बरंचसं कॉपी पेस्ट आहे , गुलमोहर हे योग्य सदर सिलेक्ट केलं आहे की नाही हेही समजत नाही . धागा दुसऱ्या सदरात कसा हलवायचा ते माहीत नाही . त्यामुळे नियमांच्या बाहेर पोस्ट झाली असल्यास धागा उडवला जाऊ नये ही विनंती .
स्त्रीजन्माची सार्थकता गृहव्यवस्था व शिशुसंगोपन यांतच आहे. आदर्श स्त्री तीच कीं, जी सुमाता व सुगृहिणी असते आणि याच तत्त्वावर स्त्रियांना जर्मनींत घराबाहेरच्या कोणत्याही धंद्यांत वा व्यवहारांत न पडण्याचे पाठ आज मिळत आहेत त्यांच्या नाजूक व प्रेमळ प्रकृतीला अपत्यसंगोपन, रुग्णपरिचर्या, यांसारखीं वत्सलतेचीं किंवा गृहव्यवस्था, पाकसिद्धि, शिक्षण, कशीदा, यांसारखीं लालित्यपूर्ण कामेंच योग्य. गृह हेंच त्यांचे कार्यक्षेत्र व सुगृहिणी बनणें हाच त्यांचा आदर्श... अशा प्रकारच्या ज्ञानानेंच आर्यमहिलांचा उद्धार होणार आहे. एवंगुणविशिष्ट स्त्रीरत्नें जेव्हां घराघराला शोभवितील, तेव्हांच घरोघर सुख, समाधान, संपन्नता, सुशीलता व स्वदेशाभिमान नांदू लागतील. "
-
स्त्रीशिक्षण सुधारणेचें दिग्दर्शन - या सदराखालीं 'सह्याद्रि' मासिक .
ऋग्वेदकालीन विवाहाची वयोमर्यादा कशी होती हैं सप्रमाण दर्शवून श्रीदत्तजन्माची एक सुंदर गोष्ट त्यांनी सांगितली आहे . ती पाहातां स्त्रियांचें वैवाहिक जीवन किती उच्च व पवित्र आहे, तसेंच ब्राह्मणांच्या मुलांना जशी मुंजीची आवश्यकता, तशीच स्त्रियांना विवाहाची आवश्यकता आहे, हेंही दिसून येतें. स्त्रियांना विवाहविधीच वैदिक संस्कार, पति सेवाच गुरुकुलवास व गृहकृत्येंच त्यांचें अग्निहोत्र असें मन्वादि स्मृतिकार म्हणतात ' यांत किती अर्थ भरला आहे, पवित्र अंतःकरणी स्त्रियाच जाणूं शकतील
यानंतर असवर्ण अथवा भिन्नवंशीय विवाहाबद्दल सुधारलेल्या जर्मन लोकांचं निषेधात्मक मत सांगून, हल्लींचें संततिनियमन किती राष्ट्रबलविघातक आहे हें सांगितलें आहे. 'समाजाचा चारी बाजूंनीं होत असलेला अधःपात धर्मवीर अशा आर्य महिलांनींच मनावर घेतल्यास बंद होईल ' अशी इच्छा प्रगट केलेली किती सत्य आहे हें तशा स्त्रियाच जाणूं शकतील.
संततिनियमनाच्या घातक चालीपासून लोकसंख्येवर व आरोग्यावरसुद्धां कसा भयंकर परिणाम होतो हें सप्रमाण दाखविण्याच्या उद्देशाने हल्लीं आस्ट्रिया देशांतील राजधानीच्या शहरीं एक जंगी प्रदर्शनही उघडण्यांत आल्याचें वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालें आहे ! प्रथम त्या चालीच्या ' गुणाचा ' दुंदुंभी पश्चिम दिशेत वाजलेला आमच्या लोकांच्या कानीं पडला व ती चाल येथें सुरू झाली; तसा त्या चालीच्या दोषाचा ' दुंदुभीही कानीं पडला पाहिजे, म्हणजे मग आमचे लोक सावध होतील. पण तो केव्हां पडतो पाहावें !
आमच्या पूर्वजांनीं मानवी स्वभावाचा चांगला अभ्यास करूनच विवाहसंस्था सुरू केली आहे व त्या सर्वाना धर्माच्या दावणीत अशा रीतीनें गोवून टाकले आहे की मानवांना त्यायोगें 'भोगांतही मोक्ष' साधतां येईल ! पण आपल्या धर्माच्या आचारविचारांचं थोड्या दमानें मनन करतील तेव्हांच ना त्याच्या रहस्याचा प्रकाश होईल ! असो.
■■■
'उठा, चहा घेतां ना ? उठा.' म्हणत नर्सनं त्यांना उठवलं, तेव्हां त्यांना अगदी ओशाळल्यासारखं झालं.
'काय ग बाई तरी झोप !' म्हणत त्यांनीं रग कमरेपर्यंत बाजूला सारला आणि किंचित् उठण्याचा प्रयत्न केला. चहा फार चवदार होता. चहाबरोबर टोस्टही होता. त्या हळुहळू फराळ करीत होत्या आणि नर्स त्यांच्या शेजारीच बसून होती. त्यांचीं गेलीं तीन बाळंतपणं याच नर्सनं केली होती. दोघींनाहि एकमेकींविषयीं स्नेहभाव वाटत होता.
'माई, हीं दोन बाळंतपणं तुम्हांला बरींच जड गेलीं हो. फार थकला आहांत. असं बरं नाहीं. पहांटे तर शेवटी शेवटीं मी घाबरलेंच. म्हटलं, धडपणी बाई सुटते की नाहीं ! तुमच्या अंगांत ताकदच राहिलेली नाहीं. '
'गेल्या चार वर्षांत मला बरं नाहीच आहे. कधीं डॉक्टरकडे गेलं की म्हणतात, 'विश्रांती घ्या.' आपलं ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. ' माई क्षीणपणानं हसल्या.
,
'आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला पाहिजे, बाई ! माईंनी एक आवंढा गिळला; आणि त्या बराच वेळ स्तब्ध बसून राहिल्या.
दर महिना रुपये चाळीस अधिक म. भ. पंचवीस मिळवणाऱ्या एका प्राथमिक खाजगी शाळेतील शिक्षकाचा संसार माईंना लाभला होता. प्रथम त्याही नोकरी करीत होत्या. पण तीन मुलं होईपर्यंत त्यांची नोकरीची धडपड टिकून राहिली. चवथ्या खेपेला डोहाळे लागतांच त्यांनीं नोकरीचा राजिनामा दिला होता. आणि मास्तरांनीं आणखी दोन शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यांच्या संसाराचं स्वरूप हे असं ओढाताणीचं होतं.
या ओढाताणीच्या जाणिवेनं माईंची जीभ ओढल्यासारखी झाली. कष्ट तर होतेच, पण आणखीहि पुष्कळ होतं. कष्टापेक्षाही तेच त्यांना कासावीस करून टाकत होतं. त्या हळुहळू बोलायला लागल्या. त्यांचा आवाज किंचित कापरा होता.
'ताई, कुणाचं शरीर अन काय ? ज्या दिवशीं हें शरीर दुसन्याच्या स्वाधीन केलं त्याच दिवशीं शरीराचा दगड व्हायला सुरवात झाली. आतां त्याला स्वतःचं सुख - इच्छा - वासना - कांहींच नाहीं. शुद्ध दगड झालं माहे. त्याची काय काळजी घ्यायची -'
'असं का म्हणतां ? मुलं लहान आहेत. एकच काळजी घ्या. आता पुन्हा-'
' - बाळंतपण नको, असंच ना ?' माई रुक्षपणानं हंसल्या.
त्यांचं हें सहावं बाळंतपण. ज्याला हें कळे तो हेटाळणीनं किंचित हसे. किती किती मुलं - किती मुलं ? छे माईंना तें भारी बोचायचं. पण - पण 'पण' कसा सुटणार ?
मुलं फार नसावीत हें त्यांना कळत नव्हतं असं थोडंच होतं ? पण कळूनही वळत नसणाऱ्या अशा गोष्टी असतातच कीं !
कालचींच सलणारी शल्यं, आणि उद्यांचे रोखलेले भाले; शरीराचे कष्ट आणि मनाचे शीण; नोकरीच्या याचना आणि संसारांतल्या विवंचना ;
-
साऱ्या गोष्टी माणसाला विसरायला हव्या असतात. क्षणभर त्या यांपासून दूर कुठं तरी विसावा हवा असतो. कुणी त्यासाठी दारूकडे ळतो, तसच कुणी - व्यसनी माणसाला व्यसनाची वाईट बाजू माहीत नसते असं थोडंच असतं ? पण माहीत असूनही त्याचा उपयोग काय होणार ? सारं कांहीं उगीचच. आणि म्हणूनच अगदीं कातर आवाजांत माई म्हणाल्या,
'ताई, कुणाला अन काय सांगायचं ? बाळंतपणाचा महिना जिथं अगदीं कसाबसा कोरा जातो- '
'बाई ग ! ' त्या नर्सच्या डोळ्यांत टचकन पाणी उभं राहिलं.
'पण मास्तर फार चांगले आहेत. त्यांची माझ्यावर माया नाहीं असं नाहीं. माझ्यासाठी त्यांचा जीव सारखा तुटत असतो. '
' हें त्याचंच लक्षण वाटतं ? '
'असं नाहीं हो. तेही माणूसच आहेत ना ? तुम्हाला सांगतें, जोंपर्यंत माझं मनही दगड बनलं नव्हतं, तोपर्यंत खूप प्रयत्न केले मी. पण व्हायचं काय ? सदा धुसफूस, चिडचीड, अबोला, असाच सारा दिवस - - कधीं त्यांनीं ताडकन् दार उघडून बाहेर निघून जावं, कधीं मी रागारागांत पोरांत येऊन झोपावं. काय फायदा त्याचा ? शेवटीं आतां मनाचाही दगड झाला आहे बघा. दगड, नुसता दगड ! जीव आहे इतकंच काय तें - '
नर्सनं डोळ्याला पदर लावला.
.....
असंच आपलं बाळ सदोदित लहान असावं आणि आपणही असंच सारख सारखं पडून रहावं. कुणी यावं, चहा द्यावा, कुणी ताट वाढून आणावं. जेवण तरी किती सुग्रास लिंबाचं लोणचं, लसणाची चटणी, भरपूर तूप, आणि वाफा येत असलेलं गरम गरम अन्न -
घरीं असं कुठे असणार ? नेहमींच अपुरं जेवण भाजी असेल तर आमटी नाहीं. तूप तर पहायलाही मिळत नाहीं. आणि कढत अन्न जेवण्याचं सुख - तें तरी कुठं मिळतं ? रोज मास्तरनां शाळेत पाठवायचं, मुलांचं आवरायचं, आणि मग पितळींत वाढून घ्यायचं. तोंवर भाताचे डिखळे आणि आमटीचं कोमट पाणी झालेलं असायचं. उजव्या डाव्या बाजूचं कालवण मुलांच्या तडाख्यांतून उरलं तर भाग्य ! पण इथं या जेवणांत त्यांना एक प्रकारची चैन वाटायची. चाखत माखत त्या जेवायच्या. चार घास अधिकही जायचे.
बाळ झोपलं कीं इतर खाटांकडून फेरी काढायची.
साऱ्याच बाळंतिणी वॉर्डातल्या आणि म्हणूनच समदुःखी .. कुणाचं चवथं, कुणाचं सातवं अशीं बाळंतपणं. त्यामुळं भेटीलाही सहसा कुणी यायचं नाहीं. कोपऱ्यातील खाटेवर एक पहिलटकरीण होती. तिचा नवरा रोज तीनदां यायचा. साऱ्या वाळंतिणी त्याच्याकडे पाहून कुत्सितपणानं हसायच्या. माईही आंवढा घोटून त्या चेष्टेंत सामील व्हायच्या. प्रत्येकीच्या घरचे अनुभव, बाळंतपणांतील खोडी, नवऱ्याचे स्वभाव चर्चेला निघायचे आणि या रसाळ गप्पांत वेळ कसा जायचा तें समजायचंही नाहीं.
रात्री अगदीं गाढ झोपावं. मूल दाईच्या स्वाधीन असायचं. रडेल बिडेल कांहीं काळजी नको. खरंच किती सुखाचे दिवस !
·
त्यामुळं दहाव्या दिवशीं रात्रीं माईंना उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. स्वतःच्या घरीं जायला मन घेईना .-
ते सारं घर - ती चूल - तें रेशन- तें धुणं तीं भांडीं मुलं- आजारपण नवऱ्याचा राग--सारं सारं भुतासारखं त्यांना भेडसावायला लागलं. मुलाला छातीशी घेऊन त्या स्वतःला विसरू पहायला लागल्या.
या रात्रीच्या शिणानं सकाळीं त्यांना जाग आली, त्या वेळी कमी येऊन तयार होती. आज अकरावा दिवस. आज त्यांना तिथं चहा मिळणार नव्हता. त्या मुकाट्यानं उठल्या.
तूं आलीस ?' आपले कपडे आवरत त्यांनी कमीला विचारलं.
'बाबा म्हणाले, मी घरांतलं करतों, तूं आईला आणायला जा, म्हणून आलें मी.'
तिच्या कडेवरील शरू हात पुढं करीत म्हणाली,
'आई, बाबा शिला कलतायत. '
माई उगीचच हसल्या.
त्यांनी मुलाला कपडे चढवायला सुरवात केली. तें दहा दिवसांचं सुख अजून त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. मुलाला टोपरं घालतां घालतां त्यांच्या मनांत विचार आला,
'आतां आजपासून पुनः कष्ट - पुनः कामं - शरीरांत प्राण असेपर्यंत उभं रहायचं आणि -- आणि -- कसली तरी किळस त्यांच्या शरीरांत थरकांप उडवून गेली, पण लगेच खुदकन् त्या हसल्या. पुनः वर्षा सव्वा वर्षांनीं असा परत विसावा -- तें हसू त्यांना कोयनेलसारखं लागलं. त्यांनीं मुलाला बाळंत्यांत नीट गुंडाळलं, छातीशी धरलं, माथ्यावरून नीट पदर घेतला. सामानाचं गाठोडं कमीच्या हातांत दिलं. आणि समोर असलेल्या दाईच्या नर्सच्या हातावर चार आणे, आठ आणे ठेवीत त्या हळूहळू जिना उतरल्या. दाराशीं धमणी उभी होती. गाडीवानानं दार उघडतांच, मुलाला सावरत त्या हलकेच धमणींत चढल्या. पुनः घरी निघाल्या.,
इंदिरा संत - कथासंग्रह कदली .
"डॉक्टर, मला आजारी पडायचंय, औषध द्या. चांगली दीड-दोन महिने तरी अंथरुणावर पडले पाहिजे. "
"अगं, लोकांना आजारी पाडण्यासाठी का डॉक्टर असतात? आणि अंगावरून पांढरं जाणं, कंबरदुखी, अशक्तपणा या तक्रारी आहेतच तुझ्या. आणखी आजारी पडून अंथरुणावर खिळलीस तर मुलांना, नवऱ्याला जेवायला कोण घालेल ?"
"खाऊन खाऊनच नवरा माजतो अन् छळतो मग-"
नवरा छळतो म्हणजे काय याचा उलगडा मला लगेच होईना. कारण ही बाई माझी जुनी पेशंट. दोन मुलं झाल्यावर तिने संतती - प्रतिबंधक शस्त्रक्रियासुद्धा करून घेतली होती. नवरा एक फॅक्टरी कामगार, मिळकत बऱ्यापैकी, आणि निर्व्यसनी होता.
"दारू पिऊन त्रास द्यायला लागला की काय तुझा नवरा ! कधी बोलली नाहीस तू याआधी ?”
" व्यसन वगैरे काही नाही हो. आता कसं सांगावं तुम्हाला ? अहो, त्यांना रोज संबंध लागतो. कधी कधी रात्रीतून दोन-दोन वेळासुद्धा माझं मढं जागं करतात. नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. हा छळवाद नाहीतर काय?"
ही बाई तशी जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली. लग्न लवकर झालं होतं. आता एकोणतीस-तीस वर्षांची असेल. अजाणतेपणे तिने लैंगिक मार्गदर्शन या विषयाला हात घातला. नवऱ्याला याबद्दल काही बोलली आहे का ते मी विचारलं. नवऱ्याजवळ तिने विषय काढल्यावर त्याने तिला उडवून लावलं होतं.
नुसतं गप्प पडून राहण्यात तुला कसला त्रास होतो असंच त्याने विचारलं.
"बाकी काही त्रास देत नाहीत हो. फॅक्टरी सुटली की सरळ घरीच येतात. खाणं पिणं, कपडालत्ता कशालाही कमी करत नाहीत. पण हा त्रास सहन होत नाही मला. पाळीचे चार दिवस सुद्धा कटकट करतात. रोज विचारतात, थांबलं का नाही? आता ते काय माझ्या हातातलं आहे का?"
बाईच्या नवऱ्याला मी बोलावून घेतलं. तुमच्या बायकोची इच्छा लक्षात न घेता तुम्ही रोज समागम करता त्यामुळे तिला अंगावरून पांढरं वगैरे त्रास होतो, हे मी त्याला समजावून सांगितलं.
नवऱ्याचं उत्तर वेगळंच,
"मला नाही तसं वाटत. संबंध करतो म्हणजे काय मारपीट करतो का? लग्नाला पंधरा वर्षं तर झाली. माझं काय वय झालं का? संबंध रोज करायची इच्छा होते मला, अन् होणारच, त्यात काय पाप आहे का? हक्काची बायको आहे, का बाहेर जातोय कुठे मी? तिच्या त्रासावर तुम्ही औषधं देतच आहात आणि बाईच्या इच्छेचा प्रश्न येतोच कुठे? पुरुषाच्या उत्तेजनांवर सगळं अवलंबून आहे. वेश्या धंदा कोणासाठी करतात, पुरुषांसाठीच ना?" असा प्रश्न विचारून त्याने मोठ्या दिमाखात हास्य केलं.
स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीची इच्छा, समाधान, त्यातला आनंद याबद्दल मी त्याला मार्गदर्शन केलं, पण तो ते काही पटवून घेत नव्हता. अन् वर म्हणाला,
" इतर, अगदी सुंदर, शिकलेल्या, मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या बायकांचं असेल तुम्ही म्हणता तसं कामेच्छा वगैरे पण माझ्या बायकोचं तसं काही नाही. मला माहीत आहे तिचा स्वभाव पहिल्यापासून. दुसरा काही घरात त्रास नाही. मी दारू पीत नाही. आता एवढीही स्वतःची हौस करू नये का माणसानं ?"
आता याला काही शिकवण्यात अर्थ नव्हता. तेव्हा याच्या बायकोलाच शिकवलं पाहिजे, असं मी मनाशी ठरवलं.
- डॉ लीना मोहाडीकर - कामविश्व संसारिकांचे
" स्त्रियांमध्ये सती, पतिप्रेमिका, साध्वी आणि पतिव्रता अशा चार पाय-या आहेत.
( १ ) केवळ स्वपतीवरच ज्यांची निश्चल प्रीति असते, अर्थात् ज्या कुवर्तनी नव्हेत, त्यांना सती म्हणावें. पण अशा सर्व सतींना पतिप्रेम पूर्णपणे जिंकता येतें असें नाहीं.
( २ ) सतीप्रमाणे शरीराचें व मनाचें पावित्र्य राखतातच, शिवाय बुद्धीच्या चतुराईनं ज्या स्त्रिया पतीचं चित्त नेहमी प्रसन्न राखूं शकतात, त्या 'पतिप्रेमिका'
समजाव्या.
( ३ ) सतीत्व व प्रतिप्रेमिकत्व असले म्हणजे तेवढ्यानं साध्वीत्व येतं असें नाहीं. ( ' साधु ' शब्दाचें स्त्रीलिंगी रूप ' साध्वी' होय. ) व्यवहारांत एखादा मनुष्य नीतिमान् व सज्जन असला तरी तेवढ्याने त्यास साधु म्हणतां येणार नाहीं. सज्जनपणा + कडक उपासना + भूतदया + तितिक्षा + परोपकार + परमार्थाभ्यास, इत्यादि मिळून साधुत्व. त्याप्रामाणें सतीत्व + पतिप्रेमिकत्व + वरील गुण, मिळून 'साध्वीत्व ' येतें.
( ४ ) सती, पतिप्रेमिका व साध्वी या तिघींच्या गुणसमुच्चयानेंच केवळ पतिव्रता पदवी प्राप्त होऊं शकणार नाहीं ; तर वरील तीनही गुण + पतिदेहावर व पतिजीवावर ईश्वरबुद्धीची अचल धारणा धरणारीच ' पतिव्रता ' पदवीस पात्र होऊं शकते. पतीशिवाय दुसरें व्रतच जिला माहीत नाहीं, तीच पतिव्रता ('पतिरेव व्रतं यस्या अखंडा सा पतिव्रता ' ) होय. पतिस्वरूपावर याप्रमाणे जिची वृत्तीची अखंड धारा .
- धर्मग्रंथ .
एक दमयंतीचा अपवाद सोडला, तर पुराण काळापासून प्रथेप्रमाणे एकदा लग्न करून मुलगी सासरघरी गेली की, तिचा माहेरचा 'शेर' संपला. कधी माहेरपणाला आली, तर चार दिवसांचे कौतुक. बाकी त्रास होत असेल तरी सहन करून मन मारून तिथेच तिने राहावे.
तेव्हापासून ते आजघडीला विज्ञानयुगातसुद्धा काही फारसा फेरफार झालेला नाही. परवाच एका स्त्रीची कथा ऐकली आणि थक्क झाले.
बाई चुणचुणीत, एस. एस. सी. पर्यंत शिकलेली, टायपिंग येत होते. पार्टटाईम नोकरी करायची. सगळ्या गोष्टीत अतिशय हौस होती आणि थोडक्या पैशात नीटनेटका संसार चालवत आनंदी राहत होती. नवरा शेतीच्या कामाकरता गावी गेला होता. घरी आल्यावर बायकोला दिवस राहिलेले बघून त्याचे डोकेच फिरले. “हे मूल माझे नाही” म्हणू लागला. बायकोला घराबाहेर काढले. माहेरी नेऊन घातले. माहेरच्यांनी चार दिवस 'माहेरपण' करून तिला परत नवऱ्याकडे आणून सोडले. त्याने घराबाहेर काढले. दार लावून घेतले.
शेवटी बाईची मैत्रीण तिला घेऊन नवऱ्याकडे आली. वारंवार पटवून दिले की, तिला दिवस आधीच राहिले असले पाहिजेत. त्याची समजूत पटेना. शेवटी नेहमीच्या डॉक्टरीणबाईंकडे सर्वजण गेले. डॉक्टरीणबाईंनी दिवस मोजून सोनोग्राफी करवून घेऊन सर्व तऱ्हांनी त्याची समजूत पटवली. हे मूल आपलंच असल्याची त्याची खात्री पटली. बाईला त्याने 'उदार अंत:करणाने' घरात घेतले. आता बाई बदलूनच गेल्यात.
आधी त्याने भरपूर शिवीगाळ केली होती व पोटात एवढ्या लाथा घातल्या होत्या की, ते मूल पोटात राहिलेच नाही. गर्भपात झाला. आता बाईंचे आनंदी असणे, खळखळून हसणे, गप्पा मारणे, फुलांचे गजरे वगैरे घालणे, थोडक्यात का होईना, कपड्यांची, भांड्यांची, घर सजावटीची हौस करणे सगळे बंदच झाले आहे. जर माहेरच्यांनी थोडे पाठबळ दिले असते, जावयाला बोलवून समजावले असते, जरूर तर कानउघाडणी केली असती, तर आज जे बाईचे आयुष्य पार विसकटून गेले आहे ते गेले नसते .
- माधवी कुंटे - स्त्रीसूक्त
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय नोटाबंदीनंतर देशभरात एक गोष्ट सारखीच पाहण्यात आली . घराघरातून बाहेर नोकरी न करणाऱ्या , घरातच कष्ट उपसणाऱ्या आणि त्याचे नगद मोल न मिळणाऱ्या बायकांनी डब्याडुब्यांतून नवऱ्याच्या चोरून काही रोख पैसे साठवले होते .
किती विविध कारणं असतात हे असे चोरून पैसे साठवण्यासाठी... घरातील अडीअडचणीच्या वेळी कामी यावेत म्हणून, सणासुदीला पोराबाळांना काही चीजवस्तू घेता यावी म्हणून , माहेरचे पाहुणे आले तर त्यांच्या स्वागतासाठी कदाचित् दमडा मिळणार नाही म्हणून लाज झाकण्यापुरते आतिथ्य करता यावे म्हणून , मासिक पाळीसाठी पॅड्स विकत घेता यावीत म्हणून, आतल्या कपड्यांसाठी पैसे द्यायला नवरा रडवतो आणि घरात सांगायची लाज वाटते म्हणून... कल्पनाही करवणार नाही असली कारणं असतात बायांनी चोरून पैसे साठवण्याची.
नोटाबंदीनंतर अनेक बायकांकडे पाचशे हजारच्या नोटा साठवलेल्या पैशात होत्या. दोनतीन हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम... मोलाची बचत बिनमोलाची होऊ नये म्हणून या सगळ्या बायांनी साठवलेले पैसे नवऱ्यांकडे दिले- नोटा बदलून आणायला- कारण बँकेत जाणं हे अजूनही फक्त पुरुषांनीच करायचं असतं. बऱ्याच जणींना पैसे `बाजूला टाकल्याबद्दल चोरीचा आरोप ठेवून नवऱ्यांनी मारहाण केली. शिव्या दिल्या. पैसे बदलून आणल्यानंतर ते पैसे नवऱ्यांनीच खिशात घातले. आणि नंतर कोणत्याही प्रकारे रोख हातात देणे बंद केले.
मध्य प्रदेशमधील ऍक्शन एड संस्थेच्या वन स्टॉप ऍक्शन सेंटरने एक पाहाणी केली, त्यातून त्या राज्यातील हकीकती अहवाल रुपात आल्या आहेत . नऊ नोव्हेंबरला एका चोवीस वर्षाच्या बाईला- तिच्या चार पोरांसकट नवऱ्याने घराबाहेर काढले - कारण तिच्याकडे चार हजार पाचशे रुपये निघाले. दुसऱ्या एका आईने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या इन्सुलिनसाठी चोरून पैसे बाजूला टाकले होते . नवरोबांनी तिला मारमारून मुलीसकट बाहेर काढले .
आज स्त्रीला एका धार्मिक थेरड्याने सामग्री म्हटले म्हणून वातावरण जरासे हिंदकळले. पेटूनबिटून काही उठत नसतो आपण. त्याने ते बोलणे चूकच होते . पण त्याने फक्त जे घडते ते निर्लज्जपणे बोलून दाखवले एवढाच काय तो दोष .
नाहीतर भारताच्या शहरांत परिस्थिती जरा बदललेली असली तरी गावखेड्यांतून अजूनही हाच दृष्टीकोन आहे. प्रश्न असा आहे... या सामग्री तर सामग्रीचीही काळजी घेत नाहीत त्या सामग्रीचे तथाकथित रक्षक.
अशाच शिबिरातली एक लेक मला भेटायला लपून छपून आली. आणि रडत रडत सांगू लागली - ताई मला ना त्या वाटेने नुसतं दह्यासारखा पांढरं बाहेर येतं. आणि खाज तरी इतकी उठते की जाऊन जीव द्यावा वाटतं हो. विचारल्यावर सांगितलं की दुसऱ्या गावातला डॉक्टर पुरुष आहे- त्याच्याकडे जायचं नाही म्हणून बंदी केलीय. काय मला दाखवायचं ते त्याला दाखवणार काय म्हणतो नि शिव्या घालतो . आणि तालुक्याच्या गावी लेडी डॉक्टर आहे तिच्याकडे जायला त्याला वेळ नाही. मी करू तरी काय...
बायकोवर परपुरुषाची नजर पडू नये- आपल्या सामग्रीवर कुणाची नजर पडू नये हे मुख्य. मग त्या सामग्रीला वाळवी लागून ती कुरतडली गेली तरी बेहत्तर. ही वृत्ती भारतात रुजलेल्या सर्वच धर्मांच्या चौकटीतून पावन होते आहे. प्राचीन हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि ख्रिस्ती, इस्लाम, ज्यू- सर्वांनाच स्त्रीचे दुय्यमत्व सोयीचे पडते.
एका संपूर्ण समूहाला मालमत्ताच ठरवले की त्याचा मालमत्तेवरचा हक्कच संपतो. कायद्याच्या दृष्टीने सर्वात विकसित अशा इंग्लंडनेही तीच चलाखी केली होती. '
घरात शिजवलेलं काय खावं, किती खावं, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी काय करावं याची सत्ता आजही आपल्यातील करोडो स्त्रियांना नाही हे सत्य आहे.
***
मुग्धा कर्णिक - शब्दांचीच वस्त्रे धैर्यास माझ्या .
हे सगळं कॉपी पेस्ट झालं . आता मला काय वाटतं ते .. पतिसेवा , पतिव्रता वगैरेवर लिहिताना न थकणारे जुने जुने धर्मग्रंथ लेखक आणि एवढं लिहिण्याची वाङ्ममयीन क्षमता नसलेले पण मनातून त्याच अपेक्षा बाळगणारे असंख्य सामान्य पुरुष यांना उलटं टांगून ओल्या मिरचीची धुरी आणि चाबकाचे फटके कोणीतरी देण्याची गरज आहे .
एका वादग्रस्त ग्रंथाच्या एका प्रतीत बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उरलेलं ( उरलं तर ) अन्न खावं इथपासून बरेच नियम सांगितले होते , ती सेव्ह केलेली पानं आज कुठे सापडली नाहीत म्हणून त्यातला मजकूर इथे पेस्ट केलेला नाही .
एकूण मजकूर आठवता त्या लेखकाचा स्त्री हे अन्न पाण्यावर चालणारं शरीर नाही , ते निव्वळ हवा आणि पाणी भक्षण करून कामाचे रगाडेच्या रगाडे उपसण्याची आणि अखंड प्रसन्न वृत्ती , गोड भाषण , शयनेषू रंभा वगैरे होण्याची दिव्य शक्ती प्राप्त असलेलं , मन भावना वगैरे नसलेलं यंत्र आहे , असा समज असावा .
उलटं टांगून मिरचीची धुरी ही शिक्षा म्हटली खरी पण ती या सगळ्या लोकांसाठी फारच सौम्य आहे .
स्त्रीदेहात जन्म घेऊन वरच्या लेखांमध्ये असलेले अत्याचार आणि असंख्य प्रकारचे आणखी अत्याचार ( लैंगिक शोषण , बलात्कार वगैरे वगैरे ) हे फर्स्ट हँड अनुभवणं हीच शिक्षा यांना योग्य आहे . परमेश्वर ती देत असेल अशी आशा आहे .
त्या भाकरी आलीच पाहिजे बाई
त्या भाकरी आलीच पाहिजे बाई (नाव विसरलो) सुद्धा बळीच आहेत का? विचार करायची क्षमता त्यांच्याकडे होती हे तर दिसतं. कारण इतर कोणाला सुचणार नाहीत अशा गोष्टीही त्यांना सुचायच्या.
मी मासिके वाचायचो तेव्हा मिळून सार्याजणी आवर्जून वाचायचो. ग्रामीण , अल्पशिक्षित, अशिक्षित, कष्टकरी ( बुद्धिजीवी वि) स्त्रियांपर्यंत पोचायचाही त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्यामध्ये सजगता यावी यासाठी काय काम चालू आहे याची माहिती असायची. त्यात पुरुषांचाही अल्प का होईना सहभाग असायचा.
पण शेवटी गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव.....
इथे धर्म हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवलाय, तर जात ही धर्म हा पाया मानून रचलेली सर्वात मोठी शोषणव्यवस्था आहे. स्त्रिया त्यातही प्रत्येक पायरी वर खाली आहेत.
मला माहिती नाही भरत हे असं का
मला माहिती नाही भरत हे असं का होतं पण तुम्हाला काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलं आहे. प्रतिभा असली तरीही स्वतंत्र विचारसरणी असेलच असं नाही किंवा हा एक समाजमान्य 'स्टॉकहोम सिंड्रोम' म्हणता येईल कदाचित. अर्थात म्हणून त्यांच्या बाबत उदारमतवादी धोरण बाळगावे असं मला मुळीच वाटत नाही, फक्त विषवृक्षाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होते.
मलाही माझी व्यक्तिवादाची व्याख्या अजून सापडली नाहीये. मी या मानसिकतेचा फक्त एक कंगोरा लिहिलाय, असे असंख्य कंगोरे असतील/ असावेत . हजारो वर्षांपासूनची मानसिक जडणघडण आहे , निमिषार्धात यातल्या त्रुटी कळणं अशक्य आहे. One neuron at a time ..!
स्वतंत्र अस्तित्व इथे कोणाचेच
स्वतंत्र अस्तित्व इथे कोणाचेच नाही.अगदी सूर्य पृथ्वी पण एकमेकावर अवलंबून आहेत एकाचे अस्तित्व दुसऱ्या वर अवलंबून आहे.
मर्यादेपेक्षा पेक्षा जास्त व्यक्ती वाद पूर्ण यंत्रणाच बिघडवू शकतो..पृथ्वी तिच्या कक्षेत फिरत आहे तो पर्यंत ठीक आहे पण ही मर्यादा तिने सोडली तर तिचे अस्तित्व धोक्यात येईल च आणि इतर ग्रह गीलांचे पण अस्तित्व धोक्यात येईल.
माणसाचे पण तसेच आहे
व्यक्ती स्वतंत्र ल मर्यादा आहेत आणि त्या असणेच फायद्याचे आहे
जसं त्या स्त्रियांची हजारो
जसं त्या स्त्रियांची हजारो वर्षांची मानसिक जडणघडण आहे, तशीच पुरुषांचीही आहे. आपल्या सोयीचे नियम पुरुषांनी आता बनवलेले नाहीत. त्यातले बरेच ही सोय समजून उपजून वापरत असतीलच. तारीही हा झगडा स्त्री विरुद्ध पुरुष असा नाही. पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात आहे.
तिथे एकाला फक्त दोष आणि दुसर्याचं प्रबोधन करून चालणार नाही. दोघांचंही प्रबोधन करायला हवं. जिथे गरज आहे तिथे कायद्याचा आधार घ्यायला हवा.
तुमच्या पहिल्या परिच्छेदात जे
तुमच्या पहिल्या परिच्छेदात जे आहे तेच लिहिण्याचा प्रयत्न करत होते.
माझे आवर्जून उल्लेख नसलेले सगळेच प्रतिसाद लिंगनिरपेक्ष असतात.
उर्वरीत प्रतिसाद आवडला.
(चर्चा पुरे करते.)
या परिस्थितीतीवर उपाय काय असा
या परिस्थितीतीवर उपाय काय असा विचार केल्यावर काही गोष्टी सुचतात . कदाचित त्या फारच बालबुद्धी , आंधळा आशावाद असलेल्या असतील , अजिबात प्रॅक्टिकल नसतील . कदाचित हे उपाय काही काही ठिकाणी प्रत्यक्षात आलेलेही असतील .
दारूची दुकानं बंद पाडण्यासाठी काही गावांमधील स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी निदान राजरोस होणारी दारूविक्री बंद केली . गुलाबी गॅंग ह्या प्रकरणात बायकोला मारहाण करणाऱ्या एका नवऱ्याविरुद्ध आधी एक त्रयस्थ बाई मदतीला उभी राहिली , नंतर उत्स्फूर्त संघटना निर्माण झाली . लाठ्या काठ्या घेऊन सामान्य बायका त्या अत्याचाराविरोधात उतरल्या .
आता त्या चळवळीची काय स्थिती आहे माहीत नाही . पण ठरवलं तर स्त्रिया आपल्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकवटू शकतात याची साक्ष या घटनांनी दिली .
एखाद्या जातीचे / धर्माचे लोक जेव्हा त्यांच्यावर काही अन्याय होतो तेव्हा एकजूट करतात . कामगार आपल्या अधिकारांचं , हिताचं रक्षण करण्यासाठी युनियन करतात .
पण स्त्रिया वेगवेगळ्या सामाजिक स्तरात आणि परिस्थितीत विभागल्या गेल्या आहेत . मध्यमवर्गीय किंवा उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील , सुखी संसार असलेल्या स्त्रिया या नवऱ्याचा छळ , मारहाण , आर्थिक परावलंबित्व या प्रश्नांशी "रिलेट" करू शकत नाहीत . हे प्रश्न असलेल्या बायकांना मदत करायला जाणं म्हणजे त्यांना लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची जबाबदारी ओढवून घेण्यासारखं वाटू शकतं .
त्यातून चूल , मूल किंवा थोडक्यात आधी आपलं घर सांभाळणे ही आता स्त्रियांची जवळजवळ इन्स्टिंक्ट झालेली आहे .
पुरुष जसे काही सामाजिक किंवा अन्य प्रश्नांसाठी घराबाहेर पडतात , काहीतरी हालचाल करतात ते करण्यापेक्षा घरची अनंत बारीकसारीक , कधीही न संपणारी कामं ही स्त्रियांना मोठी प्रायोरिटी वाटते . तो काशीला जायला निघालेल्या वृद्ध गवळणीचा एक विनोद आहे - मरण्यापूर्वी एकदा काशीला जायचं म्हणून संसारातलं मन काढून घेऊन ती कशीबशी तयार होते आणि लास्ट मोमेंटला मांजर दूध सांडून घालील , सुनेला विरजण नीट लावता येणार नाही , दही दुधाचा व्याप धडपणी सांभाळायला जमणार नाही - म्हणून काशीयात्रा रद्द करते . बायकांचा अर्धा जीव किचनमध्ये आणि उरलेला घरात , मुलांमध्ये , घरच्या इतर लोकांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये पुरा अडकलेला असतो . त्यासाठी त्या राब राब राबतात , स्वतःच्या तहान भूक झोपेचीही पर्वा करत नाहीत - तिथे बाहेर जाऊन अन्यायग्रस्त बायकांसाठी काही करावं , एकजूट वगैरे करावी हे फार लांब राहतं .
घरच्यांना गरम गरम करून जेवू खावू घालणं आणि घर व्यवस्थित ठेवणं , सतत घरच्या मोजून चार लोकांचं अखंड करत राहणं यातच खरं समाधान मिळतं .. मग बाई स्वतःकडेही दुर्लक्ष करायला तयार असते . तिथे सामाजिक / ज्या लिंगात जन्म घेतला त्या लिंगाच्या इतर माणसांशी एक अतूट बंध असणं वगैरे जड जड निरर्थक शब्द होऊन बसतात , त्या भावना , काहीतरी मदत करण्याची उर्मीच आतून येत नाही .
स्वतःचा नवरा , मुलं सोडून अख्खं जग परके लोक या कॅटॅगरीत पडतं , काहीवेळा तर सख्खा भाऊ आणि माहेरचे लोकसुद्धा मग बाहेरच्या अनोळखी किंवा जेमतेम ओळखीच्या बायकांविषयी आपलेपणा वाटणं कुठलं आलं आहे .
टीका करत नाहीये , मला जसं दिसतं आहे तसं मांडते आहे . कदाचित ते अचूक नसेलही .
ह्यावर उपाय काय ?
दरवेळी लाठ्या काठ्या घेऊन मोर्चे न्यायचे नाहीत किंवा हातापायीवरही उतरायचं नाही आहे . पण एक स्त्रियांनी एकजूट करून एक एक संघटना उभारली तर काहीतरी फरक पडू शकतो .
भिशीसाठी , बचत गटासाठी जर बायका एकत्र येऊ शकतात तर यासाठी का नाही ?
आणि या संघटनेत असल्याचा उपयोग उद्या आपल्याला गरज पडली तर आपल्यालाही होणारा आहे तेव्हा या लष्करच्या भाकऱ्या नाहीत - हा विश्वास असेल तर या हेतूने स्त्रिया एकत्र येतील . कारण शेवटी स्वार्थ हा सर्वात प्रभावी मोटीवेटिंग फॅक्टर असतो .
उदा . समाजातली एक समस्या ही की एकट्या बाईकडे , विधवा वगैरे - वाईट नजरेने पाहिलं जातं . अशा स्त्रियांच्या मागे जर स्त्रीसंघटनेची , समूहाची ताकद किंवा संख्येचं पाठबळ असेल तर कदाचित त्या इझी टार्गेट वाटणार नाहीत . लोन वूल्फ डाइज द पॅक सर्वाइव्हज अशी एक म्हण आहे , ते आपण कितीतरी वेळा समाजात पाहतोच , गट करून शक्ती वाढवणे हे जर धर्माच्या बाबतीत होऊ शकतं तर बायकांना निदान स्वार्थासाठी , स्वहितासाठी एकजूट वाढवून शक्ती वाढवण्यात काय अडचण असावी .
स्वतःचं कुटुंब जेवढं आपलं वाटतं , त्याच्याप्रती एक डेडिकेशन , कर्तव्याची घट्ट भावना असते तेवढी किंवा निदान काही प्रमाणात स्त्रियांच्या गटाविषयी ( समान लिंग , काही प्रमाणात समान समस्या यामुळे ) एक इमोशनल बॉंडिंग , कर्तव्याची जाणीव आतूनच मनापासून खरोखर निर्माण झाली तर काहीतरी फरक पडू शकेल .
फक्त संघटना निर्माण झाल्या की तिथे राजकारण , राजकीय संबंध , अधिकाराची हवा डोक्यात जाणे वगैरे वगैरे जे प्रकार निर्माण होतात तसे काहीही या प्रकारच्या संघटनेत होता नयेत .
८०-९० च्या दशकांत स्त्री
८०-९० च्या दशकांत स्त्री मुक्ती संघटनेचं काम दिसायचं. मुलगी झाली हो हे पथनाट्य गाजलं होतं. त्याचा लाभ त्या काळात मोठ्या होत असलेल्या आणि नंतर जन्मलेल्या शहरी शिक्षित भागातील मुलींना तरी नक्कीच झाला असेल. अर्थात यातही सगळं आलबेल असेलच असं नाही. शिक्षित शहरी नोकरीपेशा स्त्रीच्या वाट्याला नवर्याची शारीरिक मारहाण येताना पाहिलं आहे.
उदय यांनी लिहिलं तसं आर्थिक स्वावलंबनाचं आणि स्वातंत्र्याचं महत्त्व बिंबवणं ही पहिली पायरी आहे.
प्रश्न असलेल्या बायकांना मदत
प्रश्न असलेल्या बायकांना मदत करायला जाणं म्हणजे त्यांना लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची जबाबदारी ओढवून घेण्यासारखं वाटू शकतं .
त्यातून चूल , मूल किंवा थोडक्यात आधी आपलं घर सांभाळणे ही आता स्त्रियांची जवळजवळ इन्स्टिंक्ट झालेली आहे
बायकांचा अर्धा जीव किचनमध्ये आणि उरलेला घरात , मुलांमध्ये , घरच्या इतर लोकांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये पुरा अडकलेला असतो . त्यासाठी त्या राब राब राबतात , स्वतःच्या तहान भूक झोपेचीही पर्वा करत नाहीत - तिथे बाहेर जाऊन अन्यायग्रस्त बायकांसाठी काही करावं , एकजूट वगैरे करावी हे फार लांब राहतं .
घरच्यांना गरम गरम करून जेवू खावू घालणं आणि घर व्यवस्थित ठेवणं , सतत घरच्या मोजून चार लोकांचं अखंड करत राहणं यातच खरं समाधान मिळतं .. मग बाई स्वतःकडेही दुर्लक्ष करायला तयार असते . तिथे सामाजिक / ज्या लिंगात जन्म घेतला त्या लिंगाच्या इतर माणसांशी एक अतूट बंध असणं वगैरे जड जड निरर्थक शब्द होऊन बसतात , त्या भावना , काहीतरी मदत करण्याची उर्मीच आतून येत नाही .>>>>
मला ह्यातलं काही मुद्दे नाही पटले किंवा मी अशी कितीतरी उदाहरणं बघतलेली आहेत की जाता जाता सुशिक्षित बायका आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजू, पीडित महिलांना मदत करतात, चार चांगल्या गोष्टी शिकवतात, अगदी घरातल्या काम करणाऱ्या मावशीपासून ही सुरुवात होते किंवा करता येते.
राधा निशा,खूप तळमळीने आणि
राधा निशा,खूप तळमळीने आणि उपयुक्त मुद्दे लिहितेयस.
स्त्रियांची एकजूट हा मुद्दा आहेच.(स्त्रियांची हा इथे संबंधित मुद्दा, पण स्त्री पुरुष सर्वाना एकंदर आयुष्यातही जिथे सर्व व्यक्तिमत्त्व बुरखे उतरवून मनमोकळं आणि आनंदी राहता येईल अश्या कुटुंबाबरोबरच इतर जागा हव्यात.)
आर्थिक स्वातंत्र्य आणि सुशिक्षित, बहुवाचनी(हा मूळ शब्द असा नाहीये, मला आठवत नाहीये) असणे,वेगवेगळ्या लेयर्स मध्ये संपर्क,कुठे काय चाललंय याचं ज्ञान असणे याने बराच फरक पडेल.
स्त्री संघटना आहेत ना..पण
स्त्री संघटना आहेत ना..पण सर्वानाच हे पटेल.की प्रसिद्ध स्त्री विषयी काही घटना घडली तर ह्या स्त्री संघटन active होतात.
पण अत्यंत गरीब स्त्री वर अत्याचार झाला तर त्या बाबत मात्र आवाज उठवला जात नाही
स्त्री पुरुष हे एकमेकाचे शत्रू नाहीत तर सहकारी आहेत ही भावना ठेवली तर पुरुष सुद्धा स्त्रियांच्या पाठीमागे उभे राहतात.
प्रत्यक्ष कार्यात सहभागी पण होतात..खूप उदाहरणे आहे.
स्त्रिया ना शिक्षण मिळावे ह्याचा लढा ज्योतिबा फुले ह्यांनीच दिला होता.
रस्त्यावर अशी घटना घडत असेल तर पुरुष मदतीला येतात च . .
आणि समाजात खूप वेगवेगळे भेद आहेत.फक्त स्त्री पुरुष असा भेद नाही
श्रीमंत,गरीब,शिक्षित,अशिक्षित,उच्च जात कनिष्ठ जात,धर्म,शहरी,ग्रामीण .
खूप भेद आहेत
हे भेद स्त्री संघटना न वर पण परिणाम करतात.
मुस्लिम स्त्री वर अन्याय होत असेल तर हिंदू स्त्री संघटन विरोध करणार नाहीत.
झोपपट्टीतील स्त्री अत्याचार ची शिकार झाली तर उच्च भ्रू. स्त्रियांच्या संघटना विरोध करणार नाहीत .
स्मृती इराणी स्त्री असून ,मंत्री पण असून मणिपूर च्या घटने विषयी पक्षाचीच भूमिका घेत आहे
आता चे ताजे उदाहरण.
<पण स्त्रिया वेगवेगळ्या
<पण स्त्रिया वेगवेगळ्या सामाजिक स्तरात आणि परिस्थितीत विभागल्या गेल्या आहेत . मध्यमवर्गीय किंवा उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील , सुखी संसार असलेल्या स्त्रिया या नवऱ्याचा छळ , मारहाण , आर्थिक परावलंबित्व या प्रश्नांशी "रिलेट" करू शकत नाहीत . हे प्रश्न असलेल्या बायकांना मदत करायला जाणं म्हणजे त्यांना लष्करच्या भाकऱ्या भाजण्याची जबाबदारी ओढवून घेण्यासारखं वाटू शकतं .>
यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे. दिल्ली निर्भया आणि हैद्राबाद व्हेटर्नरी डॉक्टर प्रकरणांत या मध्यमवर्गीत सुशिक्षित स्त्रिया जेवढ्या प्रमाणात आणि एका सुरात व्यक्त झाल्या तशा कथुआ, उन्नाव, हाथरस , खैरलांजी, बिल्किस आणि आता मणिपूर प्रकरणी व्यक्त होताना का दिसत नाहीत? उलट काही स्त्रियांचा सूर तर पीडित स्त्रियांच्या विरोधात जाणारा आहे. आणखी एक निर्भया आणि हैद्राबाद प्रकरणांत पीडित स्त्री ही अपराध्यांपेक्षा वरच्या सामाजिक आर्थिक स्तरातील होती. बाकी प्रकरणात उलट होतं. मणिपूर वांशिक संघर्ष म्हणून वेगळी केस समजू.
दुसरा प्रश्न - फंडामेंटलिझम, मूलतत्त्ववाद वाढतो आहे आणि हे लोक स्त्री हक्क, समानता , पितृसत्ताक व्यवस्था यांबद्दल बोल णार्यांना टारगेट करतात. त्याबद्दल ही फारसं कोणी व्यक्त होताना दिसत नाही.
लेखाची चौकट घराच्या चार भिंतींच्या आत स्त्रीवर होणारा अन्याय एवढीच मर्यादित असली तरी त्या चौकटीतही या गोष्टींबद्दल व्यक्त होण्याबद्दल प्रश्न पडला.
दुसरं. स्त्री घर कुटुंब या जबाबदार्यांत अडकलेली आहे असं चित्र वर आलं. अर्थार्जनाची प्राथमिक जबाबदारी ही अजूनही पुरुषाची मानली जाते आणि अर्थार्जन ही पुरुषाची प्राथमिक जबाबदारी मानली जाते. पुरुषही एक प्रकारे कैद आहे.
आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे
आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे स्त्रिया किंवा त्यांचे आईवडील हे लग्नाकडे उदरनिर्वाहाच्या मार्गाचा एक पर्याय म्हणून बघतात . उदरनिर्वाह हा शब्द फारच क्रूड वाटेल . मध्यमवर्गीय , उच्चमध्यमवर्गीय कुटुंबांच्या बाबतीत कदाचित तो अचूक लागूही पडणार नाही .
इथेही स्त्रियांवर टीका करण्याचा हेतू अजिबात नाही . कुठल्याही आर्थिक परतावा देणाऱ्या नोकरीपेक्षा जास्त शारीरिक कष्ट घर - संसार सांभाळणाऱ्या स्त्रिया उपसत असतात . अन्न वस्त्र निवारा , आजारी पडल्यास औषधपाणी , क्वचित नवऱ्याच्या खिशाला झेपेल एवढी हौसमौज आणि प्रेमाची वागणूक एवढ्या मिनिमम अपेक्षा ठेवून ह्या मुली - बायका आयुष्यभर कष्ट उपसण्याच्या चॉइसची सहज निवड करतात , त्या ऐतखाऊ वगैरे अजिबातच नाहीत .
नवरा कमवेल आणि बायको घर सांभाळेल अशी विभागणी बऱ्याच काळापूर्वी झालेली आहे . अजूनही बहुतांश कुटुंबांमध्ये त्या मार्गाची निवड आपसूकच फार विचार न करता होते .
कामांची अशी विभागणी केली आहे तर कमावणाऱ्या व्यक्तीला जो आदर , जे अधिकार मिळतात तेच घराची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तीला मिळतात असं मात्र अजिबात होत नाही . फार कमी कुटुंबात कौटुंबिक निर्णयांमध्ये स्त्रीचं मत घेतलं जातं / विचारात घेतलं जातं . तिच्या वैयक्तिक गरजा या नेहमी दुय्यम महत्वाच्या असतात . हे जिथे छळ वगैरे होत नाही अशा सर्वसामान्य कुटुंबांचं झालं .
ह्याच्यापेक्षा कितीतरी पट वाईट परिस्थिती म्हणजे या मूळ लेखातली 2 - 3 उदाहरणं - जिथे स्त्रियांना स्वतःच्या किंवा मुलांच्या खर्चासाठी नवऱ्यापासून चोरून पैसे साठवावे लागतात .
आर्थिक परावलंबित्व हे स्त्रिया वर्षानुवर्षे छळ सहन करत सासरी राहण्याचं मुख्य कारण आहे . ज्यांचं माहेर भक्कम सपोर्ट करतं त्या काही मोजक्या भाग्यवान स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या तशाच पिचत राहतात . एकवेळ एकटी असती तर बाहेर पडली असती अशी स्त्री सुद्धा मुलांची आर्थिक जबाबदारी एकटीला पेलणार नाही , मुलांचे हाल व्हायला नकोत , त्यापेक्षा आपले एकटीचे काय व्हायचे ते हाल होऊ देत म्हणून सहन करत राहते . मॅटर्नल इन्स्टिंक्ट भरपूर प्रभावी असते शिवाय बाहेर पडून अर्थार्जन करण्याच्या चॅलेंजची भीती वाटते , आत्मविश्वास नसतो . अनोळखी चॅलेंजपेक्षा ओळखीचा , सवयीचा छळ परवडला असंही वाटतं . - हे मध्यमवर्गीय स्त्रियांचं झालं .
त्यामानाने कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रिया अधिक आत्मविश्वासाने बाहेर पडतात , बाहेर वावरतात , जे उपलब्ध असेल ते काम शिकून घेतात आणि चार पैसे कमवतात . काहीवेळा तर एकटीच्या कमाईवर मुलांची पोटं भरतात , घरही चालवतात. पण त्याही नवऱ्याला सोडून जाण्याचं धैर्य दाखवत नाहीत , उलट नवरा दारुडा , पैसे उधळणारा जरी असला तरी त्याला सहन करत राहतात .
कारण पुन्हा तेच - नावाला का होईना नवरा असलेली बाई या समाजात अधिक सुरक्षित असते . 10 लोकांच्या वाईट नजरा , अन्य प्रकारचे त्रास सहन करण्यापेक्षा एका नालायक नवऱ्याचा छळ परवडला असं त्यांचं गणित असतं .
मध्यमवर्गात , समाजाच्या सुशिक्षित स्तरात अर्थार्जन करत असलेल्या स्त्रियांना कनिष्ठ वर्गातील स्त्रियांपेक्षा तुलनेत अधिक सुरक्षितता असते ( वाईट नजरा इत्यादी पासून .. तुलनेने सुरक्षित , पूर्ण सुरक्षित म्हणत नाही आहे . ) , कुटुंबाचा आधार असतो . आर्थिक बाजू भक्कम असलेल्या स्त्रिया अत्याचार सहन करत राहण्याचं प्रमाण कमी असतं .
लग्न - संसार बद्दलच्या रोमँटिक आणि आदर्श कल्पना सोडून देऊन पोटापुरते दोन पैसे कमवायला शिकणे - ह्याला स्त्रियांनी अति महत्व देण्याची आवश्यकता आहे . हे अर्थात बहुतेकींच्या बाबतीत लग्नापूर्वीच शक्य आहे आणि तेही ज्या स्तरात कमी वय असतानाच लग्न लावून दिलं जात नाही अशा मुलींच्या बाबतीत .
हर लडकी का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर वगैरे बॉलिवूडने 50 - 60 वर्षात खूप घाण करून ठेवली आहे . म्हणजे धर्माने आधीपासूनच केलेली होती त्यात यांनी थोडी भर घातली एवढंच .
चुकून रखरखीत वास्तव डोळ्याला पडून आत्मभान येईल त्या वयात संसाराच्या सोनेरी फँटसीजनी डोळ्यावर पडदा येतो , हजारो वर्षांचं कंडिशनिंग आहेच , अर्थाजनाची - बाहेरच्या जगाला तोंड देण्याची जबाबदारी नवऱ्यावर टाकून आपण निर्धास्तपणे ओळखीची असलेली गोष्ट म्हणजे स्वैपाकपाणी , घरकाम वगैरे करावं हे बायकांना अधिक पसंत असतं . पुढे या भाबडेपणाची किंमत चुकवावी लागते -
अर्थात सगळ्यांनाच नाही . खूप जणींना चांगले नवरे , सासरचे लोक मिळतातही , कल्पनेत पाहिल्यासारखा सुरळीत संसार होतोही - नवऱ्याने कमवायचं , बायकोने घराची जबाबदारी पेलायची आणि त्याचा योग्य तो आदर , किंमत , स्थान तिला मिळतं .
आकडेवारी , टक्केवारी निश्चित नाही सांगता येणार पण हे ज्यांना मिळत नाही , अशांमध्ये आपण चुकूनही असू नये , माहेरी परतायची सोय नाही , जायला दुसरी कुठली जागा नाही , स्वकमाई नाही म्हणून फक्त नाईलाजाने संसार ओढत राहायचा ही वेळ आपल्यावर चुकूनही येऊ नये - याकरता तरी आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले पाहिजेत . अर्थात तसं होत नाही - आपल्या बाबतीत तसं काही होणार नाही ह्या आंधळ्या विश्वासासकट मुली जगत असतात आणि कोणाच्यातरी गळ्यात माळ घालतात .
राधा निशा,खूप तळमळीने आणि
राधा निशा,खूप तळमळीने आणि उपयुक्त मुद्दे लिहितेयस. +१२३
सतत "बाईने अलर्ट राहावं.. सर्व दृष्टीने स्वावलंबी राहावं.. नाहीतर तिच्यावर अन्याय होणारच" हे बघून / ऐकून / वाचून आता मानसिक थकवा यायला लागलेला आहे. जंगलात राहतो असे वाटू लागले आहे.
कित्येक घरांमध्ये बाईला नोकरी सोडावी वाटली.. मुलांसाठी किंवा स्वत: साठी.. तरी नोकरी सोडल्या सोडल्या तिची अवस्था पायीची वहाण अशी होणार याची स्पष्ट कल्पना असल्याने त्या नोकरीचा न झेपणारा गाडा ओढत आहेत. तिला माणूस म्हणून.. जोडीदार म्हणून समानतेची वागणूक मिळण्यासाठी तिने सतत हे जोखड गळ्यात घेतलंच पाहिजे अशी परिस्थिती बघते आहे. साधं सासरचे उघड उघड छळ करतात आणि माहेरचे किंवा नवरा त्यावर काही अॅक्शन घ्यायला तयार नाही म्हणून वेगळे राहावे वाटले तरी नवरा अलगद 'तुझ्यामुळे वेगळे झालो आता माझी या घरातली जबाबदारी शून्य' असे म्हणून सगळं झटकतो. आयुष्यात एक बेसिक सुकून मिळवण्यासाठी सुद्धा तिला पिचावे लागतेच आहे.
स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचा
स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचा द्वेष, पुरूष ना शत्रू समजून त्यांच्या शी लढाई अशी भूमिका काही स्त्री संघटना घेतात.
ही भमिका मला तरी पटत नाही.
स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांशी वैर नाही हा विचार भारतात आहे .
म्हणून न्यायमंत्री रानडे असतील ,ज्योतिबा फुले असतील,आगरकर असतील ह्यांनी स्त्री मुक्ती साठी लढा दिला.
दोघे नवरा बायको नोकरी करणारे
दोघे नवरा बायको नोकरी करणारे असतील आणि बर्या पैकी पैसा मिळत असेल तर घरकाम करण्यासाठी बाई ठेवणे, मुलांना सांभाळण्यासाठी बाई ठेवणे हा मार्ग लोक स्वीकारतात.
आणि व्यावहारिक दृष्ट हा मार्ग सर्वांना आवडतो पण.
घराचा बोजा माझ्याच डोक्यावर आहे
हे पुरुष आणि स्त्रिया म्हणत असतात.
पण
ह्याचा अर्थ मला कधीच कळला नाही.
पुरुष नालायक वृत्तीचा आहे
पुरुष नालायक वृत्तीचा आहे,नोकरी नीट करत नाही,व्यसनी आहे,बायकोला मारझोड करतो .
त्याच्या ह्या स्वभाव ल कंटाळून त्या स्त्री नी कायद्याचा आधार घेवुन नवऱ्यावर केस केली आणि पोलिस नी त्याला अटक केली की .
असे पुरुष च कांगावा करतात बघा स्त्रिया कशा कायद्याचा दुरुपयोग करत आहेत.
पण ही समस्या त्या कुटुंब पुरतीच मर्यादित आहे ,पुरुष वाईट च आहे.
पण सर्रास सर्व पुरुष तसेच असतात असे नाही.
हे स्त्रिया न बाबत पण.
घरातील कोणतीच जबाबदारी घेणार नाहीत,कुटुंबातील सदस्य न शी काही ना काही कारण काढून रोज भांडणे करणार, घरातील कोणतेच काम करणार नाही.
अशा स्त्री ल घराबाहेर काढली कंटाळून तर.
ह्याच स्त्रिया बोंब करतात.
बघा स्त्रियांवर अत्याचार होत आहे.
पण इथे पण त्या कुटुंब पुरताच त्यांचा हा प्रश्न असतो त्याचे सर्वत्रिकरण करता येणार नाही.
की सर्व स्त्रिया अशाच असतात.
ह्या अशा घटने चे सत्य,असत्य बघूनच संघटनांनी योग्य भूमिका घेणे गरजेचे असते.
तेव्हाच चळवळ यशस्वी होते.
कित्येक घरांमध्ये बाईला नोकरी
कित्येक घरांमध्ये बाईला नोकरी सोडावी वाटली.. मुलांसाठी किंवा स्वत: साठी.. तरी नोकरी सोडल्या सोडल्या तिची अवस्था पायीची वहाण अशी होणार याची स्पष्ट कल्पना असल्याने त्या नोकरीचा न झेपणारा गाडा ओढत आहेत
अनेक स्त्रिया नोकरी स्वतः हून करत नाहीत,काही घराची गरज म्हणून करत नाहीत,काही घर श्रीमंत आहे म्हणून करत नाहीत.
त्या सर्वांची अवस्था पायातील वाहन असते तशी असते का?
अपवाद असतील पण सर्रास नाही.
कित्येक घरात अशा स्त्री चे वेगळे बँक खाते असते,त्या मध्ये ती पैसे टाकू शकते.
घरखर्च आणि त्या स्त्री ची गरज इतके पैसे तिला न मागता दिले जातात..तिच्या त्यागाची जाणिव असते.
घरातील निर्णयात तिचे मत घेतले च जाते.
आता कुटुंब च आई वडील आणि मुलगा सून इतकीच मर्यादित असतात.
त्या मध्ये वेगळे राहणे ही मागणी झाली की पुरुष बिथरतात कारण आई वडिलांनी काय कष्ट केले आहे ह्याची जाणीव त्याला असते.
तो आई,वडिलांना वेगळे करण्याचा विचार करत नाही.
आता तर स्वतः आई वडील च मुलाचे लग्न झाले की स्वतः च वेगळे होतात
मुलांचे सुख ,त्यांच्या गरजा त्यांना पण कळतात.
पण काही स्त्रिया लग्न होवून एक वर्ष झाले की वेगळे व्हा असा हट्ट करतात
पटेल असे कोणतेच कारण त्यांच्या कडे नसते
अशी पण कुटुंब आहेत
जातीय द्वेषातून अत्याचार
जातीय द्वेषातून अत्याचार,धार्मिक द्वेषातून अत्याचा,स्त्रियांवर अत्याचार,पुरुषांवर अत्याचार,गरीब लोकांवर अत्याचार.
ह्या सर्व अत्याचार मध्ये क्रिमिनल लोकांची ओळख पटवून
त्यांना समाजातून बहिष्कृत करा.
गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून घडलेले गुन्हे ही सामाजिक समस्या च नाही.
मग हे गुन्हेगार .
स्त्री असू,पुरुष असू,उच्च जाती चे असू,कनिष्ठ जाती चे असू, हिंदू असू किंवा बाकी कोणत्याही धर्माचे असू.
समाजातील क्रिमिनल लोकांची लोकांची ओळख पटवून त्यांना बहिष्कृत केले आणि कडक शिक्षा दिली पाहिजे.
बचाव साठी.
लिंग, जात,धर्म,आर्थिक स्थिती हे सर्व मार्ग बंद केले तर .
अगदी निरोगी समाज निर्माण होईल.
सर्व अत्याचार वर हाच एक उपाय आहे
झुंडी चा न्याय मला तरी पसंत नाही.
धार्मिक संघटना च्या झुंड शही समोर झुकून निर्दोष पर धर्मीय ला गुन्हेगार ठरवणे.
जातीय संघटना न च्य झुंड शाही ल शरण जावून निर्दोष दुसऱ्या जातीच्या लोकांना गुन्हेगार ठरवणे.
स्त्री संघटना न च्य झुंड शाही ला शरण जावून निर्दोष पुरुषाला सुळावर चढवणे.
पुरुषी संघटना आणि satte समोर झुकून निर्दोष स्त्री ला शिक्षा देणे.
हे असेच घडतं राहिले तर समस्या कधीच सुटणार नाहीत उलट गुंता गुंतीच्या होतील
चार चार वेळा वाचून नक्की तो
चार चार वेळा वाचून नक्की तो एकच उपाय कोणता याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला पण डोक्यावरून गेलं . असो . लिटरली बलात्काराच्या केसेसचा निकाल जिथे कोर्टात वर्षानुवर्षे खितपत पडल्या आहेत , तिथे कुटुंबांतर्गत हिंसा , शारीरिक छळ , मानसिक छळ - बायको नवऱ्याचा आणि सासरच्यांचा करत असलेला , नवरा - सासरचे तिचा करत असलेला या सगळ्या गोष्टी दखलपात्र गुन्हे म्हणून कोर्टात सिद्ध करणं किचकट असतं त्यामुळे कडक शिक्षा वगैरे काहीही होत नसते .. 90 % प्रकरणांमध्ये . याचा अर्थ लगेच स्त्री संघटनेने शिक्षा द्यावी , झुंडीचा न्याय करावा असा नव्हता .
घरी काम करत नाही , भांडणं करतात अशा स्त्रियांची संख्या एकदा काढा आणि बायकोचा छळ करणाऱ्या पुरुषांच्या संख्येशी ती एकदा ताडून पाहा . माहेरचा आधार नाही , स्वकमाई नाही , स्वतःच्या मालकीचं घर नाही , घटस्फोट मिळाला तर स्वतंत्र राहण्याची ताकद नाही , पोटगी मिळाली तर तुटपुंजी मिळण्याची शक्यता आहे - अशा परिस्थितीत ज्यांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे वागायचा अफाट कॉन्फिडन्स आहे त्या बायका नक्की कशाच्या जोरावर तसं वागत असतील हे तरी कळेल .
आणि अशा ज्या कजाग बायका असतील त्यांनाही कंटाळून घराबाहेर काढायचा अधिकार त्यांच्या नवऱ्यांना नाही , रीतसर घटस्फोट देण्याचा मार्ग कायद्याने दिलेला आहे . लग्न करताना वेळ आली तर बायकोची स्वतंत्र सोय करून देण्याची तयारी हवी . विशेषतः अशा , इतक्या कजाग बायको सोबत एखादं दुसरं मूल जन्माला घातलं असेल तर तिला आर्थिक हिस्सा / पोटगी द्यायला नवरा कायद्याने आणि नैतिकदृष्ट्या बांधील आहे , कंटाळून बाहेर काढायला तो मोकळा नाही .
खूप चांगली चर्चा. अस्मिता,
खूप चांगली चर्चा. अस्मिता, राधा निशा खूप माहितीपुर्ण & मॅचुअर प्रतिसाद.
सर्वांना धन्यवाद _/\_
सर्वांना धन्यवाद _/\_
राधा निशा ह्यांचे विशेष
राधा निशा ह्यांचे विशेष अभिनंदन.
किती ही क्रॉस करणारी पोस्ट आली तरी त्यांनी संयम सोडला नाही.
संयमित शब्दात च बाजू मांडली.
त्यांना स्त्रिण्याच्या समस्या ह्याची मनापासून काळजी आहे.
दिखावू आत्मीयता नाही.
https://www.sumanasa.com/go
https://www.sumanasa.com/go/N7xnj6
कोणत्याही आधारावर भेदभाव करणारे कायदे असतील तर ते निरुपयोगी ठरतात.
त्या कायद्यांमुळे उद्देश सफल होत नाही.
स्वार्थासाठी ते कायदे वापरले जातात
हेमंत +१०००
हेमंत +१०००
498अ आणि डीव्ही हे कायदे भयानक आहेत. मोदी सरकारने त्यात काही लॉजिकल सुधारणा केल्या असं वाचलं होतं पण खरंच फरक पडला का ते माहीत नाही.
आमच्या ओळखीत अलीकडे उदाहरण घडलं आहे. त्या मुलीचं अफेअर होतं. तरी तिने एका मुलाशी लग्न केलं(कारण ज्याच्याशी अफेअर आहे तो विवाहित आहे.) काही महिने एकत्र राहिल्यावर त्या मुलाला तिच्या अफेअरबद्दल कळलं. त्याने घटस्फोट मागितला. तिला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर तो , त्याचे आईवडील सर्वांवर 498 लावला इतकंच काय मोठा दीर व जाऊ जे इथे अमेरिकेत राहतात व फक्त लग्नाच्या वेळी तिला जेमतेम आठ दिवस भेटले होते त्यांच्यावरही केस मारली. एक निष्पाप आनंदी कुटूंब उध्वस्त होताना बघितलं. पोलीस यात भरपूर पैसे खातात. आता कधी तो मुलगा सुटणार, कधी घटस्फोट होणार. त्याचं लग्नाचं वय निघून जाणार.
100 अपराधी सुटले तरी चालेल पण एकाही निरपराध्याला शिक्षा नको हे तत्व काही विशिष्ट कायद्यांमध्ये धाब्यावर बसवलेलं आहे.
काय आहे ४९८ कलम?
काय आहे ४९८ कलम?
Submitted by radhanisha on 1
Submitted by radhanisha on 1 August, 2023 - 00:55
<<
हेच जर मी किंवा इतर कुणा पुरुषाने लिहिलं, तर लगेच 'बायकांनाच दोष देऊ नका/ शिकवू नका' असल्या कॉमेंट्स सुरू होतात
भारतीय दंड संहिता १८६० मराठी
भारतीय दंड संहिता १८६० मराठी : (IPC 1860 Marathi)
प्रकरण २०-अ :
१.(पतीने किंवा पतीच्या नातेवाइकांनी क्रूर वागणूक देण्याविषयी :
कलम ४९८-अ:
एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवाहित स्त्रीशी कू्ररपणा केल्याबद्दल शिक्षा.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र-अपराध घडल्याची माहिती, अपराधामुळे नुकसान पोचलेल्या व्यक्तीने अथवा तिच्याशी रक्ताच्या किंवा सोयरिकीच्या किंवा दत्तकाच्या नात्याने संबंधित असलेल्या व्यक्तीने अथवा असा कोणताही नातेवाईक नसेल तर या संबंधात शासनाने अधिसूचित केले असेल अशा वर्गातील किंवा, प्रकरणपरत्वे, प्रवर्गातील कोणत्याही लोकसेवकाने पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिली तर.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
-------
जो कोणी एखाद्या स्त्रीचा पती असून, किंवा पतीचा नातेवाईक असून, अशा स्त्रीला क्रूर वागणूक देईल, त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे--
(अ) ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा, तिला दुखापत होईल, अथवा तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला (मानसिक किंवा शारीरिक) धोका निर्माण होईल, अशा त?्हेचे कोणतेही बुद्धिपुरस्सर वर्तन.
(ब) जेव्हा त्या स्त्रीवर किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही मालमत्तेची किंवा मूल्यवान रोख्याची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्याची जबरदस्ती करण्याच्या हेतूने, अथवा अशी मागणी पूर्ण करण्यात तिच्याकडून किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून कसूर झाल्याबद्दल तिला सतावले जाते तेव्हा, अशी सतावणूक.)
धर्म स्त्रीकडून ठेवत असलेल्या
धर्म स्त्रीकडून ठेवत असलेल्या अपेक्षा आणि स्त्री आयुष्य>>>>>
आतापर्यंत ही चर्चा ठराविक प्रदेश, धर्म ह्यापुरती केंद्रित आहे.
परंतु ह्यातील मुख्य मेख अशी आहे की धर्म संस्थापक, धर्मगुरू हे कायम आणि सर्व धर्मासाठी पुरुषच राहिले आहेत.
मूळ धार्मिक ग्रंथात .
मूळ धार्मिक ग्रंथात .
मग ते कुराण असेल किंवा बायबल असेल .
ह्या मध्ये स्त्रिया न विषयी काय मत व्यक्त केले आहे .
कोणाचा अभ्यास असेल तसे लिहावे.
हिंदू न च विषय काढला की मनस्मुर्ती चा उल्लेख केला जातो पण तो पण हिंदू च धार्मिक ग्रंथ नाही
रामायण आणि महाभारत मध्ये स्त्री वर विविध बंधन असावीत असा उल्लेख नाही
स्त्री स्वतःचा पती स्वतःच्या अटी ठेवून निवडीत होती .
द्रौपदी चे पाच पती होते हे पण तेव्हा स्वीकारले गेले आहे.
सती चा उल्लेख त्या मध्ये नसावा.
कारण महाभारत अनेक वीर युद्धात मारले गेले ,रामायणात अनेक वीर युद्धात मारले गेले पण त्या स्त्रिया सर्व सती गेल्या असा उल्लेख नाही.
माझे स्वतःचे म्हणत तर अगदी पाच पिढ्यांची माहिती आहे पण 200 ते 250 वर्ष पूर्वी पण कोणी सती गेल्याचा उल्लेख नाही .शिव काळात पण तसा उल्लेख नाही
सती जाणे हे ऐच्छिक च असावे असे वाटत ..
परंपरा वेगळ्या आणि धर्म वेगळा.
परंपरा ह्या कोणी स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्या साठी निर्माण केल्या असतील.
त्या साठी धर्म दोषी नाही.
भीष्माने अंबा, अंबिका,
भीष्माने अंबा, अंबिका, अंबालिका यांना स्वयंवरातून पळवून आणलं ते त्यांच्या इच्छेने नाही. यातल्या अंबेने आपल्याला दुसरा कोणी राजा पसंत आहे, असं म्हटलं; पण त्या राजाने हिचा स्वीकार केला नाही. पुढे अंबिका, अंबालिका यांना मूळ जन्माला घालण्यासाठी व्यासांशी संबंध ठेवावा लागला. एकीने डोळे मिटून घेतले. दुसरी पांढरीफटक पडली. ते संबंध त्यांच्या संमतीने होते का? अशा शरीरसंबंधांना काय म्हणतात? त्या संबंधांतून जन्मलेल्या दोन्ही मुलग्यांत दोष होते तेव्हा सासू ने व्यासांना पुन्हा एकदा यांतल्या एकीशी संबंध ठेवायला सांगितले. यावेळी तिने आपल्या दासीला पाठवले. का?
द्रौपदीने स्वतःहून पाच पती निवडले होते का?
स्वयंवरात पण लावला जातो, त्यात राजकन्येच्या पसंतीचा प्रश्न येतो का? जो कोणी तो पण पूर्ण करेल त्याच्या गळ्यात माळ घालावी लागते.
धर्माने द्यूतात द्रौपदीची बोली लावली. म्हणजे ती त्याची संपत्ती होती? यावरून पुढचे महाभारत घडले.
पंडुची बायको माद्री सती गेली
एकपत्नी म्हणून रामाचे कौतुक केले जाते. याचा अर्थ तेव्हा बहुपत्नीत्व हा नॉर्म होता. त्याने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. स्वतः दिली का?
सती सगळ्या प्रांतांत नव्हती. त्याचा संबंध त्या भागातल्या वारसा हक्काच्या पद्धतीशी आहे. सतीमागचं कारण संपत्तीतला एक वाटेकरी कमी करणं हा आहे. आणि तिथे ते ऐच्छिक असेल असं म्हणणं धाडसाचं आहे.
परंप रांना धर्माचं अधिष्ठान आहे, असं सांगितलं जातं.
Pages