सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol कहर धमाल लिहीले आहे. पण इतके त्रोटक नको. अजून येऊदेत.

दोनतासकुठंहोताकाकू >>> टोटली हाच प्रश्न पडला. इतकी पिव्होटल भूमिका असणार्‍या शेजारच्या काकूंचे काम कोणी केले आहे? (ही क ची बाराखडी चुकून झाली आहे)

नकली टकलाचे वाळवण, लेव्हल मेकप, पाटील टाइप माणूस, वाईट नजरेचे वर्णन, सत्ताविसावे रडके गाणे वगैरे सगळे सुपरलोल आहे Happy

बाकी काकूंना निर्णायक क्षणी देतात ती माहिती कशी काय मिळाली? शांततापूर्ण कामांकरता देश अणुतंत्रज्ञान विकसित करतात तशा या काकू बहुधा चांगल्या उद्देशाने प्रायव्हसीचे उल्लघंन करत असाव्यात. काकूंना एक लाइकतरी बनतोच.

पिव्होटल भूमिका >>> Lol
त्यांचं नाव काही कळलं नाही. मला जुन्या सिनेमातले सगळे सहकलाकार सारखेच दिसतात.

बाकी काकूंना निर्णायक क्षणी देतात ती माहिती कशी काय मिळाली? शांततापूर्ण कामांकरता देश अणुतंत्रज्ञान विकसित करतात तशा या काकू बहुधा चांगल्या उद्देशाने प्रायव्हसीचे उल्लघंन करत असाव्यात. काकूंना एक लाइकतरी बनतोच.
>>> Lol
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

पण इतके त्रोटक नको. अजून येऊदेत.>>> आता हे सोडून सव्वीस रडकी गाणी आणि दोन लावण्या आहेत फक्त. Lol

धन्यवाद. Happy

हहपुवा.

निफुला बंडी घालून दाखवायचा म्हणजे तोही म्हणेल 'बंडीवान मी या संसारी'.

याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. >> Lol

कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं >> Lol

ग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. >> Lol

>>> धमाल पंचेस आहेत. अजून पाहिजे होते. येऊ देत अजून.

विनोदी लिहीले आहेस. हा सिनेमा पाहीनसे वाटत नाही. सिनेमाच्या बाबतीत 'ब्रेव्हहार्ट' सिनेमा पहातानाही झोपण्याचा विक्रम केलेला आहे.

हायलाइट्स लिहिल्यासारखे झाले आहे. पंचेस अर्थातच धमाल. हा सिनेमा मला अजिबात आठवत नाही किंवा माहीतच नाही. निळू फुले आणि आशा काळे यांचं लग्न कोण कशाला लावेल? त्यांची ठरलेली पाटलाची भूमिका मोहन कोठिवानना दिलेली दिसते.
नेटवर सिनेमा फक्त एअरटेल एक्स्ट्रीमवर दिसतो आहे. पण एके ठिकाणी हायलाइट्स दिसले. शेजारच्या काकूचा चेहरा ओळखता आला नाही, पण आवाजावरून लीला गांधी वाटल्या.

आशा काळे मराठीतली सगळ्यात जास्त टॉर्चर झेललेली नायिका म्हणता येईल. हा धागा अशा टॉर्चर्ड नायिकांना डेडिकेट करता येईल.

आशा (भोसले)ने या काळात बरीच कचरा मराठी गाणी गायलीत. ( कशासाठी?)

Lol Lol कुठं मिळालं हे रत्न. असा सुद्धा चित्रपट येऊन गेलाय का? निळू फुले, नकली-स्टिकर टकल, दोडकं काय, वांगं काय, निफू चे काफू, आणि "शोर्ट फिल्म"ची "डोक्याला शॉट फिल्म" बनण्यास कारणीभूत अशा शेजारच्या काकू Lol धमाल लिहिलंय अगदी!

१९८८-८९ वर्षात जगात सगळीकडे बोअर वातावरण होते का काय? Proud जे काही ८८-८९ म्हणून पहायला मिळते मधले ते सगळे असेच आहे ब्वा.

>> बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते

हेच ते गाणं:
https://www.youtube.com/watch?v=8a5_-NlYuEw

कोल्हापूरच्या कळंबा तलावात शुटींगसाठी भाड्याने आणलेली बदके सोडली होती वाटतं.
गाणं मात्र ऐकायला खरंच छान वाटले. यापूर्वी कधी ऐकले नाही, पण अगदी टिपिकल "आपली आवड" छाप आहे. ९० च्या दरम्यान अशी गाणी फार हिट झाली होती. ते अजिंक्य देव आणि मुग्ध चिटणीस यांचे "दृष्ट लागण्या जोगे सारे" गाणे आठवले!

Proud एकच नंबर. आशा काळे.. अगागा..हे रत्न पाहिलं आहे. ह्याहून अस्सल म्हणजे सतीच वाण Happy

स्टेप बाय स्टेप आशा काळे :

खांब आणि आशा काळे -ह्यांना खांब फारच आवडतो, ज्या ज्या वेळी ह्यांना खांबाला सुतळीने बांधलय ते सगळे सिनेमे हिट. ह्या इतरवेळी खांबाला टेकून रडतात. त्यात पण स्टाईल आहे.

आशा काळे आणि बाहेरख्याली पणाचा आळ- " नाही, नाही.. सासूबाई / धनी / जाऊबाई (ह्यापैकी एक निवडा), हे सगळ सगळ खोटं आहे, सगळ.... सगळ......खोटं.... मी असं काही..का sss ही .... केलं नाहीये.. देवा मी हे ऐकण्या आधी मेले का नाही?? (ते आम्हाला काय माहित??)

आशा काळे आणि रडणे - आधी ओठांची विचित्र हालचाल, मग खालचा ओठ दाताने चावणे, मग जिवणीची विचित्र हालचाल , मग डोळ्यातले पाणी गालावर land , मग हात पदराकडे, मग पदराचा बोळा करून पदर तोंडात, मग मानेला हळूहळू झटके.. त्यात तोंडातून 'नाही नाही देवा देवा' चालूच, बोळा खाली, मध्येच 'डोरल्याशी' ते घट्ट धरून चाळे, ते झालं की मग दोन्ही हात कानावर, ह्यावेळी पदर डोक्यावरून खाली, रडणे चालूच, नाही नाही देवा देवा चालूच... आणि शेवटी खांबाकडे कूच, रडणे, नाही नाही, देवा देवा.... हुश्श : P

आशा काळे आणि एस्टी प्रवास आणि देवदेव (देवदर्शन)- हे पूर्ण करा आता Happy

अगं आईग अशक्य लिहीलंयस अस्मे. मी हसतेच आहे. थांबताच येत नाहीये.
>>#दोनतासकुठंहोताकाकू>> हे तर चेरीऑनदटॉप. आणि फा चा प्रतिसाद Rofl
अतूल बरं सापडलं गाणं. सगळेच प्रतिसाद धमाल आहेत. लंपन काय अभ्यास काय अभ्यास

Lol
मस्त लिहिलंय.
आशा काळे ही स्वतःच्या चेहे-याच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री होती . सारखं आपलं नाजूकपणे रडणं, डोळे टिपणं , पापण्यांची उघडझाप करणं....!!!!

कहर आहे खरंच!! वाचायला मजा आली, पण पाहताना तुम्हाला काय कष्ट पडले असतील याची कल्पनाच करवत नाही. तो आख्खा पाहिल्याबद्दल गिनीज बुक मध्ये नोंद व्हायला हरकत नाही. एकेका परिच्छेदाला हसलो.

हळूहळू आपणही पाटील होतो >> हा सगळ्यात जास्त कहर आहे. अगदी विजुअलाइज् झालं त्यांनी काय दाखवलं असेल ते!

आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो >> हे टिडिंग टिडिंग वाचून उगाच डोक्यात हृतिकचं एक पल का जीना गाण्याचं म्युझिक वाजायला लागलं आहे.

हळूहळू आपणही पाटील होतो >>> Lol हे निसटलेच होते आधी.

लंपनची पोस्टही धमाल आहे. विशेषतः खांबांशी नाते. जगातील खांब कुत्र्यांना जितके भीत नसतील तितके सलमान खानला भितात असा माझा समज होता. पण तितकेच ते आशा काळेलाही भीत असतील.

या पिक्चर मधे अक्षरशः आबालवृद्ध सुरेश वाडकरच्या आवाजात गातात. तो बालमित्र लहान असताना, तो मोठा झाल्यावर व आशा काळेचे म्हातारे वडील सगळे सुरेश वाडकर. याचे थोडेफार शूटिंग काही वर्षे आधी झाले असावे. जर १९८८ चा हा पिक्चर असेल तर प्रिया अरूण इतकी लहान कशी दिसते? त्याच काळात ती लक्ष्याची हिरॉइन होती इतर पिक्चर्स मधे. अशी ही बनवाबनवी बहुधा त्याच वर्षातला. मग तिलाच मुख्य रोल मधे घेउनही हा पिक्चर बनवता आला असता. पण या रोलचा जर अगदीच वेळ जात नसल्यामुळे कोणी कधी काळी विचार केलाच तर आशा काळे शिवाय करूच शकत नाही. झब्बा-लेंगा हा चांगल्या व्यक्तींचा गणवेष आहे या पिक्चर मधे. बालमित्र बाल असताना व तरूण असताना. अविनाश खर्शीकर सुद्धा. अर्थात अजून जेमतेम अर्धा-पाऊण तासच पाहिला आहे.

तो "पाटील टाईप माणूस" पाहिला आहे इतर पिक्चर्स मधे आधी. मोहन कोठीवान हे नावही पूर्वी वाचलेले आहे. पण ते हेच हे माहीत नव्हते. ती "लेव्हल मेकप"ची भानगडही परफेक्ट आहे. प्रिया अरूण लहान असताना इतर सगळे (बालमित्र सोडता) जसे दिसतात तसेच ते ती मोठी होऊन आशा काळे झाल्यावरही दिसतात.

तो मोठा झालेला बालमित्र कोण आहे? त्याच्या कॅरेक्टरचे लॉजिक व अभिनय दोन्ही रानोमाळ हरवले आहे. त्याला कोणत्याही सीन मधे नक्की कोठे बघायचे आहे हा प्रश्न पडत असल्यासारखा तो दिसतो- हिंदी पिक्चर मधले हीरोज याद्दाश्त हरवली की असे चेहरे करतात. तसेच हा स्त्रीप्रधान पिक्चर आहे मी यापेक्षा जास्त अभिनय करणार नाही असे ठरवून आल्यासारखा तो कसलेही भाव न दाखवता संवाद म्हणून टाकतो. एका सीन मधे तो आशा काळेशी लग्न करायचे आहे वगैरे म्हणतो. त्यावरून खास मराठी कादंबर्‍यांत शोभणारा "इथे बेडरूम... चल चहाटळ कुठला" हा एक विनोदही आपण सहन करतो. त्याने एक पुठ्ठ्याचे की थर्मोकोलचे घरही डिझाइन करून ठेवलेले असते जेथे हे दोघे भेटतात त्या ठिकाणी. पण प्रत्यक्षात लग्नाबद्दल हिने विचारल्यावर "लग्नं? मी अजून विचार केलेला नाही. कसचं कसचं" अशा संवादांच्या पाट्या टाकून तो गायब होतो. त्याने लग्न न करण्याचे "आशा काळेच्या कॅरेक्टरला टॉर्चर करणे" या कहानी की माँग व्यतिरिक्त कसलेही इतर कारण तेथे दिसत नाही. आधुनिक नाटकात जसे नेपथ्यात प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी त्या तेथे आहेत असे आपण समजायचे असते, त्याच्या उलटे येथे आहे. सीन सगळा आहे, संवाद आहे म्हणून तो जे करतोय तो अभिनय आहे असे आपण समजायचे.

हे दोघे नदीवर भेटतात हे एकदा स्क्रिप्ट मधे घातले, की प्रत्यक्षात ते शूटिंग कोठेही झालेले असो, "नदीवर" हे डीटेल अजिबात बदलणार नाही असे स्क्रिप्ट वाल्यांनी ठरवलेले असावे. कारण "नदीवर" म्हणून जे भेटतात व जेथे हिचे वडील त्यांना पकडतात - ती जागा चांगली दोन अडीचशे फूट उंचावर एखाद्या टेकडीवर असते. बाकी शूटिंग मधे दिवसरात्र एक केलेली आहे मेहनत घेताना. म्हणजे एकाच वेळच्या सीन मधे आशा काळे कडे रात्र असते व त्या बालमित्राकडे दिवस.

मग तिचे लग्न झाल्यावर ती व निफू त्यांच्या गावी जाताना एस्टीत बसतात त्या वेळेस कॅमेरा फेसिंग खिडक्यांमधून सगळे प्रवासी यांच्याकडे बघू नका सांगून तो नैसर्गिक वाटेपर्यंत रिटेक्स घेणे दिग्दर्शकाला मान्य नसावे. कारण समाजाच्या दृष्टीने दोन नगण्य व्यक्ती एसटी पकडायला जात आहेत व ते सेलिब्रिटी असल्यासारखे सगळे प्रवासी खिडक्यांमधून त्यांच्याकडे पाहात आहेत असे प्रत्यक्षात दिसते.

विहिरीतून वाचवणे हा सीन तर अफाट आहे. विहिरीचा साइज बघता वाचवणार्‍याने जपून उडी मारणे आवश्यक होते. नाहीतर बुडून ऐवजी वाचवणारा अंगावर पडल्याने व्यक्ती मरायची. तो माधव (खर्शीकर) आत कसा गेला व इतरांनी दोर वगैरे न टाकता/रहाट न फिरवता तिला उचलून तो कसा वर आला हे मला झेपले नाही. झी वगैरेने आख्खा एपिसोड केला असता या एका सीन वर. यांनी दोन मिनिटांत उरकला आहे. एका फ्रेम मधे आशा काळे काठावर दिसते. दुसर्‍या फ्रेम मधे किंकाळी व ती काठावर दिसत नाही. तिसर्‍या व चौथ्या फ्रेम मधे माधव ने तिला उचलले आहे व दोघेही बाहेर आहेत. प्रत्यक्षात विहिरीत कोणी गेले तरी होते का कोणास ठाउक. ती ओलेती आहे हे इतकेच प्रूफ आहे. मग ती तशीच सपोजेडली बेशुद्ध अवस्थेत कॉटवर आहे व इथे निफू व माधव फालतू संवाद मारत आहेत.

टॉर्चर काउण्ट ऑलरेडी बराच झाला आहे. आशा काळे व प्रेक्षकांचाही. आपला पाटील होता होता (तिचा बाप) नाना पळशीकर होतो.

अस्मिता. हहपुवा झाली....
हळूहळू आपणही पाटील होतो >>>>> हे भारी होतं.
फारएण्ड, यांची संदर्भासहित स्पष्टीकरणाची पुरवणीही आवडली.
आता बघते थोडावेळ,,,,,,,, सहन करू शकले तर...

का! ??? Lol
द्वयर्थी संवादांची रेलचेल दिसत्येय. बघतो आता..

हा सिनेमा म्हणजे पारदर्शक पातळातून जे दाखवायचं ते दाखवून पुन्हा सोज्वळपणाचा आव आणणारा आहे. दिग्दर्शकाने 'उघड दार देवा आता, उघड दार देवा' गाण्याच्या चालीवर 'हाय रामा ये क्या हुआ तुम कैसे हमें सताने लगे' हे गाणं म्हटलेलं आहे.

प्राईम वर आहे मित्रांनो 'लाभ' घ्या. धन्यवाद सर्वांना. Happy

फा ...मस्त मस्त पुरवणी !!!
"इथे बेडरूम... चल चहाटळ कुठला" ...
Lol कुमुदिनी रांगणेकर अथवा शकुंतला गोगटे टाइप्स सामाजिक कादंबऱ्या मधील विनोद आठवले!
मराठी साहित्य कशाकशातून तावून सुलाखून निघाले आहे!!!!

छान लिहिलं आहे .. प्रतिसाद पण भारी ..

आशा काळे आणि रडणे - आधी ओठांची विचित्र हालचाल, मग खालचा ओठ दाताने चावणे, मग जिवणीची विचित्र हालचाल , मग डोळ्यातले पाणी गालावर land , मग हात पदराकडे, मग पदराचा बोळा करून पदर तोंडात, मग मानेला हळूहळू झटके.. त्यात तोंडातून 'नाही नाही देवा देवा' चालूच, बोळा खाली, मध्येच 'डोरल्याशी' ते घट्ट धरून चाळे, ते झालं की मग दोन्ही हात कानावर, ह्यावेळी पदर डोक्यावरून खाली, रडणे चालूच, नाही नाही देवा देवा चालूच... आणि शेवटी खांबाकडे कूच, रडणे, नाही नाही, देवा देवा.... हुश्श : P >> डोळ्यापुढे उभं राहिलं सगळं लगेच . Lol

पण त्या गोड वाटतात पडद्यावर पाहायला .. जुन्या अभिनेत्रींपैकी देखणा चेहरा .. त्यांचे 2 - 3 च पिक्चर पाहिले असतील पण त्यातला अभिनय आवडून लक्षात राहीला .. एक नशीबवान नावाचा बहुतेक , त्यात त्यांचे मिस्टर मोहन जोशी मोलकरणीचं लॉटरी तिकीट चोरतात , नितीश भारद्वाज त्यांचा मुलगा असतो .. आणि दुसरा सिनेमा रवींद्र महाजनी डाकू असतात , आशा काळेचं लग्नातून अपहरण करतात.. मग ही त्यांच्याशी लग्न करते , मग ते सुधारतात आणि पुढे उद्योगपती वगैरे होतात . आवडले होते हे सिनेमे लहानपणी . आता पाहिले तर आवडतील की नाही सांगता येत नाही .

रामायणात जयश्री गडकर ऐवजी आशा काळे आणखी देखणी कौसल्या वाटल्या असत्या असं वाटतं कधीकधी .. पण जयश्री गडकरही बऱ्या होत्या .

मला मृणाल देव, कौसल्या च्या भूमिकेत आवडल्या असत्या. वैयक्तिक मत आहे. श्रीरामांची आई किती सुंदर असेल.

त्या त्यावेळी फारच तरुण असतील . कदाचित कौसल्या फार सुंदर दाखवायचीही नसेल म्हणून जरा प्रौढ जयश्री गडकर यांना घेतलं असेल . कैकयी देखणी असं आहे ना , ती अभिनेत्री विशेष नव्हती म्हणा .. तरीही . कैकयी देखणी आणि तरुण राणी म्हणून राजाची आवडती असं वाचल्याचं आठवतं . मृणाल कुलकर्णी यांनी मीरेचा रोल केला आहे , द्रौपदीचाही केला आहे . पण त्या जिजाबाई बेस्ट शोभल्या .. अशीच अमुची आई असती हे मात्र लागू पडणार नाही .. कारण यांच्यापेक्षा सुभेदाराची सून असून असून किती सौंदर्यवती असणार .. Lol

>>>>अशीच अमुची आई असती हे मात्र लागू पडणार नाही .. कारण यांच्यापेक्षा सुभेदाराची सून असून असून किती सौंदर्यवती असणार .. Lol
हाहाहा करेक्टो!!!

आता सतीच वाण तेवढं घ्याच. अशक्य आहे ते पण. त्यात तर पुष्पक विमान आहे (हो हो खरच आहे). ललिता पवार आणि सुषमा शिरोमणी.. अजून कसला विचार करत आहात???? युट्यूब वर आहे हे वाण. जाता जाता अजून एक... नॉर्मल डेसिबल बोलणे ६० असेल तर आशा काळेचे रागावून ओरडण्याचे बोलणे फारतर सव्वा ६० असेल. एकदम वेगळीच टोनल क्वालिटी आहे Proud

लंपन, जबरदस्त लिहिले आहे. 'आशा काळे विशारद' केलेली दिसत आहे. Lol
फा, धमाल लिहिले आहे. Lol १९८८ ची गडबड 'सही पकडे है'

निवांत लिहेन, तोपर्यंत पिसं काढा. Happy

मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले.
>>> अस्मिता- खूप टेम्प्ट करताय तुम्ही वाचकांना सिनेमा बघण्यासाठी.. पण आम्ही नाही फसणार Happy ... आशा काळे नाव वाचून कोण जाणार हे बघायला...

साथारण १९८५ च्या आसपास आशा काळे / रविंद्र महाजनी चा 'देवता' आला होता. गाणीही हिट झाली होती ( म्हणजे गणेशोत्सवात त्यांनी वात आणला होता) त्यात आशा काळे दरोडेखोराच्या अड्ड्यावरही प्रचंड मेक अप व भडक साड्या घालत असत. पूर्ण सिनेमाभर रविंद्र महाजनीची फार मोठी बहीण वाटत. त्या मानाने पद्मा खन्ना योग्य होत्या.

> ववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले.
आशा काळे ? 'इसे हम धमकी समझे या चेतावनी ?

मूळ लेख व फा लम्पन चे प्रतिसाद आवडले हे वे सां न.

Pages