चटका - ३ -सुखान्त

Submitted by सामो on 28 April, 2023 - 14:32

चटका-२.५

रोजच्याप्रमाणे डायरीमध्ये माझ्या आजच्या क्लायंटसची नोंद - १२/११/२०२० - शनिवार

सकाळी १० ला, क्लिनिक उघडल्यानंतर, नरेनला मी प्रथमच भेटलो. ५ फूट ६ इंच उंची, डोळ्याला चष्मा, कुरळे केस, आणि डोळे मात्र थकलेले, हाताची नखे कुरतडलेली आणि एकंदर किंचीत अँक्शिअस असे व्यक्तीमत्व. क्लिनिकमध्ये कोणीही मजेकरता तर येत नाही. काही समस्या असतात म्हणुनच नाईलाजाने पेशंट स्वतःहून येतात किंवा मग कुटुंबातील एखादी सुजाण व्यक्ती त्यांना बळाने घेउन येते. एक मात्र नक्की क्लिनिकमध्ये पाऊल ठेवल्याचा क्षण हा पेशंटकरता आमूलाग्र बदल घडविण्यास समर्थ असतो. हां त्याकरता पेशंटची योग्य औषधोपचार तसेच थेरपीची तयारी हवी. औषधाच्या अप-डऊन्समुळे, कितीही किचकट, अवघड आणि अनसेटलिंग अनुभव येवोत, पेशंटने धीर धरणे नितांत गरजेचे असते.

नरेन प्रगल्भ वाटतो. तसेच त्याच्याबरोबर आलेली त्याची पत्नी संयुक्ताही भले काळजीत असो, पण तीही प्रगल्भ वाटते. मुख्य म्हणजे,पेशंटच्या जेव्हा बरोबर कोणी येते, तेव्हा अ‍ॅज अ डॉक्टर, आम्हाला त्या नातेवाईकाची, पेशंट एक सपोर्ट सिस्टिम म्हणुन मदत मिळेल अशी आशा वाटते. ही आशा जवळजवळ ९५% खात्रीची आणि यशस्वी ठरते हा गेल्या ३० वर्षातील अनुभव.
"बोला" - मी
घसा खाकरुन, प्रथम नरेन बोलता झाला. मधेमधे त्याला अवघड जात असतेवेळी, संयुक्ता त्याची पत्नी मदत करत होती. एकंदर ती सुजाण आणि कनवाळू व्यक्तीमत्वाची वाटली. आज फार काही बोलणे झाले नाही कारण एका विविक्षित क्षणी नरेनला भावना आणि अश्रू अनावर झाले. आम्ही तिथे थांबलो. पेशंटच्या भावनांचा आदर हा तर थेरपीचा पायाच नाही का. रेशिमगाठ ही अलगदच उकलावी लागते. तिथे घिसाड घाई उपयोगाची नाही. पुढच्या आठवड्याची वेळ निश्चित झाली. दोघेही गेले.

नोटस - नरेन भावनाप्रधान व्यक्तीमत्व. संयुक्ता त्या मानाने डाउन टू अर्थ आणि व्यवहारी. संयुक्ताचा नवर्‍याला पूर्ण सपोर्ट - जमेची बाब.
नरेनला सिव्हिअर ट्रॉमा - त्यातून दिसणारी पी टी एस डी ची लक्षणे - आजूबाजूच्या लोकांचा सतत हायपरावेअरनेस आणि त्यातून मेंदूची सतत व्यय होणारी ऊर्जा - फटिग.

१२/१८/२०२० - शनिवार
"आपण गेल्या वेळेस जिथे थांबलो तिथून सुरु करु यात." - मी
"डॉक्टर हा प्रसंग सिंक इन होण्यास काही दिवस गेले. मात्र त्यानंतर मी चिडचिडा होउ लागलो. मी सतत संतापू लागलो. आणि तो संताप मला व्यक्त करता येत नसे. कोणाच्याही कृतीमधुन मी तिसरा अर्थ काढण्यात निष्णात झालो. "
"नरेन, तुम्ही हे जे रीडींग बिटवीन द लाइन्स करत असा, दुसर्‍याला आरोपी धरत असा, ते इमॅजिनरी होते की वास्तव याचा आपण कधी विचार केलात का?"
"नाही. इमॅजिनरी कसे असेल डॉक्टर? देहबोलीवरुन कळतेच की. मला तू म्हणा डॉक्टर. प्लीज." - नरेन
"नरेन नाही. समोरच्याने ठोस कारण दिलेले नसताना, आपण त्याच्यावरती आपले स्वतःचे विचार प्रोजेक्ट करत असतो. रीडींग बिटवीन द लाइन्स हे ९९% इमॅजिनरी असते. मी अमक्याला ३०० वोल्ट्स स्माईल दिले त्याने मात्र फक्त ५० व्होल्टस परत केले. याचा अर्थ तो माझ्यावर जळतो. असे नसते. त्या वेळी तो कदाचित अन्य विचारात गुंग असू शकतो किंवा मग त्याचा हसतमुख स्वभाव नसू शकतो. आपण स्वतःला केंद्रित ठेउन जग पहातो. आपल्याला सर्वांनाच वाटते की जग आपल्या भोवतीफिरते. हे नैसर्गिकच आहे. जसजसे स्वभान वाढत जाते , आपण साक्षीभावाने एकंदर परिस्थिती पाहू लागू. आणि अपल्या थेरपीचा एक पैलू हाच असणार आहे. साक्षीभाव."
यावरती नरेन आणि संयुक्ता दोघेही विचारात पडले.

नोटस - नरेन डिड नॉट रिजेक्ट माय सजेशन. तो नव्या लर्निंग/ अनलर्निंग प्रॉसेसकरता स्वागतशील आहे. - जमेची बाजू.

१२/२५/२०२०
"आज आपण काही औषधे सुरु करणार आहोत. आणि या औषधांची वेळ व सातत्य काटेकोरपणे पाळायचं. आज ५ वाजता , उद्या ८ वाजता घेतली डझन्ट वर्क. त्याच वेळी घेणे फार महत्वाचे. वेळ पाळायचीच." - मी
"पण डॉक्टर मला औषधांची गरजच काय? थेरपी पुरेशी आहे. शिवाय आमच्या घरात सगळे धडधाकट तर आहेतच पण औषधे बिउषधे कोणी घेत नाही बरं का." - नरेन

" नरेन, बहुसंख्य लोक हे औषधे न घेण्यात धन्यता मानतात. त्यांना औषधे म्हणजे कुबड्या वाटतात. पण क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाची आहे की औषध-शून्य जीवन हे आपण ठरवायचे. मी तुम्हाला बळजबरी करणार नाही. निर्णय तुमचा आहे. मी फक्त वाट दाखविणार." - मी
नंतर मी काही औषधांचे परिणाम आणि फायदे नरेन-संयुक्ताला, सविस्तर वर्णन केले.
>>>>>>>>>
नरेन, आपल्या हर्ष/आनंद आदी भावनांना कारणीभूत अशी ४ रसायने आहेत : एंडोर्फिन्स , डोपेमाईन ,ओक्सिटोसिन आणि सेरोटोनिन.प्रत्येकाचे ठरलेले कार्यक्षेत्र आहे.
एंडोर्फिन्स मुळे वेदना जाणवत नाहीत. जरा तुमच्यावरती एखाद्या प्राणघातक पशूने हल्ला केला तर एंडोर्फिन्स तयार होतात ज्यायोगे जोवर तुम्ही सुरक्षित स्थळी पोचत नाहीत, तोवर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. उदा - मला संधिवात आहे, मी २२ व्या मजल्यावर राहाते. आग लागते. आणि मी धावत धावत २२ माजले उतरते, अशावेळी मला गुडघ्यात वेदना जाणवत नाहीत याचे कारण असते रिलीझ झालेले एंडोर्फिन्स. मग कोणी म्हणेल कि एंडोर्फिन्स सतत रिलीझ होता राहिले तर उत्तमच की. तर तसे नाही. कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला कधी वेदनाच जाणवणार नाहीत. वेदनांमुळे आपण धोक्यांपासून बचावात्मक उपाय शोधतो. आपले अस्तित्वात टिकवण्यामध्ये (survival ) वेदनांचा सहभाग असतो. एंडोर्फिन्स हे आत्यंतिक सुखद भावना अथवा भीतीही निर्माण करण्यास कारणीभूत असतात. जणू काही आपल्या मानवी गरजा लक्षात घेऊन, धोके टाळण्याकरता नियुक्त केलेला देखरेख्या म्हणजे एंडोर्फिन्स. तेव्हा एंडोर्फिन्स हे सतत निर्माण होता नाहीत हे उत्तमच आहे.
.
नरेन, आता डोपेमाईन पाहू यात. डोपेमाईन केव्हा रिलीझ होतात तर तुम्हाला एखादे बक्षीस, काहीतरी आवडणारे मिळण्याच्या तुम्ही अगदी जवळ येऊन पोहोचला आहात. तुम्ही समजा रसाळ फळ तोडण्याच्या मिषाने, एखाद्या झाडावरती चढता आहात तर हे जे शेवटच्या २-४ फांद्या तुम्ही सहजगतेने ओलांडून जाता ते डोपेमाईनच्या जोरावर. जर तुमचे डोपेमाईन सदासर्व काळ निर्माण होतच राहिले असते तर तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती किती का किरकोळ असेना, तुम्ही आपली ऊर्जा तीमध्ये ओतत राहिला असता आणि महत्वाच्या गोष्टींकरता तुमची ऊर्जा वाचलीच नसती. तेव्हा डोपेमाईन सतत निर्माण होत नाही हे बरेच आहे. डोपेमाईन हे मुख्यतः एकाग्रता, फोकस यावरती काम करते म्हणजे आपल्याला काही साध्य करायचे आहे त्याकरता जी एकाग्रता लागते त्याचे कारकत्व आहे डोपेमाईन कडे. गाजराचे आमिष म्हणजे डोपेमाईन चे कर्तृत्व. सतत गाजर दिसत राहिले तर बैल/घोडा कसे पळत राहातील तसे हे रसायन आपली ऊर्जा एकाग्र करते. कोणतीही गोष्ट प्राप्त होणे या पेक्षा त्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास, तळमळ, ऍंटीसिपॅशन म्हणजे डोपेमाईनचे कारकत्व.
.
ऑक्सिटोसिन हे विश्वास निर्माण करणारे रसायन आहे. ते जरा सातत्याने निर्माण होता राहिले असते तर तुम्ही वाट्टेल त्या परक्या लोकांवर, वाईट झाला वृत्तीच्या लोकांवरही विश्वास टाकला असतात. मसाज, ऑर्गेझम, प्रसूती या काही ऑक्सिटोसिन, निर्माण करणाऱ्या क्रिया आहेत. जेव्हा गाय वासराला चाटते, किंवा आई मुलास जवळ हृदयाशी धरते, तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होते. मानव आई जेव्हा मुलं अन्य कोणाकडे सोपवते किंवा प्राण्यांतही जेव्हा पिल्लू कळपात सोडले जाते तेव्हा जे सामाजिक बंध निर्माण होतात, त्यातही ऑक्सिटोसिन निर्मिती होत असते. वर सांगितल्याप्रमाणे, ऑक्सिटोसिन सतत निर्माण होणे हे survival च्या दृष्ट्या अनुकूल नाहीच.
.
नरेन, आता वळू यात सेरोटोनिन कडे. सेरोटोनिन हे रसायन जेव्हा तुम्ही अधिकार गाजवता तेव्हा रिलीझ होते. मेंदूपेक्षा, माणसांच्या पोटात सेरोटोनिन अधिक असते, कारण आपले पूर्वज हे तेव्हा शांतपणे खाऊ शकायचे, पोटभर खाऊ शकायचे जेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी असायची, विश्वास असायचा. ही हमी केव्हा वाटते जेव्हा तुम्ही अधिक बलवान असता, जसे बलवान पूर्वज अन्न चोरण्यास येणाऱ्या अन्य प्राण्यांना पळवून लावत . सतत जरा सेरोटोनिन रिलीझ होता राहिलं तर तुम्ही सर्वांकरता एक डोकेदुखी होऊन बसाल.
.
बरे होण्याकरता, फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागते. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.

हळूहळू हिप्नोथेरपी तसेच कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सुरुकरण्याचा मानस आहे. नरेनचे शरीर औषधांना कसा रिस्पॉन्स देते हे पाहून, पुढे निर्णय घेता येइल.
नोटस - हे सारे संयुक्ताला चटकन पटले आणि तिने नरेनशी सल्ला मसलत करुन, आता नरेनने औषधे घेण्यास सुरुवात केलेली आहे - जमेची मोट्ठी बाजू.
.
.
.
.
.
.
११/१०/२०२१
नोटस - नरेनला औषधे मानवत आहेत. त्याला पहील्यापेक्षा खूप खूप स्वभान आलेले आहे. आपल्याला, कधी डिप्रेसिव्ह वाटते कधी अ‍ॅग्झायटी होते ते ट्रिगर्स त्याला कळू लागलेले आहेत. सी बी टी आजपासून सुरु करण्यास हरकत नाही. नरेनचे आणि संयुक्ताचे पती-पत्नी संबंध पहील्यापेक्षा खूप खूप सुधारलेले आढळतात. दोघांचे नाते फुलते अहे.- जमेची बाजू. नरेन १००% बरा होत आहे, होणार आहे. एक यशस्वी केस!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला यापुढे काय लिहावे ते कळत नाही. - संयुक्ता चा विवाहबाह्य अनुभव आणि त्यबद्दल नरेनला कळणे - त्यवर त्याची प्रतिक्रिया - त्यांचे एकमेकांनी बदललेले किंवा न बदललेले रीलेशन ?

तिनही भाग उत्तमोत्तम जमुन आलेत..
संयुक्ता, नरेन आणि समुपदेशक या तिघांचे POV बघायला मिळाले..

पुलेशु..! :⁠-⁠)

असामी, धनवन्ती, मन्या ऽ - खूप आभार.
>>>> संयुक्ता चा विवाहबाह्य अनुभव आणि त्यबद्दल नरेनला कळणे - त्यवर त्याची प्रतिक्रिया - त्यांचे एकमेकांनी बदललेले किंवा न बदललेले रीलेशन ?
मला त्या विषयावर अजिबातच काही सुचत नाही.

छान लिहिलेय सामो.. अगदी अभ्यासू लेख झालाय Happy

संयुक्ता चा विवाहबाह्य अनुभव आणि त्यबद्दल नरेनला कळणे -
>>>>
तो माणूस आणखी डिप्रेशनमध्ये जाईल
अज्ञानात सुख असते Happy

न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. >>>>>>>>

ही माहिती, हार्मोन्स बद्दल एवढ्या सोप्या भाषेत लिहिला आहात... खूपच मस्त...

पुढे काय...
हॅपिली एवर आफ्टर...
अर्थात् माझ्या मते त्यांच्यात त्यांचे त्यांचे वैवाहिक जीवनात अप्स अँड डाऊनस् येतच राहतील... Which is inavitable.. पण हा भाग खरचं खूप मस्त झालाय...

धन्यवाद मधुरा. हा किल्ली व कुलुपांचा दॄष्टांत 'बॉय हु वॉज रेझ्ड अ‍ॅज अ डॉग" या विलक्षण पुस्तकातील आहे. अफाट पुस्तक आहे. हृदयद्रावक अशा बाल मनोरुग्णांच्या सत्य केसेस आहेत. निव्वळ विलक्षण पुस्तक आहे.

'बॉय हु वॉज रेझ्ड अ‍ॅज अ डॉग">>>>>>

कोणी लिहिलं आहे ते सांगाल का?? मला वाचायला आवडेल...

आणि खर सांगायचं तर वास्तविक किल्ली कुलूप अश्याच mechanisam ने या रिएक्शन होत असतात...
Rather, lock and key hypothesis असच त्या थिओरी च नावं आहे...

The Boy Who Was Raised as a Dog: And Other Stories from a Child Psychiatrist's Notebook -- What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing – by Bruce D Perry

एच टी एम एल काम करत नाही मला हे खालील विवेचन लपवता येत नाही. वॉर्निंग - ग्राफिक डिटेल्स आहेत. स्वतःच्या जबाबदारीवर वाचावेत.
-------- माझ्या एका लेखातून -----
काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "" पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत.
(१) पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना. या १८ वर्षाच्या मुलाने २ लहान मुलींचा (वय वर्षे १२ व १३)खून करुन, नंतर त्यांच्या शवांवर बलात्कार तर केलाच तरीही त्याच्या राग शांत होईना तेव्हा बूटांनी त्यांना चिरडले.
पण हे सर्व प्रक्षोभक आणी हिंसक व भडक लिहीण्यासाठी हा धागाप्रपंच नाही तर त्या मुलाशी व त्याच्या पालकांशी बोलून या मानसोपचारतज्ञाला जी "इनसाईट" मिळाली ती मला सांगायची आहे.
या मुलाची आई जी डोक्याने थोडी अधू होती, तिला मुलाचे रडणे सहन न झाल्याने, या मुलाला तान्हे असताना अंधार्‍या खोलीत रडत ठेऊन बाहेर निघून जात असे. असे महीनोंमहीने केल्याने त्या बाळाचे रडणे तर थांबले पण मानवी संपर्कातून जी ऊब व माया मिळते ती न मिळाल्याने, हा मुलगा माणसांवर विश्वास टाकणे, त्यांच्या सकारात्मक प्रोत्साहनास प्रतिसाद देणे , त्यांच्या भावनांशी एकरुप होणे अशा काही मुलभूत "ट्रिगर्स्"पासून वंचित राहीला. त्यातून त्याच्या संतापाचा, "सहानुभूती व सहवेदनेच्या अभावाचा" जन्म झाला.
लेखकाने खूप सोप्या पण वैद्यकीय भाषेत हे उलगडून दाखविले आहे. पुस्तक खाली ठेववतच नाही. या पुस्तकातील अन्य लहान मुलांच्या कथाही अशाच विद्रावक, भयानक पण दु:खाचा कढ आणणार्‍या होत्या. एक वेगळ्याच विषयावरचे पुस्तक.
गुडी -गुडी पुस्तकांपेक्षा फार वेगळ्या अन व्यावहारीक विषयावरचे पुस्तक असे म्हणेन.
.
हे पुस्तक लायब्ररीत मिळाले. सर्वच कथा विचित्र व हृदयद्रावक वाटल्या.बालमानसोपचारतज्ञाचे काम इतके अवघड असेल याची कल्पना नव्हती.
(२) एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ तासांनी सापडल्यावर काही महीन्यांनी तिने फोटोच्या ढीगातून त्या खून्याला ओळखले. पुढे विटनेस म्हणून तिला वापरणार होते पण त्याची पूर्वतयारी म्हणून ती ४ वर्षाची असताना बाळाला मानसोपचारतज्ञाकडे पाठविले गेले.अन मग थेरपी सुरु झाली.
की मुलगी काय करत असेल बरं थेरपीत? तर डॉ. पेरींवर विश्वास बसल्यानंतर ती हळूहळू ओपन अप झाली व "तो' सीन स्वतःची स्वतः एनॅक्ट करु लागली. ती पेरींना हात बांधल्यासारख्या कल्पित अवस्थेत झोपवत असे.थोपटत असे, मधेच जाऊन दूध आणे व देई,खेळणे आणे व देई. पेरी अर्थातच 'त्या आईची" भूमिका करत असल्याने हालचाल करत नसत.मग ती त्यांच्या अंगावर झोपून "रॉक अन हम" करत असे.कधी रडत असे/हुंदके देत असे.हे असे दर सेशनमध्ये होई.या थेरपीचा की पॉईंट हा होता की त्या मुलीला सिचुएशनचा पूर्ण "कंट्रोल" पेरींनी दिला. जो कंट्रोल तिला "तेव्हा" मिळाला नाही तो या सेशनमध्ये तिला दिला गेला. अन हीलींग सुरु झाले.
पुढे ही मुलगी खूप 'प्रॉडक्टीव्ह" आयुष्य जगली,जगते आहे. तिला उत्तम ग्रेडस मिळाल्या. तिचे स्वतःचे कुटुंब आहे. ती एक द्याळू व संतुलीत व्यक्ती आहे. शी इज जस्ट डुईंग फाईन.
.
अर्थात फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागली.क्लोनॉडीन नावाच्या औषधामुळे तिचे निद्रेविषयक बरेच प्रश्न सुटले, बेल वाजल्यावर दचकणे आदि भीती दूर झाली वगैरे. याच कथेत औषधोपचारावरती एक फार मार्मीक मिमांसा केलेली आहे. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.
पुढेही सोप्या वैद्यकीय भाषेतील खूप विश्लेषण या कथेत वाचावयास मिळते.

ही कथा व हे एकंदर पुस्तकच मानवी मेंदूची गुंतागुंत सोडविणारे वेधक वाटले.
(३) एक शेवटची "केस" सांगते. अँबर नावाची मुलगी स्वतःच्या मनगटावर रेझर/सुरीने "कट्स" देत असे. बरेचदा असे "सेल्फ्-म्युटिलीएशन" करणार्‍या मुलामुलींचा भूतकाळ अंधारमय/यातनामय असतो आणि अँबरही याला अपवाद नव्हती.
७ वर्षाची असल्यापासून तिच्या सावत्र वडीलांनी केलेल्या लैंगिक शोषणाची ती शिकार होती. वडील दारु प्यायचे तेव्हा "तसे" वागायचे. भीतीमुळे तिने हे लपविले होतेच पण पुढेपुढे एकदाचे "ते" होऊन जाउ दे या हेतूने ती त्यांना दारु देणे/प्रव्होकेटीव्ह वागणे आदि करुन ती तो यातनामय प्रसंग हातावेगळा करत असे. पुढे २ वर्षांनी आईला ने वडीलांना तिच्याबरोबर पाहीले व हाकलून दिले. पण आईने काही मानसोपचारतज्ञाची मदत घेतली नाही.
लहानपणीच्या या स्मृती अँबरकरता इतक्या ओव्हरव्हेल्मींगली यातनामय होत्या की हळूहळू त्या स्मृतींपासून स्वतःला "डिसोसीएट" करायला ती मनगटावर "कट्स" देऊ लागली व "ट्रान्स" मध्ये जाऊ लागली. अशा प्रकारची मुले जे ड्रग्ज घेऊन साधतात ते ती स्वत:ला जखमा करुन साधू लागली.
तिला लहानपणाची लाज (शेम) व गुन्हेगार (गिल्ट) वाटे पण स्वतःला सुरक्षित करण्याची पॉवर तर हवी होती. यातून सुरु झाले एक समांतर आयुष्य!
प्रसंगी ती स्वतःला कावळा समजे. अतिशय चतुर/स्मार्ट पक्षी जो पॉवरफुल आहे, वाईटाचा पारीपत्य करणारा आहे. अन तो काळा हीडीस आहे, कोणालाही नको असलेलाही आहे. हवे तेव्हा ती त्या जगात निसटून जाई , जिथे ती कावळा असे. ती फक्त काळे कपडे घाले, शरीरावर काळे टटू रेखाटून घेत असे.
डॉ पेरींनी तिला कशी थेरपी दिली, तिला श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकविले, १ श्वास - १ पायरी- २ रा श्वास-दुसरी पायरी .... अशा १० पायर्‍या उतरुन तिला मनातल्या मनात जीन्याखालच्या अंधार्‍या पण सुरक्षित खोलीत जायला "स्मृती पासून डिसोसीएट करायला" शिकवले ज्यायोगे ती "कट्स" देईनाशी झाली.
पुढे याच थेरपीतून त्यांनी तिला हे पटवून दिले की जग "हीडीस समजून" तिला नाकारत नसून ती जगावर तिच्या शेम व गिल्टचे आरोपण करत एक सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी जगत आहे हे तिच्या लक्षात आणून दिले.
.
अर्थात औषधोपचारही लागलेच लागले. या औषधांचे मेंदूवर होणारे परीणाम व विश्लेषण केवळ वाचनीय आहे. या पुस्तकातून एक नक्की अर्थबोध झाला तो म्हणजे - बाळाची पहीली वर्षे फार फार नाजूक असतात अन आई -वडीलांचा रोल फार महत्त्वाचा (क्रुशिअल) ठरतो. दुसरे एक कळले ते हे की मुलांना रुटीन/एक स्ट्रक्चर (साचा) लागते. एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
.
प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे.

सामो, तुझा हा प्रतिसाद एक उत्तम आणि आवश्यक लेख बनू शकेल. हे पुस्तक आणि अशा प्रकारच्या पुस्तकांचे तुझे बरेच वाचन आहे हे जाणवते.

धनवन्ती मानसशास्त्रात खूप रस आहे पण त्यातही बरेच प्रकार आहेत - चाइल्ड सायकॉलॉजी, अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी, ऑर्गझायझेशनल सायकॉलॉजी, हे काही मला माहीत असलेले. मला लहान मुलांकरता काम करायला आवडले असते. किंबहुना समाजशास्त्रातच एम ए करायचे होते. मला वाटतं सोशल वर्कर होण्याकरता ते आवश्यक असते. पण आता आत्मविश्वास राहीलेला नाही. शिवाय अनेक स्त्रियांचे अनुभव टिव्हीवर , अन्य मिडियात ऐकून आहे जिथे गुंडांच्या विरुद्ध जाणे, त्यांच्या जीवावरही बेतलेले आहे. तेव्हा सोशल वर्क अलहिदा. सायकॉलॉजीचे शिक्षण घ्यायचे तर बायोलॉजी घ्यावे लागते. ११-१२ वी इलेक्ट्रॉनिक्स असल्याने, जीवशास्त्राला फाटा होता.
आता फक्त वाचते. आणि तसेही थिअरी व प्रॅक्टिकलमध्ये फार फार अंतर आहे. त्यामुळे कदाचित झाले ते योग्यच झाले असे वाटते. मी काही शूर नाही. आता वरच्या केसेसच बघ ना. त्या मुलांना जवळ घेउन, त्यांना प्रेम द्यावेसे वाटणे वेगळे आणि त्यांच्यावर औषधोपचार करणे वेगळे. त्याकरता तुमच्याकडे निष्णात, क्लिनिकल माईंडसेट हवा.
हे डॉक्टर पेरी कधीतरी भेटावेत असे वाटते. त्यांनी हे पुस्तक फार छान लिहीलेले आहे.

सामो, तुझा हा प्रतिसाद एक उत्तम आणि आवश्यक लेख बनू शकेल>> खरंच. मनावर घेच. . किमान पुस्तक परिचय म्हणून तरी लिही.

प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे>>>>>

केवळ समुपदेशक च नाही तर तुमच्या छोट्याश्या पुस्तकं परीचायाने प्रत्येकाने वाचावे अस पुस्तकं आहे अस वाटत...

तसेही थिअरी व प्रॅक्टिकलमध्ये फार फार अंतर आहे. त्यामुळे कदाचित झाले ते योग्यच झाले असे वाटते. मी काही शूर नाही. >>>>>>

हो हे खरय की थियरी प्रॅक्टिकल मध्ये खूप फरक आहे... आणि खर सांगायचं तर, शुर असण्याची परिभाषा सीमित नाहीय... शुर असणं म्हणजे काहीतरी जीवावर बेतेल असच काम करण नाही... आपले विचार व्यक्त करणं आणि त्यातून अगदी थोडीशी का होईना समाज जागृती करण हे पण शुर पणांचाच भाग आहे ...
अर्थात् हे मझ मत आहे...

बाकी तुम्ही मेंशन केलेलं पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी लिंक टाकतेय.
बाकी कोणाला वाचायचं असेल तर...
https://b-ok.africa/book/5709038/7253e2/?

आणि ही लिंक work झाली नाही तर zlib search करून त्याच्या सर्च बॉक्स मध्ये पुस्तकाचं नाव टाऊन search करा...
Epub फॉरमॅट मध्ये पुस्तक download करता येईल

एक शंका आहे - तुम्ही लिखाण करताना पेन वापरता त्यात AI आहे का Wink इतकं चतुरस्र लिखाण आणि तेहि एकाच कथानकावर विविध एंगलने लागोपाठ लिहिणे म्हणजे फक्त एकच प्रतिक्रिया देऊ शकतो - __/\__

--------------------------

मला यापुढे काय लिहावे ते कळत नाही. अनुभव नाही आणि कल्पनाही येत नाही Happy इथेच हे डॉक्टरांचे सेशन्स संपवित आहे.
----------- समाप्त------अजुन एक भाग होणे आहे किंवा खरं तर तुमचा व्यासंग आणि अभ्यास पाहता ह्याच कथा नायक आणि नायिकेला मध्यवर्ती ठेवत मानसोपचार आणि त्याच्या फलिताची विविध व्हिक्टिम्स वरती सीरीज बनवु शकता. जसे की उपचारानंतर त्या दोघांचे हॅपी मैरिड लाइफ आणि नंतर गोंड्स बाळ वगैरे सोपस्कार झाल्यावर ह्या जोडप्याने आपल्यासारख्या पिडिताना भावी आयुष्यात न्याय / उपचार / पुनर्वसन करण्यास केलेली वैयक्तिक / सामजिक संस्था माध्यम ठेवून केलेली मदत !!

खूपच मस्त लिहिलं आहे सामो.
अभ्यास जाणवतोय.इतक्या सोप्या शब्दात पहिल्यांदा वाचलं.
लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं.हसत खेळत मनाची ओळख.ते आठवलं.
विचाराच्या शक्तीने एका माणसाचा हात पूर्ण लुळा पडला अशी एक केस त्यात होती.(खूप कडक वडील, त्यांच्या बद्दल मनात संताप, हात उगारून त्यांना मारण्याचे विचार मनात येणे, आणि त्या विचाराचा गिल्ट येऊन 'स्वतःच्या वडलांवर हात उगारण्याचे कृतघ्न विचार येण्यापूर्वी माझा हात लुळा का पडत नाही' अशी भावना सतत मनात.)

खरंच, अमेझॉन वर पुस्तक ई पब्लिश करण्याचा विचार नक्की होऊदे.

3 ही भाग खूप छान सामो ...नाण्याची दुसरी बाजू दाखवणारे...आणि ते पुस्तक परिचय ही सुंदर !

((इतकं चतुरस्र लिखाण आणि तेहि एकाच कथानकावर विविध एंगलने लागोपाठ लिहिणे म्हणजे फक्त एकच प्रतिक्रिया देऊ शकतो - __/\__))+111

छान. सगळे नीट जुळावे, सगळे स्केल balance व्हावेत असे आयुष्यात क्वचितच घडते. त्यामुळे शेवट आवडला. तिन्ही भाग आवडले.

मला ह्यावरून बोजॅक हॉर्समन सिरीज आठवली. उत्तम सिरीयल आहे ती सुद्धा, मेंटल हेल्थ वरच आहे. फक्त थीम किंचित वेगळी आहे. मुख्य पात्राला लहानपणात मिळालेली मिस्ट्रिटमेंट, स्वतःचे अल्कोहोल addiction, self destructive behaviour आणि आपल्या स्वार्थी वागणुकीमुळे अनेक लोकांची वाताहात - ह्या सगळ्या गोष्टींशी कसे डील करतो हे उत्तम दाखवले आहे. बघितली नसेल तर नक्की बघा.

शर्मिला, कॉमी, अनु, पवार, अज्ञानी आणि स्वान्तसुखाय आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
प्राचीन अगं हा माझा उतारा मी एका लेखात टाकलेला आहे. तेव्हा परत त्याचा लेख बनवत नाही.

मंजूताई धन्यवाद.
>>>>>>>तुम्ही लिखाण करताना पेन वापरता त्यात AI आहे का
हाहाहा. आवडता विषय असला की सुचत जाते.

तिन्ही भाग छान लिहिलेत सामो तुम्ही !!! नरेन च्या अज्ञानातच सुख आहे . तुम्ही open end सोडलाय तोच बरोबर वाटतोय.

तीनही भाग छान लिहिले आहेत

पहिल्या भागातील चटका हे सद्य परस्थितीतील एखाद उदाहरण असू शकत,
दुसऱ्या भागात नरेन चा दुर्दैवी भूतकाळ खरच जास्त चटका लावतो. पुरुषांवर लैंगिक अत्याचार (पुरुषांकडून आणि महिलांकडून ) होऊ शकतात हे खूप कमी जणांना पटत. लहान वयात घडलेल्या अशा गोष्टी खूप खोलवर परिणाम करतात
तिसरा भाग मात्र खूप पुढे गेल्या सारखा वाटला. मधे संयुक्ता च धक्क्यातून सावरण, नरेन शी पुन्हा संवाद साधण, त्याचा विश्वास कमावून त्याला डॉक्टर कडे नेण हा मोठा पल्ला आहे.... पहा जमल कधी तरी तर भाग २.५ Happy

तिसऱ्या भागात endorphins, dopamine, oxytocin, serotonin बद्दल चांगलं स्पष्टीरण दिलंय

पण एक सुधारणा दाखवल्या शिवाय प्रतिसाद पूर्ण नाही करता येत

>>>>मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. >>>>

Neurons म्हणजे चेतापेशी, अशा असंख्य neurons च जाळ= neuronal network आपल्या मेंदूत पसरलेल असतं
प्रत्येक neuron हा एक IO device सारखा म्हणावा लागेल, ते एकमेकांकडे माहिती संक्रमित करताना neoro-tranmitters चा उपयोग करतात, वर उल्लेखलेले dopamine, oxytocin हे त्यापैकी काही. ह्या neoro-tranmitters आणि त्यांच्या receptors ना किल्ली आणि कुलूप ही उपमा योग्य आहे.
काही Psychoactive medicine ही किल्ली च काम करतात (agonist) तर काही, ती कुलूप थोड्या वेळा करता बंद करून ठेवतात (antagonist), कुठल्या आजारावर कुठली किल्ली वापरायची हे डॉक्टर ठरवतात

असो ..इथे basic neurobiology चा वर्ग घेण्याचा माझा हेतू नव्हता
साधारण २० वर्षांनी पुन्हा मायबोली वर biologist ची नवीन पिढी दिसली तेंव्हा राहवलं नाही

@सामो, @ मधुरा ह्या विषयाला अुसरुन भविष्यात तुमच्या कडून छान कथा , लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो

@ manya खूप छान सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
>>>>>>मधे संयुक्ता च धक्क्यातून सावरण, नरेन शी पुन्हा संवाद साधण, त्याचा विश्वास कमावून त्याला डॉक्टर कडे नेण हा मोठा पल्ला आहे
Happy होय मोठ्ठा पल्ला आहे खरा.
>>>>>इथे basic neurobiology चा वर्ग घेण्याचा माझा हेतू नव्हता
नाही नाही. खरच खूप छान माहीती दिलीत तुम्ही.

असो ..इथे basic neurobiology चा वर्ग घेण्याचा माझा हेतू नव्हता
साधारण २० वर्षांनी पुन्हा मायबोली वर biologist ची नवीन पिढी दिसली तेंव्हा राहवलं नाही

@सामो, @ मधुरा ह्या विषयाला अुसरुन भविष्यात तुमच्या कडून छान कथा , लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो...>>>>>>>>>>>

नक्किच...
Rather तुम्ही बेसिक न्युरोलॉजी explain केलेली मला वाचायल आवडली... माझ न्यूरोलॉजी चा डीप मध्ये अभ्यास नाहीय पण त्यात phd साठी मी न्युरोलॉजी चाच विचार करतेय.. अशी बेसिक माहिती मिळत गेली तर मला नक्कीच आवडेल...
@manya...

तीनही कथा वाचल्या.
स्वतंत्र म्हणूनही छान.
ही फारच छान वाटली.
मदत मिळणे किती महत्वाचे हे लक्षात येतंय.

Pages