धर्म स्त्रीकडून ठेवत असलेल्या अपेक्षा आणि स्त्री आयुष्य

Submitted by राधानिशा on 28 July, 2023 - 11:57

बरंचसं कॉपी पेस्ट आहे , गुलमोहर हे योग्य सदर सिलेक्ट केलं आहे की नाही हेही समजत नाही . धागा दुसऱ्या सदरात कसा हलवायचा ते माहीत नाही . त्यामुळे नियमांच्या बाहेर पोस्ट झाली असल्यास धागा उडवला जाऊ नये ही विनंती .

स्त्रीजन्माची सार्थकता गृहव्यवस्था व शिशुसंगोपन यांतच आहे. आदर्श स्त्री तीच कीं, जी सुमाता व सुगृहिणी असते आणि याच तत्त्वावर स्त्रियांना जर्मनींत घराबाहेरच्या कोणत्याही धंद्यांत वा व्यवहारांत न पडण्याचे पाठ आज मिळत आहेत त्यांच्या नाजूक व प्रेमळ प्रकृतीला अपत्यसंगोपन, रुग्णपरिचर्या, यांसारखीं वत्सलतेचीं किंवा गृहव्यवस्था, पाकसिद्धि, शिक्षण, कशीदा, यांसारखीं लालित्यपूर्ण कामेंच योग्य. गृह हेंच त्यांचे कार्यक्षेत्र व सुगृहिणी बनणें हाच त्यांचा आदर्श... अशा प्रकारच्या ज्ञानानेंच आर्यमहिलांचा उद्धार होणार आहे. एवंगुणविशिष्ट स्त्रीरत्नें जेव्हां घराघराला शोभवितील, तेव्हांच घरोघर सुख, समाधान, संपन्नता, सुशीलता व स्वदेशाभिमान नांदू लागतील. "
-
स्त्रीशिक्षण सुधारणेचें दिग्दर्शन - या सदराखालीं 'सह्याद्रि' मासिक .

ऋग्वेदकालीन विवाहाची वयोमर्यादा कशी होती हैं सप्रमाण दर्शवून श्रीदत्तजन्माची एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे . ती पाहातां स्त्रियांचें वैवाहिक जीवन किती उच्च व पवित्र आहे, तसेंच ब्राह्मणांच्या मुलांना जशी मुंजीची आवश्यकता, तशीच स्त्रियांना विवाहाची आवश्यकता आहे, हेंही दिसून येतें. स्त्रियांना विवाहविधीच वैदिक संस्कार, पति सेवाच गुरुकुलवास व गृहकृत्येंच त्यांचें अग्निहोत्र असें मन्वादि स्मृतिकार म्हणतात ' यांत किती अर्थ भरला आहे, पवित्र अंतःकरणी स्त्रियाच जाणूं शकतील

यानंतर असवर्ण अथवा भिन्नवंशीय विवाहाबद्दल सुधारलेल्या जर्मन लोकांचं निषेधात्मक मत सांगून, हल्लींचें संततिनियमन किती राष्ट्रबलविघातक आहे हें सांगितलें आहे. 'समाजाचा चारी बाजूंनीं होत असलेला अधःपात धर्मवीर अशा आर्य महिलांनींच मनावर घेतल्यास बंद होईल ' अशी इच्छा प्रगट केलेली किती सत्य आहे हें तशा स्त्रियाच जाणूं शकतील.

संततिनियमनाच्या घातक चालीपासून लोकसंख्येवर व आरोग्यावरसुद्धां कसा भयंकर परिणाम होतो हें सप्रमाण दाखविण्याच्या उद्देशाने हल्लीं आस्ट्रिया देशांतील राजधानीच्या शहरीं एक जंगी प्रदर्शनही उघडण्यांत आल्याचें वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालें आहे ! प्रथम त्या चालीच्या ' गुणाचा ' दुंदुंभी पश्चिम दिशेत वाजलेला आमच्या लोकांच्या कानीं पडला व ती चाल येथें सुरू झाली; तसा त्या चालीच्या दोषाचा ' दुंदुभीही कानीं पडला पाहिजे, म्हणजे मग आमचे लोक सावध होतील. पण तो केव्हां पडतो पाहावें !

आमच्या पूर्वजांनीं मानवी स्वभावाचा चांगला अभ्यास करूनच विवाहसंस्था सुरू केली आहे व त्या सर्वाना धर्माच्या दावणीत अशा रीतीनें गोवून टाकले आहे की मानवांना त्यायोगें 'भोगांतही मोक्ष' साधतां येईल ! पण आपल्या धर्माच्या आचारविचारांचं थोड्या दमानें मनन करतील तेव्हांच ना त्याच्या रहस्याचा प्रकाश होईल ! असो.

■■■
'उठा, चहा घेतां ना ? उठा.' म्हणत नर्सनं त्यांना उठवलं, तेव्हां त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं.

'काय ग बाई तरी झोप !' म्हणत त्यांनीं रग कमरेपर्यंत बाजूला सारला आणि किंचित् उठण्याचा प्रयत्न केला. चहा फार चवदार होता. चहाबरोबर टोस्टही होता. त्या हळुहळू फराळ करीत होत्या आणि नर्स त्यांच्या शेजारीच बसून होती. त्यांचीं गेलीं तीन बाळंतपणं याच नर्सनं केली होती. दोघींनाहि एकमेकींविषयीं स्नेहभाव वाटत होता.

'माई, हीं दोन बाळंतपणं तुम्हांला बरींच जड गेलीं हो. फार थकला आहांत. असं बरं नाहीं. पहांटे तर शेवटी शेवटीं मी घाबरलेंच. म्हटलं, धडपणी बाई सुटते की नाहीं ! तुमच्या अंगांत ताकदच राहिलेली नाहीं. '

'गेल्या चार वर्षांत मला बरं नाहीच आहे. कधीं डॉक्टरकडे गेलं की म्हणतात, 'विश्रांती घ्या.' आपलं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. ' माई क्षीणपणानं हसल्या.
,
'आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, बाई ! माईंनी एक आवंढा गिळला; आणि त्या बराच वेळ स्तब्ध बसून राहिल्या.
दर महिना रुपये चाळीस अधिक म. भ. पंचवीस मिळवणाऱ्या एका प्राथमिक खाजगी शाळेतील शिक्षकाचा संसार माईंना लाभला होता. प्रथम त्याही नोकरी करीत होत्या. पण तीन मुलं होईपर्यंत त्यांची नोकरीची धडपड टिकून राहिली. चवथ्या खेपेला डोहाळे लागतांच त्यांनीं नोकरीचा राजिनामा दिला होता. आणि मास्तरांनीं आणखी दोन शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यांच्या संसाराचं स्वरूप हे असं ओढाताणीचं होतं.

या ओढाताणीच्या जाणिवेनं माईंची जीभ ओढल्यासारखी झाली. कष्ट तर होतेच, पण आणखीहि पुष्कळ होतं. कष्टापेक्षाही तेच त्यांना कासावीस करून टाकत होतं. त्या हळुहळू बोलायला लागल्या. त्यांचा आवाज किंचित कापरा होता.

'ताई, कुणाचं शरीर अन काय ? ज्या दिवशीं हें शरीर दुसन्याच्या स्वाधीन केलं त्याच दिवशीं शरीराचा दगड व्हायला सुरवात झाली. आतां त्याला स्वतःचं सुख - इच्छा - वासना - कांहींच नाहीं. शुद्ध दगड झालं माहे. त्याची काय काळजी घ्यायची -'

'असं का म्हणतां ? मुलं लहान आहेत. एकच काळजी घ्या. आता पुन्हा-'

' - बाळंतपण नको, असंच ना ?' माई रुक्षपणानं हंसल्या.
त्यांचं हें सहावं बाळंतपण. ज्याला हें कळे तो हेटाळणीनं किंचित हसे. किती किती मुलं - किती मुलं ? छे माईंना तें भारी बोचायचं. पण - पण 'पण' कसा सुटणार ?

मुलं फार नसावीत हें त्यांना कळत नव्हतं असं थोडंच होतं ? पण कळूनही वळत नसणाऱ्या अशा गोष्टी असतातच कीं !

कालचींच सलणारी शल्यं, आणि उद्यांचे रोखलेले भाले; शरीराचे कष्ट आणि मनाचे शीण; नोकरीच्या याचना आणि संसारांतल्या विवंचना ;
-
साऱ्या गोष्टी माणसाला विसरायला हव्या असतात. क्षणभर त्या यांपासून दूर कुठं तरी विसावा हवा असतो. कुणी त्यासाठी दारूकडे ळतो, तसच कुणी - व्यसनी माणसाला व्यसनाची वाईट बाजू माहीत नसते असं थोडंच असतं ? पण माहीत असूनही त्याचा उपयोग काय होणार ? सारं कांहीं उगीचच. आणि म्हणूनच अगदीं कातर आवाजांत माई म्हणाल्या,

'ताई, कुणाला अन काय सांगायचं ? बाळंतपणाचा महिना जिथं अगदीं कसाबसा कोरा जातो- '

'बाई ग ! ' त्या नर्सच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं.

'पण मास्तर फार चांगले आहेत. त्यांची माझ्यावर माया नाहीं असं नाहीं. माझ्यासाठी त्यांचा जीव सारखा तुटत असतो. '

' हें त्याचंच लक्षण वाटतं ? '

'असं नाहीं हो. तेही माणूसच आहेत ना ? तुम्हाला सांगतें, जोंपर्यंत माझं मनही दगड बनलं नव्हतं, तोपर्यंत खूप प्रयत्न केले मी. पण व्हायचं काय ? सदा धुसफूस, चिडचीड, अबोला, असाच सारा दिवस - - कधीं त्यांनीं ताडकन् दार उघडून बाहेर निघून जावं, कधीं मी रागारागांत पोरांत येऊन झोपावं. काय फायदा त्याचा ? शेवटीं आतां मनाचाही दगड झाला आहे बघा. दगड, नुसता दगड ! जीव आहे इतकंच काय तें - '

नर्सनं डोळ्याला पदर लावला.

.....

असंच आपलं बाळ सदोदित लहान असावं आणि आपणही असंच सारख सारखं पडून रहावं. कुणी यावं, चहा द्यावा, कुणी ताट वाढून आणावं. जेवण तरी किती सुग्रास लिंबाचं लोणचं, लसणाची चटणी, भरपूर तूप, आणि वाफा येत असलेलं गरम गरम अन्न -

घरीं असं कुठे असणार ? नेहमींच अपुरं जेवण भाजी असेल तर आमटी नाहीं. तूप तर पहायलाही मिळत नाहीं. आणि कढत अन्न जेवण्याचं सुख - तें तरी कुठं मिळतं ? रोज मास्तरनां शाळेत पाठवायचं, मुलांचं आवरायचं, आणि मग पितळींत वाढून घ्यायचं. तोंवर भाताचे डिखळे आणि आमटीचं कोमट पाणी झालेलं असायचं. उजव्या डाव्या बाजूचं कालवण मुलांच्या तडाख्यांतून उरलं तर भाग्य ! पण इथं या जेवणांत त्यांना एक प्रकारची चैन वाटायची. चाखत माखत त्या जेवायच्या. चार घास अधिकही जायचे.

बाळ झोपलं कीं इतर खाटांकडून फेरी काढायची.
साऱ्याच बाळंतिणी वॉर्डातल्या आणि म्हणूनच समदुःखी .. कुणाचं चवथं, कुणाचं सातवं अशीं बाळंतपणं. त्यामुळं भेटीलाही सहसा कुणी यायचं नाहीं. कोपऱ्यातील खाटेवर एक पहिलटकरीण होती. तिचा नवरा रोज तीनदां यायचा. साऱ्या वाळंतिणी त्याच्याकडे पाहून कुत्सितपणानं हसायच्या. माईही आंवढा घोटून त्या चेष्टेंत सामील व्हायच्या. प्रत्येकीच्या घरचे अनुभव, बाळंतपणांतील खोडी, नवऱ्याचे स्वभाव चर्चेला निघायचे आणि या रसाळ गप्पांत वेळ कसा जायचा तें समजायचंही नाहीं.

रात्री अगदीं गाढ झोपावं. मूल दाईच्या स्वाधीन असायचं. रडेल बिडेल कांहीं काळजी नको. खरंच किती सुखाचे दिवस !
·
त्यामुळं दहाव्या दिवशीं रात्रीं माईंना उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. स्वतःच्या घरीं जायला मन घेईना .-

ते सारं घर - ती चूल - तें रेशन- तें धुणं तीं भांडीं मुलं- आजारपण नवऱ्याचा राग--सारं सारं भुतासारखं त्यांना भेडसावायला लागलं. मुलाला छातीशी घेऊन त्या स्वतःला विसरू पहायला लागल्या.

या रात्रीच्या शिणानं सकाळीं त्यांना जाग आली, त्या वेळी कमी येऊन तयार होती. आज अकरावा दिवस. आज त्यांना तिथं चहा मिळणार नव्हता. त्या मुकाट्यानं उठल्या.

तूं आलीस ?' आपले कपडे आवरत त्यांनी कमीला विचारलं.

'बाबा म्हणाले, मी घरांतलं करतों, तूं आईला आणायला जा, म्हणून आलें मी.'

तिच्या कडेवरील शरू हात पुढं करीत म्हणाली,

'आई, बाबा शिला कलतायत. '

माई उगीचच हसल्या.

त्यांनी मुलाला कपडे चढवायला सुरवात केली. तें दहा दिवसांचं सुख अजून त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. मुलाला टोपरं घालतां घालतां त्यांच्या मनांत विचार आला,

'आतां आजपासून पुनः कष्ट - पुनः कामं - शरीरांत प्राण असेपर्यंत उभं रहायचं आणि -- आणि -- कसली तरी किळस त्यांच्या शरीरांत थरकांप उडवून गेली, पण लगेच खुदकन् त्या हसल्या. पुनः वर्षा सव्वा वर्षांनीं असा परत विसावा -- तें हसू त्यांना कोयनेलसारखं लागलं. त्यांनीं मुलाला बाळंत्यांत नीट गुंडाळलं, छातीशी धरलं, माथ्यावरून नीट पदर घेतला. सामानाचं गाठोडं कमीच्या हातांत दिलं. आणि समोर असलेल्या दाईच्या नर्सच्या हातावर चार आणे, आठ आणे ठेवीत त्या हळूहळू जिना उतरल्या. दाराशीं धमणी उभी होती. गाडीवानानं दार उघडतांच, मुलाला सावरत त्या हलकेच धमणींत चढल्या. पुनः घरी निघाल्या.,

इंदिरा संत - कथासंग्रह कदली .


"डॉक्टर, मला आजारी पडायचंय, औषध द्या. चांगली दीड-दोन महिने तरी अंथरुणावर पडले पाहिजे. "

"अगं, लोकांना आजारी पाडण्यासाठी का डॉक्टर असतात? आणि अंगावरून पांढरं जाणं, कंबरदुखी, अशक्तपणा या तक्रारी आहेतच तुझ्या. आणखी आजारी पडून अंथरुणावर खिळलीस तर मुलांना, नवऱ्याला जेवायला कोण घालेल ?"

"खाऊन खाऊनच नवरा माजतो अन् छळतो मग-"

नवरा छळतो म्हणजे काय याचा उलगडा मला लगेच होईना. कारण ही बाई माझी जुनी पेशंट. दोन मुलं झाल्यावर तिने संतती - प्रतिबंधक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. नवरा एक फॅक्टरी कामगार, मिळकत बऱ्यापैकी, आणि निर्व्यसनी होता.

"दारू पिऊन त्रास द्यायला लागला की काय तुझा नवरा ! कधी बोलली नाहीस तू याआधी ?”

" व्यसन वगैरे काही नाही हो. आता कसं सांगावं तुम्हाला ? अहो, त्यांना रोज संबंध लागतो. कधी कधी रात्रीतून दोन-दोन वेळासुद्धा माझं मढं जागं करतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हा छळवाद नाहीतर काय?"

ही बाई तशी जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली. लग्न लवकर झालं होतं. आता एकोणतीस-तीस वर्षांची असेल. अजाणतेपणे तिने लैंगिक मार्गदर्शन या विषयाला हात घातला. नवऱ्याला याबद्दल काही बोलली आहे का ते मी विचारलं. नवऱ्याजवळ तिने विषय काढल्यावर त्याने तिला उडवून लावलं होतं.

नुसतं गप्प पडून राहण्यात तुला कसला त्रास होतो असंच त्याने विचारलं.

"बाकी काही त्रास देत नाहीत हो. फॅक्टरी सुटली की सरळ घरीच येतात. खाणं पिणं, कपडालत्ता कशालाही कमी करत नाहीत. पण हा त्रास सहन होत नाही मला. पाळीचे चार दिवस सुद्धा कटकट करतात. रोज विचारतात, थांबलं का नाही? आता ते काय माझ्या हातातलं आहे का?"

बाईच्या नवऱ्याला मी बोलावून घेतलं. तुमच्या बायकोची इच्छा लक्षात न घेता तुम्ही रोज समागम करता त्यामुळे तिला अंगावरून पांढरं वगैरे त्रास होतो, हे मी त्याला समजावून सांगितलं.
नवऱ्याचं उत्तर वेगळंच,

"मला नाही तसं वाटत. संबंध करतो म्हणजे काय मारपीट करतो का? लग्नाला पंधरा वर्षं तर झाली. माझं काय वय झालं का? संबंध रोज करायची इच्छा होते मला, अन् होणारच, त्यात काय पाप आहे का? हक्काची बायको आहे, का बाहेर जातोय कुठे मी? तिच्या त्रासावर तुम्ही औषधं देतच आहात आणि बाईच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? पुरुषाच्या उत्तेजनांवर सगळं अवलंबून आहे. वेश्या धंदा कोणासाठी करतात, पुरुषांसाठीच ना?" असा प्रश्न विचारून त्याने मोठ्या दिमाखात हास्य केलं.

स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीची इच्छा, समाधान, त्यातला आनंद याबद्दल मी त्याला मार्गदर्शन केलं, पण तो ते काही पटवून घेत नव्हता. अन् वर म्हणाला,

" इतर, अगदी सुंदर, शिकलेल्या, मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या बायकांचं असेल तुम्ही म्हणता तसं कामेच्छा वगैरे पण माझ्या बायकोचं तसं काही नाही. मला माहीत आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून. दुसरा काही घरात त्रास नाही. मी दारू पीत नाही. आता एवढीही स्वतःची हौस करू नये का माणसानं ?"
आता याला काही शिकवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा याच्या बायकोलाच शिकवलं पाहिजे, असं मी मनाशी ठरवलं.

- डॉ लीना मोहाडीकर - कामविश्व संसारिकांचे



" स्त्रियांमध्ये सती, पतिप्रेमिका, साध्वी आणि पतिव्रता अशा चार पाय-या आहेत.

( १ ) केवळ स्वपतीवरच ज्यांची निश्चल प्रीति असते, अर्थात् ज्या कुवर्तनी नव्हेत, त्यांना सती म्हणावें. पण अशा सर्व सतींना पतिप्रेम पूर्णपणे जिंकता येतें असें नाहीं.

( २ ) सतीप्रमाणे शरीराचें व मनाचें पावित्र्य राखतातच, शिवाय बुद्धीच्या चतुराईनं ज्या स्त्रिया पतीचं चित्त नेहमी प्रसन्न राखूं शकतात, त्या 'पतिप्रेमिका'
समजाव्या.

( ३ ) सतीत्व व प्रतिप्रेमिकत्व असले म्हणजे तेवढ्यानं साध्वीत्व येतं असें नाहीं. ( ' साधु ' शब्दाचें स्त्रीलिंगी रूप ' साध्वी' होय. ) व्यवहारांत एखादा मनुष्य नीतिमान् व सज्जन असला तरी तेवढ्याने त्यास साधु म्हणतां येणार नाहीं. सज्जनपणा + कडक उपासना + भूतदया + तितिक्षा + परोपकार + परमार्थाभ्यास, इत्यादि मिळून साधुत्व. त्याप्रामाणें सतीत्व + पतिप्रेमिकत्व + वरील गुण, मिळून 'साध्वीत्व ' येतें.

( ४ ) सती, पतिप्रेमिका व साध्वी या तिघींच्या गुणसमुच्चयानेंच केवळ पतिव्रता पदवी प्राप्त होऊं शकणार नाहीं ; तर वरील तीनही गुण + पतिदेहावर व पतिजीवावर ईश्वरबुद्धीची अचल धारणा धरणारीच ' पतिव्रता ' पदवीस पात्र होऊं शकते. पतीशिवाय दुसरें व्रतच जिला माहीत नाहीं, तीच पतिव्रता ('पतिरेव व्रतं यस्या अखंडा सा पतिव्रता ' ) होय. पतिस्वरूपावर याप्रमाणे जिची वृत्तीची अखंड धारा .

- धर्मग्रंथ .

 एक दमयंतीचा अपवाद सोडला, तर पुराण काळापासून प्रथेप्रमाणे एकदा लग्न करून मुलगी सासरघरी गेली की, तिचा माहेरचा 'शेर' संपला. कधी माहेरपणाला आली, तर चार दिवसांचे कौतुक. बाकी त्रास होत असेल तरी सहन करून मन मारून तिथेच तिने राहावे.
तेव्हापासून ते आजघडीला विज्ञानयुगातसुद्धा काही फारसा फेरफार झालेला नाही. परवाच एका स्त्रीची कथा ऐकली आणि थक्क झाले.

बाई चुणचुणीत, एस. एस. सी. पर्यंत शिकलेली, टायपिंग येत होते. पार्टटाईम नोकरी करायची. सगळ्या गोष्टीत अतिशय हौस होती आणि थोडक्या पैशात नीटनेटका संसार चालवत आनंदी राहत होती. नवरा शेतीच्या कामाकरता गावी गेला होता. घरी आल्यावर बायकोला दिवस राहिलेले बघून त्याचे डोकेच फिरले. “हे मूल माझे नाही” म्हणू लागला. बायकोला घराबाहेर काढले. माहेरी नेऊन घातले. माहेरच्यांनी चार दिवस 'माहेरपण' करून तिला परत नवऱ्याकडे आणून सोडले. त्याने घराबाहेर काढले. दार लावून घेतले.

शेवटी बाईची मैत्रीण तिला घेऊन नवऱ्याकडे आली. वारंवार पटवून दिले की, तिला दिवस आधीच राहिले असले पाहिजेत. त्याची समजूत पटेना. शेवटी नेहमीच्या डॉक्टरीणबाईंकडे सर्वजण गेले. डॉक्टरीणबाईंनी दिवस मोजून सोनोग्राफी करवून घेऊन सर्व तऱ्हांनी त्याची समजूत पटवली. हे मूल आपलंच असल्याची त्याची खात्री पटली. बाईला त्याने 'उदार अंत:करणाने' घरात घेतले. आता बाई बदलूनच गेल्यात.

आधी त्याने भरपूर शिवीगाळ केली होती व पोटात एवढ्या लाथा घातल्या होत्या की, ते मूल पोटात राहिलेच नाही. गर्भपात झाला. आता बाईंचे आनंदी असणे, खळखळून हसणे, गप्पा मारणे, फुलांचे गजरे वगैरे घालणे, थोडक्यात का होईना, कपड्यांची, भांड्यांची, घर सजावटीची हौस करणे सगळे बंदच झाले आहे. जर माहेरच्यांनी थोडे पाठबळ दिले असते, जावयाला बोलवून समजावले असते, जरूर तर कानउघाडणी केली असती, तर आज जे बाईचे आयुष्य पार विसकटून गेले आहे ते गेले नसते .

- माधवी कुंटे - स्त्रीसूक्त


नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नोटाबंदीनंतर देशभरात एक गोष्ट सारखीच पाहण्यात आली . घराघरातून बाहेर नोकरी न करणाऱ्या , घरातच कष्ट उपसणाऱ्या आणि त्याचे नगद मोल न मिळणाऱ्या बायकांनी डब्याडुब्यांतून नवऱ्याच्या चोरून काही रोख पैसे साठवले होते .

किती विविध कारणं असतात हे असे चोरून पैसे साठवण्यासाठी... घरातील अडीअडचणीच्या वेळी कामी यावेत म्हणून, सणासुदीला पोराबाळांना काही चीजवस्तू घेता यावी म्हणून , माहेरचे पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी कदाचित् दमडा मिळणार नाही म्हणून लाज झाकण्यापुरते आतिथ्य करता यावे म्हणून , मासिक पाळीसाठी पॅड्स विकत घेता यावीत म्हणून, आतल्या कपड्यांसाठी पैसे द्यायला नवरा रडवतो आणि घरात सांगायची लाज वाटते म्हणून... कल्पनाही करवणार नाही असली कारणं असतात बायांनी चोरून पैसे साठवण्याची.

नोटाबंदीनंतर अनेक बायकांकडे पाचशे हजारच्या नोटा साठवलेल्या पैशात होत्या. दोनतीन हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम... मोलाची बचत बिनमोलाची होऊ नये म्हणून या सगळ्या बायांनी साठवलेले पैसे नवऱ्यांकडे दिले- नोटा बदलून आणायला- कारण बँकेत जाणं हे अजूनही फक्त पुरुषांनीच करायचं असतं. बऱ्याच जणींना पैसे `बाजूला टाकल्याबद्दल चोरीचा आरोप ठेवून नवऱ्यांनी मारहाण केली. शिव्या दिल्या. पैसे बदलून आणल्यानंतर ते पैसे नवऱ्यांनीच खिशात घातले. आणि नंतर कोणत्याही प्रकारे रोख हातात देणे बंद केले.

मध्य प्रदेशमधील ऍक्शन एड संस्थेच्या वन स्टॉप ऍक्शन सेंटरने एक पाहाणी केली, त्यातून त्या राज्यातील हकीकती अहवाल रुपात आल्या आहेत . नऊ नोव्हेंबरला एका चोवीस वर्षाच्या बाईला- तिच्या चार पोरांसकट नवऱ्याने घराबाहेर काढले - कारण तिच्याकडे चार हजार पाचशे रुपये निघाले. दुसऱ्या एका आईने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या इन्सुलिनसाठी चोरून पैसे बाजूला टाकले होते . नवरोबांनी तिला मारमारून मुलीसकट बाहेर काढले .

आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष .

नाहीतर भारताच्या शहरांत परिस्थिती जरा बदललेली असली तरी गावखेड्यांतून अजूनही हाच दृष्टीकोन आहे. प्रश्न असा आहे... या सामग्री तर सामग्रीचीही काळजी घेत नाहीत त्या सामग्रीचे तथाकथित रक्षक.

अशाच शिबिरातली एक लेक मला भेटायला लपून छपून आली. आणि रडत रडत सांगू लागली - ताई मला ना त्या वाटेने नुसतं दह्यासारखा पांढरं बाहेर येतं. आणि खाज तरी इतकी उठते की जाऊन जीव द्यावा वाटतं हो. विचारल्यावर सांगितलं की दुसऱ्या गावातला डॉक्टर पुरुष आहे- त्याच्याकडे जायचं नाही म्हणून बंदी केलीय. काय मला दाखवायचं ते त्याला दाखवणार काय म्हणतो नि शिव्या घालतो . आणि तालुक्याच्या गावी लेडी डॉक्टर आहे तिच्याकडे जायला त्याला वेळ नाही. मी करू तरी काय...

बायकोवर परपुरुषाची नजर पडू नये- आपल्या सामग्रीवर कुणाची नजर पडू नये हे मुख्य. मग त्या सामग्रीला वाळवी लागून ती कुरतडली गेली तरी बेहत्तर. ही वृत्ती भारतात रुजलेल्या सर्वच धर्मांच्या चौकटीतून पावन होते आहे. प्राचीन हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू- सर्वांनाच स्त्रीचे दुय्यमत्व सोयीचे पडते.

एका संपूर्ण समूहाला मालमत्ताच ठरवले की त्याचा मालमत्तेवरचा हक्कच संपतो. कायद्याच्या दृष्टीने सर्वात विकसित अशा इंग्लंडनेही तीच चलाखी केली होती. '

घरात शिजवलेलं काय खावं, किती खावं, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी काय करावं याची सत्ता आजही आपल्यातील करोडो स्त्रियांना नाही हे सत्य आहे.
***

मुग्धा कर्णिक - शब्दांचीच वस्त्रे धैर्यास माझ्या .

हे सगळं कॉपी पेस्ट झालं . आता मला काय वाटतं ते .. पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .

एका वादग्रस्त ग्रंथाच्या एका प्रतीत बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उरलेलं ( उरलं तर ) अन्न खावं इथपासून बरेच नियम सांगितले होते , ती सेव्ह केलेली पानं आज कुठे सापडली नाहीत म्हणून त्यातला मजकूर इथे पेस्ट केलेला नाही .

एकूण मजकूर आठवता त्या लेखकाचा स्त्री हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर नाही , ते निव्वळ हवा आणि पाणी भक्षण करून कामाचे रगाडेच्या रगाडे उपसण्याची आणि अखंड प्रसन्न वृत्ती , गोड भाषण , शयनेषू रंभा वगैरे होण्याची दिव्य शक्ती प्राप्त असलेलं , मन भावना वगैरे नसलेलं यंत्र आहे , असा समज असावा .

उलटं टांगून मिरचीची धुरी ही शिक्षा म्हटली खरी पण ती या सगळ्या लोकांसाठी फारच सौम्य आहे .

स्त्रीदेहात जन्म घेऊन वरच्या लेखांमध्ये असलेले अत्याचार आणि असंख्य प्रकारचे आणखी अत्याचार ( लैंगिक शोषण , बलात्कार वगैरे वगैरे ) हे फर्स्ट हँड अनुभवणं हीच शिक्षा यांना योग्य आहे . परमेश्वर ती देत असेल अशी आशा आहे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी माझ्याही मनात नेहेमी हेच प्रश्न, शंकाकुशंका येत राहतात.

सीता, द्रौपदी ह्यांच्या कथा, द्युतात पत्नी पणाला लावणं, काही काही पचत नाही, पटत नाही.

दुर्गा भागवतांच महा भारतातील स्त्रियांवर पुस्तक आहे, परत मिळालं तर वाचेन.
खूप पूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचलेलं पण तेव्हा मला वाटतं नीट समजलं नव्हतं. त्यामुळे आता वाचायला पाहिजे.

अगदी अगदी माझ्याही मनात नेहेमी हेच प्रश्न, शंकाकुशंका येत राहतात.

सीता, द्रौपदी ह्यांच्या कथा, द्युतात पत्नी पणाला लावणं, काही काही पचत नाही, पटत नाही.

दुर्गा भागवतांच महा भारतातील स्त्रियांवर पुस्तक आहे, परत मिळालं तर वाचेन.
खूप पूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचलेलं पण तेव्हा मला वाटतं नीट समजलं नव्हतं. त्यामुळे आता वाचायला पाहिजे.

ह्या मध्ये एक शंका आहे .
स्वयंवर च्या अटी मुलगी ठरवत असत की तिचे पालक.
मुली च अटी ठरवत असतील तर वर तिच्या पसंतीचाच आहे

सती जाव्या लागलेल्या 99 % बायकांच्या बाबतीत ती गोष्ट ऐच्छीक असणं शक्य नाही . सती जायला तयार नसलेल्या , चितेतून बाहेर पडण्याची धडपड करत असलेल्या स्त्रीला काठ्यांनी ढोसून आत ढकलल्याचे उल्लेख जेन्यूईन सोर्समधून वाचले आहेत .

मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या पुरुषाला पाठवणे . भयंकर आहे , नियोग हे नाव होतं . एकीने डोळे घट्ट मिटून घेतले , एक बेशुद्ध पडली की पांढरीफटक पडली असे दोन वेगवेगळे उल्लेख आहेत , एकवेळ दासीला पाठवलं गेलं .

अंबा अंबालिका यांच्या स्वयंवरात कोणतीही अट नव्हती , मुलींची पसंती हीच मुख्य अट होती , तेच कुंतीच्या स्वयंवराच्या बाबतीत . पण याही ठिकाणी म्हणजे इतर राजकन्यांची स्वयंवरं होत असतील तर अमुक वराचीच निवड कर अशी सक्त ताकीद पूर्वीच दिलेली असणं अजिबात अशक्य वाटत नाही . रीत म्हणून स्वयंवर ठेवणं भाग आहे पण आपल्याला जास्तीतजास्त राजकिय लाभ व्हावा , सैन्याची ताकद वाढेल / मित्र राज्य होणं लाभदायक असेल असाच वर निवडून त्याचीच निवड करण्याची सक्ती मुलीवर झालेली असणं सहज शक्य आहे .

इथे सर्वच लोकांना मुलगा किंवा मुलगी आहे किंवा दोन्ही पण आहेत.
.अगदी मनापासून विचारतो किती लोक मुलगा किंवा मुलगी ह्यांनी पसंत केलेली वधू किंवा वर ह्याला डोळे झाकून परवानगी देतील.
अगदी मनापासून सांगा.
काही तपासणी आई वडील करणार च..
काळजी पोटी

<< अगदी मनापासून विचारतो किती लोक मुलगा किंवा मुलगी ह्यांनी पसंत केलेली वधू किंवा वर ह्याला डोळे झाकून परवानगी देतील.
अगदी मनापासून सांगा.
काही तपासणी आई वडील करणार च..
काळजी पोटी >>

------- प्रश्न प्रामाणिक आहे आणि सोपा नाही.

आज, शहरी आणि शिकलेल्या समाजात, २५-३० या वयांत मुला-मुलींची लग्न होत आहेत (३०+ कडे पण जात आहेत). या समाजातली मुले कायद्यानुसार आपले जोडीदार निवडण्यासाठी सज्ञान आहेत, मुलगा किंवा मुलगी यांना जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
तपासणी म्हणजे काय अपेक्षित आहे? ३६ गुण/ पत्रिका/ मंगळ-शनी... असल्या निरर्थक गोष्टी मी तरी बघणार नाही. नोकरी/ पगार/ स्थैर्य या गोष्टी बद्दल माहिती असणे आवश्यक असले तरी त्याने निर्णयावर परिणाम व्हायला नको.

जोडीदार निवडतांना, मुलांनी/ मुलींनी त्यांचा वेळ घ्यावा, जिथे आवश्यक असेल तर इतरांचा ( थोरा-मोठ्यांचा, लहान्यांचा ) सल्ला घ्यावा. पण अंतिम निर्णय स्वत: घ्यावा.

१८ वर्षांपेक्षा कमी वयांत झालेले विवाह हे बेकायदेशीर आहेत. या वयोगटांत, भारतात दर वर्षी १५ लाख मुलींचे विवाह होतात. हा आकडा फार मोठा आहे. शिक्षणाने फरक पडेल, पण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. या वयोगटांतल्या मुलां / मुलींसाठी आई- वडिलांची परवानगी आवश्यक आहेच. १५-१९ या वयोगटांतील प्रत्येक ७ मुलींमधे एक १ मुलगी विवाहीत आहे - म्हणजे शिक्षण जवळ जवळ संपलेच आहे :अरेरे:.

" Estimates suggest that each year, at least 1.5 million girls under 18 get married in India. Nearly 16 per cent adolescent girls aged 15-19 are currently married. "

https://www.unicef.org/india/what-we-do/end-child-marriage#:~:text=Estim....

बर्‍याच घरांत मुलांना लाडाकोडात वाढवलंय म्हणतात म्हणजे केवळ पैसा आणि वस्तू देतात. त्यातले किती जण त्यांना वैचारिक मोकळीकही देतात? मुलांनाही वेगळी मतं असू शकतात, त्यांच्या भावनांना पण आदर द्यायचा असतो, याचं भान/ज्ञान बर्‍याच कुटुंबात नसतं. मुलं सज्ञान झाल्यावर त्यांच्याही भावना विचारात घ्याव्यात, अशी काही पद्धतच नसते. मुलं ही आपली प्रॉपर्टीच असतात, असं मानायची सवय आपल्या संस्कृतीत खोलवर मुरलेली आहे; तीही इतकी की त्यात आपल्याला वावगं असं काही वाटतच नाही.स्वतःचं भलंबुरं कशात आहे, हे कळण्याची त्याची/तिची अक्कलच नाही. त्यामुळं त्यांचे निर्णय आम्हीच व्यवस्थित घेऊ शकतो, असा विचार करणार्‍या पालकांना जराही वाटत नाही की वयाच्या विशीपर्यंत जर आपल्या मुलांना सो कॉल्ड ‘अक्कल’ येत नसेल, तर वीस वर्षे आपण काय झोपा काढल्या का? आपल्यातील पालकत्व कमी पडलं असं वाटत नाही का आपल्याला? म्हणून मग मुलं सज्ञान झाल्यावर तू तुझं तुझं बघ, असं म्हणण्यापेक्षा त्यांचे सगळे निर्णय पालकच घेत असतात. आणि निसर्गात असं फक्त मानव प्रजातीतच होतं बरंका!

संसारासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? प्रेम आणि लग्न यात संबंध काय असतो? अशा अनेक प्रश्नांची मला तिला ओळख करून द्यावी लागेल. दोन भिन्न सामाजिक/आर्थिक परिस्थितीतली आणि भिन्न मतांची माणसं एकत्र राहणं, ही साधी गोष्ट नसते, हे तिला आजूबाजूच्या उदाहरणांतून दाखवावं लागेल. शारीरिक आकर्षण आणि लैंगिक ऊर्मी या गोष्टी व्यवहाराच्या पातळीवर लाँग टर्म राहण्यासाठी भावनिक गुंतवणूक होणं आणि भावनिक गुंतवणूक होण्यासाठी विचार जुळणं किती महत्त्वाचं असतं, ते चर्चांतून आणि उदाहरणांतून दाखवून द्यावं लागेल .

- सचिन लांडगे .

पूर्ण लेख - https://thanedinman.com/marriage-is-a-social-status/

धाग्याच्या हेडरमधले लेख वाचून झाले. प्रतिसाद वाचून झाले. अनेक लेख एकामागोमाग असल्याने मांडणीविस्कळीत झाली आहे . कामाच्या ताणामधे प्रयत्न करूनही एकामागून एक लेख वाचून होत नव्हते. मन लावून वाचण्यासाठी थोडा वेळ लागला. अर्थात लेखांची यादी देण्यापेक्षा त्यांचा उल्लेख करून स्वतःच्या शब्दात दिल्याने थोडासा फरक पडल असता असे वाटते.

मांडणीच्या दोषाने काही बिघडत नाही. ज्यांच्या वाट्याला अशी परिस्थिती येते त्यांच्यासाठी शुद्धलेखनाच्या चुका, व्याकरण, मांडणी यापेक्षा लेखाचा आत्मा महत्वाचा असतो. ज्यांच्या वाट्याला अशी परिस्थिती येत नाही पण जे लेखातल्या आत्म्याशी कनेक्ट होऊ पाहतात , संवेदनशील असतात त्यांनाही फरक पडत नाही.

मात्र ज्यांच्यात बदल घडवायचा आहे त्यांना अशा गोष्टींनी फरक पडतो. कुंपणावरच्यांना निमित्त असतं.
प्रतिसाद पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा चर्चा होणे का आवश्यक आहे याची जाणीव झाली. राधानिशा आणि अस्मिता यांचे प्रतिसाद विशेष आवडले. पुढील चर्चेच्या प्रतिक्षेत.

१५-१९ या वयोगटांतील प्रत्येक ७ मुलींमधे एक १ मुलगी विवाहीत आहे - म्हणजे शिक्षण जवळ जवळ संपलेच आहे :अरेरे:.

भारताविषयी विचार करताना असा सरसकट विचार करता येत नाही.
भू भाग सलग्नाता म्हणून भारत एक देश असला तरी प्रचंड विषमता भारतात आहे
एकच देशात अती प्रचंड गरीब असणारा भाग आणि श्रीमंत असणारा भाग असे चित्र स्पष्ट दिसेल.
लहान वयात मुली न ची लग्न कोणत्या कोणत्या भागात,जिल्ह्यात, जास्त होत आहेत त्याचा डेटा हवा.
कोणत्या धर्मात,जातीत,समाज घटकात होत आहेत त्याचा पण डेटा हवा .
आणि आर्थिक गटाचा पण डेटा हवा.
आर्थिक समस्या ही सामाजिक समस्या शी निगडित आहे.
मुलांची संख्या, लवकर लग्न होणे ह्याचा सरळ संबंध आर्थिक स्थिती शी आहे.
ती लवकर लग्न थांबवायची असतील तर आर्थिक स्थिती त्या भागातील ,,, (बाकी पुढचे घटक.)
सुधारली पाहिजे.

भू भाग सलग्नाता म्हणून भारत एक देश असला तरी प्रचंड विषमता विविधता भारतात आहे
आता कसं वाटतयं?

आर्थिक विविधता?
त्यांचा पूर्ण प्रतिसाद विचारात घेता त्यांचा आर्थिक विषमतेचा मुद्दा आहे.

आर्थिक विषमता विषयी च नी माझ्या पोस्ट मध्ये स्पष्ट लीहले
आहे.
गरिबी हे एक महत्वाचे कारण आहे लवकर लग्न होण्या मागे.
आणि दुसरे न कळत्या वयात प्रेम प्रकरण.

आणि तिसरे अगदी दुर्मिळ कारण म्हणजे जुनाट विचारांचा पालकांवर पगडा
त्या साठी सरकार योजना पण आघत असते..
मुलींना मोफत शिक्षण,मोफत प्रवास,शाळेत जेवणाची व्यवस्था.
त्या बरोबर आर्थिक मदत पण सरकार नी अशा कुटुंबांना केली तर फरक नक्कीच पडेल.
फक्त कायदा करून भागणार नाही

<< लहान वयात मुली न ची लग्न कोणत्या कोणत्या भागात,जिल्ह्यात, जास्त होत आहेत त्याचा डेटा हवा.
कोणत्या धर्मात,जातीत,समाज घटकात होत आहेत त्याचा पण डेटा हवा .
आणि आर्थिक गटाचा पण डेटा हवा.
आर्थिक समस्या ही सामाजिक समस्या शी निगडित आहे.
मुलांची संख्या, लवकर लग्न होणे ह्याचा सरळ संबंध आर्थिक स्थिती शी आहे. >>

------- डेटा हवा या बद्दल १०० % सहमत. कुठला भाग शिक्षणांत मागे आहे, १८ वर्षांखाली विवाह कुठल्या (आर्थिक, शैक्षणिक ) स्तरांत जास्त होत आहे, याबद्दलचा डेटा माहित असणे महत्वाचे आहे. यासाठीच दर दहा वर्षांनी जनगणना घेणे महत्वाचे आहे. २०२१ मधे होणार होती, अजून झालेली नाही आहे.

कॉमी यांच्या प्रतिसादानंतर NFHS काय आहे हे बघितले. " representative sample of households throughout India... " असे असले तरी qualitative डेटा म्हणून बघायला हरकत नाही.

https://india.unfpa.org/sites/default/files/pub-pdf/analytical_series_1_...

१८ व्या वर्षापूर्वी लग्न व्हायचं प्रमाण कमी होतं आहे हीच त्यातल्या त्यात चांगली बाब आहे ( लॉकडाउनमध्ये ट्रेंड रिव्हर्स झाल्याचं वाचलं होतं)
In 1992-93, almost two-thirds of women got married before 18 years, while during 2019-21, only a little less than one-fourth (२३.३%) of the women aged 20-24 years were married before the legal age उदय यांनी दिलेल्या युनिसेफच्या आकडेवारीनुसार सध्या Nearly 16 per cent adolescent girls aged 15-19 are currently married. ".

केरळ नंबर १.
या बद्दल वेगळा धागा काढायला हवा... शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा, बेरोजगारी, आर्थिक विषमता अशा अनेक क्षेत्रात क्रमांक १ वर आहे.

केरळ च कौतुक आहेच पण मला जास्त जम्मू आणि काश्मीर च कौतुक वाटतं आहे.
अस्थिर वातावरणात, अतिरेकी कारवाया मुळे भीती च्या वातावरणात आणि मुस्लिम लोकसंख्या जास्त असून पण त्या राज्यात मुलींचे कमी वयात लग्न होण्याचे प्रमाण कमी आहे..महाराष्ट्र गुजरात सारख्या राज्यांना पण त्यांनी मागे टाकले आहे

राधानिशा, तुमची मानसिक तडफड कळते आहे. युट्युब वर व्हिमो व्हि आय एम ओ एच ह्याची दोन चॅनेल आहेत ती जरुर बघा. एथिजम धर्म पावर स्ट्रक्चरस वगैरे बद्दल जास्त क्लॅरिटी मिळेल. तुम्हाला तुमची उत्तरे सापडोत ह्या साठी शुभेच्छा. आपले शोषण होत आहे हे देखील महिला वर्गाला समजत नाही इतके घट्ट सोशल कंडिशनिन्ग असते. ती फ्रेम मुळातून तोडल्या शिवाय उत्तरे सापड्णार नाहीत.

मला धाग्याचा रोख बदलावयाचा नाही, तरी अगदी राहवत नाही म्हणून लिहीत आहे. वर कुणीतरी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) चा उल्लेख केला आहे; त्याबद्दल जरा माहिती द्यायची आहे. NFHS हा भारत सरकारद्वारे (USAID, UNICEF व WHO) च्या मदतीने १९९२-९३ पासून विशिष्ट अंतराने केला जाणारा सर्वे आहे, जो इतर अनेक विकसनशील व अविकसित देशांमध्ये डेमोग्राफिक अँड हेल्थ सर्वे (DHS) नावाने ओळखला जातो. विशेषतः भारत सरकार, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलशन सायन्सेस, देवनार, मुंबई (मी ज्या इन्स्टिटयूट मधून मास्टर्स, एमफिल व PhD केले आहे) च्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात NFHS करतो. आपल्या देशात जनगणना होत असली तरी तिचा खर्च, व्याप, मनुष्यबळ, देशाचा आकार व लोकसंख्या लक्षात घेता ती दर १० वर्षांनी होते (यूके वा जपान मध्ये दर ५ वर्षांनी होत असल्याचे ऐकिवात आहे). शिवाय जनगणनेचा संपूर्ण डेटा यायला काही वर्ष लागू शकतात. म्हणून विशिष्ट अंतराने होणाऱ्या NFHS/DHS ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या सर्वेत संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यावर प्रातिनिधिक सॅम्पल्सचा डेटा गोळा केला जात असे. तथापि, NFHS ४ (२०१५-१६) पासून प्रत्येक जिल्हास्तरावरील प्रातिनिधिक सॅम्पल्स घेतले जातात. ह्या सर्वेच्या अंमलबजावणीत सरकारची आर्थिक मदत व देखरेख असली तरी थेट सहभाग नसल्याने फाइण्डिंग्स अर्थपूर्ण मानल्या जातात (देशपातळीवर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलशन सायन्सेस, देवनार, मुंबई नेतृत्व करत असते, पण तरीही तिचाही डेटा गोळा करण्यात थेट सहभाग नसतो तर प्रत्येक राज्याचा विस्तार लक्षात घेता डेटा गोळा करायला १-३ एजेंसीज निवड करते) ज्यावर आपल्या देशाचे आरोग्य कार्यक्रम, व धोरण ठरतात.

मात्र अलीकडच्या काळात सरकारला NFHS च्या काही फाइण्डिंग्सवर आक्षेप आहेत, जसे राज्यांतील/जिल्ह्यातील हागणदारीमुक्त प्रमाण, स्वच्छ इंधनाचा वापर (देश १००% चे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर असला तरी अनेक राज्यांत/जिल्ह्यांत परिस्थिती वेगळी आहे), व रक्तक्षयाचे ५ वर्षे पूर्व बालक (०-५९ महिने) व महिलांमधील (१५ - ४९ वर्षे) प्रमाण. सरकारच्या मते स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपूर्ण देश १०० हागणदारीमुक्त झाला आहे, तर उज्वला योजनेअंतर्गत संपूर्ण १०० घरांत स्वच्छ इंधनाचा वापर होत आहे. ह्याची परिणती नुकतीच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलशन सायन्सेसच्या डायरेक्टरच्या निलंबनात झाली आहे.

वर कुणीतरी NFHS ला क्वालीटेटिव्ह डेटा म्हणून अन्नुलेख केला आहे, त्यामुळे मला फार वाईट वाटले. कारण मी NFHS-४ (२०१५-१६) व NFHS-५ (२०१९-२०) ची अंमलबजावणी जवळून प्रत्यक्षात पहिली आहे. त्यात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलशन सायन्सेसचे आजी व माजी डायरेक्टर व इतर समन्वयकांचे देशाला उत्तम डेटा मिळावा म्हणून कष्ट बघितले आहे.

राहुल, चांगली माहिती. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक माहिती देणारा असा अर्थ मी घेतला. तो शब्द नकारात्मक आहे का?

राहुल, चांगली माहिती. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक माहिती देणारा असा अर्थ मी घेतला. तो शब्द नकारात्मक आहे का?>> नाही पण Accuracy कमी मानली जात असेल. गुगल म्हणतो
A big advantage of quantitative data is that it's relatively quick and easy to collect, meaning you can work with large samples. At the same time, quantitative data is objective; it's less susceptible to bias than qualitative data, which makes it easier to draw reliable and generalizable conclusions.

Qualitative research is very important in educational research as it addresses the “how” and “why” research questions and enables deeper understanding of experiences, phenomena and context. Qualitative research allows you to ask questions that cannot be easily put into numbers to understand human experience.

“how” and “why” हे कुठल्याही सरकारला आवडत नाही.

National Family Health Survey of India बद्दल येथे मला माहिती मिळते.
http://rchiips.org/nfhs/

विविध रिपोर्टस आणि डेटा तिथे बघायला मिळतात. कुठलाही डेटा बघतांना Sampling size/ criteria महत्वाचे आहे. त्याच वेबसाईट वर पुढील वाक्य आहे.

" The National Family Health Survey (NFHS) is a large-scale, multi-round survey conducted in a representative sample of households throughout India. "

डेटा गोळा करतांना काही निकष लावले असतील आणि एक सँपल साईज ठरविला असेल म्हणून त्यांनी representative sample of household असे म्हटले आहे. १००० असेल, १०००० असेल किंवा अजून मोठा आकडा असेल. जिल्ह्याच्या २ % संख्या असेल - मला माहित नाही.

डेटा प्रत्येक घराचा/ व्यक्तीचा मिळाला असता तर Quantitative Data असे म्हटले असते. आणि असा डेटा केवळ आणि केवळ जनगणने मधूनच मिळणार आहे.

जनगणना कितीही खर्चिक असली तरी दहा वर्षांनी न करण्याचे नुकसान त्यापेक्षा मोठे आहे. जनगणने संबंधात मी सुरु केला होता धागा. राहुल, तुमच्या कडे जनगणाने संबंधांत माहिती असेल तर जरुर लिहा.
https://www.maayboli.com/node/83435

डेटा कुठल्याही ( Qualitative Vs Quantitative) प्रकारचा असला तरी त्याने डेटाचे महत्व कमी होत नाही.

काही मोजकेच सर्व्हे सोडले तर .
(जसे जनगणना, )
सर्व सर्व्हे हे सँपल सर्व्हे च असतात.
विज्ञान विषयी सर्व सर्व्हे हे सँपल सर्व्हे चे असतात .
नवीन औषध निर्मिती ची मान्यता पण सँपल सर्व्हे वर च मिळते

राहुल, चांगली माहिती. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक माहिती देणारा असा अर्थ मी घेतला. तो शब्द नकारात्मक आहे का? >>> माफ करा, माझा गैरसमज झाला होता.

डेटा कुठल्याही ( Qualitative Vs Quantitative) प्रकारचा असला तरी त्याने डेटाचे महत्व कमी होत नाही >>> अगदी बरोबर आहे.

काही मोजकेच सर्व्हे सोडले तर .
(जसे जनगणना, )
सर्व सर्व्हे हे सँपल सर्व्हे च असतात.
विज्ञान विषयी सर्व सर्व्हे हे सँपल सर्व्हे चे असतात .
नवीन औषध निर्मिती ची मान्यता पण सँपल सर्व्हे वर च मिळते >>> तुमचं मत खरे आहे मग तुमचा आक्षेप नेमका कुणा वा कशावर आहे?

ऑन ऍ लायटर मोड, मला वाटत आता सगळ्यांचा Research Methodology चा वर्ग घ्यावा लागेल. तर Qualitative Research अँड Qualitative Data ह्या पूर्णतः वेगळ्या बाबी आहे, त्यांची सरमिसळ करू नये. तर NFHS व जनगणनेमध्ये Quantitative अँड Qualitative Data दोन्ही आहेत. जेव्हा आपण एखादा data चे परीमाण, प्रमाण, वा माप (Quantity) मोजू शकत नाही तर केवळ संख्या (Frequency, जी शक्यतोवर नंबर ऑफ सॅम्पल्स (N) आणि त्याचे percentage दिली असते (%)) मोजू शकतो त्याला Qualitative Data म्हणतात. जसे, १. लिंग (पुरुष, स्त्री, आणि तृतीयपंथी), २. धर्म (हिंदू, मुस्लिम, आणि इतर) इत्यादी. ह्याद्वारे आपण केवळ संख्या मोजतो. तर जेव्हा एखाद्या data चे डिरेक्टली परीमाण, प्रमाण, वा माप (Quantity) मोजल्या जाते त्याला Quantitative Data म्हणतात. जसे, १. उंची, २. वजन, ३. सिरम ग्लुकोज लेवल, ४. वय इत्यादी.

Qualitative Research: जेव्हा कोणत्याही research मध्ये केवळ कारणे, हेतू, attitude, knowledge, behavior वा practice चा डेटा वापरला जातो, त्याला Qualitative Research म्हणतात.
समजा घरात (विशेषतः ग्रामीण भागात) टॉयलेट असले तरी ते का किंवा/आणि कसे किंवा/आणि का वापरलया जात नाही ते जाणून घेणे म्हणजे Qualitative Research होय. घरांमध्ये वैयक्तिक, सामुदायिक व विभागून टॉयलेट का नाहीत? कदाचित पाण्याची कमतरता असेल, किंवा पाण्याची साधने घरापासून फार लांब असतील. (जे वरती mandard ह्यांनी लिहिलं आहे)

Quantitative Research: जेव्हा कोणत्याही research मध्ये केवळ Quantitative Data वापरला जातो, त्याला Quantitative Research म्हणतात.
Quantitative Research मध्ये किती घरांमध्ये वैयक्तिक टॉयलेट आहे, किती घर सामुदायिक व विभागून टॉयलेट वापरतात, आणि किती घरांमध्ये वैयक्तिक, सामुदायिक व विभागून टॉयलेट नाहीत म्हणजे जी खुल्यास शौचास जातात.

Mixed Research: पाश्चिमात्य देशांत रूढ झालेली Mixed Research ची पद्धत आता भारतासारख्या विकसनशील व अविकसित देशांतही वापरली जाते.
किती घरांमध्ये वैयक्तिक टॉयलेट आहे, किती घर सामुदायिक व विभागून टॉयलेट वापरतात, आणि किती घरांमध्ये वैयक्तिक, सामुदायिक व विभागून टॉयलेट नाहीत म्हणजे जी खुल्यास शौचास जातात. त्यासोबतच त्याची कारणेही जाणून घेणे म्हणजे Mixed Research होय.

डेटा प्रत्येक घराचा/ व्यक्तीचा मिळाला असता तर Quantitative Data असे म्हटले असते. आणि असा डेटा केवळ आणि केवळ जनगणने मधूनच मिळणार आहे >>> हे मात्र अर्धचुकीचं विधान आहे. प्रत्येक घराचा/ व्यक्तीच्या Data ला जनगणना किंवा Complete Enumeration असेही म्हणतात (ह्यात प्रत्येक घराची व घरातल्या प्रत्येक व्यक्तीची गणना केली जाते. शिवाय भारताची लोकसंख्या जाहीर करण्याच्या आदल्या रात्री अगदी बेवारशी, बेघर व निराधार (मंदिर, रेल्वे स्टेशन वा फूटपाथ/पुलाखाली राहणारी) चीही संख्या मोजली जाते). तर जनगणनेतही Quantitative (जसे, वय, एकेरी वर्षात शिक्षण (एमएससी व्यक्ती कमीत कमी १७ वर्षे शिकला असेल) आणि Qualitative Data (जसे, पुरुष, स्त्री, व तृतीयपंथीची संख्या (सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जनगणना २०११ पासून तृतीयपंथीची संख्या वेगळी मोजली जाते)) गोळा केला जातो.

NFHS व जनगणनेबद्दल अधिक माहिती संबंधित रिपोर्ट्समध्ये सविस्तर दिली आहे, कृपया ती वाचू शकता. विशेषतः इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉपुलशन सायन्सेस, देवनार, मुंबईच्या लाइब्ररीत अगदी पहिल्या जनगणनेपासूनचा (१८८१) Data आहे.

@radhanisha: माफ करा, मला तुमच्या धाग्याच्या रोख अजिबात बदलावयाचा नाही. मीही तुमच्या बर्याचश्या मतांशी सहमत आहे.

Pages