वैवाहिक सहजीवन

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 September, 2023 - 01:44

पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल. स्त्रीमुक्तीचा विचार जसा सशक्त होत गेला तसा विवाह संस्थेचे भवितव्य अशक्त होत गेले.पुढील काही शतकात विवाह संस्था नामशेष होत जाईल असे आमचे भाकित आहे.आपला देश किमान तीन शतकात एकाच वेळी वावरतो. त्यामुळे कैक पिढ्या जातील. विवाह संस्थेला पर्याय म्हणून लिव्ह इन रिलेशन वाढत जाईल. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे हा विचार लिव्ह इन मधे करार स्वरुपात केला जातो. अजून हा प्रकार प्रायोगिक अवस्थेत आहे. पण भविष्यात याला चांगले दिवस आहेत असेही भाकित या निमित्त वर्तवतो.
पुरोगामी विचारांच्या जेष्ठ लोकांच्या सहजीवनात अजून एक बाब येते. जेष्ठत्वाच्याच नव्हे तर एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. दोन्ही व्यक्तिमत्वे विचारांनी, आर्थिक दृष्ट्याही स्वतंत्र असतात. तसेही सहजीवन ही तडजोडच असते. पुरोगामी विचारांमधे व्यक्ति स्वातंत्र्याला, विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. सहजीवनाच्या एका टप्प्यावर जेव्हा व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक राहत नाहीत त्या टप्प्यात तडजोडी करत सहजीवन जगणे जाचाचे बनत जाते. चिडचिड वाढते. आतापर्यंत सहन केले आता नाही असा विचार बळावू लागतो. शिवाय तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असता. मग आता तडजोडी करत का जगायचे? आता पर्यंत केल्याच ना! तुमचे उर्वरित ऎक्टिव्ह आयुष्य थोडे असते. ते आपल्या मनाप्रमाणे जगावे असे वाटत राह्ते. त्यात सहजीवनाचे ओझे व्हायला लागते. त्यामुळे उतारवयातही घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे निरिक्षण तसे धक्कादायक वाटते. ज्या काळात एकमेकांना एकमेकांची गरज आहे त्याच काळात हे प्रमाण कसे वाढत चालले असा प्रश्न उपस्थित होतो. तसेही जेष्ठ ही काही एकजिनसी संकल्पना नाही. पण मुले व आईवडील अशा चौकटीत सोयीसाठी ती एकजिनसी ग्राह्य धरली जाते. व्यक्तिस्वांतंत्र्याचा अतिरेक असे जरी म्हटले जात असले तरी कुठल्या बिंदूपासून तो अतिरेक व कुठपर्यंत तो विवेकी असे काही ठोस उत्तर नसते. ते सापेक्ष आहे.अनेकदा असे होते की आयुष्याच्या उत्तरार्धात पतिपत्नी एकमेकांना कंटाळलेले असतात. मग एकमेकांची डोकी खात बसतात. तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते. मग मागचे हिशोब निघतात. कधी जुने हिशोब चुकते केले जातात. असे स्कोअर सेटलिंग चालू असते. या वयात घटस्फोट घेणे ही एकमेकांना परवडणारे नसते मग नाईलाजाने संसार रेटत राहतात. तुम्ही एकटे राहिलात तरी ही समाजाशी तडजोड ही करावीच लागते. मग अपरिचतांशी तडजोड करत बसण्यापेक्षा परिचितांशी तडजोड केलेली बरी असा समन्वय साधला जातो.
करोना काळात एक निरिक्षण आहे. हे निरिक्षण जेष्ठांच्या सहजीवनालाही लागू आहे. एकमेकांच्या "स्पेस" वर या सामायिक काळात अतिक्रमण झाले. एकमेकांच्या सहवासात जास्त काळ गेल्याने एकमेकांचे गुणदोष समोरासमोर प्रकर्षाने दिसू लागले. परिणिती एकमेकांना सहन करण्याची वेळ आली. कुटुंबासाठी वेळ दया, घरासाठी वेळ द्या हे जे पुर्वी सांगाव लागायच तेच इथे प्रश्नांकित झाले. घटस्फोट ही बाब असफल वैवाहिक जीवन, विवाहाचे अपयश अशी मानली जाते. त्यामुळे वाढलेल्या घटस्फोटांची संख्या ही विवाहसंस्थेला उतरती कळा किंवा विवाहसंस्थेची गरज कमी कमी होत चालल्याचे लक्षण म्हणता येईल. आता त्याला पर्यायी व्यवस्था म्हणुन लिव्ह इन रिलेशनशिप उदयास आली आहे. त्याचे प्रमाण ही एका वर्गात लक्षणीय वाढते आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा तत्वावरचे हे एक प्रकारचे ट्रायल मॅरेज आहे. तो सामंजस्याने सहजीवन जगण्याचा एक प्रकारचा करार आहे. तो लिखित वा मौखिक/ अलिखित असू शकतो. त्याला कायद्याची मान्यताही आहे. स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्याने एकमेकांच्या प्रॉपर्टीवर, आर्थिक कमाईवर हक्क न सांगता परस्परांची लैंगिक, वैचारिक, सांस्कृतिक भूक परस्पर संमतीने भागवून सहजीवन जगणे हा हेतु. या सहजीवनाच्या प्रवासात होणार व्यक्तिमत्वातील बदल जर परस्परांना घातक ठरु लागले तर सहजीवनातून बाहेर पडण्याचे प्रत्येकाचे हक्क सुरक्षित ठेवुन हा मार्ग अवलंबला जातो. अजून तरी हा प्रायोगिक अवस्थेत आहे. एकमेकांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा अवकाश जपत सहजीवन जगणे ही तशी कसरतच आहे. त्यासाठी विवेकी प्रगल्भता लागते. ती आपोआप येत नाही. तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत घ्यावी लागते. काही कौशल्ये आत्मसात करावी लागतात. शरीराच्या फिटनेसाठी जशा जिम्स आहेत तशा मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
मला वाटते 2021 मधे जेष्ठांचे लिव्ह इन हे सरिता आव्हाड यांचे लोकसत्तेतील पंधरा दिवसांनी चालणारे सदर सर्वांनीच वाचले असेल. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी निरिक्षणे व उदाहरणॆ त्यात दिली आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच्या स्पेसबद्दल खूपच सहमत आहे. मग ती फक्त घरातील स्पेस नसून एक मानसिक, बौद्धिक अवकाशही त्यात येते. मी अमक्या फोरमवर सक्रिय आहे तिथे नवर्‍याने कडमडू नये. माझे पास्वर्डस मागू नयेत. माझं माझं वेगळं बँक अकाऊंट असावे - त्यात मला कोणाचेही प्रश्न नकोत न सल्ले नकोत. माझं एक मैत्र मंडळ असावे जिथे नवरा नाही आला तरी काही बिघडत नाही. आपले आपले वेगळे छंद जोपासावेत.
हे अवकाश जितकं हेल्दी(निरामय) असेल , तितका सहजीवनात आनंद रहातो.

But let there be spaces in your togetherness,
And let the winds of the heavens dance - खलिल जिब्रान

>>>>>> तडजोडींची संख्या वाढायला लागक्ली की "सहजीवन" हे "सहनजीवन" होते.
हाहाहा

>>>>>आपली शारिरिक व मानसिक प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स, सायकियाट्रिस्ट,सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर्स अशा तज्ञांची मदत ....... मनाच्या फिटनेसाठी माईंड जिम्स ही आहेत.
युट्युब वरती, नेटवरती असंख्य लेख, पॉडकस्टस आहेत. ते ऐकून , आचरणात आणण्यासारखे आहेत. झिग झिगलर यांचे एक वाक्य आहे ' People often say that motivation doesn't last. Well, neither does bathing - that's why we recommend it daily. ' तसे हे पॉडकास्टस वेळोवेळी ऐकून, लेख वाचून , मनाला वळण लावता येत व सातत्याने आठवण ठेवावी लागते की - समोरचा सर्वगुणसंपन्न नाही. अगदी जसे आपण सर्वगुणसंपन्न नाही तस्सेच!!! Happy
---------------------------
विवाहोपरान्त जी सरमिसळ्/मीलन होते ते आर्थिक/वित्तिय आणि मानसिकही असते. अशा वेळी कठोर मर्यादा(बाऊंडरीज) घालून घ्यावात अशा मताची आहे मी. म्हणजे विवाहात एक पाय व बाहेर एक पाय ठेवावा. जर वेळ आली तर वेगळे होता आलेच पाहीजे. मग त्यात आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक कणखरपणा आणि स्वतःच्या आवडीनिवडींचा आदर. मुलीला तेच शिकवते. नाईलाजाने कोणी कधीच नात्यात राहू नये.
लेख आवडला.

प्रघा आपले सर्व लेख पुनश्च चाळले. काही सावकाश वाचण्यासाठी व परत परत वाचण्याकरता मार्क केले. वैचारीक, आणि (आता शब्द आठवत नाही) - एकंदर अ‍ॅग्रेशन विरहित - कोणताही अभिनिवेश(?) नसलेले लेख.

लोकांना प्रयोग करू ध्या.
त्यांच्या कृत्याची फळं त्यांना मिळतील.
पण ह्या प्रयोग करणाऱ्या लोकांचा कोणताच बोजा कोणत्या ही स्थिती मध्ये सरकारी तिजोरी वर किंवा समाजावर पडता कामा नये.
त्यांची फळ तीच लोक भोगतील.
अपराध घडला तरी सरकारी यंत्रणांनी त्याची दखल घेण्याची गरज नाही

कडेलोटावर आल्यावर समुपदेशन, मानसिक जिम वगैरे ठीक आहे. पण लेखात ज्योतिषाचा कोन यायला हवा होता. मंगळ,शुक्र हे विवाहाचे भविष्य सांगतात पण चंद्र मानसिक ओढ दाखवतो. तर पुढे यांचे विचार जमणार का नाही हे शनि आणि रवी ठरवतात. हे दोन ग्रह स्थानाप्रमाणे विजोड विचार दाखवतात. म्हणजे अगदी घटस्फोट होत नसला तरी यांचे कधीच जमत नाही हे नक्की ठरते. शनी आणि रवी प्रभावी लोकांचे विचार कधीच जुळत नाहीत , विरोधी पद्धत असते.
तर हे फक्त लग्नाच्या जोडीदाराबरोबर नसून इतर नात्यांतही दिसते. (रवी -शनी हे बाप लेक मानले आहेत पुराणांत).
असो. एखाद्या समुपदेशकाने एखाद्या जोडप्याचा होऊ घातलेला घटस्फोट टाळला आणि त्याचं श्रेय घेतलं तरी त्यांची मानसिक तडजोड कधीच होणार नाही. सहजीवन ते.

अशा वेळी कठोर मर्यादा(बाऊंडरीज) घालून घ्यावात अशा मताची आहे मी. म्हणजे विवाहात एक पाय व बाहेर एक पाय ठेवावा. जर वेळ आली तर वेगळे होता आलेच पाहीजे. मग त्यात आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक कणखरपणा आणि स्वतःच्या आवडीनिवडींचा आदर. मुलीला तेच शिकवते. नाईलाजाने कोणी कधीच नात्यात राहू नये.>>> या मर्यादा ही डायनॆमिक असतात. त्यामुळे त्यावर आधारलेली गणितही बदलत असतात. विशिष्ट मर्यादे नंतर जेव्हा आपण म्हणतो ती "विशिष्ट" मर्यादा कोणती हे ठरवताना मेंदु बधीर होतो. तिथे नेटवरील पॉडकास्ट लेख यांची काही अंशी मदत होते.

विवाहोपरान्त जी सरमिसळ्/मीलन होते ते आर्थिक/वित्तिय आणि मानसिकही असते. अशा वेळी कठोर मर्यादा(बाऊंडरीज) घालून घ्यावात अशा मताची आहे मी. >> चांगलं मतं आहे. पण नविन नविन लग्न झालं असताना अश्या मर्यादा घालाव्यात हा विचार सुचत नाही. 'प्रेम म्हणजे त्याग/ समर्पण', ही कल्पना पिढ्यांपिढ्या समाजात रुजल्यामुळे तसे होते. आणि लग्न असो किंवा लिव्ह-इन, दोन्हीच्या पायाशी प्रेम असतं असं सर्वसाधारण सगळीच जोडपी मानतात. असं असताना ह्या मर्यादा घालाव्यात, हे भान येईपर्यंत किमान ५-१० वर्ष निघून जातात. मग मर्यादा घालू म्हटलं, तर आर्थिक आणि मानसिक सरमिसळ ऑलरेडी झालेली असते. एखादं मूलही जन्माला आलेलं असतं. त्याला मोठ करताना बरेचदा आर्थिक आणि मानसिक सरमिसळ गरजेची बनते.
अश्या परिस्थितीतही मार्ग काढून ही सरमिसळ थोडी कमी करता येते, मर्यादा वाढवता येतात. पण दोन्ही पार्टनर्स समजूतदार असतील, आणि घरातल्या आणि समाजातल्या इतर व्यक्तींकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस त्यांच्यात असेल, तरच ही मर्यादा घालण्याची प्रक्रीया सहजगत्या होते.

सोहा एक मुद्दा राहतोच. विवाहोपरांत एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही. मग अशामुळे येणार्‍या मर्यादांचा विचार अगोदर प्रेडिक्ट करता येत नाही. एकाचे अन्न हे दुसर्‍याचे नैसर्गिक रित्याच विष बनत असेल तर स्वाभाविकपणे तडजोड संपुष्टात येते. कारण तिथे अस्तित्वालाच धोका पोहोचलेला असतो.

विवाहोपरांत एकूण सहजीवनातील प्रवासात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास ही स्वतंत्रपणॆ होत असतो. तो या टप्पात परस्पर पूरक राहिला असतोच असे नाही.>> ह्यासाठीच मर्यादा गरजेच्या असं वाटतं. आपल्या आयुष्यात किती आणि कोणत्याबाबतीत आपल्या पार्टनरने ढवळाढवळ करावी, हे स्वतःशी ठरवणे, आणि ते स्पष्ट्पणे, पण तरीही न दुखावता दुसर्‍याला सांगणे, हीच खरी कसोटी असते ह्या टप्प्यावर.
ते एकदा जमलं, की आप-आपल्या व्यक्तीमत्वासाठी योग्य असे निर्णय घेण्याचे आर्थिक आणि मानसिक स्वातंत्र्य दोन्ही पार्टनर्सना मिळते.
पण दोघांच्या व्यक्तीमत्वामधे कमालीची तफावत असेल आणि विवाहोपरांत काही काळ एकत्र घालवूनही ती तफावत कमी झाली नसेल तर मात्र विवाह टिकणे कठीण.

>>>>>>पण दोघांच्या व्यक्तीमत्वामधे कमालीची तफावत असेल आणि विवाहोपरांत काही काळ एकत्र घालवूनही ती तफावत कमी झाली नसेल तर मात्र विवाह टिकणे कठीण.
एक जण भयंकर हट्टी असेल तर दुसर्‍याची फरफट तरी होते किंवा दुसरा हिंमतीने वेगळा होतो.

पण दोघांच्या व्यक्तीमत्वामधे कमालीची तफावत असेल आणि विवाहोपरांत काही काळ एकत्र घालवूनही ती तफावत कमी झाली नसेल तर मात्र विवाह टिकणे कठीण.>>>>>>>>>> मग विवाहासारखा आयुष्यातील एक मोठा निर्णय घेताना वधूवरांची व्यक्तिमत्वे परस्परांशी पूरक आहेत की नाहीत हे आधुनिक विज्ञानाच्या आधारे कसे ठरवायचे? विवाहपूर्व वैद्यकीय तपासणी करुन काही शारिरिक बाबी समजू शकतात पण मानसिक पिंड/ प्रकृती समजण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांची किती व कशी मदत होउ शकते? वैवाहिक आयुष्याचा दीर्घ काळ असलेल्या टप्प्यात व्यक्तिमत्वांमधे बदल होणे ही स्वाभाविक असते. ते बदल जर परस्परांना पूरक राहिले नाहीत तर मग सहजीवन अवघड बनत जाते.वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात असे आढळून आले आहे गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मायबोलीवरील या क्षेत्रातील लोकांना हे या निमित्त आवाहन आहे.

https://archive.org/search?query=subject%3A%22%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B...

यांची सगळीच पुस्तकं भारी आहेत , यातल्या विवाह अभ्यास आणि जोडीदाराची निवड या 2 पुस्तकांमध्ये जोडीदाराच्या कम्पॅटिबिलिटीचा , तडजोड आणि या विषयाच्या शक्य तेवढ्या विविध अंगांचा सखोल विचार मांडलेला आहे .

राधानिशा, अनिल भागवतांचे विवाह अभ्यास मंडळ होते. त्यांचे कडे माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक ही ठेवले होते. मला गुणमेलनाला समांतर अशी मानसशास्त्रीय चाचणी चे स्वरुप हवे आहे. भागवतांशी माझी चर्चा झाली होती.

>>विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? अशा प्रश्नांवर मला सामाजिक जाणीवा असलेल्या मानसतज्ञांची वेळोवेळी मदत हवी आहे. मायबोलीवरील या क्षेत्रातील लोकांना हे या निमित्त आवाहन आहे.

नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 5 September, >>

आता योग्य ठिकाणी आलात. उपाय काय.
मानसशास्त्रीय मागोवा घेणे बरोबर. मग तो प्रश्नोत्तरे करून ठरवता येईल. म्हणजे शंभरेक प्रश्न आणि त्यांचे पर्याय दिलेले सोडवून घेणे. त्यातून "वैचारिक कल" समजेल.

मानसशास्त्रीय मागोवा घेणे बरोबर. मग तो प्रश्नोत्तरे करून ठरवता येईल. म्हणजे शंभरेक प्रश्न आणि त्यांचे पर्याय दिलेले सोडवून घेणे. त्यातून "वैचारिक कल" समजेल.>>>>> या बरोबर भावनिक बुद्धीमत्ता ही महत्वाची आहे. म्हणूनच विवाह नावाच्या तडजोडीत आपल्या तडजोडीच्या क्षमतांचा वैज्ञानिक दृष्टीकोना आधारे अंदाज यावा यासाठी एखादी मानसशास्त्रीय चाचणी विकसित असावी असे मला वाटते

<< गुणमेलनाला सक्षम पर्याय म्हणुन वधूवरांसाठी / विवाहेच्छुक स्त्री पुरुषांसाठी कोणती मानसशास्त्रीय चाचणी विकसित करावी? >>

त्याने काय साध्य होणार? उलट पत्रिका मागताना, सोबत चाचणीचे रिझल्टपण मागितले जातील. मुळात पत्रिका हा भंपकपणा ताबडतोब बंद केला पाहिजे. भारत देश वगळला (त्यात ही सर्वजण नाहीतच) तर इतर देशात पत्रिका आणि गुणमेलन/गुण जुळवणे, या प्रकाराला कुत्रं पण विचारत नाही. पण तरीही या भंपकपणात आणखी भर कशाला?

उबो, पर्यायी व्यवस्था म्हणेज अतिरिक्त व्यवस्था नाही.तरीही जेव्हा आपण एखादा पर्याय देतो त्यावेळी मूळ एकदम नष्ट करत नाही म्हणून लोक सुरवातील तुम्ही म्हणता त्या पद्धतीन वापर होईल. जेव्हा आता या मानसशास्त्रीय कसोट्या तुलनेने बर्‍याच विश्वासार्ह आहेत हे लक्षात आल्यावर पहिला टेकू काढून घ्यायला सुरवात करतील. समाज सुधारणा ही उत्क्रांत होत जाते. त्याला अवधी द्यायला हवा.

पत्रिका हा भंपकपणा ताबडतोब बंद केला पाहिजे. >>

काही कुटुंबं पत्रिकेवर विश्वासापेक्षा नापसंती कळवण्यासाठी " पत्रिका जुळत नाही " या निमित्तासाठी पत्रिकेचा सहारा घेत असावेत . स्पष्ट नकार कोणतीही कारणं न देता देणं कदाचित बऱ्याच जणांना अवघड वाटत असू शकतं .. कदाचित ओळखीतून सुचवल्या गेलेल्या स्थळांच्या बाबतीत कारण न देता दिलेला नकार किंवा खरं कारण देऊन दिलेला नकार हा ज्यांनी स्थळ सुचवलं त्यांच्यासोबतचे आपले संबंध बिघडायला कारणीभूत होईल अशी भीती किंवा एकूणच खरं कारण सांगून मुलाची / मुलीची इमेज लग्नाच्या बाजारात बिघडू नये अशा कारणांमुळे पत्रिका जुळत नाही हे अतिशय सेफ एक्सक्यूज असू शकतं .

काही कुटुंबं पत्रिकेवर विश्वासापेक्षा नापसंती कळवण्यासाठी " पत्रिका जुळत नाही " या निमित्तासाठी पत्रिकेचा सहारा घेत असावेत . >>>>> होय तसेही होते पण अन्यही कारणे असतात.. माझे यंदा कर्तव्य आहे हे पुस्तक विवाह व ज्योतिष याच विषयावर वाहिलेले आहे.
सदर पुस्तक आता आपल्याला खालील लिंकवरुन डाउनलोड करुन घेता येईल.
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/yanda%20kartavya%20aahe.pdf

माझ्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॉगवर ही लिंक आहे. तो ब्लॉग ही पहावा.

पण दोघांच्या व्यक्तीमत्वामधे कमालीची तफावत असेल आणि विवाहोपरांत काही काळ एकत्र घालवूनही ती तफावत कमी झाली नसेल तर मात्र विवाह टिकणे कठीण.
नवीन Submitted by soha on 5 September, 2023 - 18:31

जर व्यक्तिमत्वे जुळतात कि नाही हे ठरवण्यासाठी काही काळ जाऊ द्यायचा असेल तर दोघांनी परस्पर संमतीने ठरवून तितका काळ मूल जन्माला घालू नये (दोन्हीकडच्या ज्येष्ठांच्या दुराग्रहाला बळी न पडता ), आणि स्वतःचे व्यक्तिमत्व / स्पेस जपण्यासाठी निष्पाप मुलांच्या भविष्याचा सत्यानाश करू नये .

जर व्यक्तिमत्वे जुळतात कि नाही हे ठरवण्यासाठी काही काळ जाऊ द्यायचा असेल तर दोघांनी परस्पर संमतीने ठरवून तितका काळ मूल जन्माला घालू नये>>>> रक्तदान करताना या व्यक्तिचे रक्त पेशंटला चालणार नाही हे रक्तगटावरुन लगेच कळते. कारण रक्त गट चाचण्या विकसित झाल्या आहेत. मानसशास्त्रीय चाचण्या इतक्या अचूकतेने विकसित झाल्या नाहीत पण मानसशास्त्र विकसित होत आहे. लायडिटेक्टर वा नार्को ऎनॅलिसिस किती टक्के विश्वासार्ह आहे हे त्यातील तज्ञ सांगू शकतील. पण एक त्यातल्या त्यात विश्वासार्ह गाईडलाईन देण्याचे काम करु शकणारी या विषयावर चाचणी तर हवी.वस्तुनिष्ठता हा कळीचा मुद्दा इथे येतो

पण एक त्यातल्या त्यात विश्वासार्ह गाईडलाईन देण्याचे काम करु शकणारी या विषयावर चाचणी तर हवी.वस्तुनिष्ठता हा कळीचा मुद्दा इथे येतो
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 6 September, 2023 - 12:32

अशी काही चाचणी सध्यातरी अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे त्यामुळे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी सध्या तरी एकत्र सहवास हाच पर्याय दिसतो. हवे तर "चि व ची. सौ. कां. " चित्रपटांत दाखवल्याप्रमाणे लग्नापूर्वी मुला मुलीने एकत्र राहणे (मुलाच्या किंवा मुलीच्या घरी ते ही अशारीर पद्धतीप्रमाणे ) हा एक त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे, पण यात दोघांच्या संयमाची कसोटी लागू शकते , जे सध्याच्या इन्स्टंट परिणाम हवे असणाऱ्या पिढीसाठी खुपच कठीण वाटते .

अबा सहमत! अशी मागणी करणार्‍या मुलगा वा मुली ला वेस्टर्न चळ लागलाय असे लेबल लागू शकते पण
नवीन Submitted by aashu29 on 6 September, 2023 - 14:09

कदाचित असे लेबल लागू पण शकेल, पण ज्यांना स्वतःच्या स्पेस / व्यक्तिमत्व / स्वातंत्र्य इत्यादी इत्यादींची इतकी काळजी असेल त्यांनी असे लेबल व लेबल लावणाऱ्यांची किंमत / काळजी का करावी आणि असे लेबल लागल्याने त्यांच्या आयुष्यात नक्की काय फरक पडणार आहे?

<< मानसशास्त्रीय कसोट्या तुलनेने बर्‍याच विश्वासार्ह आहेत. >>
मला (आणि बऱ्याच वैज्ञानिकांना) याबद्दल शंका आहे. या pseudo-scientific टेस्ट आहेत. म्हणूनच पॉलीग्राफ टेस्ट कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत. Myers–Briggs Type Indicator आणि True Colors सारख्या टेस्ट, लोकांना "box" मध्ये टाकण्यासाठी वापरलेल्या आहेत, हे मी अनुभवातून बघितले आहे. शिवाय या अश्या टेस्टमध्ये fake results ची, दरवेळी वेगळा रिझल्ट मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसशास्त्रीय टेस्ट कितपत विश्वासार्ह आणि उपयोगी आहेत, याबद्दल शंकाच आहे. (त्या जर खात्रीशीर असत्या तर hiring करतानाच सगळ्या कंपन्यांनी घेतल्या असत्या.)

<< काही कुटुंबं पत्रिकेवर विश्वासापेक्षा नापसंती कळवण्यासाठी " पत्रिका जुळत नाही " या निमित्तासाठी पत्रिकेचा सहारा घेत असावेत >>
हे उगीचच पसरवलेले myth आहे. जनरली मुला/मुलीची माहिती आणि पत्रिका आधी बघितली जाते. माहिती पसंत पडली आणि "पत्रिका जुळत असेल" तरच मग मुलगा/मुलगी बघण्याचा/भेटण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पसंती नसेल, तर सरळ सांगतातच ना की पसंत नाही/विवाहाचा योग नाही म्हणून. की पत्रिका जुळते म्हणून पहिल्याच स्थळाला हो म्हणतात? मग तेव्हा प्रॉब्लेम येत नाही का स्पष्ट सांगायला? मग हेच आधी सांगायला पत्रिकेच्या कुबडीचा आधार कशाला लागतो?

लेखातील मूळ मुद्दा की सहजीवन व व्यक्तिस्वातंत्र्य एकाच वेळी जपता आले पाहिजे, याच्याशी सहमत आहे. माझ्या बघण्यात तरी असे आहे की जसा एकमेकांचा सहवास वाढतो, जसे वय वाढते तसे एकमेकांची गरज समजू लागते आणि त्यामुळे उलट उतारवयात घटस्फोट होण्याचे प्रमाण कमी होते. (अपवाद असतील, पण प्रमाण कमी.) तरुणपणी असणारे उसळते रक्त तोपर्यंत थंड झालेले असते.

व्यक्तिस्वातंत्र्याचं महत्त्व लहानपणापासून प्रत्येकावर बिंबवणे हाच उपाय आहे. पण विशेषतः लग्नाळू लोक आणि त्यांचे आईवडील यांचं याबाबत प्रॉपर प्रबोधन व्हायला हवं. कॅथलिक लोकांत लग्नाआधी चर्च मध्ये कौन्सेलिंग करतात, असं ऐकलंय. काय सांगतात ते कधी माहीत करून घेतलं नाही.

माझ्या भाच्याचं लग्न जमलंय . ताईशी त्यावर सारखं बोलणं होत असतं. मुलीला आपल्याला हवं तसं वळण लावून घेऊ असं ती लग्नासाठी स्थळं पाहायच्या वेळेपासून म्हणत आली आहे. हे फोल आहे हे तिच्या हळू हळू लक्षात आणून देतो आहे.

दुसरीकडे नवर्‍याने आपण म्हणू तसंच वागायला हवं अशी अपेक्षा असणार्‍या मुलीही असतात.

आताच्या काळात हे मुलगा मुलगी दोघांकडच्यांना लागू आहे.

Pages