
मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :
१००, ०००,०००,०००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).
आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !
बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर ( ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.
ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,
“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.
आज १०दशपद्म च्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.
…
जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :
“आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”
2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता :
१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.
या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.
झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्यांच्या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.
जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात (https://www.maayboli.com/node/71538). त्यातील विविध विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.
“त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
.....................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !
मला त्या एकंदरीत संख्या
मला त्या एकंदरीत संख्या नामाबद्दलच शंका आहे
त्यात एक बाप म्हणून पण एकक आहे मग त्यावेळी असं म्हणत असतील का की काय बाप संख्या आहे किंवा हा तारा आपल्यापासून बाप योजने दूर आहे वगैरे
रोचक माहिती!
रोचक माहिती!
इतिहासातील तीव्र चलन
इतिहासातील तीव्र चलन फुगवट्याचे अजून एक उदाहरण.
दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीतील आर्थिक परिस्थिती खराब होत गेली आणि 1970 पासून ते तिथे युरो प्रस्थापित होईपर्यंत चलन फुगवटा वाढतच होता. त्यांनी एक लाख लिराची नोट सुद्धा काढलेली होती. 1970 ते 80 च्या दशकात मी ऐकले होते, की इटलीतील नागरिक सुद्धा बॅग किंवा पिशवीमध्ये नोटा घेऊन खरेदीला जात असत.
https://numismatics.org/collection/2010.62.5
इतिहासातील तीव्र चलन
दु प्र.
अवल,
अवल,
लहानपणापासून अक्षौहिणी म्हणजे किती याचे कुतूहल होते.तुमच्याकडून चांगली माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
आशुचँप,संख्या नामाबद्दलच शंका
आशुचँप,
संख्या नामाबद्दलच शंका >>> + १
कोषागणिक फरक आहेत.
बृहद्कोश पहा :
खर्व = Ten thousand millions.
पद्म = Ten billions
..
शब्दरत्नाकर :
खर्व = १० अब्ज
पद्म = १ अब्ज /१०० कोटी
दोन्ही कोशांचे खर्व जुळतेय ( तरी पण अजून कोणी तपासा); पद्म ??
......
अधिकृत गणित कोशात पाहणे हेच यावरील उत्तर आहे !
माझ्या मते यासाठी भरत हे योग्य व्यक्ती आहेत
चलन किंमत कमी होणे त्या मुळे
चलन किंमत कमी होणे त्या मुळे खरेदी साठी
खूप नोटा लागणे.
हा काही खरा प्रश्न नक्कीच नाही.
डिजिटल युगात जिथे नोटांची गरजच नाही तिथे त्तर फरक पडणार नाही.
कारण ती समस्या च नाही.
पगार किती मिळतो.
व्यवसायात नफा आहे का.
वस्तू चा तुटवडा नाही ना.
देशात शांतता आहे ना
हे प्रश्न महत्वाचे आहेत.
डिजिटल युगात जिथे नोटांची
डिजिटल युगात जिथे नोटांची गरजच नाही तिथे
>>>
अहो, असे विधान नका करू हो ! हे बघा भारतातला विदा :
(https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/business/india-business/...)
Currency in circulation rose to an all-time high of Rs 30.18 lakh crore as on March 11, 2022, testifying India’s love for cash
..... निवडणुका आणि सणांच्या वेळेला तर रोखीची मागणी प्रचंड वाढते असेही पुढे दिलेले आहे !!!
एक हटके विषयावरचा रोचक लेख डॉ
एका हटके विषयावरचा रोचक लेख डॉ. कुमारेक.
एव्हढ्या प्रचंड मोठ्या संख्या बघून (किंवा वाचून) गरगरायला होते आहे.
त्याबरोबरीने येथील काही माबोकर कोणत्याही विषयावर प्रचंड ताकदीने आणि तितक्याच अधिकारवाणीने प्रतिक्रिया देतात. त्यांची प्रचंड प्रज्ञा बघून देखील गरगरायला होते आहे.
सर्वांनाच धन्यवाद !
सर्वांनाच धन्यवाद !
...
माझी अजून एक शंका आहे.
जगातील बहुतेक देशांमध्ये त्यांचे:
१ मूलभूत मोठे चलन = 100 छोटी मूलभूत चलने असे गणित आहे
(उदाहरणार्थ, एक रुपया बरोबर शंभर पैसे )
परंतु,
इराक, कुवेत, लिबिया, ओमान आणि ट्युनिशिया या मोजक्या देशांमध्ये :
१ मूलभूत मोठे चलन = 1000 छोटी चलने असे नाते ठेवलेले आहे.
(https://www.worlddata.info/currencies/)
१००० : १ अशा रचनेमागे काय अर्थशास्त्रीय कारण असते ?
लहान किमतीच्या चलनात तिथे
लहान किमतीच्या चलनात तिथे काही वस्तू मिळत असतील.
१ रुपया बरोबर १०० पैसे.
पैसे आता चलनात नाहीत .पण पाहिले होते.
२ पैसे पासून ५, १०,२०,२५,५० पैसे चलनात होते आणि त्या किंमतीच्या वस्तू पण होत्या.
Gulf मध्ये त्यांच्या लहान चलनात पण काही तरी मिळत असेल.
भारतात. १ रुपयाच्या खाली काहीच मिळत नाही.
१ रुपया la अजून पण काही वस्तू मिळतात.
भारतात आज पण दोन चलन आहेत.
रुपया आणि पैसे.
असे प्रतेक देशात असणार.
युरो आणि ponds
मस्त लेख व एकापेक्षा एक
मस्त लेख व एकापेक्षा एक प्रतिक्रिया!
मी जरा गडबड केली, तुम्ही व भरत म्हणताय ते अधिक योग्य आहे. ती लिंकही बघितली व इथेही सविस्तर दिले आहे, ते वाचले.
आंबटगोडने अगदी बरोबर पकडलं , काल पोस्ट टाकून झोपायला गेले पुन्हा येऊन बघते तर नीलचे पद्म झाले.
आशुचँप +१
अवलताईचा किस्सा भन्नाट आहे.
चर्चा खूप रोचक आहे.
त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.
बिचारे झिम्बाब्वे, अवमूल्यन झाल्याने टोपल्यातल्या नोटा म्हणजे 'व्यापार' या खेळातल्या नोटा वाटताहेत.
>>>>आपण इथे दुसरं काय करताहोत.
अर्थशास्त्राच्या नियमानुसार मध्यस्थांची साखळी जितकी लांब, ग्राहकांचे नुकसान तितके अधिक! त्यामुळे मध्यस्थांना पर्याय नसलेल्या ठिकाणी त्यांची संख्या कमी करणे हा त्यातल्या त्यात बरा उपाय वाटतो.
मला पण पाहिले असेच वाटायचे.पण
मला पण पाहिले असेच वाटायचे.पण कोणत्या ही व्यवसायात जितकी जास्त साखळी मोठी तितके लाभ त्या व्यवसाय त मिळणाऱ्या नफ्यात जास्त लोकांचा हिस्सा.
एकच व्यक्ती लाभार्थी नाही
ऑनलाईन शॉपिंग मुळे काही ही स्वस्त झाले नाही .
फक्त दुकानदार,किंवा साखळी मधील बाकी घटक त्या व्यवस्थेमध्ये राहिले नाहीत बाहेर फेकले गेले.
Online recharge मुळे मोबाईल रिचार्ज ची किंमत कमी झाली नाही .पण voucher विकणारी एक साखळी तुटली.
केबल टीव्ही मध्ये केबल ऑपरेटर हे मध्यस्थ होते तेव्हा अस्तित्वात असलेले सर्व. चॅनेल उपलब्ध केले जायचे आणि आज chya पेक्षा कमी भावात.
आता ott वर ते सर्व चॅनेल घ्यायचे झाले तर खूप जास्त पैसे मोजावे लागतात.
मध्यस्थ हटला पण ग्राहकांना फायदा झाला नाही उलट तोटा झाला.
ही काही उदाहरणे आहेत.
पण त्या व्यवसायात असणारा नफा एकच व्यक्ती कडे जावू लागला
हे मात्र घडले.
साखळी हवीच.मध्यस्थ नसतील तर ग्राहकांना स्वस्त मिळेल ह्याचे उदाहरण शोधून सापडणार नाही
आर्थिक उलाढाली मध्ये अनेक लोकांचा सहभाग हवाच.
चर्चेत चांगले मुद्दे येत आहेत
चर्चेत चांगले मुद्दे येत आहेत.
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार!
अस्मिता
तो स्वल्पविराम संबंधीचा दुवा बघितला. आता अगदी स्पष्ट झाले.
Gulf मध्ये त्यांच्या लहान
Gulf मध्ये त्यांच्या लहान चलनात पण काही तरी मिळत असेल. >>
या उत्तराने समाधान होत नाही कारण सौदी, कतार, ओमान, कुवेत व यु ए ई हे सगळे साधारण एकाच आर्थिक गटातले देश आहेत.
पण सौदी, यु ए ई आणि कतार ची जी चलने आहेत तिथं १०० : १ असेच नाते आहे
आणि ओमान, कुवेत १००० : १.
असे का ?
<< साखळी हवीच >>
<< साखळी हवीच >>
चूक. साखळी जितकी लहान, ग्राहकाच्या दृष्टीने तितके चांगले. कमीत कमी लोकांशी घासाघीस करणे, यात ग्राहकाचा फायदा असतो. उदा. घर भाड्याने घेताना थेट मालकाशी बोलणे चांगले की दलालामार्फत बोलणे चांगले? तुम्हीच ठरवा. कधी कधी किमती कमी होत नाहीत, पण तितक्याच पैशात अधिक पर्याय उपलब्ध होतात. यात पण ग्राहकाचा फायदा आहे.
काही प्रश्न.
काही प्रश्न.
१) पाहिले कागदी चलन कधी अस्तित्वात आले असेल.
२) चलन हे देशाच्या भू भाग पुरतेच मान्यता प्राप्त असते.
राजे राजवाड्यांच्या काळात सारख्या राज्याच्या सीमा बदलत तेव्हा चलन ची मान्यता राहतं असेल का?
३) समजा मी चीन मध्ये गेलो तर तेथील वास्तव्यात मला चीन चे चलन लागेल तिथे रुपया चालणार नाही.
माझ्या भारतीय रुपयाचे रूपांतर करताना चीन ला भारतीय चलन मिळेल त्याचाच वापर ते भारता कडून काही वस्तू घेताना करत असेल ना?
परकीय चलन चा वापर परकीय देशाशी व्यापार करतं असतानाच होत असेल ना.
Yuvan,dollar घेवून भारतात तरी काही मिळणार .
Gulf मध्ये आपले कामगार आहेत ते तेथील चलनात पगार घेतात
आणि ते चलन बदलून भारतात त्यांना भारतीय चलन मिळते.
तेच पैसे आपण तेल खरेदी करण्यासाठी वापरतो का?
एकाध्या देशाकडून कोणताच दुसरा देश काहीच खरेदी करत नाही तर त्या देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात बदलून दिले जाते का?
चांगली चर्चा. वाचते आहे. माझे
चांगली चर्चा. वाचते आहे. माझे (+ उ बो यांनी दुरूस्त केलेले) २ आणे - त्या कॉमाला डिलिमीटर असे म्हणतात.
(धन्यवाद उ बो! )
तै, त्याला delimiter म्हणतात.
तै, त्याला delimiter म्हणतात.
Decimal separator म्हणजे अपूर्णांक दाखवण्याची खूण. ती टिंब अथवा स्वल्पविराम असू शकते. उदा. ०.1 अथवा 0,1
तै, त्याला delimiter म्हणतात.
.
हो स्वल्पविराम डेसिमल
हो स्वल्पविराम डेसिमल सेपरेटरला ही वापरत असल्याने ती संज्ञा लिहीली गेली. जर १००००००००.९९ झिंबाब्वे डॉलर इ देण्याची वेळ आली तर लागेल हा डेसिमल सेपरेटर. त्यामुळे ती संज्ञाही असू दे इथे
छान लेख आणि रोचक माहिती.
छान लेख आणि रोचक माहिती.
धन्य आहे!
‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे. >>> केवढा विचित्र योग आहे हा. चलनात असताना इतकी कमी किंमत असलेल्या नोटांना बाद झाल्यावर अशी किंमत यावी!
चर्चेत चांगले मुद्दे येत आहेत
चर्चेत चांगले मुद्दे येत आहेत.
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार!
डिलिमीटर
छानच शब्द .आवडला
>>>मस्त लेख व एकापेक्षा एक
>>>मस्त लेख व एकापेक्षा एक प्रतिक्रिया!>>> +१२३
>>>इतकी कमी किंमत असलेल्या नोटांना बाद झाल्यावर अशी किंमत यावी! Happy धन्य आहे!>>> भारीच !
इतकी कमी किंमत असलेल्या
आभार !
.....
इतकी कमी किंमत असलेल्या नोटांना बाद झाल्यावर अशी किंमत यावी!
>>> +१.
यावरून एक मुद्दा लक्षात येतोय का ? लेखातील हा जो भाग आहे :
‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ विजेत्यांना १ पद्म झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट" >>
जरी ही नोट त्या विजेत्यांना टिंगलस्वरूप दिलेली असली तरी तिचे आजचे बाजारमूल्य दोनशे अमेरिकी डॉलर आहे ! अशा विजेत्यांनी ती नोट अनेक वर्षे जपून ठेवल्यास पुढे दुर्मिळ वस्तूंच्या बाजारात तिचा भाव कित्येक पट वधारतो !!
अनेक देशात असे घडले आहे.
अनेक देशात असे घडले आहे.
ब्राझील नी पण कमी काळात खूप प्रगती केली आणि त्यांचे चलन पण नंतर आपटले.
ती प्रगती नव्हती तर फुगा होता.
श्रीलंकेत पण तेच घडले भारता पेक्षा जास्त वेगात प्रगती आणि नंतर अर्थ व्यवस्था khadyat.
असे जगातील अनेक देशात घडले आहे घडतं आहे.
काही वर्षांपूर्वी सिटी बँक बुडाली आणि रिअल इस्टेट चा फुगा फुटला आणि जग भर अनेक बँका संकटात सापडल्या.
ज्या प्रॉपर्टी वर कर्ज दिले होते ती विकून पण कर्ज वसुली होणे अशक्य झाले होते.
अनेक देशात असे घडले आहे. >>>
अनेक देशात असे घडले आहे. >>> +१
......
झिम्बाब्वेत चलन वापरासंबंधी सतत धरसोडीचे धोरण राहिलेले दिसते.
१. जेव्हा त्यांचा ZWD बंद झाला त्यानंतर अकरा देशांच्या चलनांचा वापर चालू झाला ज्यात भारतीय रुपया सुद्धा होता.
२. 2019 मध्ये वरील बहुदेशीय चलन पद्धत रद्द करून नवा झिंबाब्वे डॉलर काढण्यात आला.
३. मार्च 2020 नंतर पुन्हा एकदा बहुदेशीय चलनांचा वापर सुरू झालेला आहे.मुख्यत्वे USD.
४. सध्या त्यांचा ZWD चे पुनरुज्जीवन करण्याचा विचार आहे.
अनेक देशात असे घडले आहे. >>>
दु प्र
चलन परिवर्तन हा काही तरी
चलन परिवर्तन हा काही तरी प्रकार आहे ना.
म्हणजे चलन बदलणे किंवा त्याचे परिमाण बदलणे.
100 रुपया लं 1 ..... संबोधने..आणि ते नवीन चलन अस्तित्वात आणणे
सहज हे सुचले मला .
पण कुमार sir ह्यांच्या वरील एका प्रश्नांचे हे उत्तर असावे
1000#१ ह्या चे कारण हेच असावे
हेमंत,
हेमंत,
अगदी बरोबर. झिंबाब्वे मध्ये २००६-०९ मध्ये तेच झाले आहे.
त्यांनी एकूण तीन वेळेस चलनाचे पुनर्मूल्यांकन केले. अशा तर्हेने पहिला ते चौथा ZWDअशी ती रेंज होती.
प्रत्येक पुनर्मुल्यांकन करताना चलनाची अवाढव्य किम्मत झालेली असते त्यातली अनेक शून्ये उडवली जातात आणि मग कमी किमतीचे नवीन चलन अस्तित्वात येते. आता पुढे जर अर्थव्यवस्था सुधारली नाही, तर चलन पुन्हा काही काळाने एका मोठ्या किमतीला जाऊन बसते. मग पुन्हा तेच करायचे ! असा तो व्याप असतो
पण 1000:1 चे हे कारण नाही वाटत. ओमानचे अनेक वर्षे ते तसेच आहे - १९७० पासून. पूर्वी त्यांचा Saidi rial होता. तो पण 1000:1 असाच.
.आणि त्या ओपेक देशांमध्ये आर्थिक स्थैर्य चांगलेच आहे ना.
Pages