोरडे वाटले तर आन्बट ताकाचा शिपका द्द्यायचा.

मस्त ! माझ्या माहेरी पण असेच असतात दडपे पोहे पण धणे भरड, डाळिंब नसते. कैर्‍या असतील तेव्हा लिंबाऐवजी कैरीचा किस .
सासरी दडपे पोहे करतात ते वेगळे असतात. त्यात ओले खोबरे नसते आणि फोडणी सढळ तेलातली. इथे नारळ मिळायची खात्री नसल्याने सासरच्या पद्धतीनेच केले जातात.

आज परत केले. यावेळेला भरड धणे घातले. एकदम यमी!!!
-----------
यात बरच काही दडपता येतय की - ताक, कोकम, लिंबू, नारळाचे पाणी
मला वाटतं थोडीशी किसलेली कैरीही चालून जावी.

हो सामो, कैरी मस्त लागते. मला थोडी काकडी पण आवडते खिसून.
बेसिकली यात मला वाटतं मेन घटक दोन तीनच आहेत. बाकी आपल्याला आवडेल ते घाला असा मामला.
दडपे पोहे माझे अति आवडते आहेत पण काही कारणाने आत्ता करू शकत नाही.

आवडता प्रकार आहे हा.. बरेच दिवस मनात आहे करायचं पण या थंडीमुळे खावंसं वाटत नाहीये.
मला उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी आवडतात असे पोहे खायला. विशेष कारण असं नाही मे बी नॉस्टॅल्जिया... लहानपणी माझे बाबा बनवून द्यायचे शाळेतून आल्यावर खायला. दडपे पोहे, हिरव्या मिरचीची फोडणीवाले दही पोहे Happy

माझ्या सासरी याचं वेगळं वर्जन करतात त्याला ते लावलेले पोहे म्हणतात. यात काकडी आणि गाजर किसून, सिमला मिरची बारीक चिरून घालायची आणि फोडणी. पण ते फार चामट लागतात. तोंड दुखतं चावून चावून.

Pages