डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

Submitted by पुरंदरे शशांक on 7 August, 2023 - 11:26

डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

आपल्या मायबोलीवर वैद्यकीय विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे डाॅ.कुमार 1 - हे आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच.

याच डाॅ.नी हार्ट अॅटॅकवर शिक्का मोर्तब करणारे ट्रोपोनिन यावर एक लेख इथे लिहिलेला आहे - जो मी आधीच वाचलेला होता.

मला (शशांक पुरंदरे) जेव्हा काही महिन्यांपूर्वी घरीच हार्ट अॅटॅक आला तेव्हा त्या वेदनांच्या तीव्रतेमुळे मला पूर्णपणे कळलेले होते की हा हार्ट अॅटॅकच आहे. पण ज्या रुग्णालयामधे माझा ईसीजी व बीपी तपासले तेथे हे दोन्हीही नाॅर्मल आल्याने तेथील डाॅ. हे ह्रदय दुःख हे काहीतरी मानसिक स्ट्रेसमुळे झालेला त्रास आहे असे म्हणत राहिले. तासाभराने परत काढलेला ईसीजी ही नाॅर्मल आल्याने व मी पूर्ण वेदनामुक्त होऊन माझ्या पायावर उभा राहिल्याने तर ते डाॅ. हा हार्ट अॅटॅक नाहीच्चे यावर ठाम होते.

पण मी मात्र तो ट्रोपोनिनचा लेख वाचलेला असल्याने ती टेस्ट कराच म्हणून हटून राहिलो. पण ती टेस्ट हार्ट अॅटॅकनंतर सहा तासांनी करायची असते म्हणून डाॅ.नी मला घरीही पाठवले. व जेव्हा रात्री दहाच्या सुमारास मी ती टेस्ट तिथेच केली तेव्हा ती स्ट्राँग पाॅझिटिव आली व मला लगेच cardiac i. c. u. तच हलवले.

वैद्यकीय दृष्ट्या मी तसा स्टेबल असल्याने लगेचच दुसर्‍या दिवशी अँजिओग्राफी केली ज्यात ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यात चार मेजर ब्लाॅकेजेस आढळले. त्यामुळे त्यात चार स्टेंट टाकून माझा जीव डाॅ.नी वाचवला.

हे सगळे त्या ट्रोपोनिनमुळेच लक्षात आले. या करता या डाॅ.कुमार यांचा तर मी आजन्म ऋणीच आहे.
असेच वैद्यकीय विविध विषयांवरचे लेख लिहून डाॅ.नी सर्व सामान्यांचे प्रबोधन करीत रहावे ही डाॅ.ना नम्र विनंती.

सर्व मायबोलीकरांना उत्तम आरोग्यासाठी ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

धन्यवाद !
--------------------------------------------------------
डाॅ.कुमार1 यांचा लेख
ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब https://www.maayboli.com/node/65025

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ओळखीतल्या १ तरूण माणसा ला अचानक हार्ट अटॅक येऊन तो तत्काळ गेला. तो डॉक होता (भुलतज्ञ) आणि दर ६ महिन्यांनी चेकप व्हायची तेंव्हा हार्ट विषयी काहीही तक्रार जाणवली नव्हती किंवा रीपोर्ट मधे तसे काही नव्हते.

Submitted by aashu29 on 8 August, 2023 - 12:05

कुमार सर ,
आशु यांनी दिलेल्या उदाहरणात हार्ट अटॅक असू शकतो कि कार्डियाक अरेस्ट असू शकतो?
व्यक्ती वाचण्याची शक्यता हार्ट अटॅक मध्ये जास्त असते कि कार्डियाक अरेस्ट मध्ये?
तात्काळ जाणाऱ्या व्यक्तींच्या रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट वाचण्यात आल्यामुळे हे विचारात आहे.

आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद !

आता इथल्या प्रश्नांमधून येणाऱ्या काही मुद्द्यांचा परामर्श 2018 सालच्या trop च्या मूळ धाग्यात घेतलेला होता. पण हरकत नाही. तिकडचे उत्तर सुधारित करून येथे देतो. या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन सभासदही आले असण्याची शक्यता आहे.
पुढे चालू..

अ बा,
१. ओळखीतल्या १ तरूण माणसा ला अचानक हार्ट अटॅक येऊन तो तत्काळ गेला. >>>

मैदानी खेळाडूंमध्ये (आणि अन्य काही तरुणांत) वयाच्या तिशीच्या आत अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर काहीजण उपचारांनी बचावले. २०२१मध्ये डेन्मार्कचा फुटबॉलपटू Christian Eriksenला या प्रकारचा त्रास मैदानावर झाला होता. त्याला वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला.

या अनुषंगाने या प्रकारच्या आजारांचा सखोल अभ्यास झालेला आहे. हा आजार हृदयस्नायुंच्या आनुवंशिक विकारामुळे होतो (Hypertrophic Cardiomyopathy).
यामध्ये हृदयस्नायू प्रमाणाबाहेर वेड्यावाकड्या पद्धतीने thick झालेले असतात. त्यामुळे हृदयाच्या कप्प्यातून महारोहिणीमध्ये रक्त पंप करताना मोठा अडथळा येतो.
खेळाडूंमध्ये या प्रकारचा त्रास लवकर लक्षात येतो.

<<वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.>>>
अगदी अगदी.
डॉ कुमार ह्यांचे आभार. मी त्यांचा एकही लेख वाचायचा बाकी ठेवत नाही. प्रत्येक लेखातून आपल्या स्वतःसाठी काहीतरी उपयुक्त clue मिळतोच. कुठल्या तरी तक्रारीचे कारण समजतेच.
श्री. शशांक दीर्घायुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या प्रसंगावधानाने, स्मरणशक्तीने, जिद्दीने आणि डॉ कुमार यांच्यावरील विश्वासाने एक भयकारी हल्ला तर तुम्ही परतवून लावला आहे. आता पुढील वाटचाल अगदी निरामय राहो.

अ बा
व्यक्ती वाचण्याची शक्यता हार्ट अटॅक मध्ये जास्त असते कि कार्डियाक अरेस्ट मध्ये?
>>>
१. वाचण्याची शक्यता हार्ट अटॅक मध्ये जास्त. कारण यामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र असे प्रकार (किती रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत यानुसार) असतात.

२. सडन कार्डियाक अरेस्ट : हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो जसे की :
१. हृदयतालबिघाड : यामध्ये सर्वात कॉमन ventricular fibrillation हे आहे. यात अत्यंत तातडीने उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता राहते. उपचारांना जसा विलंब होतो तसे प्रति मिनिटागणिक जगण्याची शक्यता झपाट्याने कमी होत जाते.

२. करोनरी हृदयविकार
३. जन्मजात हृदयविकृती
४. क्षमतेपेक्षा कित्येक पट जास्त प्रमाणात केलेला व्यायाम किंवा ढोर श्रम.

डॉ कुमार तुमचे आभार. वेळोवेळी तुम्ही उपयुक्त माहिती मायबोलीकरांना पुरवली आहे. शिवाय कुणीही शंका विचारली तरी कायम दखल घेउन प्रतिसादही दिले आहेत.
पुरंदरे शशांक यानी योग्य माहितीचा वापर केला त्याबद्दल कौतुक आणि निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा!

शशांक आणि कुमार तुम्हा दोघांचे अभिनंदन.
रुग्णाने स्वतः दक्ष राहून आपल्या समस्येबद्दल वाचन, विचार करुन प्रश्न विचारत राहिलं पाहिजे हे परत एकदा अधोरेखित झालं. गूगल निदान/ गूगल डॉक्टर म्हणून कोणी किती हिणवलं तरी असुदे, आपल्या समस्या आपलं समाधान होईस्तोवर आपण धसास लावल्याच पाहिजेत.

@ शशांक,

तुमच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले, स्थिरचित्ताने समस्येला सामोरे गेलात आणि जिंकलात !! ब्राव्हो.
निरामय, दीर्घ, रसरशीत जीवन लाभो ह्या शुभेच्छा.

@ कुमार,

जुलैतील त्या इमोशनल संदेशाचा आता उलगडा झाला, तुमच्या भावना समजून आल्या. मुक्तहस्ते ज्ञान वाटण्याचा तुमचा स्वभाव आणि humbleness अनुकरणीय आहेत. तुम्हाला भरपूर शुभेच्छा _/\_

फार छान वाटले वाचून! शशांक, तुम्ही आजारपणात गडबडून न जाता योग्य माहितीचा वापर केलात हे फार कौतुकास्पद! तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा!
डॉ. कुमार, खूप खूप धन्यवाद!

शशांकजी दीर्घायुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.
डॉ.कुमार यांचे लेख खरंच वाचनीय असतात. भरपूर ज्ञान असताना सविस्तर लिहून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हे जास्त कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांना धन्यावाद!!!
खरंतर मेडिकल संबंधी माझे ज्ञान फारच तोकडे आहे...
पण बर्‍याच दिवसांपासून एक प्रश्न सतत मनात येतोय तो कुमार सरांना विचारते...
सर,
गेल्या काही महिन्यांमध्ये heart attack चे प्रमाण खूपच वाढले आहे...काही वयोमर्यादाच राहिली नाही....पंचविशीतल्या तरुणां सोबतच अगदी 15 - 16 वर्षांच्या मुलांना पण हार्ट अ‍ॅटॅक येत आहेत...हे नक्की कशामुळे? कोरोना लसीचा दुष्परिणाम? की आणखी काही?

खरोखरच कुमार सरांचे आभार मानावे तितके कमी!
+
जुलैतील त्या इमोशनल संदेशाचा आता उलगडा झाला, तुमच्या भावना समजून आल्या. मुक्तहस्ते ज्ञान वाटण्याचा तुमचा स्वभाव आणि humbleness अनुकरणीय आहेत. तुम्हाला भरपूर शुभेच्छा _/\_

==> हो अगदी बरोबर, अचूक !!!
सरांच्या लेखनाचा खूप उपयोग होतो ( मलाही झाला आहे), जिथे व्यावसायीक सल्ले देखील कधी कधी जितका आधार, माहिती देत नाही तिथे सरांचे लेखन, सविस्तर अभ्यासपुर्ण लेखन मोलाचे काम करते !!!
_/\_

शशांक : तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही लक्षात ठेवून या माहितीचा वापर केलात याबद्दल विशेष कौतुक.

कुमार सर : ग्रेट! असे लेख तुम्ही इथे लिहिता त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजतात. खूप आभार.

शशांक, केवढे धीराचे आहात तुम्ही, मोठे प्रसंगावधान दाखवले तुम्ही कठीण काळात! तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो! तब्येतीची काळजी घ्या.

कुमार सर, तुम्हाला शतशः प्रणाम! वैयक्तिक रीत्या, तुमच्या कोविड धाग्यांचा मला खूप उपयोग झाला. तुमचे सारे लेख मी आवर्जून वाचते.

आपण आपण सर्वांनी भरभरून ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या शशांक यांच्यासाठी नक्कीच बलवर्धक ठरतील. धन्यवाद.

@मोक्षू
गेल्या काही महिन्यांमध्ये heart attack चे प्रमाण खूपच वाढले आहे...काही वयोमर्यादाच राहिली नाही >>>

या संदर्भात आपल्या राज्य/ देश यांचा काही विदा प्रसिद्ध झालाय का ते शोधावे लागेल. मग त्यावर मत देता येईल. साधारणपणे असा विदा तयार व्हायलाही बराच काळ जावा लागतो. सवडीने पाहू.

गेल्या काही दशकांमध्ये भारतात तरुण वयातील लोकांना हार्ट अटॅकचे जे प्रमाण वाढले त्या मागे Lipoprotein (a) या घटकाचे प्रमाण (जनुकीय कारणास्तव) जास्त असल्याचा संबंध आहे.

सर्व वाचक मित्र मैत्रिणींनो,
माझ्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही सर्वांनी हार्दिक शुभेच्छांचा जो काही वर्षाव केलात त्याकरता माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीयेत, या वर्षावामुळे मी केवळ भारावून गेलो आहे.
आपणा सर्वांना व सर्व मायबोलीकरांना निरामय दीर्घायुष्य लाभावे हीच ईशचरणी प्रार्थना.
वेमा व डाॅ.कुमार - यांचे अगदी मनापासून आभार.
मायबोलीमुळे मला अनेक जिवलग मित्रही मिळालेत व अनेक प्रकारे मदतही झालीये - ज्याचे वर्णन शब्दात करता येणे अशक्यच !
सर्वांना ह्रदयपूर्वक धन्यवाद !
सर्वे सन्तु निरामयः

_____/\_____

@srd
पहिल्या पानावर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ट्रॉपोनिनच्या धाग्यावर दिले आहे.
ट्रॉपोनिन, कोलेस्टेरॉल आणि तत्सम धागे दीर्घकाळ चालू आहेत आणि चालू राहतील असे दिसते.
त्या दृष्टीने या विषयाची सखोल माहिती त्या धाग्यांवर राहणे भविष्यातील संदर्भासाठी योग्य राहील.

डॉ.कुमार यांचा मार्गदर्शनपर लेख उत्तमच.श्री शशांकदांनी त्यांच्या आजारपणाच्या कठीण प्रसंगात धैर्य व समयसूचकता दाखवून; या लेखाचा वापर अतिशय योग्य प्रकारे करून जणू पुनर्जन्मच मिळवला आहे. हे अतिशय कौतुकास्पद व लेखाचे सार्थक करणारे आहे. शशांकदा,तुमच्या अध्यात्मिक वृत्तीचा वाटाही यात मोलाचा आहे.तुम्ही लवकरच पूर्ववत् कार्यरत व्हाल,याची खात्री आहे.मनःपूर्वक शुभेच्छा.

शशांकजी तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, काळजी घ्या.

कुमार सर, तुम्हाला शतशः प्रणाम!!!

डॉ कुमार, सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद. छातीत वेदना सुरु झाल्यानंतर (स्नायूंच्या पेशी मृत व्हायला लागल्यावर) काही वेळानेच ट्रोपोनिन टेस्टचा उपयोग होऊ शकतो, आधी टेस्ट करून उपयोग नाही, हे स्पष्ट झाले.

बापरे...
कुमार१, तुम्हाला खरच शतशः प्रणाम. तुमच्या सर्व लेखांवर नेहेमी प्रतिसाद दिले जात नसले तरी नेहेमी वाचले जातात आणि खुप माहितीपर असतात.
शशांकजी, वाचाल तर वाचाल अशी एक म्हण लहानपणी वाचली होती. ती तुमच्याबाबतीत शब्दशः खरी झाली. आणि तुमचं प्रसंगावधान तर कौतुकास्पद आहेच.
तुम्हा दोघांनाही उत्तम आयुरारोग्य लाभो ही परमेश्वराचरणी प्रार्थना.

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.>>> अगदी अगदी.
+१११
शुभेच्छा

पुरंदरे सर तुम्हाला निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा
तुम्ही सर्व लक्षात ठेवून ठाम राहिलात म्हणून रोगनिदान लवकर।झाले आणि पुढे उपचार देखील.
कुमार सर आपण केलेली।छोटीशी कृती / लेखन किती मोठा बदल एखाद्याच्या आयुष्यात घडवून आणू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण झाले.
तुमचे माहितीपूर्ण लेख वाचतो न चुकता.
माबो रॉक्स.

डॉ. कुमार तुमचं खरच मनापासुन कौतुक.. तुमचा पेशा असलेल्या व्यक्तीकडे वेळ हा कमीच असतो त्यातुनहि असं प्रबोधन करुन तुमच्या लिखाणामुळे माणसं सावध होवुन उपचार घेतात अन बरी होतात हेहि नसे थोडके.. असच लिहित चला.. तुमचा मधुमेहावरचा लेख मि पुर्ण वाचला..
शशांक निरोगी आरोग्यासाठी तुंम्हास सदिच्छा.. तुमचा अनुभव शेअर केलात..खुप छान केलत.. पुढच्यास ठेच मागचा शहाणा..

आहार,विहार, नीट ठेवा .व्यसन ना पासून दूर राहा, दिनचर्या नीट ठेवा ,फालतू टेंशन, पासून दूर रहा.
श्रीमंत असण्या पेक्षा समाधानी व्हा.
Heart' attack ही खूप किचकट प्रक्रिया आहे
आज पण त्याची चाहूल किती ही टेस्ट केल्या तरी कोणालाच लागू शकतं नाही .जे वाचले त्यांचे नशीब चांगले होते.
स्वप्न कमी करा आणि थोडक्यात सुखी राहायला शिका.
ह्या शिवाय कोणतीच दुसरी टेस्ट नाही हार्ट अटॅक पासून वाचण्याची

आतापर्यंत सर्वांच्या प्रतिसादांतून जे प्रेम व आपुलकी दिसून आली त्याने भारावून गेलोय. यातून आपली मायबोली हे एक मोठे आंतरराष्ट्रीय कुटुंब असल्याचे अधोरेखित झालेय. गुगल आणि चटगपटच्या युगात आजही मराठीतील लेखन आवडीने वाचले जात आहे हे बघून आनंद व समाधान वाटले. या कौटुंबिक जीवनाचे हे अनुबंध असेच कायम राहोत.

वाचाल तर वाचाल >>> हे या घटनेत भलतेच चपखल आहे !
धन्स !

शशांकदादा,

दीर्घायुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या प्रसंगावधानाने, स्मरणशक्तीने, जिद्दीने आणि डॉ कुमार यांच्यावरील विश्वासाने एक भयकारी हल्ला तुम्ही परतवून लावला आहे. हार्ट अ‍ॅटॅक असुनही तुम्हाला दुखण्याखेरिज काही जाणवले नाही आणि त्यामुळे डोक्टरही चकले. शेवट गोड झाला हे नशिब.

आता पुढील वाटचाल अगदी निरामय राहो.

Pages