धर्म स्त्रीकडून ठेवत असलेल्या अपेक्षा आणि स्त्री आयुष्य

Submitted by राधानिशा on 28 July, 2023 - 11:57

बरंचसं कॉपी पेस्ट आहे , गुलमोहर हे योग्य सदर सिलेक्ट केलं आहे की नाही हेही समजत नाही . धागा दुसऱ्या सदरात कसा हलवायचा ते माहीत नाही . त्यामुळे नियमांच्या बाहेर पोस्ट झाली असल्यास धागा उडवला जाऊ नये ही विनंती .

स्त्रीजन्माची सार्थकता गृहव्यवस्था व शिशुसंगोपन यांतच आहे. आदर्श स्त्री तीच कीं, जी सुमाता व सुगृहिणी असते आणि याच तत्त्वावर स्त्रियांना जर्मनींत घराबाहेरच्या कोणत्याही धंद्यांत वा व्यवहारांत न पडण्याचे पाठ आज मिळत आहेत त्यांच्या नाजूक व प्रेमळ प्रकृतीला अपत्यसंगोपन, रुग्णपरिचर्या, यांसारखीं वत्सलतेचीं किंवा गृहव्यवस्था, पाकसिद्धि, शिक्षण, कशीदा, यांसारखीं लालित्यपूर्ण कामेंच योग्य. गृह हेंच त्यांचे कार्यक्षेत्र व सुगृहिणी बनणें हाच त्यांचा आदर्श... अशा प्रकारच्या ज्ञानानेंच आर्यमहिलांचा उद्धार होणार आहे. एवंगुणविशिष्ट स्त्रीरत्नें जेव्हां घराघराला शोभवितील, तेव्हांच घरोघर सुख, समाधान, संपन्नता, सुशीलता व स्वदेशाभिमान नांदू लागतील. "
-
स्त्रीशिक्षण सुधारणेचें दिग्दर्शन - या सदराखालीं 'सह्याद्रि' मासिक .

ऋग्वेदकालीन विवाहाची वयोमर्यादा कशी होती हैं सप्रमाण दर्शवून श्रीदत्तजन्माची एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे . ती पाहातां स्त्रियांचें वैवाहिक जीवन किती उच्च व पवित्र आहे, तसेंच ब्राह्मणांच्या मुलांना जशी मुंजीची आवश्यकता, तशीच स्त्रियांना विवाहाची आवश्यकता आहे, हेंही दिसून येतें. स्त्रियांना विवाहविधीच वैदिक संस्कार, पति सेवाच गुरुकुलवास व गृहकृत्येंच त्यांचें अग्निहोत्र असें मन्वादि स्मृतिकार म्हणतात ' यांत किती अर्थ भरला आहे, पवित्र अंतःकरणी स्त्रियाच जाणूं शकतील

यानंतर असवर्ण अथवा भिन्नवंशीय विवाहाबद्दल सुधारलेल्या जर्मन लोकांचं निषेधात्मक मत सांगून, हल्लींचें संततिनियमन किती राष्ट्रबलविघातक आहे हें सांगितलें आहे. 'समाजाचा चारी बाजूंनीं होत असलेला अधःपात धर्मवीर अशा आर्य महिलांनींच मनावर घेतल्यास बंद होईल ' अशी इच्छा प्रगट केलेली किती सत्य आहे हें तशा स्त्रियाच जाणूं शकतील.

संततिनियमनाच्या घातक चालीपासून लोकसंख्येवर व आरोग्यावरसुद्धां कसा भयंकर परिणाम होतो हें सप्रमाण दाखविण्याच्या उद्देशाने हल्लीं आस्ट्रिया देशांतील राजधानीच्या शहरीं एक जंगी प्रदर्शनही उघडण्यांत आल्याचें वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालें आहे ! प्रथम त्या चालीच्या ' गुणाचा ' दुंदुंभी पश्चिम दिशेत वाजलेला आमच्या लोकांच्या कानीं पडला व ती चाल येथें सुरू झाली; तसा त्या चालीच्या दोषाचा ' दुंदुभीही कानीं पडला पाहिजे, म्हणजे मग आमचे लोक सावध होतील. पण तो केव्हां पडतो पाहावें !

आमच्या पूर्वजांनीं मानवी स्वभावाचा चांगला अभ्यास करूनच विवाहसंस्था सुरू केली आहे व त्या सर्वाना धर्माच्या दावणीत अशा रीतीनें गोवून टाकले आहे की मानवांना त्यायोगें 'भोगांतही मोक्ष' साधतां येईल ! पण आपल्या धर्माच्या आचारविचारांचं थोड्या दमानें मनन करतील तेव्हांच ना त्याच्या रहस्याचा प्रकाश होईल ! असो.

■■■
'उठा, चहा घेतां ना ? उठा.' म्हणत नर्सनं त्यांना उठवलं, तेव्हां त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं.

'काय ग बाई तरी झोप !' म्हणत त्यांनीं रग कमरेपर्यंत बाजूला सारला आणि किंचित् उठण्याचा प्रयत्न केला. चहा फार चवदार होता. चहाबरोबर टोस्टही होता. त्या हळुहळू फराळ करीत होत्या आणि नर्स त्यांच्या शेजारीच बसून होती. त्यांचीं गेलीं तीन बाळंतपणं याच नर्सनं केली होती. दोघींनाहि एकमेकींविषयीं स्नेहभाव वाटत होता.

'माई, हीं दोन बाळंतपणं तुम्हांला बरींच जड गेलीं हो. फार थकला आहांत. असं बरं नाहीं. पहांटे तर शेवटी शेवटीं मी घाबरलेंच. म्हटलं, धडपणी बाई सुटते की नाहीं ! तुमच्या अंगांत ताकदच राहिलेली नाहीं. '

'गेल्या चार वर्षांत मला बरं नाहीच आहे. कधीं डॉक्टरकडे गेलं की म्हणतात, 'विश्रांती घ्या.' आपलं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. ' माई क्षीणपणानं हसल्या.
,
'आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, बाई ! माईंनी एक आवंढा गिळला; आणि त्या बराच वेळ स्तब्ध बसून राहिल्या.
दर महिना रुपये चाळीस अधिक म. भ. पंचवीस मिळवणाऱ्या एका प्राथमिक खाजगी शाळेतील शिक्षकाचा संसार माईंना लाभला होता. प्रथम त्याही नोकरी करीत होत्या. पण तीन मुलं होईपर्यंत त्यांची नोकरीची धडपड टिकून राहिली. चवथ्या खेपेला डोहाळे लागतांच त्यांनीं नोकरीचा राजिनामा दिला होता. आणि मास्तरांनीं आणखी दोन शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यांच्या संसाराचं स्वरूप हे असं ओढाताणीचं होतं.

या ओढाताणीच्या जाणिवेनं माईंची जीभ ओढल्यासारखी झाली. कष्ट तर होतेच, पण आणखीहि पुष्कळ होतं. कष्टापेक्षाही तेच त्यांना कासावीस करून टाकत होतं. त्या हळुहळू बोलायला लागल्या. त्यांचा आवाज किंचित कापरा होता.

'ताई, कुणाचं शरीर अन काय ? ज्या दिवशीं हें शरीर दुसन्याच्या स्वाधीन केलं त्याच दिवशीं शरीराचा दगड व्हायला सुरवात झाली. आतां त्याला स्वतःचं सुख - इच्छा - वासना - कांहींच नाहीं. शुद्ध दगड झालं माहे. त्याची काय काळजी घ्यायची -'

'असं का म्हणतां ? मुलं लहान आहेत. एकच काळजी घ्या. आता पुन्हा-'

' - बाळंतपण नको, असंच ना ?' माई रुक्षपणानं हंसल्या.
त्यांचं हें सहावं बाळंतपण. ज्याला हें कळे तो हेटाळणीनं किंचित हसे. किती किती मुलं - किती मुलं ? छे माईंना तें भारी बोचायचं. पण - पण 'पण' कसा सुटणार ?

मुलं फार नसावीत हें त्यांना कळत नव्हतं असं थोडंच होतं ? पण कळूनही वळत नसणाऱ्या अशा गोष्टी असतातच कीं !

कालचींच सलणारी शल्यं, आणि उद्यांचे रोखलेले भाले; शरीराचे कष्ट आणि मनाचे शीण; नोकरीच्या याचना आणि संसारांतल्या विवंचना ;
-
साऱ्या गोष्टी माणसाला विसरायला हव्या असतात. क्षणभर त्या यांपासून दूर कुठं तरी विसावा हवा असतो. कुणी त्यासाठी दारूकडे ळतो, तसच कुणी - व्यसनी माणसाला व्यसनाची वाईट बाजू माहीत नसते असं थोडंच असतं ? पण माहीत असूनही त्याचा उपयोग काय होणार ? सारं कांहीं उगीचच. आणि म्हणूनच अगदीं कातर आवाजांत माई म्हणाल्या,

'ताई, कुणाला अन काय सांगायचं ? बाळंतपणाचा महिना जिथं अगदीं कसाबसा कोरा जातो- '

'बाई ग ! ' त्या नर्सच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं.

'पण मास्तर फार चांगले आहेत. त्यांची माझ्यावर माया नाहीं असं नाहीं. माझ्यासाठी त्यांचा जीव सारखा तुटत असतो. '

' हें त्याचंच लक्षण वाटतं ? '

'असं नाहीं हो. तेही माणूसच आहेत ना ? तुम्हाला सांगतें, जोंपर्यंत माझं मनही दगड बनलं नव्हतं, तोपर्यंत खूप प्रयत्न केले मी. पण व्हायचं काय ? सदा धुसफूस, चिडचीड, अबोला, असाच सारा दिवस - - कधीं त्यांनीं ताडकन् दार उघडून बाहेर निघून जावं, कधीं मी रागारागांत पोरांत येऊन झोपावं. काय फायदा त्याचा ? शेवटीं आतां मनाचाही दगड झाला आहे बघा. दगड, नुसता दगड ! जीव आहे इतकंच काय तें - '

नर्सनं डोळ्याला पदर लावला.

.....

असंच आपलं बाळ सदोदित लहान असावं आणि आपणही असंच सारख सारखं पडून रहावं. कुणी यावं, चहा द्यावा, कुणी ताट वाढून आणावं. जेवण तरी किती सुग्रास लिंबाचं लोणचं, लसणाची चटणी, भरपूर तूप, आणि वाफा येत असलेलं गरम गरम अन्न -

घरीं असं कुठे असणार ? नेहमींच अपुरं जेवण भाजी असेल तर आमटी नाहीं. तूप तर पहायलाही मिळत नाहीं. आणि कढत अन्न जेवण्याचं सुख - तें तरी कुठं मिळतं ? रोज मास्तरनां शाळेत पाठवायचं, मुलांचं आवरायचं, आणि मग पितळींत वाढून घ्यायचं. तोंवर भाताचे डिखळे आणि आमटीचं कोमट पाणी झालेलं असायचं. उजव्या डाव्या बाजूचं कालवण मुलांच्या तडाख्यांतून उरलं तर भाग्य ! पण इथं या जेवणांत त्यांना एक प्रकारची चैन वाटायची. चाखत माखत त्या जेवायच्या. चार घास अधिकही जायचे.

बाळ झोपलं कीं इतर खाटांकडून फेरी काढायची.
साऱ्याच बाळंतिणी वॉर्डातल्या आणि म्हणूनच समदुःखी .. कुणाचं चवथं, कुणाचं सातवं अशीं बाळंतपणं. त्यामुळं भेटीलाही सहसा कुणी यायचं नाहीं. कोपऱ्यातील खाटेवर एक पहिलटकरीण होती. तिचा नवरा रोज तीनदां यायचा. साऱ्या वाळंतिणी त्याच्याकडे पाहून कुत्सितपणानं हसायच्या. माईही आंवढा घोटून त्या चेष्टेंत सामील व्हायच्या. प्रत्येकीच्या घरचे अनुभव, बाळंतपणांतील खोडी, नवऱ्याचे स्वभाव चर्चेला निघायचे आणि या रसाळ गप्पांत वेळ कसा जायचा तें समजायचंही नाहीं.

रात्री अगदीं गाढ झोपावं. मूल दाईच्या स्वाधीन असायचं. रडेल बिडेल कांहीं काळजी नको. खरंच किती सुखाचे दिवस !
·
त्यामुळं दहाव्या दिवशीं रात्रीं माईंना उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. स्वतःच्या घरीं जायला मन घेईना .-

ते सारं घर - ती चूल - तें रेशन- तें धुणं तीं भांडीं मुलं- आजारपण नवऱ्याचा राग--सारं सारं भुतासारखं त्यांना भेडसावायला लागलं. मुलाला छातीशी घेऊन त्या स्वतःला विसरू पहायला लागल्या.

या रात्रीच्या शिणानं सकाळीं त्यांना जाग आली, त्या वेळी कमी येऊन तयार होती. आज अकरावा दिवस. आज त्यांना तिथं चहा मिळणार नव्हता. त्या मुकाट्यानं उठल्या.

तूं आलीस ?' आपले कपडे आवरत त्यांनी कमीला विचारलं.

'बाबा म्हणाले, मी घरांतलं करतों, तूं आईला आणायला जा, म्हणून आलें मी.'

तिच्या कडेवरील शरू हात पुढं करीत म्हणाली,

'आई, बाबा शिला कलतायत. '

माई उगीचच हसल्या.

त्यांनी मुलाला कपडे चढवायला सुरवात केली. तें दहा दिवसांचं सुख अजून त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. मुलाला टोपरं घालतां घालतां त्यांच्या मनांत विचार आला,

'आतां आजपासून पुनः कष्ट - पुनः कामं - शरीरांत प्राण असेपर्यंत उभं रहायचं आणि -- आणि -- कसली तरी किळस त्यांच्या शरीरांत थरकांप उडवून गेली, पण लगेच खुदकन् त्या हसल्या. पुनः वर्षा सव्वा वर्षांनीं असा परत विसावा -- तें हसू त्यांना कोयनेलसारखं लागलं. त्यांनीं मुलाला बाळंत्यांत नीट गुंडाळलं, छातीशी धरलं, माथ्यावरून नीट पदर घेतला. सामानाचं गाठोडं कमीच्या हातांत दिलं. आणि समोर असलेल्या दाईच्या नर्सच्या हातावर चार आणे, आठ आणे ठेवीत त्या हळूहळू जिना उतरल्या. दाराशीं धमणी उभी होती. गाडीवानानं दार उघडतांच, मुलाला सावरत त्या हलकेच धमणींत चढल्या. पुनः घरी निघाल्या.,

इंदिरा संत - कथासंग्रह कदली .


"डॉक्टर, मला आजारी पडायचंय, औषध द्या. चांगली दीड-दोन महिने तरी अंथरुणावर पडले पाहिजे. "

"अगं, लोकांना आजारी पाडण्यासाठी का डॉक्टर असतात? आणि अंगावरून पांढरं जाणं, कंबरदुखी, अशक्तपणा या तक्रारी आहेतच तुझ्या. आणखी आजारी पडून अंथरुणावर खिळलीस तर मुलांना, नवऱ्याला जेवायला कोण घालेल ?"

"खाऊन खाऊनच नवरा माजतो अन् छळतो मग-"

नवरा छळतो म्हणजे काय याचा उलगडा मला लगेच होईना. कारण ही बाई माझी जुनी पेशंट. दोन मुलं झाल्यावर तिने संतती - प्रतिबंधक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. नवरा एक फॅक्टरी कामगार, मिळकत बऱ्यापैकी, आणि निर्व्यसनी होता.

"दारू पिऊन त्रास द्यायला लागला की काय तुझा नवरा ! कधी बोलली नाहीस तू याआधी ?”

" व्यसन वगैरे काही नाही हो. आता कसं सांगावं तुम्हाला ? अहो, त्यांना रोज संबंध लागतो. कधी कधी रात्रीतून दोन-दोन वेळासुद्धा माझं मढं जागं करतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हा छळवाद नाहीतर काय?"

ही बाई तशी जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली. लग्न लवकर झालं होतं. आता एकोणतीस-तीस वर्षांची असेल. अजाणतेपणे तिने लैंगिक मार्गदर्शन या विषयाला हात घातला. नवऱ्याला याबद्दल काही बोलली आहे का ते मी विचारलं. नवऱ्याजवळ तिने विषय काढल्यावर त्याने तिला उडवून लावलं होतं.

नुसतं गप्प पडून राहण्यात तुला कसला त्रास होतो असंच त्याने विचारलं.

"बाकी काही त्रास देत नाहीत हो. फॅक्टरी सुटली की सरळ घरीच येतात. खाणं पिणं, कपडालत्ता कशालाही कमी करत नाहीत. पण हा त्रास सहन होत नाही मला. पाळीचे चार दिवस सुद्धा कटकट करतात. रोज विचारतात, थांबलं का नाही? आता ते काय माझ्या हातातलं आहे का?"

बाईच्या नवऱ्याला मी बोलावून घेतलं. तुमच्या बायकोची इच्छा लक्षात न घेता तुम्ही रोज समागम करता त्यामुळे तिला अंगावरून पांढरं वगैरे त्रास होतो, हे मी त्याला समजावून सांगितलं.
नवऱ्याचं उत्तर वेगळंच,

"मला नाही तसं वाटत. संबंध करतो म्हणजे काय मारपीट करतो का? लग्नाला पंधरा वर्षं तर झाली. माझं काय वय झालं का? संबंध रोज करायची इच्छा होते मला, अन् होणारच, त्यात काय पाप आहे का? हक्काची बायको आहे, का बाहेर जातोय कुठे मी? तिच्या त्रासावर तुम्ही औषधं देतच आहात आणि बाईच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? पुरुषाच्या उत्तेजनांवर सगळं अवलंबून आहे. वेश्या धंदा कोणासाठी करतात, पुरुषांसाठीच ना?" असा प्रश्न विचारून त्याने मोठ्या दिमाखात हास्य केलं.

स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीची इच्छा, समाधान, त्यातला आनंद याबद्दल मी त्याला मार्गदर्शन केलं, पण तो ते काही पटवून घेत नव्हता. अन् वर म्हणाला,

" इतर, अगदी सुंदर, शिकलेल्या, मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या बायकांचं असेल तुम्ही म्हणता तसं कामेच्छा वगैरे पण माझ्या बायकोचं तसं काही नाही. मला माहीत आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून. दुसरा काही घरात त्रास नाही. मी दारू पीत नाही. आता एवढीही स्वतःची हौस करू नये का माणसानं ?"
आता याला काही शिकवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा याच्या बायकोलाच शिकवलं पाहिजे, असं मी मनाशी ठरवलं.

- डॉ लीना मोहाडीकर - कामविश्व संसारिकांचे



" स्त्रियांमध्ये सती, पतिप्रेमिका, साध्वी आणि पतिव्रता अशा चार पाय-या आहेत.

( १ ) केवळ स्वपतीवरच ज्यांची निश्चल प्रीति असते, अर्थात् ज्या कुवर्तनी नव्हेत, त्यांना सती म्हणावें. पण अशा सर्व सतींना पतिप्रेम पूर्णपणे जिंकता येतें असें नाहीं.

( २ ) सतीप्रमाणे शरीराचें व मनाचें पावित्र्य राखतातच, शिवाय बुद्धीच्या चतुराईनं ज्या स्त्रिया पतीचं चित्त नेहमी प्रसन्न राखूं शकतात, त्या 'पतिप्रेमिका'
समजाव्या.

( ३ ) सतीत्व व प्रतिप्रेमिकत्व असले म्हणजे तेवढ्यानं साध्वीत्व येतं असें नाहीं. ( ' साधु ' शब्दाचें स्त्रीलिंगी रूप ' साध्वी' होय. ) व्यवहारांत एखादा मनुष्य नीतिमान् व सज्जन असला तरी तेवढ्याने त्यास साधु म्हणतां येणार नाहीं. सज्जनपणा + कडक उपासना + भूतदया + तितिक्षा + परोपकार + परमार्थाभ्यास, इत्यादि मिळून साधुत्व. त्याप्रामाणें सतीत्व + पतिप्रेमिकत्व + वरील गुण, मिळून 'साध्वीत्व ' येतें.

( ४ ) सती, पतिप्रेमिका व साध्वी या तिघींच्या गुणसमुच्चयानेंच केवळ पतिव्रता पदवी प्राप्त होऊं शकणार नाहीं ; तर वरील तीनही गुण + पतिदेहावर व पतिजीवावर ईश्वरबुद्धीची अचल धारणा धरणारीच ' पतिव्रता ' पदवीस पात्र होऊं शकते. पतीशिवाय दुसरें व्रतच जिला माहीत नाहीं, तीच पतिव्रता ('पतिरेव व्रतं यस्या अखंडा सा पतिव्रता ' ) होय. पतिस्वरूपावर याप्रमाणे जिची वृत्तीची अखंड धारा .

- धर्मग्रंथ .

 एक दमयंतीचा अपवाद सोडला, तर पुराण काळापासून प्रथेप्रमाणे एकदा लग्न करून मुलगी सासरघरी गेली की, तिचा माहेरचा 'शेर' संपला. कधी माहेरपणाला आली, तर चार दिवसांचे कौतुक. बाकी त्रास होत असेल तरी सहन करून मन मारून तिथेच तिने राहावे.
तेव्हापासून ते आजघडीला विज्ञानयुगातसुद्धा काही फारसा फेरफार झालेला नाही. परवाच एका स्त्रीची कथा ऐकली आणि थक्क झाले.

बाई चुणचुणीत, एस. एस. सी. पर्यंत शिकलेली, टायपिंग येत होते. पार्टटाईम नोकरी करायची. सगळ्या गोष्टीत अतिशय हौस होती आणि थोडक्या पैशात नीटनेटका संसार चालवत आनंदी राहत होती. नवरा शेतीच्या कामाकरता गावी गेला होता. घरी आल्यावर बायकोला दिवस राहिलेले बघून त्याचे डोकेच फिरले. “हे मूल माझे नाही” म्हणू लागला. बायकोला घराबाहेर काढले. माहेरी नेऊन घातले. माहेरच्यांनी चार दिवस 'माहेरपण' करून तिला परत नवऱ्याकडे आणून सोडले. त्याने घराबाहेर काढले. दार लावून घेतले.

शेवटी बाईची मैत्रीण तिला घेऊन नवऱ्याकडे आली. वारंवार पटवून दिले की, तिला दिवस आधीच राहिले असले पाहिजेत. त्याची समजूत पटेना. शेवटी नेहमीच्या डॉक्टरीणबाईंकडे सर्वजण गेले. डॉक्टरीणबाईंनी दिवस मोजून सोनोग्राफी करवून घेऊन सर्व तऱ्हांनी त्याची समजूत पटवली. हे मूल आपलंच असल्याची त्याची खात्री पटली. बाईला त्याने 'उदार अंत:करणाने' घरात घेतले. आता बाई बदलूनच गेल्यात.

आधी त्याने भरपूर शिवीगाळ केली होती व पोटात एवढ्या लाथा घातल्या होत्या की, ते मूल पोटात राहिलेच नाही. गर्भपात झाला. आता बाईंचे आनंदी असणे, खळखळून हसणे, गप्पा मारणे, फुलांचे गजरे वगैरे घालणे, थोडक्यात का होईना, कपड्यांची, भांड्यांची, घर सजावटीची हौस करणे सगळे बंदच झाले आहे. जर माहेरच्यांनी थोडे पाठबळ दिले असते, जावयाला बोलवून समजावले असते, जरूर तर कानउघाडणी केली असती, तर आज जे बाईचे आयुष्य पार विसकटून गेले आहे ते गेले नसते .

- माधवी कुंटे - स्त्रीसूक्त


नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नोटाबंदीनंतर देशभरात एक गोष्ट सारखीच पाहण्यात आली . घराघरातून बाहेर नोकरी न करणाऱ्या , घरातच कष्ट उपसणाऱ्या आणि त्याचे नगद मोल न मिळणाऱ्या बायकांनी डब्याडुब्यांतून नवऱ्याच्या चोरून काही रोख पैसे साठवले होते .

किती विविध कारणं असतात हे असे चोरून पैसे साठवण्यासाठी... घरातील अडीअडचणीच्या वेळी कामी यावेत म्हणून, सणासुदीला पोराबाळांना काही चीजवस्तू घेता यावी म्हणून , माहेरचे पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी कदाचित् दमडा मिळणार नाही म्हणून लाज झाकण्यापुरते आतिथ्य करता यावे म्हणून , मासिक पाळीसाठी पॅड्स विकत घेता यावीत म्हणून, आतल्या कपड्यांसाठी पैसे द्यायला नवरा रडवतो आणि घरात सांगायची लाज वाटते म्हणून... कल्पनाही करवणार नाही असली कारणं असतात बायांनी चोरून पैसे साठवण्याची.

नोटाबंदीनंतर अनेक बायकांकडे पाचशे हजारच्या नोटा साठवलेल्या पैशात होत्या. दोनतीन हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम... मोलाची बचत बिनमोलाची होऊ नये म्हणून या सगळ्या बायांनी साठवलेले पैसे नवऱ्यांकडे दिले- नोटा बदलून आणायला- कारण बँकेत जाणं हे अजूनही फक्त पुरुषांनीच करायचं असतं. बऱ्याच जणींना पैसे `बाजूला टाकल्याबद्दल चोरीचा आरोप ठेवून नवऱ्यांनी मारहाण केली. शिव्या दिल्या. पैसे बदलून आणल्यानंतर ते पैसे नवऱ्यांनीच खिशात घातले. आणि नंतर कोणत्याही प्रकारे रोख हातात देणे बंद केले.

मध्य प्रदेशमधील ऍक्शन एड संस्थेच्या वन स्टॉप ऍक्शन सेंटरने एक पाहाणी केली, त्यातून त्या राज्यातील हकीकती अहवाल रुपात आल्या आहेत . नऊ नोव्हेंबरला एका चोवीस वर्षाच्या बाईला- तिच्या चार पोरांसकट नवऱ्याने घराबाहेर काढले - कारण तिच्याकडे चार हजार पाचशे रुपये निघाले. दुसऱ्या एका आईने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या इन्सुलिनसाठी चोरून पैसे बाजूला टाकले होते . नवरोबांनी तिला मारमारून मुलीसकट बाहेर काढले .

आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष .

नाहीतर भारताच्या शहरांत परिस्थिती जरा बदललेली असली तरी गावखेड्यांतून अजूनही हाच दृष्टीकोन आहे. प्रश्न असा आहे... या सामग्री तर सामग्रीचीही काळजी घेत नाहीत त्या सामग्रीचे तथाकथित रक्षक.

अशाच शिबिरातली एक लेक मला भेटायला लपून छपून आली. आणि रडत रडत सांगू लागली - ताई मला ना त्या वाटेने नुसतं दह्यासारखा पांढरं बाहेर येतं. आणि खाज तरी इतकी उठते की जाऊन जीव द्यावा वाटतं हो. विचारल्यावर सांगितलं की दुसऱ्या गावातला डॉक्टर पुरुष आहे- त्याच्याकडे जायचं नाही म्हणून बंदी केलीय. काय मला दाखवायचं ते त्याला दाखवणार काय म्हणतो नि शिव्या घालतो . आणि तालुक्याच्या गावी लेडी डॉक्टर आहे तिच्याकडे जायला त्याला वेळ नाही. मी करू तरी काय...

बायकोवर परपुरुषाची नजर पडू नये- आपल्या सामग्रीवर कुणाची नजर पडू नये हे मुख्य. मग त्या सामग्रीला वाळवी लागून ती कुरतडली गेली तरी बेहत्तर. ही वृत्ती भारतात रुजलेल्या सर्वच धर्मांच्या चौकटीतून पावन होते आहे. प्राचीन हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू- सर्वांनाच स्त्रीचे दुय्यमत्व सोयीचे पडते.

एका संपूर्ण समूहाला मालमत्ताच ठरवले की त्याचा मालमत्तेवरचा हक्कच संपतो. कायद्याच्या दृष्टीने सर्वात विकसित अशा इंग्लंडनेही तीच चलाखी केली होती. '

घरात शिजवलेलं काय खावं, किती खावं, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी काय करावं याची सत्ता आजही आपल्यातील करोडो स्त्रियांना नाही हे सत्य आहे.
***

मुग्धा कर्णिक - शब्दांचीच वस्त्रे धैर्यास माझ्या .

हे सगळं कॉपी पेस्ट झालं . आता मला काय वाटतं ते .. पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .

एका वादग्रस्त ग्रंथाच्या एका प्रतीत बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उरलेलं ( उरलं तर ) अन्न खावं इथपासून बरेच नियम सांगितले होते , ती सेव्ह केलेली पानं आज कुठे सापडली नाहीत म्हणून त्यातला मजकूर इथे पेस्ट केलेला नाही .

एकूण मजकूर आठवता त्या लेखकाचा स्त्री हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर नाही , ते निव्वळ हवा आणि पाणी भक्षण करून कामाचे रगाडेच्या रगाडे उपसण्याची आणि अखंड प्रसन्न वृत्ती , गोड भाषण , शयनेषू रंभा वगैरे होण्याची दिव्य शक्ती प्राप्त असलेलं , मन भावना वगैरे नसलेलं यंत्र आहे , असा समज असावा .

उलटं टांगून मिरचीची धुरी ही शिक्षा म्हटली खरी पण ती या सगळ्या लोकांसाठी फारच सौम्य आहे .

स्त्रीदेहात जन्म घेऊन वरच्या लेखांमध्ये असलेले अत्याचार आणि असंख्य प्रकारचे आणखी अत्याचार ( लैंगिक शोषण , बलात्कार वगैरे वगैरे ) हे फर्स्ट हँड अनुभवणं हीच शिक्षा यांना योग्य आहे . परमेश्वर ती देत असेल अशी आशा आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके सर्व सर्व्हे होतात सरकार ला दिले जातात.
सरकार ते मीडिया ला नक्कीच देत असेल .

सर्व सत्य माहीत असून पण सर्रास खोटी माहिती भारतीय मीडिया बिन्धास्त लोकांना देते.
आणि राजकीय पक्ष पण तीच रीघ ओढतात.
आणि नालायक राज्य सरकार कोण कोणती आहेत हे लोकांना माहीत च पडत नाही.
मायबोली कर खोलात शिरतात.
पण सामान्य जनता इतकी खोलात जात नाही.
भारतात इतके टक्के बालविवाह होतात अशी बातमीच नको.
बिहार मध्ये बालविवाह जास्त होतात केरळ मध्ये कमी होतात.
अशी डिटेल माहिती का बर प्रसिद्ध केली जात नसेल.
आपला महाराष्ट्र पण नावजण्या इतका ह्या बाबत प्रगत नाही.

स्त्रियांना पहिला संपत्ती (जमीन)मध्ये हक्क नव्हता .तो आता दिला जात आहे.
पण संपत्ती नावावर पहिली कर्त्या पुरुषाच्या नावावर असायची.
म्हणजे सर्वात जेष्ठ पुत्राच्या .
बाकी कोणाच्याच नाव वर नसायची.
एकत्रित कुटुंब प्रमुख .xyz.
असा उल्लेख सर्रास ७)१२, बघायला मिळतो.
आज पण अनेक कुटुंबात हीच स्थिती आहे

Pages