पणजीआज्जीच्या पाककृती - काळे पोलीस

Submitted by मेधावि on 13 September, 2022 - 01:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काळे घेवडे
फोडणीचं साहित्य, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण

क्रमवार पाककृती: 

माझ्या पणजेसासूबाई वाई, महाबळेश्वर भागातल्या.
त्या काळे पोलीस करायच्या. तिथं काळ्या घेवड्याला पोलीस म्हणतात. म्हणजे आज काय केलंय?
तर बाबा "पोलीस केलेत"...
विचित्र वाटतं ना?
मला नाही वाटत..... सवयीमुळे. Happy

तर...ही उसळ त्यांनी फोडणीस घातली की असा सुगंध दरवळायचा की क्या कहने....पदार्थाला चव आणण्यासाठी आलं लसूण पेस्ट, धने जिरे आमचूर पावडर, कांदा टाॅमॅटो चं वाटण लागतंच ही अंधश्रद्धा आहे हे एक चमचाभर उसळ खाल्ली की लक्षात येई.

तर...

काळे घेवडे रात्री गार पाण्यात भिजवायचे.
सकाळी कुकरला अगदी मऊ मेणासारखे शिजवायचे. पालथ्या डावानं जरा चेचायचे आणि मग घोटायचे. थोडे आख्खे, थोडे ठेचलेले म्हणजे उसळ मिळून येते. झालं...मोठ्ठं काम झालं.

कढीपत्त्याची पानं हातावर चुरून घ्यायची.
फोडणी - लोखंडाच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात
गोडं तेल...तापलं की मोहोरी, तडतडली की जरा जास्त हिंग, हळद, कढीपत्ता,

बास्स.....

मग काळे पोलीस फोडणीस घालायचे (इथूनच तो सुगंध दरवळायला लागायचा...)
गूळ (उसळीला गोडसर चव यायला हवी इतपत) .+ मीठ, सुकं खोबरं किसून मग भाजलेलं, हातावर चुरून घालायचं. कोथिंबीर

आणि मग लोखंडी पळीत अजून एक फोडणी करायची. त्यात ठेचलेला लसूण घालून तपकिरी रंगावर कुरकुरीत करायचा. मग गॅस बंद आणि त्या गरम तेलात लाल तिखट आणि घरचा गोडा मसाला घालून ही फोडणी उसळीवर घालायची. मग झाकण ठेऊन द्यायचं आणि बारीक गॅसवर उकळायची.

आत्ता लिहीतानाही ती चव आठवतीये आणि जाणवते आहे मला. भाताशी किंवा ज्वारीच्या भाकरीशी किंवा वाटीत घेऊन चमच्यानं खाणं म्हणजे स्वर्गसुखच.

पोलीस हे राजम्याचं मराठी भावंडं. तशीच छान क्रीमी क्रीमी चव लागते ह्याची. पण जरा जास्त ठसकेबाज चवीचं.

मात्र नीट शिजली नाही तर वाईट लागते ही उसळ. दाणे लाकडासारखे लागतात मग. पहिल्याच फटक्यात भरपूर शिजवायचे. परत नंतर शिजवायचं म्हटलं की दडदडीत होतात.

तयार उसळीची चव घेतली ना चमच्यातून कि पहिल्यांदा पुढे येते ती गोड चव. अरेच्चा, हे प्रकरण गोड का लागतंय? असा मनात विचार येतोय तोच चव जाणवते ती खोबरं, गोडा मसाला, कढीपत्ता आणि लसणीच्या फोडणीची चव घेऊन आलेल्या काळ्या घेवड्याच्या स्मूथ रसदार ग्रेव्हीची. आणि मग नुसती खाऊन पण संपू शकते बरं.....त्या अंदाजानंच करा.
बघा करून, खाऊन.
दुवा द्याल. Happy

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंयस. माझ्या बहिणीचं सासर वाईचं. तिच्याकडे करतात हे पोलिस. मस्त लागतात.

माझ्याकडे स्वैपाक करणार्‍या मावशी कोल्हापूरच्या होत्या. त्यांनी मला दिडगे आणून दिले होते. त्या त्याची उसळ करत.ते दिडगे आणि हे पोलिस सिमिलर वाटतात मला.

रच्याकने, कोणतीही ग्रेव्ही क्रीमी करण्याची युक्ती म्हणजे त्यात एक-दोन चमचे ओटमिल घालायचं उकळताना. ग्रेव्ही घट्ट आणि क्रीमी होते. राजमा इ. कडधान्यात खोबरं किंवा दाण्याचं कूट घालत नाहीत त्यावेळी ही युक्ती कामी येते. इतरही पंजाबी ग्रेव्हीसाठी हे वापरता येईल. खरोखरीचं क्रीम वापरण्यापेक्षा जास्त चांगलं.

काळे पोलिस आणि कोल्हापूर मधले दिडके एकाच असावेत बहुतेक. भाजी एक तोपासू होते.
फोटो असला की रेसिपी एकदम सुफळ संपूर्ण वाटते.
फोटो टाका प्लिज.:)

छान वाटते आहे.
माबो स्पेशल प्रश्नः काळा घेवडा मिळायचा नाही. राजमा घालून करू का? कुठल्या दुसर्‍या कडधान्याने रिप्लेस करू?

काळे पोलिस नुसते ऐकूनच माहित आहेत. आता हे वाचून करून बघावे असे वाटले पण इथे पटेल मधे मिळतात का, कोणत्या नावाने हा अभ्यास आधी करावा लागेल Happy
पुन्हा केलीत तर फोटो घ्यायला विसरू नका!

थंडीच्या दिवसात हिरव्या आणि काळ्या राजम्याच्या शेंगा मिळतात.त्यातील दाणे म्हणजेच ह्या पाककृतील दाणे का?
चविष्ट असतात.पण माझ्याकडे हिरवेच जास्त वापरले जातात.

रीया, थँक्स Happy घरी ब्लॅक बीन्स आहेत पण 'काळे घेवडे कुठे बरे मिळतील?' झालं होतं. पीटा रॅपमधे वापरले आहेत, फार पिठूळ वाटतात व अंगची चवही कमी वाटते. भरपूर लसूण घालून करून बघेन , सोपी कृती आहे.

धन्यवाद.
इथे ब्लॅक बीन्स म्हणून मिळतात त्याच वाटतायत - मग तर सोप्पं झालं काम. Happy

मला फार आवडतो काळा घेवडा.. हा सिजनल असतो ना? कारण माझी सासू हा वर्षातून एकदा बनवते. मला वाटतं साधारण पावसाळ्यात वगैरे बाजारात मिळतो.

म्हाळसा, मी कायम कडधान्य मिळतं दुकानात तो आणलाय आणि भिजवून मग वापरलाय. शेंगा मिळतात सीझनला पण मी नाही कधी वापरल्या कधी.

कोरडा पण मिळतो आणि भिजवून वापरता येतो आणि शेंगा पण मिळतात.

याच काळ्या घेवड्यांची डाळ पण असते (भाजलेली) . त्याची आमटी सुद्धा साधी सोपी आहे पण मस्त होते. ती अमेरिकेत पिटसबर्गला बघितली होती पण इतर कुठे दिसली नाही

आम्ही याला काळे वाल म्हणतो. हिवाळ्यात याच्या शेंगा मिळतात त्या सोलुन दाणे वापरायचे. अंगचीच चव खुप असते याला. आई फक्त हिरवी मिरची लसूण वाटण फोडणीला देउन बनवते. माझी आवडती भाजी.

मी अमेरिकेत इंग्रो मधून black beans आणले. ते आणि canned एकच का कल्पना नाही (बहुतेक असावेत.)
हे आणलेत बहुतेक

उसळ भारी झाली. आवडली. क्रिमी टेक्चर पण मस्त आलेलं

20220923_124102.jpg

छान पाकक्रुती! करुन बघिन…

आम्ही पण काळ्या घेवड्याच्या शेंगा हिवाळ्यात आणतो. त्याची भाजी खुप छान लागते . मिठ घालुन वाफवले तर canned black bean सारखे लागतात.