डोळ्यात खुपणारी गाणी

Submitted by माझेमन on 20 July, 2022 - 05:22

आत्ताच्या पिढीला कदाचित हे दुःख समजणार नाही. कारण आता चित्रपट किंवा त्यातली गाणी नेत्रसुखद करण्यावर भर असतो. फराह खानसारखे कुशल नृत्यदिग्दर्शक एखाद्या चांगल्या गाण्याला चार चाँद लावतात. एक्झॉटिक लोकेशन्स, देखणे कलाकार, चकाचक सेट, मॉडेलसारखे दिसणारे किंवा भारतिय मानसिकतेला आवडतील असे कॉकेशिअन रंगरुपाचे बॅकग्राउंड डान्सर्स हे गरजेचे झालेले आहे. गाण्यांचे सेपरेट रिलीज होतात व हक्क विकले जातात त्यामुळे गाणे चांगले (असण्यापेक्षाही) दिसणे फार महत्वाचे होते आहे.

पण इंटरनेट, मोबाइलचा जमाना येण्यापूर्वी व उपग्रह वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी असेही व्हायचे ना की एखादे गाणे ऐकायला खूप छान वाटायचे, कधी पाहिलेले नसायचे. मग एखाद्या दिवशी आपल्या दूर्दैवाने ते गाणे दिसायचे आणि 'क्या यही दिन दिखाने के लिए भगवान ने मुझे जिंदा रखा?' असं म्हणावेसे वाटायचे.

तर चला बनवूया अशा गाण्यांची लिस्ट….

(वि. सु. : गाण्यांचे व्हिडिओ स्वतःच्या हिंमतीवर पाहणे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक छळास पोस्टलेखक जबाबदार नाही.)

सेहरा चित्रपटातील 'पंख होती तो उड आती रे'. हेच गाणे या पोस्टला (परिणामस्वरुपी तुमच्या डोकेदुखीला) कारणीभूत ठरले आहे. लताबाईंचा आवाज अप्रतिम लागलाय, संगीतही सुंदर आहे पण या गाण्यात संध्याबाईंनी जे काही (मी त्याला नृत्य म्हणण्याचे धाडस करणार नाही) केलेय त्याला तोड नाही. युट्युबरसुद्धा ऑडिओ ऐकते मी.
https://youtu.be/s3Kt97M0ANQ

'घुंगरू' चित्रपटातील 'प्यार के धागे' गाणे. साधना सरगम गोड गायल्या आहेत. मनहर उधासही वाईट नाहीत. लिरिक्सही चांगले आहेत. पण 'प्यार के धागे' म्हणून वडाला गुंडाळलेले दोरेच दाखवले पाहिजेत? गाणं डोळ्यासमोर आणा व खरं सांगा 'आता आठवतायत ते फक्त पांढरेशुभ्र बूट' असं होतं की नाही.
नंतर नंतर तर हिरो हिरॉईनकडे लक्ष जायच्या ऐवजी हिरोचे ते शिकारी/हायकिंग बूटच दिसत राहतात या गाण्यात
https://youtu.be/P43GZJ7lP2E

तसंच ते गॅंबलरमधलं 'दिल आज शायर है'. इतकी सुंदर शायरी किशोरकुमारने जीव ओतून गायली आहे, पण आठवतं काय तर देव आनंदची ती विअर्ड मिशी. मान्य आहे की हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता. पण गाण्यात देव आनंद असताना त्याची मिशी लक्षात रहावी यापरता दैवदुर्विलास तो काय?
https://youtu.be/XRuqrlBmzAY

मदन मोहनचे अप्रतिम संगीत, लताबाईंचा दैवी आवाज मातीमोल करणारं हंसते ज़ख्म मधले 'आज सोचा तो आंसू भर आये'. काय ती प्रिया राजवंश, काय तो गॅरीश सिल्कचा ड्रेस, अगागा. त्यातून ती बिचारी देणार जेमतेम साडेतीन एक्स्प्रेशन्स. आता प्रिया तर नाहीच करत आहे मग तिच्या वाटचा अभिनयपण तुम्ही करुन टाका म्हणून वेठीला धरलेले के. एन. सिंग व रझा मुराद. वास्तविक हे दोन्ही अभिनेते एखादी भुवई उंचावून किंवा ओठाला हलकीशी मुरड पाडून बरंच काही सांगून जातात. पण त्यांनाही या गाण्यात कॅरीकेचरच्या लेव्हलला आणुन ठेवलंय.
https://youtu.be/PcOfJLdIh1M

तुम्हाला कुठली गाणी खुपतात?

Group content visibility: 
Use group defaults

देव आनंद हा (त्याच्या तारुण्यात) परीकथांतील राजकुमार होता. त्याने छान दिसावं, गरीब सुंदर हिरॉईनशी अप्रतिम गाणी म्हणत रोमान्स करून आपल्या परीने अमिरी गरीबीका फासला मिटवावा, तत्कालीन डॅम्सेल इन डिस्ट्रेसला (पतिता, ज्वेल थीफ) साथ देऊन माफक समाजसुधारणा करावी व सुखाने राज्य करावं. अभिनय, कटू वास्तव वगैरे त्याचा प्रांत नोहे. सर्वसामान्यांना दूर्लभ गोष्टी, राजस रूप, श्रीमंती त्याने जगावी व ती स्वप्न इतरांनी पहावी ही त्याची कोअर कॉंपिटन्सी जोवर संभाळली तोवर तो टॉपवर होता. गाईड अपवाद. काळानुरूप बदलण्याचा त्याचा प्रयत्न स्वप्रतिमेच्या मोहाने हास्यास्पद झाला.

Pages