पार्टनर

Submitted by ध्येयवेडा on 13 September, 2022 - 14:16

"हट .. भें s s चो"

"काय रे, बसल्या बसल्या कोणाला शिव्या घालतोय?" पार्टनरनं विचारलं

मी फक्त नकारार्थी मान डोलावली.

"ओ साहेब, अशी अचानक शिवी हासडण्याची ही काय पहिली वेळ नाही आपली. कोणाला शिव्या घालतोय सांग?" - पार्टनर ऐकेना

"स्वतःलाच घालतोय आणि कोणाला घालणार..
पार्टनर मला सांग तुला कधी स्वतःच्या चुका आठवतात का रे? .. भूतकाळात कधीतरी घडलेल्या.... मनावर कायमचा ठसा उमटवून गेलेल्या.
म्हणजे बघ ना,त्या चुकांची आठवण यायला काळ, वेळ, जागा, वातावरण असल्या गोष्टींची गरज नसते..
आपण काहीतरी करत बसलेलो असतो आणि ती आठवण तळागाळातून अशी बुडबुड्यासारखी अचानक वर येते."

"हो येतात की. बऱ्याचदा होतं असं. पण स्वतःलाच इतक्या मोठ्यांदा शिव्या द्यायची वेळ आली नाही कधी... म्हणजे अजुन तरी हा.
btw, तुला आत्ता असं काय बरं आठवलं?" पार्टनर उत्सुकतेनं म्हणाला.

"ए मी आलोच, जरा हलकं होवून येतो" मी पुढचा विषय टाळायच्या हेतूनं म्हणालो.

"चल मी पण येतो, अर्थात तुझी हरकत नसेल तर"
माझी परवानगी गृहीत धरून पार्टनर सुद्धा माझ्यासोबत बाथरूममध्ये आला.

"काय रे.. सांगतोयस ना? अचानक काय आठवलं ते"

"काय वेगळं नाही यार, नेहमीचच आपलं.. माहितीये की तुला... साला इतकी वर्ष होऊन गेली, तरी असं काल परवा घडल्यासारखं वाटतं बघ.."

"परत तेच?? अरे सोडून का नाही देता येत यार तुला तो विषय...
Immaturity होती ती तुझी.. आणि हे तुलाही माहितीये. पण आता आपण मोठे झालो आहोत, आयुष्यात बरेच पुढे आलो आहोत.
थोडी तरी maturity दाखव आणि कायमचा सोडून दे ना विषय"

"पण त्या Immaturity मुळे अनेकांच्या मनावर कायमचे व्रण उठले रे..
सारखं वाटत राहतं, भूतकाळात जावं आणि स्वतःलाच दोन ठेवून द्याव्यात. सगळं नीट करावं, असल्या चुका घडूच देऊ नये"

"हे बघ, मला काय वाटतं माणूस त्याच्या वर्तमानाशी समाधानी नसला की त्याला भूतकाळ आठवू लागतो. आणि मग नंतर त्याला भूतकाळात रमणं जास्ती आवडू लागतं" - पार्टनर म्हणाला

"हा मात्र चुकीचा अर्थ काढतोयस हा पार्टनर. आज मी एकदम समाधानी आहे. मजेत जगतोय मी"

"आज आहेस ना समाधानी? मग अशी सारखी आठवण का करून द्यावी लागते? नेहमी आपलं भूतकाळात काहीतरी राहून गेल्यासारखं का वागतोयस? सोडून का नाही देत असले विषय?...
...अरे राहतात काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी बोलायच्या आणि काही गोष्टी ऐकायच्या...
आणि कधी कधी उलटही होतं. कधी जास्ती आणि नको ते बोललं जातं, नको ते ऐकलं किंवा बघितलं जातं.
आपल्याला जसं पाहिजे तसं क्वचितच होतं. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, तुझं काही खूप वेगळं नाही"

"पार्टनर यार, दर वेळेस तू हेच explanation देतोस, आणि मला पण ते दर वेळेस त्या क्षणाला पटल्या सारखं वाटतं.
तुझी ही चार वाक्य ऐकली ना, की बरं वाटतं बघ.
एक तूच आहेस ज्याला मी हे कितीही वेळा सांगू शकतो. आणि तू पण पुन्हा पुन्हा तेच पेशन्स ठेवून ऐकतोस यार.."

"टक टक टक.. अरे किती वेळ झाला आत बसलाय. बाहेर यायचा विचार आहे की नाही"

"आली बघ तुझी दुसरी पार्टनर.. दिसला नाहीस ना बराच वेळ. आठवण आली तिला तुझी...
आणि फक्त मी नाही, ती पण ऐकून घेते की रे तुझी बकबक.. जीव लावते तुझ्यावर..
आता तिनी आपल्याला एकत्र पकडायचा आधी पहिला बाहेर हो"

मी गडबडीत बाथरूमचं दार उघडून बाहेर आलो.
मागे बघितलं तर पार्टनर कोणालाही पत्ता न लागू देता निघून गेला होता.

- भूषण

Group content visibility: 
Public - accessible to all site users