नावात काय?

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 May, 2023 - 00:43

शेक्सपिअरनं म्हटलंय नावात काय?
ती तर एखाद्याला ओळखायची सोय
गुलाबाला म्हणालात जुलाब
म्हणून तो घाणतो काय?
कुणाला बोलवायचं म्हणजे
काही तरी नाव हवंय
सोम्या, गोम्या, दगड्या, धोंड्या वगैरे वगैरे

बहुतेकांवर देवादिकांचा पगडा
की आदर्श आशावाद बापडा ?

त्यांना वाटत असावं
सात्विक नाव ठेवल्यास
बाळ सात्विक निपजावं
मनाच्या देव्हाऱ्यातल्या देवाचं
देवत्व माणसांत उतरावं

घडतं वेगळच

तरीही पोरं,नातू,पणतू, नात
देव होऊनच पोटाला येतात

एवढे देव असतात माणसात
तरीही नसतो राम रामात
राम,लक्ष्मण, भरत वगैरे
असतात नावात दडलेले संस्कार
सत्यवचनी , आज्ञाधारक
प्रेमळ, कर्तव्यनिष्ट
कुलवंत,
दुर्जनांचे काळ
सज्जन तारणहार
त्यागी, निर्मोही
प्रजाहितदक्ष
ख-याची चाड
खोट्याची चीड
वगैरे वगैरे

तेव्हा कुणी येड्या गबाळ्यानं
अशी नावं का धारण करावी ?
कुणीही देवाचं नाव धारण
करुन जसं देव होत नाही
तसच
एखाद्याचं नाव दगडू असलं
म्हणून तो माठ होत नाही

राम पुराणातल्या रामा सारखा नसेल अगदी
तरी प्रामाणिक , कष्टाळू असावा
तसंच दगडूही पाषाण हृदयी नसावा

देवादिकांची सात्विक नावं
आता माणसाला देऊ नयेत
कारण नेणतेपणी आलेलं
भारदस्त नावाचं शिवधनुष्य
जाणतेपणी पेलत नाही

म्हणून हल्ली
ज्या नावाला पुढे बट्टा लागणार नाही
असेच किडूकमिडूक नाव बाळाचं ठेवावं
दगडू, धोंडू, बारक्या, खारक्या,
सोन्या, मोन्या, काळू, बाळू, बाबू वगैरे वगैरे
ते नाही का धोंडो केशव कर्वे
नावात धोंडोबा पण
त्याच धोंड्यातून देव साकारला
अबलांना सबला करुन गेला

नाव काहीही असलं तरी ते
सुंदर होऊ शकतं
त्यासाठी काळजात माणूसपण
जितं असावं लागतं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !
शेवटचे कडवे सर्वोत्तम...

शेवट उत्तम.

नावात काय आहे? - विशिष्ट प्रकाराने एखाद्या ठराविक व्यक्ती अथवा वस्तूला संबोधण्याची सोय आहे. Happy

कुमार १
हपा
सामो
साद
केशवकूल

सर्वांचे लाख लाख धन्यवाद...

छान.
विशेष आवडले - देवादिकांची.... कडवे.