सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.>>>
ह्याला काही आधार??
कोणताही धार्मिक उत्सव सार्वजनिक नसावा. इन्क्लुडिन्ग मोहरम.

देश सोडणार आहे.
त्यानंतर या विषयावर निर्भीड मत देईन.

उत्सव सार्वजनिक नसावेत. पण मग वेगवेगळ्या परेड्स, मोर्चे हे ही एक प्रकारचे उत्सवच असतात ना?

समूहाची एक वेगळी अशी एनर्जी असते व ती अशा उत्सवातून व्यक्त होते. आता व्यक्त व्हायला मोकळीक असताना ती काही प्रमाणात नुकसानकारक ठरतेय तर मग तिच्यावर बंदी घातली तर ती अनिर्बंध कुठेही व्यक्त होऊ शकते. त्याचे काय करायचे?

खेळांसारखे एका डेडिकेटेड, बंदिस्त जागेत, अमुक एका संख्येला प्रवेश देऊन करावेत का?

माझ्या मते हे गणपती मिरवणुका, दहीहंडी , ते गालात सळ्ञा खुपसून घेत कोणत्या तरी देवाची मिरवणूक काढणे - हे सर्व न्युइसन्स आहेत. वाहतूकीचा खोळंबा, पोलिसांवरती अतिरिक्त ताण, गर्दीतील गैरप्रकार. हे मुद्दे यामागे आहेत.

३१ डिसेंबर का मिसला ? सर्वात जास्त जागतिक स्तरावर त्रास तर त्याचाच आहे.
अजून काही तरी असते ख्रीस्त समुदायाचे. आठवडा भर रस्त्यात धुड़घुस. गोव्याच्या बातम्या दिसत राहतात.
मशिदीचे भोंगे ह्यावर काही का नाही लिहले ?? त्याचा तर रोजचा त्रास असतो. इतर सण किमान वार्षिक असतात.
वैलेंटाइन डेज मध्ये सगळ्यात जास्त पैशाची उधळपट्टी ..... तेसुद्धा न कमावणाऱ्या वर्गाकडून कमवत्या वर्गाच्या पैशांची होत असावी. आणि ही प्रथा धर्माच्या सीमा सोडून फोफावत जातेय त्यावर काही भाष्य न दिसता फक्त हिंदु धर्मियांचा सण म्हणजे सर्व समस्यांचे मूळ असे का बऱ्याच जणांस लेख लिहिताना वाटत असते हे एक वैश्विक गूढ़ आहे.

बाकी लेखात उल्लेख आलेल्या सणात सामील तर आम पब्लिक असते आणि त्यात आपण स्वतः मिळून असे पब्लिक बनते. त्यामुळे देणगी देणे न देणे ते गैरप्रकार करणे न करणे हे सर्व आपल्याच हातात. कुठलाही कायदा करुन काही फारसे निष्पन्न निघणार नाही.

हे विषय जुने नाही का ???? का नव्याने प्रत्येक मोठ्या सणाच्या वेळी ठेवणीतले कपडे काढतात तसे हे प्रश्न उपस्थित केले जातात उगाच डोक्याचा भुगा करायला। उगीच वर्षातून काही ठराविक सणांना का टार्गेट केले जाते। माघी गणपती एक उत्सव हा लेख तुम्हीच लिहिलात ना त्यात मोठमोठ्याने आरत्या , सवाई , भोवंत्या २/४ तास चालत त्यात तुम्ही सहभागी झालेल्यात ते तुम्ही मिस हि करता मग तेही सार्वजनिक रित्या साजरी केले म्हणूनच तुम्हाला अनुभवता आले ना। तसेच दहीहंडी , सार्वजनिक गणपती , नवरात्रोत्सव काही लोक घरी साजरी नाही करू शकत म्हणून जे सार्वजनिक रित्या साजरी होते तिथे सामील होऊन आपला एक अनुभव जमवतात त्यात गैर काय आहे ???

विशेषतः हिंदु सणांना>>
धुडघुसवाले त्यांचे सण जास्त असतात म्हणून.
गणपती, धुलिवंदन, होळी कमी होते म्हणुन की काय आता हनुमान जयंतीला पण डीजे, रस्त्यावर मांडव, वर्गण्या आणि काय काय.
धुलिवंदनाला स्टेजवर अश्लील गाण्यान्वर स्त्रीयांन्ना नाचवा हे कोणत्या हिन्दू धर्मग्रंथात लिहिले आहे?

https://www.loksatta.com/thane/senior-lawyer-shantaram-datar-interview-for-thane-loksatta-1124800/

>>>>>>>>>>>>३१ डिसेंबर का मिसला ?
मिरवणुका नाही निघत या दिवशी.
>>>>>अजून काही तरी असते ख्रीस्त समुदायाचे. आठवडा भर रस्त्यात धुड़घुस. गोव्याच्या बातम्या दिसत राहतात.
माहीत नव्हते.
>>>>>>>>>वैलेंटाइन डेज
मिरवणुक नाही निघत.
मला वाटलेले आत्ता मिरवणुकीचा विषय चाललेला आहे.

मायबोलीवर आता गणेशोत्सव सुरु होईल लोक पाककृती स्पर्धा , चित्रकला , भजन, आरत्या सर्व काही इथे साजरे करणार, इथले जगभरातील मेंबर्स एकत्र येऊन सेलीब्रेट नाही करू शकत म्हणून सगळं व्हर्चुअल होईल तेच जर एकत्र जमायचं चान्स मिळाला तर वर्षाविहार काढून dj वर रेन डान्स करता ना तेव्हा आवाज नाही होत का गोंधळ होत नाही का ? हे सण वर्षनुवर्षं अशाच प्रकारे साजरे होतात व ते असेच साजरे होत राहणार बदल नवीन पिढी घडवून आणेल पण प्रत्येक वर्षी असे धागे काढून उंटावरून शेळया हाकण्यात काय मज्जा .

उस्तवं सार्वजनिक च असावेत.लोकांना त्रासदायक होणारे घटक हवं तर बदलण्याचा हट्ट धरू शकता.
आज सामाजिक स्थिती खूप भयंकर आहे.
कुटुंब विस्कळीत झाली आहेत .तरुण मुलं मोकळ्या आकाशात स्वतःच्या पंखांनी उडत आहेत,आई वडील एकटे आहे.
मूल एकटी आहेत
माणसं एकटी पडलेली आहेत.भौतिक सुख प्रचंड आहेत,पैसा खूप आहे पण आपली लोक जवळ नाहीत.
Ustav मुळे लोक एकत्र येतात,एकटे पण दूर होते.
समाजात भावनिक नात निर्माण होते.
भावनिक नातं च माणसाची जगण्याची प्राथमिक गरज आहे.
भावनिक शक्ती वर अनेक आजार पण दूर जातात.

उत्सव हे सार्वजनिकच असतात. सण जेव्हा सार्वजनिक रित्या साजरे होतात तेव्हा त्यांचा उत्सव होतो.

आता सण सार्वजनिक रित्या साजरे करावेत का हा खरा प्रश्न आहे. माझ्या मते हरकत नाही. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. फक्त ते करताना इतरांना त्रास होऊ नये. हे म्हणजे विज्ञान शाप की वरदान टाईप आहे. लोकांना फार त्रास होऊ लागला तर मग तो शापच वाटणार. अति सर्वत्र वर्जयेत्.

DJ हा प्रकार भयंकर आहे त्या वर बंधन हवं, अशी काही बंधन घालून ustav खूप जोरात साजरे करता येतील.
तरुण पिढी नी सहभागी व्हावे म्हणून dj हा प्रकार आला.
दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने तरुण पिढी चा सहभाग वाढवता येईल.
पण ustav साजरे च करू नका हे मत अयोग्य.
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे ह्याचा विसर पडून देवू नका.

सण सार्वजनिकरीत्या साजरे व्हावेत. लहानपणीच्या खूप सुंदर आठवणी आहेत सणांच्या..

आक्षेप असावा तो त्यात चालणाऱ्या गैरकृत्यांवर..

जसे वर वर कोणी म्हटले दही हंडीला स्टेजवर बाई नाचावतात. अगदी वाह्यात प्रकार..
गणपतीला मंडळाचे कार्यकर्ते दारू पिऊन रात्री दंगा करतात. तर चोपला पाहिजे त्यांना.
श्रद्धेच्या नावावर बाजार भरत असेल.. तर उठवला पाहिजे.
नवरात्री असो वा नववर्ष, जर त्याचा फायदा उचलत काही गैरप्रकार घडत असतील तर ते रोखायला काटेकोर कायदे हवेत. नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेता सण साजरे करायला काय हरकत आहे..

पण प्रॉब्लेम असा आहे की यातल्या बरेच गोष्टी उत्सवाला गालबोट लावतात हेच आजकाल लोकांना कळत नाही.
त्यामुळे कायदे नियम बनवण्यासोबत मूल्य शिक्षणाची देखील गरज आहे.

मला वाटलेले आत्ता मिरवणुकीचा विषय चाललेला आहे>>>>मग ते तर प्रत्येक मोठ्या लग्नाच्या मिरवणुकी साठी सुद्धा लागू होणार ना ?
मग फक्त सणावर आणि तेही हिंदु सण आले की का फक्त बोलले जाते हां मुख्य मुद्दा आहे. क्लिकबेट म्हणून फक्त वापर करायचा लिखाणा मागील उद्देश असेल तर चर्चा कधीच वास्तवदर्शी आणि सर्व समावेशक होऊ शकत नाही.

एकंदर धाग्यामध्ये आलेले आणि लिखाण करण्यास उद्युक्त केले गेलेले मुद्दे जे पर्यावरणास, मनुष्य समाजास आणि सामजिक सुस्थिती राखण्यास त्रास दायक ठरले / ठरवले गेले ते खालील प्रकारे असावेत ―
१) ध्वनी प्रदूषण
२) गर्दी व्यवस्थापन
३) निती मुल्यांचा ऱ्हास
४) आर्थिक उधळपट्टी
५) गुंडगिरीस चालना

उत्सव हे सार्वजनिकच असतात. सण जेव्हा सार्वजनिक रित्या साजरे होतात तेव्हा त्यांचा उत्सव होतो.

आता सण सार्वजनिक रित्या साजरे करावेत का हा खरा प्रश्न आहे. >>> दुरुस्त केले

फक्त हिंदू सणांवर रोख दाखवणे हा ह्या लेखाचा उद्देश नाही.
लेखात उत्सव सार्वजनिकरित्या का/ कसे साजरे करणे सुरु झाले याचा उल्लेल्ख आणि समर्थन आहे.

परंतु त्याला आता प्राप्त झालेले स्वरूप, त्याचे बाजारीकरण, लोकांच्या धार्मिकभावनांवर राजकरणी भाजत असलेली पोळी आणि त्यातून सार्वजनिकरणाचे मूळ उद्देश बाजूला राहणे यावर टिप्पणी आहे.

उत्सव सार्वजनिक देखील असावेच. त्रासदायक किंवा भोंगळ कारभार वाढले (डीजे वगैरे)तर सामान्य लोकांचा सहभाग कमी होतो. आणि हळूहळू असले कार्यक्रम ही कमी होतात. सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती आणि नसावीच

परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.>>>
ह्याला काही आधार??>>> दोन तीन ठिकाणी ही माहिती दिसली. आणि जेवढ शाळेत शिकलो त्याने याला दुजोरा मिळतो

एक गोष्ट नेहेमी खटकते, ह्या माहितीयुगात जगभरातील सर्व माहिती अगदी काही क्लीक्स मध्ये मिळते. परंतु भारताचा इतिहास किंवा सांस्कृतिक माहिती शोधताना आधार बऱ्याचदा पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या लिखाणाचाच आधार घ्यावा लागतो. कोणाला ह्याविषयी अधिक माहिती असल्यास जरूर सांगावे

ऋन्मेष मंडळात भरपूर कामे असतात.. दिवसभर थकून जातो कार्यकर्ता... त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी ते आवश्यक आहे...

बाकी मला आवडतात असे जोरजोरात डीजे गाणी वगैरे.. माहोल बनतो... स्पिकर्स ची भिंत पाहिजे मात्र.. दणाणून हार्ट बिट्स वाढल्या पाहिजेत... एक अँक्सिएटी यायला हवी...

३१ डिसेंबर भारतातच नाही जगभरात अतिशय मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. बरेच रस्ते, जागा बंद असतात. अगदी टाइम्स sqaure ठळक उदाहरण.

लुनार इयर ( चायनीज नववर्ष), इस्टर , हॅलोवीन ह्यांच्या परेड निघतात, वेगवेगळे क्रीडा संघ ह्यांच्या रॅली निघतात, ४थ जुलै ला काही प्रमाणात रस्ते बंद ठेवतात. इकडे मुळातच लोकसंख्या कमी असल्याने ते त्यांना थोडक्यात आवरता येते.

३१ डिसेंबर ला होणाऱ्या जल्लोषापुढे आपली हिंदू नववर्ष यात्रा उजवी वाटते. (हे मा वै मी आ )

घरात दारू लावून झोपावे का किंवा घरात / बंदिस्त हॉल मध्ये पिउन / न पिऊन दणाणून हार्ट बिट्स वाढतील एवढा कर्कश्य डीजे लावून नाचावे का हा विषय नाही वाटत धाग्याचा. त्यावर स्वतंत्र धागा काढला तर यावर तिथे मत मांडता येईल.

धाग्याच्या विषयावर: सार्वजनिक असावेत. केवळ रुढी परंपरा आहेत, हक्क आहे म्हणुन नव्हे तर मानसीकदृष्ट्या आरोग्यदायी (healthy) समाजाचे ते लक्षण आहे, त्यास आवश्यक असलेल्या ऍक्टिव्हीटीज पैकी ही एक आहे असे मला वाटते. एकाच वेळी बाळ गोपाळ ते वयोवृद्ध याचा वेगवेगळा आनंद घेतात तसेच या निमित्ताने एकत्रित आल्यावर अनेक चांगले उपक्रम राबवता येतात, तसे अनेक ठिकाणी राबवल्या जातानाही दिसतात.
हे साजरे करताना अर्थात वरील बाबीचे भान ठेवून करायला हवे. पण तसे न होता जे वेगळे नको ते वळण/रूप त्यास मिळते (ज्याचा लेखात आणि काही प्रतिसादात उल्लेख केलेला आहेच) त्या करता सण सार्वजनिक रित्या साजरे करणे बंद करणे हा उपाय मला पटत नाही. समाज प्रबोधन हाच योग्य मार्ग आहे असे मला वाटते. पल्ला लांबचा आहे पण सामाजिक तसेच राजकीय इच्छाशक्ती असेल तर लौकर होईल.
कायदे व कायद्यांची अंमल बजावणी याला खूप मर्यादा असतात, लोकांचे प्रबोधन न होता केवळ कायदे कडक करत गेले तर त्यातुन फार काही निष्पन्न होणार नाही. समाज प्रबोधन होऊनही काही लोक न जुमानणारे असतात त्यासाठी हे कायदे नियम असावेत.

---------
वरील
"समाज प्रबोधन हाच योग्य मार्ग आहे असे मला वाटते."
हे
"जे नको ते वळण / रूप मिळते ..... त्या पासुन रोखण्यासाठी समाज प्रबोधन हाच मार्ग योग्य आहे असे मला वाटते."
असे वाचावे.

सार्वजनिक सामूहिकरीत्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सणांत दिसणारा आणि वाढत चाललेला उन्माद मला धोकादायक वाटतो.
गणेशोत्सवाकरिता वर्गणी मागायला आठ नऊ जणांचा जमाव येतो.
शिवाय आता अशा सामूहिक रीत्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सणांचं प्रमाण वाढत चाललं आहे. जे सण आधी चार घरांत देवळांत साजरे केले जायचे, ते रस्त्यावर आले. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा इतिहास फार जुना नाही. माघी गणेशोत्सव कधीपासून सार्वजनिक झाले ?

आता रामनवमी, हनुमानजयंतीला मिरवणुका निघू लागल्यात. यंदा महाशिवरात्रीलाही निघाल्या. यातल्या अनेक मिरवणुकांत धार्मिकता भिंग घेऊन शोधावी लागेल. हातात शस्त्रे, डीजेवर वाजणार्‍या गाण्यांचा आणि दिल्या जाणार्‍या घोषणांचा त्या त्या देवाशीच काय, कुठल्याच देवाशी संबंध नाही त्यात भक्तिभाव नावालाही नाही , असे चित्र दिसले. महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत रॉकेट्स सोडली गेली आणि ती वर आकाशात नव्हे तर कुठल्या तरी इमारतीवर. कुठल्या ते सांगत नाही. अमेरिकेत न्यु जर्सी इथे निघालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या मिरवणुकांत बुलडोझर होते.
म्हणजे हे सगळे उत्सव आपल्याला आनंद मिळावा म्हणून नव्हे, तर दुसर्‍या कोणालातरी काहीतरी दाखवायला केले गेले.

समाजप्रबोधन होत असेल तर उलट दिशेने होताना दिसते. आमच्याच सणांवर का बोलता? इ.

हे एका मायबोलीकराने फेसबुकवर लिहिलं आहे - "जोरदार आवाजांमुळे टिनिटसचा धोका असतो. शरीराचा तोल जाणं, कमी ऐकू येणं हे प्रकार होऊ शकतात. गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीला मी घरातून ९८ ते १०२ डेसिबल इतका आवाज मोजला. सर्व दारंखिडक्या बंद होत्या. दुसर्‍या दिवसापासून मला टिनिटसचा त्रास सुरू झाला. बोटांना मुंग्या येणं, गरगरणं सुरू झालं. टिनिटस अजूनही आहे. एका कानाची क्षमता आठ टक्क्यांनी कमी झाली आहे. "

ढोल ताशा पथकांतील लोकांना सुद्धा याचा त्रास होत असेल.

पाच पन्नास हजार लोकसंख्या साठी एक नगरसेवक त्या प्रमाणे एकच मंडळ अशी सक्ती केली तर कदाचित वाहतुकीचा खोळंबा , सक्तीची वर्गणी , अश्लील गाणी वाजवणे असले प्रकार घडणार नाहीत आणि पावित्र्य ही राखले जाईल .
दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे गणेशाच्या पाया पडण्यासाठी आपोआप हात जुळतील .
पण ही घंटा बांधणार कशी हा मुख्य प्रश्न .

एक गाव एक मंडळ एक देऊळ एक मशीद एक चर्च
एक वार्ड/झोन एक मंडळ एक देऊळ एक मशीद एक चर्च
दर्शन उत्सव देऊळ मशीद चर्च मध्ये
कार्यक्रम ग्राम सभागृह नगरपालिका सभागृह मध्ये ग्रामसेवक / पालिका अधिकारी हजर असताना.
असे काही घडेल तर नियम - शिस्त - कायदा - धार्मिक रूढ़ी - परंपरा - सर्वच पालन होलसेल मध्ये.

भरत...
कसली किंमत मोजली काही दोष नसताना...
समाज प्रबोधन....कुणाचं आणि कसं...
बेकार, व्यसनी तांडे...
कथीत सभ्य जगानं नागवलेले....समाजाचं लक्ष वेधू पाहतात. स्वतः:ची विकृत ओळख मिळवू पाहतात ... नीति अनीती गुंडाळून ठेवतात.
येणकेण प्रकारेण प्रसिध्दी लोलूपता....
हव्यासी ( रक्तपिपासू) व्यापारी वृत्ती...
रोजीरोटी पलीकडं काहीच दिसू नये अशी हतबल माणसं....
ही सगळी कारणमीमांसा आहे उत्सव विकृतीची असं मला वाटतं...I have every right to be wrong.

विकृत पना जो आलेला आहे त्याचे मूळ कारण राजकीय पक्षांचा ह्या क्षेत्रात प्रवेश.
जिथे चार माणसं जमा होतात तिथे हे राजकीय पक्ष पोचतात.
धार्मिक कार्यक्रमाचा पण राजकीय अड्डा बनवून ठेवला आहे..
त्या मुळेच ह्या विकृती अशा उस्तावत शिरल्या आहेत

Pages