ती रात्र भाग १

Submitted by प्रथमेश काटे on 3 September, 2023 - 14:56

ती रात्र
भाग १

मोकळं, निर्जन मैदान. मध्यरात्रीची वेळ होती. जमीन, झाडे, लांबवरची घरं, डोंगर, टेकड्या सर्व मंद चंदेरी प्रकाशाने व्यापून टाकल होत. आज बहुदा पौर्णिमा असावी ; किंवा नुकतीच काल परवा होऊन गेली असावी. शांततेत दोनच आवाज ऐकू येत होते. एक रात्रकिड्यांची किरकिर, आणि दुसरा दण.. दण्ण... असा काहीतरी खणल्यासारखा आवाज. मैदानात एका जागेवर एक तरूण कुदळीने खणत होता. जवळच एक मुलगी उभी होती. तिनं हातातील बॅटरीचा झोत त्याच्या खणण्याच्या जागेवर टाकलेला.थोड्याच अंतरावरून गंगाराम डुलत, धडपडत चालला होता. हातातली बॅटरी प्रत्येक पावलागणिक डचमळत होती. त्याचं लक्ष त्या तरूणीवर ‌ गेलं. तो जागेवरच थांबला.
एव्हाना बऱ्यापैकी खड्डा खणून झाला होता. तो तरुण खणणं थांबवून सरळ, शांतपणे उभा राहिला. फुललेला श्वास आटोक्यात आल्यावर त्याने कपाळावरचा घाम अंगठ्याने निपटून काढला.
" चल उचल. " तिच्या जवळ जाऊन तो तरुण
म्हणाला.
दोघांनी त्या मुलीजवळ असलेली एक जुनाट ट्रंक उचलली. ट्रंक बघून गंगारामचे डोळे चमकले. मघाशी ती त्या मुलीच्या पलीकडून असल्यामुळे गंगारामला दिसली नव्हती. उचलताना तरूणाच गंगाराम कडे लक्ष गेलं. आधी तो दचकलाच ; पण मग घाबरण्याचं काहीच कारण नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

" ए गंग्या, काय बघतो ? चल निघ इथून." तो खेकसला. गंगाराम निमूटपणे निघाला ; पण त्याची चाल मंदावली होती.ट्रंक फारच जड लागत होती. दोघांनी ती कशीबशी उचलून खड्डयात टाकली.

" खड्डा पुरेसा खोल आहे ना ? ट्रंक कुणी पळवून नेणार नाही ना ? " मुलीनं विचारलं. त्याने होकारार्थी मान डोलावली. गंगाराम फार पुढे गेला नव्हता. त्याला तिच बोलणं स्पष्ट ऐकू आल.

मग ते दोघे तिथून निघाले. जाताना ती तरूणी सारखी मागे वळून पाहत होती. तिच्या मनाला कसलीतरी हुरहूर लागली असावी, असं वाटत होतं. त्या जागेवर पूर्ण शांतता पसरली.

थोड्या वेळानंतर गंगाराम परत आला. त्याच्या हातात कुदळ होती. तो मनाशीच विचार करू लागला - ' मला काय खुळा समजलात काय ? आसं रात्रीच्या वेळला, एकांड्या जागी ही ट्रंक पुरायला आणली. दोन जणांना पण उचलना ; एवढी जड. म्हंजे नक्कीच मोठ घबाड असणार. म्हणूनच त्या पोरीला ट्रंक कुणी पळवून नेईल, अशी भीती वाटत होती जाताना पण सारखी सारखी वळून बघत होती.'
खड्डा आता बुजवला होता. त्यामुळे ती जागा कुठे असावी याचा त्याला अंदाज येईना. तो असाच तिथल्या तिथे फेऱ्या मारू लागला. थोडं पुढे गेल्यावर एकदम थांबला. दोन - अडीच फुटांवर एका जागेवर त्याचे डोळे खिळले. तो जणू भारावल्यासारखा तिकडे गेला, आणि अंदाजाने खणायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा वेग चांगलाच वाढला. त्याच्या हडकुळ्या हातात कुठून बळ आलं, कुणास ठाऊक ? कदाचित मनातल्या लालसेपोटी. त्याच्या डोळ्यात एक धग उतरली होती मघाच्या त्या तरूणापेक्षाही दुप्पट ताकदीने आणि वेगाने तो घाव घालत होता.
शेवटी एकदाचं खणून झालं. तो जरा विश्रांती घेण्यासाठी कुदळ बाजूला टाकून खाली डोळे मिटून बसला. दोन मिनीटांनी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांतली धग विझली होती. समोरच्या खड्ड्याकडे बघून त्याला आश्चर्य वाटले. पण मग त्याने बेफिकीरीने हात झटकला. तो पटकन उभा राहिला, अन कुदळ घेऊन आत उतरला. ट्रंकला भलंमोठं कुलूप होतं. ते त्याने कुदळीचा घाव घालून तोडल, आणि घाईघाईने ट्रंक उघडली. पण हातातल्या बॅटरीचा झोत आत टाकून जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. आश्र्चर्य, भीती, किळस असे संमिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले
आत एका तरूणीचं प्रेत होतं. छातीवरचे रक्त सुकून काळं पडल होत.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्रर्र Uhoh त्याने आधी दृश्यम्-१ बघायला पाहिजे होता म्हणजे ट्रंक नक्की कुठे पुरायला पाहिजे होती ते समजले असते. बिचारा फसला आता !!

गंगाराम सारखा आय विटनेस सोडून चूक केली
दोघांनी...>> नाही हो. तो नशेत होता. जे काही बघितलं असेल ते दुसऱ्या दिवशी सकाळी दारू उतरल्यावर विसरून जाईल असंच कुणीही विचार करेल ना. त्याला आय विटनेस वैगेरे समजण्याइतक महत्त्व देण्याची त्यांना गरज वाटली नसणार.