व्हेजिटेबल राईस नूडल सूप

Submitted by अल्पना on 17 October, 2022 - 13:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आले - लसूण, एक छोटा कांदा, गाजराचा एक तुकडा, मुठभर बीन्स, ५-६ बेबी कॉर्न, ४-५ मशरूम, मूठभर पालकाची पाने, कांद्याची पात, १०० ग्राम पनीर, सोया सॉस, स्वीट चिली सॉस/ चिली सॉस, व्हेजिटेबल स्टॉक, फ्लॅट राईस नूडल्स

क्रमवार पाककृती: 

महाराष्ट्रात अजून पावसाळाच सुरू असला तरी आमच्याकडे दिल्लीत मात्र हिवाळा तोंडावर आलाय. सकाळ - संध्याकाळी थोडा गारवा जाणवतोय, पंखे १-२ नंबरवर लावले तरी पुरते दिवसभर. त्यात सगळीकडे फ्लू च्या केसेस पण वाढल्यात. २-३ दिवसांपासून लेक सर्दी - पडश्याने आजारी आहे त्यामूळे रोज रात्री सूप बनवणे सुरू केले आहे.
आज फ्राईड राईस करून उरलेल्या थोड्या भाज्यांचा वापर करून सूप बनवले.
थोड्या तेलावर बारीक चिरलेले आले - लसूण आणि कांदा परतले. त्यात सगळया बारीक चिरलेल्या भाज्या घालून थोडे परतले. नंतर दीड - दोन ग्लास व्हेजिटेबल स्टॉक घातला. सूप उकळत आल्यावर त्यात अर्धा चमचा ताहिनी, थोडा सोया सॉस आणि थोडा स्वीट चिली सॉस ( या ऐवजी साधा चिली सॉस घातलेला जास्त चांगला लागतो. आम्हाला कमी तिखट सूप बनवायचे होते) घातला. वरून चिरलेले पनीर, कांद्याची पात आणि राईस नूडल्स घातले.
व्हेजटेबल स्टॉक मी अंजली च्या टॉम याम सूप मध्ये दिलेल्या पद्धतीने बनवते. १-२ दिवसांचा बनवून ठेवलेला असतो भाज्या निवडताना तुकडे बाजुला काढून.
भाज्यांमध्ये आज गाजर, बीन्स, मशरूम, बेबी कॉर्न आणि पालक वापरला होता. माझा लेक तिखट खात नाही फारसे म्हणून मी नंतर माझ्या सूपमध्ये शेजवान सॉस घालून घेतला.

वाढणी/प्रमाण: 
२ जण
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
हेच बीफ स्टॉक मधलं केलं तर फो (फं) सारखं लागेल का? ते करता आलं तर सुडोमी मोमेंट असेल.

फो खावून बघितलं नाहीये. आत्ता रेसिपी वाचून बघितली. थोडे लिंबू किंवा आंबट पणासाठी काहीतरी घालावे लागेल आणि त्या बीफ किंवा चिकन स्टॉक मध्ये बरेच गरम मसाले वापरलेले दिसले, तर त्याचा पण फरक पडू शकेल.
( इथे कोणीतरी लिहिली आहे का रेसिपी? कदाचित वर्षू ताई ने इथे किंवा मग फेसबूक वर लिहिली होती)

अल्पना, रेसिपी चटकन होणारी आणि अत्यावश्यक कॅटेगरीतील आहे.

प्लीज मला अंजलीची veg स्टॉकची रेसीपी मिळेल का ?

प्लीज मला अंजलीची veg स्टॉकची रेसीपी मिळेल का ?>>> माधव नी दिली आहेच. फक्त मी दरवेळी यात काफर लाइम आणि लेमन ग्रास घालत नाही.

नूडल्स घरी करता येतील का? (तांदूळ/गहू)

इडिअप्पमच्या शेवया म्हणजे राईस नूडल्सच्या जवळपास जाईल काय?

नूडल्स घरी करता येतील का? (तांदूळ/गहू)>>> मध्ये एकदा प्रयोग म्हणून गव्हाच्या पिठाचा पास्ता आणि नूडल्स करून बघितले आहेत. तेल, मीठ, पाणी, अंडे घेवून त्यात गव्हाचे पीठ + मैदा मळून घ्यायचा. मळलेले पीठ किमान दोन एक तास बाजूला ठेवायचे. आणि मग त्याची पातळ पोळी लाटून त्या पोळीचे लांब फ्लॅट नुडल्स कापायचे. पीठात टॉस करून ठेवायचे म्हणजे चिकटत नाहीत. ही पद्धत आहे. नुसते गव्हाचे पीठ घेवून चालणार नाही, भरपूर ग्लूटेन तयार होण्यासाठी मैदा किंवा ब्रेड साठीचे पीठ घ्यावेच लागेल थोडे तरी. एकूणच इतकी किचकट आणि वेळखाऊ प्रोसेस आहे की मी एकदा प्रयोग केल्यानंतर परत कधीच करायचे नाही असे ठरवले.
शेवया वापरून बघता येतील नुडल्स च्या ऐवजी.

इडिअप्पमच्या शेवया जरा जास्त नाजूक असतात. वाफवून सूपात घातल्या तर मोडतील बहूतेक किंवा मग गाळ होईल कदाचित. न वाफवता सरळ सूप मध्ये घालून उकळले तर जमेल का हे करूनच बघावे लागेल.

पण एवढे कुटाणे करण्यापेक्षा बाजारातले नुडल्स वापरलेले सोपे. शिवाय आम्ही तरी यात नूडल्स चे प्रमाण खूप कमी ठेवतो. पोट भरण्यासाठी खरे तर यातल्या भाज्या आणि पनीर ( नॉन व्हेज च्या वेळी चिकन) पुरेसे होते. थोडे तरी कार्ब हवे जेवणात स्पेशली मुलांच्या म्हणून नूडल्स.