भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>श्रीसूक्तात क्षुत्पिपासामलाम् ज्येष्ठाम् अलक्ष्मीम् नाशयाम्यहम् असं म्हटलं आहे. म्हणजे क्षुधा-तहान इत्यादींनी लिप्त अशा, (लक्ष्मीची) मोठी बहीण (ज्येष्ठा) अलक्ष्मीचा मी नाश करतो/करते.
आमच्या एकवीरेचा मंत्र आहे -
महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा। निद्रा तृष्णा चैकवीरा कालरात्रिर्दुरत्यया ....

जेव्हा आईचे हे तामसिक रुप - लक्षात आले तेव्हा मी प्रार्थना करणे थांबविले नाही पण जेवणात घेतलेल्या मीठासारखी ती कमी केली खरी. हे रुप थोडं भितीदायक आहे. कालीमातेचे रुप आहे अशी जाणिव झाली. तेव्हा प्रार्थना होते पण ...... अति नाही. प्रमाणात आणि भीतीयुक्त आदराने.

>>>>>>बाकी ह्याला आर्य/आर्येतर, सवर्ण / अवर्ण असे बरेच कंगोरे असल्याचे वाद होत असतात. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही आणि धाग्याचा तो विषय नाही. त्यामुळे फक्त असे अर्थ असू शकतात इतकंच नमूद करून इथे थांबतो.
हे खूप रोचक आहे. मी नक्की शोधून वाचेन.

>>>>>>>>चक्रीवादळाचे Biparjoy (Biporjoy) हे नाव बंगाली भाषेतील आहे….
लिहायचे राहिले, संस्कृत चा ‘विपर्यय’ आहे तो शब्द. ध्वस्त करणारा.
रोचक आहे हे. अनिंद्य धन्यवाद.

छान.
...
आता विकांताच्या पूर्वसंध्येला एक नवा शब्द चर्चेस घेतो :
रसदशास्त्र
हा एका मराठी अनुवादात वाचला. हा ज्या इंग्लिश शब्दासाठी प्रतिशब्द आहे त्याची सध्या एकदम चलती आहे.
ओळखणार का तो इंग्लिश शब्द कोणी ?

Logistics

धर्मकुढाव

विचित्र वाटला हा वाचलेला शब्द. “धर्मरक्षक” असा अर्थ दिला होता पण बोध झाला नाही. कुढाव ?

मी अनेकदा वापरते हा शब्द. पण काहींना माहिती नव्हता तर त्याचं स्पष्टिकरण दिलं. इथे आलाय का तो शब्द आठवत नाही. असेल तर दुर्लक्ष करा.
शोशा
खरं तर फारसी शब्द आहे. फारसी लिपीमधे, अक्षरांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी अक्षराच्या शेवटी जास्तीचे टोक काढणं म्हणजे शोशा. तर त्यावरून उगा दिखावा करणे म्हणजे शोशा.
आता हा शब्द माझ्यापर्यंत खूप आधी, अगदी शाळेपासून आलाय. कसा माहित नाही.

शोशा
वा ! आवडला.
..
त्याच्याशी साधर्म्य दाखवणारा हा एक शब्द सापडला :
सोशा
= सों ! सों ! करीत व अकस्मात येणारा, वहाणारा (वारा)

शोशा >> अच्छा! असा शब्द खरोखर आहे होय! मला वाटायचं की जसे जोडशब्द बनवतो ना आपण ब लावून, किल्ले - बिल्ले, पाणी-बिणी, हिंदीत व लावून शादी - वादी, तसा श वापरून शो - शा असा केला आहे की काय (म्हणजे 'शो' बाजी, देखावा-बिखावा). आज खरी माहिती कळली. आभार.

चक्रीवादळाचे Biparjoy (Biporjoy) हे नाव बंगाली भाषेतील आहे….
लिहायचे राहिले, संस्कृत चा ‘विपर्यय’ आहे तो शब्द. ध्वस्त करणारा.

>>> याचा 'विपर्यास' शी संबंध असू शकतो का? असाच 'विपरीत' हा शब्दही आठवला.

निघोट हाही एक शब्द कमी वापरला जातो.
निघोट म्हणजे गुठळ्या नसलेला सरबरीत तयार पदार्थ. जसे की श्रीखंड, घट्ट बासुंदी. ज्यात गुठळ्या नसतील. घोटून घोटून गुळगुळीत पण सरबरीत तयार पदार्थ.
शब्दकोषात याचा अर्थ, मराठीत : संपूर्ण, परिपूर्ण; तर इंग्रजीत : well-formed दिलेला दिसतो.

शोशा शब्द इन्टरेस्टिंग आहे - वाक्यात कसा वापरतात?

तुम्ही बृहद्कोषाचा दुवा दिला आहे, तिथे सोस आणि शोष यांच्यातला संबंध पाहून एकदम 'युरेका' मोमेन्ट आली! Happy

दर्पदलन

आधीच्या पानावर 'दर्प' बद्दल चर्चा झाली होती, आज 'दर्पदलन' हा सुंदर शब्द वाचनात आला.

दर्प म्हणजेच गर्व, अभिमान नष्ट करणारा, त्यासाठी कारणीभूत होणारा = महाविद्वान / योगी / गुरु / ईश्वर या अर्थी = दर्पदलन

ओह, नवीन शब्द
मी आधी दर्पदमन वाचल. मग लक्षात आलं दर्पदलन आहे

दर्प >> अभिमानापेक्षा दर्प या शब्दाला दुरभिमान, गर्व वगैरेचा दर्प ('वास' हा त्याचा मराठीत दुसरा अर्थ आहे Happy ) येतो. बाकी दर्पदलन या शब्दाचा अर्थ पटला. नव्यानेच ऐकला हा.

कंदर्प = कामदेव , हा एक शब्द आठवला.

दर्पदलन >>>
सुंदर शब्द ! छान चर्चा...

चमक, उसण, लचक आणि सणक यांना समानार्थी असणारा एक नवा शब्द प्रथमच ऐकला :
शिलक/ शिळक.

शिल्लक हा आपल्याला वेगळ्या अर्थी माहित असतो. अखेर कोशांमध्ये पाहिल्यावर सगळे स्पष्ट झाले :
शिलक / शिल्लक =
(फा) बाकी उरलेली रक्कम ; चमक.

तसेच सणकचा उगम खालील शब्दांपासून आहे :
शिणक, शिणीक

Pages