डोळ्यात खुपणारी गाणी

Submitted by MazeMan on 20 July, 2022 - 05:22

आत्ताच्या पिढीला कदाचित हे दुःख समजणार नाही. कारण आता चित्रपट किंवा त्यातली गाणी नेत्रसुखद करण्यावर भर असतो. फराह खानसारखे कुशल नृत्यदिग्दर्शक एखाद्या चांगल्या गाण्याला चार चाँद लावतात. एक्झॉटिक लोकेशन्स, देखणे कलाकार, चकाचक सेट, मॉडेलसारखे दिसणारे किंवा भारतिय मानसिकतेला आवडतील असे कॉकेशिअन रंगरुपाचे बॅकग्राउंड डान्सर्स हे गरजेचे झालेले आहे. गाण्यांचे सेपरेट रिलीज होतात व हक्क विकले जातात त्यामुळे गाणे चांगले (असण्यापेक्षाही) दिसणे फार महत्वाचे होते आहे.

पण इंटरनेट, मोबाइलचा जमाना येण्यापूर्वी व उपग्रह वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी असेही व्हायचे ना की एखादे गाणे ऐकायला खूप छान वाटायचे, कधी पाहिलेले नसायचे. मग एखाद्या दिवशी आपल्या दूर्दैवाने ते गाणे दिसायचे आणि 'क्या यही दिन दिखाने के लिए भगवान ने मुझे जिंदा रखा?' असं म्हणावेसे वाटायचे.

तर चला बनवूया अशा गाण्यांची लिस्ट….

(वि. सु. : गाण्यांचे व्हिडिओ स्वतःच्या हिंमतीवर पाहणे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक छळास पोस्टलेखक जबाबदार नाही.)

सेहरा चित्रपटातील 'पंख होती तो उड आती रे'. हेच गाणे या पोस्टला (परिणामस्वरुपी तुमच्या डोकेदुखीला) कारणीभूत ठरले आहे. लताबाईंचा आवाज अप्रतिम लागलाय, संगीतही सुंदर आहे पण या गाण्यात संध्याबाईंनी जे काही (मी त्याला नृत्य म्हणण्याचे धाडस करणार नाही) केलेय त्याला तोड नाही. युट्युबरसुद्धा ऑडिओ ऐकते मी.
https://youtu.be/s3Kt97M0ANQ

'घुंगरू' चित्रपटातील 'प्यार के धागे' गाणे. साधना सरगम गोड गायल्या आहेत. मनहर उधासही वाईट नाहीत. लिरिक्सही चांगले आहेत. पण 'प्यार के धागे' म्हणून वडाला गुंडाळलेले दोरेच दाखवले पाहिजेत? गाणं डोळ्यासमोर आणा व खरं सांगा 'आता आठवतायत ते फक्त पांढरेशुभ्र बूट' असं होतं की नाही.
नंतर नंतर तर हिरो हिरॉईनकडे लक्ष जायच्या ऐवजी हिरोचे ते शिकारी/हायकिंग बूटच दिसत राहतात या गाण्यात
https://youtu.be/P43GZJ7lP2E

तसंच ते गॅंबलरमधलं 'दिल आज शायर है'. इतकी सुंदर शायरी किशोरकुमारने जीव ओतून गायली आहे, पण आठवतं काय तर देव आनंदची ती विअर्ड मिशी. मान्य आहे की हा पिक्चर येईपर्यंत तो ५०-६० च्या दशकातला 'राजस, सुकुमार' राहिला नव्हता. पण गाण्यात देव आनंद असताना त्याची मिशी लक्षात रहावी यापरता दैवदुर्विलास तो काय?
https://youtu.be/XRuqrlBmzAY

मदन मोहनचे अप्रतिम संगीत, लताबाईंचा दैवी आवाज मातीमोल करणारं हंसते ज़ख्म मधले 'आज सोचा तो आंसू भर आये'. काय ती प्रिया राजवंश, काय तो गॅरीश सिल्कचा ड्रेस, अगागा. त्यातून ती बिचारी देणार जेमतेम साडेतीन एक्स्प्रेशन्स. आता प्रिया तर नाहीच करत आहे मग तिच्या वाटचा अभिनयपण तुम्ही करुन टाका म्हणून वेठीला धरलेले के. एन. सिंग व रझा मुराद. वास्तविक हे दोन्ही अभिनेते एखादी भुवई उंचावून किंवा ओठाला हलकीशी मुरड पाडून बरंच काही सांगून जातात. पण त्यांनाही या गाण्यात कॅरीकेचरच्या लेव्हलला आणुन ठेवलंय.
https://youtu.be/PcOfJLdIh1M

तुम्हाला कुठली गाणी खुपतात?

Group content visibility: 
Use group defaults

ह्या कॅटेगरीत टॉप १० लिस्टमधे येईल असं गाणं म्हणजे ‘अजहु न आये बालम, सावन बिता जाये‘. हे गाणं ऐकणं आणि पहाणं ह्यातला पोटेन्शियल डिफरन्स कमालीचा आहे

https://youtu.be/CChT3Om2xAQ

तेरे जैसा यार कहॉं , कहॉं ऐसा याराना ,,,, गाणं लिरीक्स आणि चित्रीकरण फारच mismatch वाटतं. कोणीतरी मित्र असेल याच्या सोबत असं वाटतं तर अमिताभ स्टेजवर म्हणताना दिसतो.

या धाग्यावर आलेली चित्रविचित्र उदाहरणं बघता "यु आर ए प्रॉडक्ट ऑफ योर टाइम" या उक्तिची उकल होते... Wink

अजहु न आये बालम, सावन बिता जाये‘>>> मला हे पटलं नाही. इथे गाण्यातला आणि पडद्यावर जे काही चाललं आहे त्यातला विरोधाभास विनोदनिर्मितीसाठी वापरला आहे. हे इंटेंशनल आहे. पडोसन मधल्या एक चतुर नार सारखं.

काय श्रवणीय गाणे ! पण अजिबात बघवत नाही. क्रीम रोल गोंगुरा पचडी मध्ये बुडवून खाल्यासारखे वाटते !
( वरच्या संजय दत्त गिटार गीत बद्दल आहे हे )

“त्यातला विरोधाभास विनोदनिर्मितीसाठी वापरला आहे. हे इंटेंशनल आहे. पडोसन मधल्या एक चतुर नार सारखं.” - चतुर नार चे शब्द, संगीत हे सगळंच विनोदनिर्मिती साठीच आहे. तसं अजहु न मधे नाही. त्यामुळे तो विनोदनिर्मितीचा प्रयत्न जमला नाहीये आणि एका चांगल्या गाण्याचं चीज झालं नाही असं मला वाटतं.

गाणं पाहिलं.संजय दत्त चा सूट, आतलं जॅकेट अगदी रॉक च्या तुलनेत पण भयाण आहे.मुळात गाण्याला त्यातलं कोणतंच व्हिज्युअल नीट लागू पडत नाहीये.

त्यातला विरोधाभास विनोदनिर्मितीसाठी वापरला>>>>>>

सहमत. तेव्हाच्या खुप चित्रपटांत हे दिसते. विनोद निर्मितीसाठी साइड हिरो व साईड हिरोइन ही दोन पात्रे व त्यांच्या तोंडी असले एखादे गाणे.

फुल गेन्दवा न मारो हे गाणेही ऐकताना जितके गम्भिर वाटते तितकेच पाहायला विनोदी आहे.

प्रदीपकुमार आणि मीनाकुमारीचे "दिल जो न कह साका " हे मेल व्हर्जन रफीने ग्यायलेले पहायला भयाण आहे. प्रकु चा चेहरा एक्स्प्रेशन लेस वाटतो , बाकी हेच गाणे लता मंगेशकर च्या आवाजात आहे आणि प्रेक्षणीय पण>>>
हे गाणं मी केवळ अन केवळ रफी साठी ऐकते.. त्याच्या आवाजाचे चढउतार, टाहो फोडून गुपित सांगायची धडपड हे सगळेच पोचते.. बाकी प्रदीप कुमार म्हणजे धन्यवाद.. अशोक कुमार त्याच गाण्यात मोजक्या फ्रेम मध्ये सुधा कमाल करून जातो

हा धागा आज वाचतोय. तुम बिन जाउ कहाँ - गाणं फारच आवडतं आणि त्याचा व्हिडिओ वरती कुणी तरी दिलेल्या लिंकमुळे आज पाहण्याचा योग आला. अगागागागा! अज्ञानात सुखी होतो मी यापूर्वी. कुठे फेडाल ही पापे लोकहो!

मला एकंदरीतच भारतभूषण खुपतो. काय वाट्टेल त्या भूमिका त्याच्या वाट्याला तोंडात जांभूळ टपकावं अश्या आल्या आहेत. 'ना तो कारवां की तलाश है' गाण्यात मन्ना डेने ज्याला आवाज दिला आहे, त्या उस्तादाच्या बाजूला बसलेला एक साईड-उस्ताद-कम-चेला जो आहे, त्याचा अभिनय मेन उस्तादापेक्षा भारी आहे आणि मेन उस्तादाचा सुर्कुतीही न हलवता केलेला अभिनय नंतर एण्ट्री मारणार्‍या भारत भूषणपेक्षा भारी आहे. अशा भारतभूषणच्या तोंडी रफीचा आवाज ऐकून कच्च्या दुधी भोपळ्यात श्रीखंड घातल्याचा प्रत्यय येतो. यात नीट बघा - आधी रफीचा आवाज ऐकून मधुबाला तिकडे धावत येते आणि नंतर त्या आवाजाचा मालक भाभू असलेला बघून ती खांबावर डोके ठेऊन डोळ्यातून घळाघळ अश्रू गाळते. ते अश्रू खरे असणार!

माझे मन >>>>> धन्यवाद
मी युट्यूब वर "क्या जानु सजन होती हैं क्या गम कि शाम, जल उठे सौ दिये जब लिया तेरा नाम" बघितल्यापासून अश्या धाग्याच्या शोधात होतो. शेवटी आपल्या कृपेने निघालाच.

आधी रफीचा आवाज ऐकून मधुबाला तिकडे धावत येते आणि नंतर त्या आवाजाचा मालक भाभू असलेला बघून ती खांबावर डोके ठेऊन डोळ्यातून घळाघळ अश्रू गाळते. ते अश्रू खरे असणार! >>खुपसाऱ्या लाफिंग स्मायली ..

आधी रफीचा आवाज ऐकून मधुबाला तिकडे धावत येते आणि नंतर त्या आवाजाचा मालक भाभू असलेला बघून ती खांबावर डोके ठेऊन डोळ्यातून घळाघळ अश्रू गाळते. ते अश्रू खरे असणार! >>> Lol

ह.पा. Lol
हे गाणं आधी बघितलं नव्हतं. परफेक्ट वर्णन आहे!
ती दुसरी गायिका आधीपासूनच का रडते? तिने भारतभूषणला आधीच बघितलं म्हणून का?

मला खूप आवडते ती कव्वाली. भारतभूषण सकट. सोबत मधुबाला असली की तो खटकत नाही. उलट इतर वेळ पेक्षा बरा वाटतो.
माझ्या भावना दुखावल्या.

उलट मधुबाला सोबत असली की तो जास्त खटकतो Lol
जिंदगीभर नही भूलेगी हे गाणं यातलंच आहे ना?
त्या मानाने 'तू गंगा की मौज ' मधे ठीक वाटतो.

ती दुसरी गायिका आधीपासूनच का रडते? तिने भारतभूषणला आधीच बघितलं म्हणून का? >> हो, तिला तर शेवटी उचलून न्यायची वेळ येते.

मला खूप आवडते ती कव्वाली >> मलाही.
माझ्या भावना दुखावल्या. >> सॉरी भरत. भाभूसमोर मधुबाला बघून माझ्या भावनाही दुखावतात, त्याची परतफेड समजा. Wink

आधी रफीचा आवाज ऐकून मधुबाला तिकडे धावत येते आणि नंतर त्या आवाजाचा मालक भाभू असलेला बघून ती खांबावर डोके ठेऊन डोळ्यातून घळाघळ अश्रू गाळते. ते अश्रू खरे असणार! >> Rofl Rofl

आपके हसीन रुख पे
https://youtu.be/GQblX2TmEZI
हे गाणं बाकी छान आहे बघायलासुद्धा, पण धर्मेंद्रची पियानो वाजवण्याची acting 'धर्मेंद्रची पोळ्या लाटतानाची दुर्मिळ क्लिप' अशा नावाने बघितली होती तेव्हा ते अगदी पटलं होतं!

आधी रफीचा आवाज ऐकून मधुबाला तिकडे धावत येते आणि नंतर त्या आवाजाचा मालक भाभू असलेला बघून ती खांबावर डोके ठेऊन डोळ्यातून घळाघळ अश्रू गाळते. >>> Biggrin

धर्मेंद्रची पियानो वाजवण्याची acting 'धर्मेंद्रची पोळ्या लाटतानाची दुर्मिळ क्लिप' >>>> Lol अगदी अगदी. मल्टि टास्किंग केलंय. पोळ्या लाटता लाटता एकीकडे गाणं म्हणत दिल पण लाटतोय.

Pages