सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचे मूळ कारण राजकीय पक्षांचा ह्या क्षेत्रात प्रवेश.
>>
अगदी बरोबर !
फार फार पूर्वी जेव्हा या लोकांनी गेटवर बॅनर लावायला सुरुवात केली तेव्हाच मला वाटलेले की हे पैसे पुरवत आहेत पण आता सगळे यांच्या तालावर होणार आहे...

च्रप्स
मी सुद्धा काम केले आहे.
संध्याकाळी एकत्र चहा वडापाव आणि रात्री पुलाव पावभाजी हे मौजमजेला पुरते. कारण कामाची आपली स्वतःची अशी एक नशा असते. साधे वर्गणी साठी फिरण्यातही एक मजा असते.. बा असायची... रात्र जागवायला डीजे आणि दारू नाही तर टाळ कुटत भजने किंवा गाणी, खेळायला पत्त्यांचा जोड किंवा हाऊजी, खायला चिवडा आणि प्रसाद, गप्पा मारायला मित्र हे पुरायचे.
आता लोकांच्या मौजमजेचया कल्पनाच बदलल्या आहेत.

आता लोकांच्या मौजमजेचया कल्पनाच बदलल्या आहेत. +१
जसे की कुठेही पिकनिकला गेले की दारु प्यायला हवीच तरच खरी मौज ही विकृत कल्पना आणि त्या विचारसरणीचे अश्या उत्सवात एकत्र आल्यावर ती विकृती सांघिक साजरी करण्यात धन्यता मानणे

सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन होतंय. स्वागतासाठी नऊ वाजल्यापासून झिंगाट, मुंगळा इ. गाणी वाजत आहेत. आता अकरा वाजून गेलेत. अजून सुरू आहे.

इकडे ढोल प्रॅक्टिस काही संपत नाहीये गेले दोन महिने चालू आहे रोज रात्री नऊ ते साडे दहा. अत्यंत ओंगळवाणे स्वरूप आले आहे हलली सगळ्याच उत्सवांना. ह्यावेळी दही हंडी किती तरी दिवस चालू होती पुण्यात. शनिवार रविवार तर कहर झाला एकच दिवस असतो ना दही हंडीचा?. राम नवमी मिरवणूक कधीच बघितली नव्हती मागचे दोन वर्ष चालू झाली आहे. ह्यात हिंदू मुस्लिम किरिस्तव बुद्ध काही नाही.. सर्वांनीच जरा शिस्त बाळगून हे उत्सव साजरे करावेत.

ध्वनी प्रदूषण टाळले पाहिजे याला सहमती. ढोल ताशा प्रॅक्टिस सदैव चालू असते. मागे मी भारतात डिसेंबर मध्ये गेलेले, तेव्हा कशाला हवी ढोल प्रॅक्टिस? पण चालू होते रात्री उशिरापर्यंत..
आता कॅलिफोर्निया मध्ये ही गणेशोत्सव मध्ये ढोल ताशा असतोच. उद्या मी विचारेन प्रॅक्टिस कशी आणि कुठे करता, काय measures घेतले जातात. Navratri ही आता खुल्या मैदानावर करणार अशा वार्ता कानावर येत आहेत. जी लोकं बाजूला राहतात त्यांना त्रास आहे.

ध्वनी प्रदूषण टाळले पाहिजे याला सहमती. ढोल ताशा प्रॅक्टिस सदैव चालू असते. मागे मी भारतात डिसेंबर मध्ये गेलेले, तेव्हा कशाला हवी ढोल प्रॅक्टिस? पण चालू होते रात्री उशिरापर्यंत..
आता कॅलिफोर्निया मध्ये ही गणेशोत्सव मध्ये ढोल ताशा असतोच. उद्या मी विचारेन प्रॅक्टिस कशी आणि कुठे करता, काय measures घेतले जातात. Navratri ही आता खुल्या मैदानावर करणार अशा वार्ता कानावर येत आहेत. जी लोकं बाजूला राहतात त्यांना त्रास आहे.

रात्रीचे स्पीकरचे नियम असतात तसे.. दहा साडे साडे दहा वगैरे वेळ मर्यादा असते. सध्याचा वेळ काय आहे हे बघायला हवे.
पण डीजेचा आवाज मात्र संध्याकाळीही त्रास देतो. जे नाचत असतात त्यांना ईतरांचा त्रास कळत नाही. उलट आम्हाला ईतकी मजा येतेय आणि यांना कसा काय त्रास असेच वाटते.
गाणी लाऊन एकत्र नाचणे हा खूप आवडीचा प्रकार आहे खरे तर... पण या डीजे स्पीकरच्या आवाजाच्या स्पर्धेने सगळी वाट लावली आहे..

मला गणपती मिरवणूक पारंपारीक स्वरुपात बघायला आवडते, ढोल ताशा लेझीम. वाटेल ती गाणी लाऊन तीही ठणाणा आवडत नाही, म्हणजे वाटेल ती संबंधित नसलेली गाणीच मुळात अशा वेळी अयोग्य. कधी कधी फक्त म्युझिक लाऊन ढोल वाजवत नाचत गणपती आणतात तेही ओके. मागच्या सोसायटीत तसा आणतात. गणपतीच्या पाच दिवसात लाऊडस्पीकरवर गाणी लावतात पण ती गणपतीची असतात आणि भावगीते असतात. बाकी त्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू असतात त्यात डान्स वगैरे वेगवेगळ्या गाण्यांवर ऐकू येतात.

बाय द वे तुम्ही पंढरीच्या वारीवर कुठे लेख लिहिला आहेत, मला दिसला नाही. यंदा बे एरियात हा prgm झालेला काही दिवसांपुर्वी तेव्हा माझ्या भाचीने आणि तिच्या मुलीने भाग घेतलेला. स्टेजवरचे डान्स वगैरे फोटो बघितलेले.

यंदा बे एरियात हा prgm झालेला काही दिवसांपुर्वी तेव्हा माझ्या भाचीने आणि तिच्या मुलीने भाग घेतलेला. स्टेजवरचे डान्स वगैरे फोटो बघितलेले. >> तो इन्द्रायणी काठी

https://www.maayboli.com/node/83629 >>> हा विठोबा वारी वरील लेख.

आता कॅलिफोर्निया मध्ये ही गणेशोत्सव मध्ये ढोल ताशा असतोच. उद्या मी विचारेन प्रॅक्टिस कशी आणि कुठे करता, काय measures घेतले जातात>>> Spartan ani SJSU चा collab आहे. त्यमुळे ते SJSU च्या आवारात प्रॅक्टिस करतात.

माघी गणेशोत्सव कधीपासून सार्वजनिक झाले ? >>>
मी जास्त करून कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो हे ऐकलंय. आणि एकदा अनुभवलंय.

बाकी देवळात, किंवा इतर काही संस्थाही माघी गणेशोत्सव साजरा करतात. सुदैवाने त्याला अजून राजकीय हवा लागली नाहीये

ठाण्यात पण एक संस्था खूप छान पद्धतीने साजरा करायची

त्यांच्या(माघी उत्सवाच्या ) रौप्य महोत्सवी वर्षात, शाहीर साबळ्यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम बघायला मिळालेला. अप्रतिम होता म्हणून लक्षात राहिलाय.

गणपती आगमनाच्या मिरवणुकीत लोक झिंगाट आणि मुंगळावर नाचताहेत म्हणजे ते पब्लिकच्या पैशाने आउटडोर पार्टी करताहेत. गणपती हे निमित्त आहे. त्यात धार्मिकता कुठे आली? धार्मिकता असती तर किमान गणेशभक्तीपर गीते वाजवून नाचले असते. पण त्यात 'मजा' कशी येणार?
त्यामुळे "आमच्या 'धर्माच्या' सणांच्या वेळीच तुम्ही आक्षेप का घेता?" हा प्रश्न विचारणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे.
ते दारू पिऊन नाचत असले तरी त्याचंही समर्थन वर झालेलंच आहे.
---
मी आमच्या भागात तरी या दशकापासूनच सार्वजनिक माघी गणेशोत्सव पाहतो आहे. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाइतक्या संख्येने आणि प्रमाणात अजूनतरी नाही.

सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही? हे आहे धागा शिर्षक
आणि फोटो फक्त गणपती उत्सव का

इतर धर्माचे असेच गर्दी करणारे सण +गणेश उत्सव असे कोलाज करुन लावले तर ओके होतं. पण हे काहीतरी वेगळे शिजतेय.

अज्ञानी, एक प्रश्न विचारलाय. गणेशोत्सवात धार्मिकता किती आणि मजा किती? तुमच्या प्रतिसादाच्या वरच्याच प्रतिसादात सविस्तर लिहिलंय. उत्तर द्याल का?

भरत तुम्हाला सुद्धा माहिती आहे हां क्लिकबेट धागा आहे
जरा मायबोली वरती इतर धर्मीय त्रास दायक ठरणाऱ्या सणांवरती लिहिलेल्या लेखांची यादी देणार का ?

माझा मुद्दा हा आहे की सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक सण आहे का? मला तरी तसं दिसत नाही. हेच मी इतर अनेक मिरवणुकांबद्दल म्हणेन. मग तुम्ही त्यात धर्म का आणताय?

एरवी कुठे खुट्ट झालं की दुखावणार्‍या तुमच्या धार्मिक भावना गणपतीच्या मिरवणुकीत मुंगळा गाणं वाजल्यावर आणि त्यावर लोक नाचत असताना का दुखावत नाहीत?

माझा पहिल्या पासून प्रश्न इतकाच आहे की फक्त गणपती आले की का ?
बाकी शांतिप्रिय समाजाच्या समाजिक मिरवणूक असताना इकडच्या लेखणीरूपी तलवारी म्यान का होतात ?

व्हॉट अबाऊटरी कशाला? मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, पारसी, सीख, जैन (अजुन कोणी आठवले तर सांगा) सगळ्यांच्याच उत्सवी धांगडधिंगा, आवाज वाल्या मिरवणूका बंद व्हायला हव्यात. यात डावं उजवं काय आहे? त्रास सगळ्याच मिरवणुकींचा सारखाच आहे. मूळ मुद्दा राहीला बाजूला ....

तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही. धर्माच्या जागी समाज शब्द वापरून पळता येणार नाही. पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला असं गात टाळ झांजा वाजवात मिरवणूक काढली तर कोणीही आक्षेप घेणार नाही. पण मग मज्जा कशी येणार? तुमचा सण देवधर्मासाठी आहे की मज्जेसाठी?

यात डावं उजवं काय आहे>>> धाग्या मध्ये दिलेला फोटो डावे उजवे करतोय हे मी मघाशी म्हटले आणि धाग्याच्या सर्व मुद्द्यास सर्वच धर्मीय सण जबाबदार आहेत म्हणून गणेश उत्सव फोटो ऐवजी सर्व समावेशक कोलाज बनवून टाकला तर अधिक चांगली निष्पक्ष चर्चा घडेल इतकंच तर सांगतोय मघापासून

मी मांडलेल्या मुद्द्यापासून पळून काहीच उपयोग नाही. निष्पक्षवाद हवा तर मी ह्याआधी लिहिलंय सर्व ते रिपीट करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सुद्बा तुमचे मुद्दे उदाहरण देऊन लिहिले त्यामुळे तेही रिपीट करण्यात अर्थ नाही. धाग्या मध्ये दिलेला फोटो कोलाज रुपात सर्व समावेशक स्वरुपात दिसायला लागल्यावर पुढे बोलू. तोवर ही चर्चा सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही? ह्या शीर्षकाखाली फोटो नुसार फक्त गणपती उत्सव पुरता मर्यादित राहते त्यामुळे एकांगी विचार मांडले जाणार असतील तर टाटा बाय बाय

लिस्ट वैगेरे मागणे म्हणजे शुद्ध वेड पांघरून पेडगावला जाणे आहे. खालील उत्सवात गोंगाट अती जास्त असतो आणि त्रास होतो
गणेश उत्सव
नवरात्री
शिवजयंती

घ्या. उगाच ईकवलैजेशन साठी मुस्लिम सणांची नावे हवी आहेत ना, नाही घालणार. मुहररमला इतका आवाज आणि इतका सलग वेळ आजिबात नसतो.

ह्या शीर्षकाखाली फोटो नुसार फक्त गणपती उत्सव पुरता मर्यादित राहते त्यामुळे एकांगी विचार मांडले जाणार असतील तर टाटा बाय बाय>>>
बाय Happy

कोलाज करायला काहीच हरकत नाही. फक्त माझ्याकडे तेव्हढा वेळ नव्हता/ नाही. महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव गणपती आहे. बंगाल मध्ये दुर्गा पूजा, किंवा गुजरात मध्ये दांडिया किंवा हैद्राबाद बाजूला मुस्लिम उत्सव (मोहरम) मी माझ्या बुद्धीने / समजुतीने लिहिले आहे. कोणीही त्यात अजून पुढे वाढवू शकतो.

मूळ मुद्दा गणपती किंवा इतर कोणत्याही उत्सवावर घाला घालणे नाही तर त्याचा जो विपर्यास चालू आहे, त्याचे स्वरूप पालटून त्याचे बाजारीकरण किंवा ओंगळवाणे रूप दिले जाते तो आहे.

मूळ लेख किंवा इतर प्रतिसादामध्येही तेच प्रामुख्याने दिसून आले आहे.

Pages