डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

Submitted by पुरंदरे शशांक on 7 August, 2023 - 11:26

डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

आपल्या मायबोलीवर वैद्यकीय विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे डाॅ.कुमार 1 - हे आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच.

याच डाॅ.नी हार्ट अॅटॅकवर शिक्का मोर्तब करणारे ट्रोपोनिन यावर एक लेख इथे लिहिलेला आहे - जो मी आधीच वाचलेला होता.

मला (शशांक पुरंदरे) जेव्हा काही महिन्यांपूर्वी घरीच हार्ट अॅटॅक आला तेव्हा त्या वेदनांच्या तीव्रतेमुळे मला पूर्णपणे कळलेले होते की हा हार्ट अॅटॅकच आहे. पण ज्या रुग्णालयामधे माझा ईसीजी व बीपी तपासले तेथे हे दोन्हीही नाॅर्मल आल्याने तेथील डाॅ. हे ह्रदय दुःख हे काहीतरी मानसिक स्ट्रेसमुळे झालेला त्रास आहे असे म्हणत राहिले. तासाभराने परत काढलेला ईसीजी ही नाॅर्मल आल्याने व मी पूर्ण वेदनामुक्त होऊन माझ्या पायावर उभा राहिल्याने तर ते डाॅ. हा हार्ट अॅटॅक नाहीच्चे यावर ठाम होते.

पण मी मात्र तो ट्रोपोनिनचा लेख वाचलेला असल्याने ती टेस्ट कराच म्हणून हटून राहिलो. पण ती टेस्ट हार्ट अॅटॅकनंतर सहा तासांनी करायची असते म्हणून डाॅ.नी मला घरीही पाठवले. व जेव्हा रात्री दहाच्या सुमारास मी ती टेस्ट तिथेच केली तेव्हा ती स्ट्राँग पाॅझिटिव आली व मला लगेच cardiac i. c. u. तच हलवले.

वैद्यकीय दृष्ट्या मी तसा स्टेबल असल्याने लगेचच दुसर्‍या दिवशी अँजिओग्राफी केली ज्यात ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यात चार मेजर ब्लाॅकेजेस आढळले. त्यामुळे त्यात चार स्टेंट टाकून माझा जीव डाॅ.नी वाचवला.

हे सगळे त्या ट्रोपोनिनमुळेच लक्षात आले. या करता या डाॅ.कुमार यांचा तर मी आजन्म ऋणीच आहे.
असेच वैद्यकीय विविध विषयांवरचे लेख लिहून डाॅ.नी सर्व सामान्यांचे प्रबोधन करीत रहावे ही डाॅ.ना नम्र विनंती.

सर्व मायबोलीकरांना उत्तम आरोग्यासाठी ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

धन्यवाद !
--------------------------------------------------------
डाॅ.कुमार1 यांचा लेख
ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब https://www.maayboli.com/node/65025

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे !
काळजी घ्या
डॉ. कुमार आपण करत असलेले जाणीव, जागृती व प्रबोधन खूप मोलाचे आहे +१

डॉ कुमार मनापासून आभार!
शशांकजी तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

वा शशांक, वाचलेली माहिती योग्य वेळी आठवून तुम्ही तिचा वापर केला,आणि जीव वाचला.पुढील रिकव्हरी साठी शुभेच्छा.
डॉ कुमार,असेच लेखन करत राहा.>>+१

ओह... काळजी घे शशांक. त्याही परिस्थितीत तुझा सजगपणा जागा राहिला अन योग्य तपासणीचा आग्रह धरलास. ग्रेट.
डॉक्टर कुमार यांचे आभार!
शशांक तुला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

शशांक पुरंदरे, तुम्हाला लेख आठवून त्या चाचणीचा आग्रह धरला, ग्रेट. डॉ. कुमार यांच्या आरोग्यविषयक लेखमालांनी अनेकांना जागरूकता आली आणि इतर फायदे झाले.

VB या वयात तुमची ओपन हार्ट सर्जरी हे वाचून जरा धक्का बसला.

दोघांनाही यातून रिकव्हरी व पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा!

शशांकजी, आता पूर्ण बरे आहात ना?

डाॅक्टर कुमार यांचे लेख अतिशय माहितीपूर्ण असतात. ते माबोकरांसाठी फॅमिली डाॅक्टरच आहेत.

अंगावर शहारा आला. शशांक जी तब्बेतीची काळजी घ्या. तुमचं ही कौतुक आहे, लेख आठवून बरे झाल्यावर ईथे आवर्जून हा लेख लिहिलात आणि डॉ. चे आभार मानलेत.
कुमार सरांचे मनापासून कौतुक! प्लिज लिहित रहा.

कुमार१ लिहितोय :

आरोग्य लेखनास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सभासदांना पुन्हा एकवार धन्यवाद !

खरं म्हणजे आज सकाळी मी एक नवा आरोग्य लेख प्रकाशित करण्याच्या तयारीत होतो. काल त्याच्यावर शेवटचा हात फिरवून झाला होता आणि चित्रांची जमवाजमव पण करून झाली होती.

परंतु काल रात्री शशांक यांचा हा अतिशय आनंददायी लेख इथे आला आणि मग माझा कार्यक्रम पूर्णपणे बदलला.

शशांक यांचा लेख वाचताना किती आनंदाश्रू गळाले याची गणतीच नाही. जगात कोणाचाही जीव वाचणे या इतका दुसरा कुठलाही आनंद असूच शकत नाही. त्या अत्यानंदामुळे माझे स्वस्थचित्त खरोखर हरवले आहे आणि अजून नॉर्मलला यायला काही दिवस द्यावे लागतील हे नक्की.
काल रात्री ८.५६ ला हा लेख आला .. आणि मग मी रात्री फक्त दीड तास कसाबसा झोपू शकलो .. अर्थात याचा आनंदच वाटतो. Happy

शशांकदा, माहितीचा वापर योग्य वेळी केलात त्याबद्दल कौतुक तुमचं.
कुमार सरांचे ही आभार मानावे तितके कमीच आहेत.

@VB: तुम्हीही खुप मोठ्या प्रसंगातून गेल्या आहात, तुम्हालाही आरोग्यदायी जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.

डॉक्टर कुमार यांचे कौतुक आणि आभार..
.. आणि त्या हास्पिटल मधील निष्काळजी डॉक्टर होप तुम्ही बदलला असेल..... घरी पाठवायची किती घाई त्यांना...

शशांक सर तुमच्या presence of mind ला सलाम. कुमार सरांबद्दल आदर आहेच तो अजून वाढला.
शशांक सर आणि VB ला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा

या आजाराच्या संदर्भात वैद्यकीय व्यवसायात आढळणारी एक नेहमीची परिस्थिती लिहितो.

संबंधित लक्षणे असलेला रुग्ण तातडीच्या विभागात येतो, त्याची Trop केली व ती निगेटिव्ह येते; मात्र vague लक्षणे आहेतच. समजा त्याच्या इसीजीवर सुद्धा काही मिळालेले नाही.
आता प्रश्न असा असतो, की या रुग्णाला घरी पाठवून द्यायचे की निरीक्षणाखाली तिथेच ठेवून घ्यायचे ?

ठीक आहे, रुग्णाच्या भल्यासाठी त्याला ठेवून घेतले. पुढे तीन आणि सहा तासांनी पुन्हा Trop केली व ती सुद्धा निगेटिव्ह आली. अजूनही MI सिद्ध होईल असे कुठलेही पुरावे मिळत नाहीयेत.
मग आता रुग्णाला तातडीच्या विभागात किती काळपर्यंत ठेवायचे हा यक्षप्रश्न असतो, कारण तिथे जर अशांची गर्दी वाढू लागली तर तिथल्या कक्षाची रुग्ण ठेवण्याची मर्यादाही संपते.

सध्या अशा प्रसंगी संबंधित डॉक्टरच्या अनुभवानुसार निर्णय घेतला जातो. आता यावर तोडगा म्हणून नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून महत्वपूर्ण निर्णय अगदी सुरवातीसच घेता येऊ शकेल.

. या संदर्भात मी इथे (https://www.maayboli.com/node/65025) एक प्रतिसाद काही महिन्यांपूर्वी लिहिला होता तो आता परत खाली डकवतो :

करोनरी हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान केवळ एका ट्रॉपोनिन तपासणीवरून करता येईल काय?
काही वेळेस पहिली टेस्ट निगेटिव्ह नसते, पॉझिटिव्हच्या बाजूला असते परंतु निदानासाठी आवश्यक असलेल्या कटऑफच्या आतच ते मापन आलेले असते.

या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. संभाव्य लक्षणे असलेला रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती ( पूर्व इतिहास + कौटुंबिक आजार, इ. सर्वकाही ) मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल.

त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
त्यानुसार निरीक्षणाखाली ठेवण्याची खरी गरज असलेले रुग्णच ठेवून घेतले जातील आणि सर्व काही निगेटिव्ह असल्यास बाकीचे घरी पाठवून देता येतील. हे वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल.

माझा व्यक्तिगत अनुभव अस्थानी वाटल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे. कदाचित स्वतंत्र पोस्ट टाकेन

श्री शशांक पुरंदरे ह्यांचे प्रसंगावधान दाखवून स्वतःचा जीव वाचवल्याबद्दल अभिनंदन. डॉ कुमार ह्यांना त्यांच्या ह्या ज्ञानयज्ञासाठी खूप धन्यवाद.
एक प्रश्न डॉ कुमार ह्यांच्यासाठी: समजा काही दिवस धाप लागणे, अस्वस्थता अशी लक्षणे दिसत असतील, आणि शेवटी हार्ट अटॅक आलाच तर अटॅकच्या किती वेळ आधी ट्रोपोनिन टेस्ट पॉसिटीव्ह येऊ शकते? अटॅक च्या ६-७ तास आधी ट्रोपोनिन टेस्ट केली (म्हणजे तेव्हा माहित नसेल की ६-७ तासांनी अटॅक येईल पण in hindsight ) तर ती पॉसिटीव्ह येऊन, पुढे येऊ घातलेल्या धोक्याची सूचना मिळून त्याप्रमाणे तयारी करता येऊ शकते का? की अटॅक आल्यानंतरच हृदयाच्या स्नायूंच्या पेशी मरून मगच ट्रोपोनिन टेस्ट पॉसिटीव्ह येईल?

<<ठीक आहे, रुग्णाच्या भल्यासाठी त्याला ठेवून घेतले. पुढे तीन आणि सहा तासांनी पुन्हा Trop केली व ती सुद्धा निगेटिव्ह आली. अजूनही MI सिद्ध होईल असे कुठलेही पुरावे मिळत नाहीयेत.>>
अशावेळी रुग्णाचा अँजिओग्राम करणे योग्य होणार नाही का? (अशा केस मध्ये TMT पण निगेटिव्ह येण्याची शक्यता जास्त असेल का? किंवा नसल्यास अशावेळी TMT साठी रुग्णाची दमछाक करणेही इष्ट नसेल.)

अजबराव,
तुमचा प्रश्न चांगला आहे. आता हार्ट अटॅक या सामान्य माणसाच्या शब्दाकडे जरा शास्त्रीय नजरेने पाहू.

१. जेव्हा एखाद्या करोनरी रक्तवाहिनीतील रक्तपुरवठा हृदयाच्या विशिष्ट स्नायूंना पोचू शकत नाही त्याला ischemia असे म्हणतात.
२. त्या पुढची अवस्था असते micronecrosis, आणि
३. सर्वात शेवटची म्हणजे necrosis = पूर्ण मृत पेशी.

वरीलपैकी पहिल्या ते दुसऱ्या अवस्थेच्या दरम्यान मृत होऊ घातलेल्या हृदयस्नायूपेशी ट्रोपोनिन रक्तात सोडू लागतात.
आता हे आपल्याला लवकरात लवकर कधी समजेल हा कळीचा मुद्दा आहे.
याचे उत्तर, रुग्णाच्या शरीरातील परिस्थिती आणि ट्रोपोनिन मोजण्यासाठी प्रयोगशाळा कोणत्या जनरेशनचे तंत्रज्ञान वापरत आहे या दोन्हींवर अवलंबून आहे.
सध्या बहुसंख्य ठिकाणी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानानुसार छातीतील वेदना सुरू झाल्या नंतर कमीत कमी ३ तास गेल्यानंतर आपल्याला रक्तातील वाढलेले ट्रोपोनिन समजू शकते.

जगात जिथे कुठे अल्ट्रासेनसीटीव तंत्रज्ञान उपलब्ध असेल तिथे साधारण दीड तासात ट्रोपोनिन वाढल्याची सूचना मिळू शकेल.
परंतु, “काही दिवस आधी” धाप लागते, तेव्हा चाचणी केली तर .. वगैरे मुद्द्यांना अर्थ नाही. मुळात, पेशी मृत झाल्याशिवाय ती दखलपात्र प्रमाणात तिच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडत नाही.

मानव,
बरोबर. angio करता येईल. पण,
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:

MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

१ ( ट्रोपोनिन) हा निकष "मस्ट" आहे. >>>> तरच MI सिद्ध होते ; अन्यथा नुसता ischemia (अपुरा रक्त पुरवठा )

अरे बापरे !!
डाॅ.कुमार1 यांचे आभार खरोखर !!
काळजी घ्या ! नशीब वेळेवर तुम्हाला तो लेख आठवला आणि dr नी टेस्ट केली

डॉक्टर
हृदय रोगाशी निगडित सर्व चाचण्या अंशतः लक्षणं जाणवली तर कराव्या का ?
एक अडाणी प्रश्न...

द सा
करोनरी हृदयविकाराच्या टप्प्यानुसारच विशिष्ट चाचण्या करायच्या असतात.
ढोबळ मानाने आपण या आजाराचे चार टप्पे पाडतो. त्यातला शेवटचा टप्पा म्हणजे MI
प्रत्येक टप्प्यावर चाचण्यांची व्याप्ती वाढत जाते.

अँजीओ प्लास्टि शिवाय ब्लॉकेजेस कळत नाहित काय?
आमच्या ओळखीतल्या १ तरूण माणसा ला अचानक हार्ट अटॅक येऊन तो तत्काळ गेला. तो डॉक होता (भुलतज्ञ) आणि दर ६ महिन्यांनी चेकप व्हायची तेंव्हा हार्ट विषयी काहीही तक्रार जाणवली नव्हती किंवा रीपोर्ट मधे तसे काही नव्हते.

अजून १ म्हणजे नुकतंच १ नातेवाईक व्यक्ती ला ३ दिवस अ‍ॅसीडीटी झाली होती, अस्वस्थ वाटू लागले, हॉस्पि. गेल्या वर अँजिओ केल्या वर २ व्हेन्स ब्लॉक असल्याचे आढळले ते ही ९९%.

आशू
प्रस्तुत आजाराच्या बाबतीत आहार व जीवनशैली, कारणमीमांसा आणि प्रयोगशाळा चाचण्या (चाळणी आणि रोगनिदान) इतक्याच मुद्द्यांवर माझा अभ्यास आहे आणि तो माझ्या चर्चेचा परीघ राहील.

कोणत्याही प्रकारचे इमेजिंग तंत्रज्ञान आणि उपचार यासंबंधी समर्पक उत्तरे देण्यासाठी आपल्याला हृदयविकारतज्ञांची आवश्यकता आहे.
म्हणून सध्या आपण त्या परिघातच राहूया ही विनंती.

डॉ कुमार,

आपले लेखन हे निव्वळ लेखन न राहता जीव वाचवणारे लेखन होत आहे. विनम्र अभिवादन!

पुरंदरे, आपली प्रकृती उत्तम राहो ही प्रार्थना व हा लेख लिहिल्याबद्दल मनापासून आभार!

Heart' attack म्हणून जे काही असते .
त्याचे अनेक प्रकार आहेत.
Dr. Kumar ह्यांनी त्याची ओळख करून दिली आहे.
त्या मुळे एका रुग्णाची तुलना दुसऱ्या रुग्णांशी करता येणार नाही.
Dr मांडके हे स्वतः जागतिक कीर्ती चे ऋदय रोग तज्ञ होते.
गेले अटॅक नीच.
आता मध्ये गुजरात मधील पण अत्यंत हुशार डॉक्टर पण अटॅक नीच गेले.
Dr मांडके ह्यांचे प्रसिद्ध वाक्य.

योग्य वेळी योग्य डॉक्टर मिळण्यासाठी नशीब लागते.

आणि ह्याची सत्यता अतुल पुरचरे ह्यांना कॅन्सर झाला तो अनुभव शेअर केला होता तो ऐकून पण जाणवली

डॉ कुमार याचे आभार
पुरंदरे शशांक यानी योग्य माहितीचा वापर केला त्याबद्दल कौतुक!

Pages