श्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल...

Submitted by चिनूक्स on 1 June, 2009 - 10:28

रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.

रूपवेध प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारा 'तन्वीर सन्मान' श्री. विजय तेंडुलकर यांना २००६ साली देण्यात आला.

'सूर्य पाहिलेला माणूस', 'प्रेमाची गोष्ट', 'आनंदओवरी', 'मी माझ्याशी', 'चौक', 'गोळायुग', 'उजळल्या यांसारखी अप्रतिम नाटकं आणि 'सेझ : अराजकाची नांदी', 'तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज', 'नाटककार सतीश आळेकर', 'कचरा कोंडी', 'के. आर. दात्ये - ऊर्जेच्या शोधवाटा' हे दर्जेदार लघुपट निर्माण व दिग्दर्शित करणार्‍या श्री. अतुल पेठे यांनी त्या प्रसंगी केलेलं भाषण तेंडुलकरांचं समकालीनत्व सिद्ध करतं. एका विलक्षण प्रतिभावान रंगकर्मीचं तेंडुलकरांबद्दलचं हे मनोगत..

***

ten_atul.jpg

आपण ज्या संस्कृतीत किंवा ज्या प्रांतात जगतो, वाढतो त्या क्षेत्रात आपले पूर्वसूरी गवसणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या आजच्या असण्याला आधीचे लोक कारणीभूत असतात. परंपरेची नाळ जोडत गेल्यास नवतेच्या वाटा अधिक स्पष्ट होत जातात. आमच्या सर्व रंगकर्मींच्या वतीने बोलायचं झालं तर, विजय तेंडुलकर हा लेखक भारतीय रंगभूमीचा असा आधारस्तंभ आहे,की ज्यांनी जीवनाची आणि कलेची दृष्टी आम्हांला दिली.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत हा 'लेखकमाणूस' मराठी संस्कृतीचाच नव्हे तर भारतीय संस्कृतीचा भाग बनून राहिला आहे. आता तर भारतीय नाटक म्हणजे विजय तेंडुलकरांचं नाटक अशीच ओळख आजच्या जगाला आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली'ची किंवा सत्यजित रेंच्या 'पथेर पांचाली'ची जी ओळख जगाला आहे, तीच ओळख जगाला तेंडुलकरांच्या 'सखाराम-घाशीराम'ची आहे. तेंडुलकरांच्या साहित्याचा परीघ हा असा विस्तीर्ण आहे. तशीच त्यातील खोलीही मोठी आहे. पंचवीससहून अधिक नाटके, अनेक एकांकिका, नभोनाट्यं, बालनाट्यं, कथा, कादंबर्‍या, पटकथा, ललित लेखन, वृत्तपत्रीय लेखन वाचताना थक्क व्हायला होतं. हे कमी म्हणून की काय, त्यांचं छायाचित्रकलेवरचं प्रेम, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय व्यक्ती-संघटनांबरोबरचं फिरणं, पत्रकारिता वगैरेंमुळे आपल्याला नतमस्तक व्हायला होतं.

विजय तेंडुलकरांशी माझा इतरांप्रमाणे सर्वप्रथम संबंध आला तो 'घाशीराम कोतवाल' या नाटकामधून. या जबरदस्त नाटकाने माझ्यावर त्यावेळेस गारुड केलं होतं. ही गोष्ठ अठ्ठ्याहत्तर सालातली. अनेक वेळा विंगेतून किंवा जिथे जागा मिळेल तिथून मी 'घाशीराम' अनुभवलेलं होतं. 'घाशीराम'मधलं नृत्यसंगीत मला आकर्षून घ्यायचंच पण त्याहूनही त्यातली ब्राह्मणांची टिंगल मला आतवर जखम करायची. आपले पूर्वज असे होते? इतके नादान? इतके राजकारणी? इतके लंपट? इतके क्रूर? माझ्या आधीच्या आयुष्याला दरवेळेस नव्याने हादरे बसायचे. मी शनिवार पेठेत राहायचो. माझ्यावरचे संस्कार तर ब्राह्मणीच होते. सन्मार्गी, सुसंस्कृत आणि सपक वाटावं असं मध्यमवर्गीय वातावरण माझ्या आजुबाजूला होतं. त्यामुळे मी आधी पाहिलेल्या नाटकांपेक्षा 'घाशीराम'चं जग वेगळं वाटलं. माझ्या तथाकथित संस्कारांच्या भिंतीला तडा दिला तो या 'घाशीराम'नं आणि नंतर ती भिंत जमीनदोस्त केली ती तेंडुलकरांना प्रेरणास्थानी मानणार्‍या सतीश आळेकरांच्या 'महानिर्वाण'नं !! 'बावन्नखणी हो बावन्नखणी ऽ ' वगैरे 'घाशीराम'मधल्या गाण्यांनी आजूबाजूच्यांचा राग उफाळून यायचा. ही माणसं इतकी का रागावत होती हे पुढे कळलं. पण माझ्यावर संपूर्ण हावी झाला होता तो घाशीराम ! गरगरा डोळे फिरवून बामण हरींना पळता भुई थोडी करणारा. नाटकाच्या शेवटी त्याचा काढलेला काटा मला फार सुन्न करून जायचा. घाशीरामच्या मृत्यूबाबत मला कायम प्रश्न पडत आले होते. घाशीरामचं हे असं का झालं? याच्या या नराधम कृत्यांना जबाबदार कोण? अशी कुठली परिस्थिती असते की जी अशी क्रूर माणसं जन्माला घालते? अर्थात हे प्रश्न मनात निर्माण होण्यामागे तेंडुलकरच होते. असेच प्रश्न सर्व वाचक, प्रेक्षकांच्या मनांत निर्माण व्हावेत, हेच त्यांचं उद्दिष्ट होतं, हे नंतर उमजलं. अजगरासारखं सुस्त पडलेल्या समाजाला ढोसून जागं करणं आणि विचारसन्मुख करणं, हेच त्या कलाकृतीचं काम होतं. चांगलं साहित्य माणसाला अस्वस्थ करून शहाणपणाच्या वाटेवर नेण्याचं काम करतं.

पण अशा या मला भारावून टाकणार्‍या कलाकृतीच्या कर्त्यास भेटायचा योग आला नव्हता. तो आला थिएटर अकादमीच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं. त्या दिवशी मी तेंडुलकरांना पाहिलं. ऐकलं. त्या दिवशीचं त्यांचं अस्तित्व मनावर जे कोरलं गेलं आहे ते आजही तसंच आठवतं. त्यावेळेस त्यांच्या चेहर्‍यावर असणारा ताजेपणा, जगाविषयीची उत्सुकता, नाविन्याची ओढ, बंडखोरीचं स्वागत करणारी आणि विविध प्रश्नांमागचं गांभीर्य समजावून घेणारी वृत्ती त्यांच्या हालचालीतून जाणवे. पण त्यापलीकडेही मला आठवते ती समोरच्याला आरपार छेदून जाणारी त्यांची नजर, ऐकलेल्या शब्दांमागचे अन्वयार्थ लावणारी त्यांची मग्नता आणि पोटात धस्स करणारी शांतता...विराम...मग ती शांतता सावकाश मोडून हळुवारपणे एकेक मुद्दा मांडत जाणारे त्यांचे शब्द. (इथे मी माझे अनुभव मांडत असलो तरी ते खरंतर आमच्या कुठल्याही नाटकवाल्याचेच आहेत, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो.)

तर पहिल्या भेटीतच तेंडुलकरांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की बस्स. त्या दिवशी ते जसे ठाय लयीत एका गालावर बंद पंजा ठेऊन बोलले तसा मी बोलू लागलो. लोकांकडे आरपार रोखून पाहू लागलो. पुढे त्यांची नाटकं आणि इतर साहित्य वाचून काढलं. माणसं ही तेंडुलकरांची आवडती थिम होती. माणसांतील क्रौर्य आणि लैंगिकता हा त्याचा पाया होता. मीही कळत नकळत माझ्या लेखनाचा तोच पाया मानू लागलो. याच काळात मी तेंडुलकरांना अचानक भेटलो. तेंडुलकर आस्थेने बोलले. मनावरचं दडपण दूर झालं. दडपण दूर झालं खरं, पण आपल्याला एक अक्षर बोलता येईल का, ही मलाच शंका होती. मी चाचरत सुरुवात केली तर काही वेळानंतर लक्षात आलं की आपणच फार बोलतो आहोत, आणि ते गप्पच. मी बोललो की मान डोलवायचे आणि थांबलो की प्रश्न विचारायचे. हे असं नेहमीच व्हायचं. दुसर्‍याला सहजपणे बोलतं करण्याची तेंडुलकरांची ताकद मी त्यावेळी अनुभवली. माझ्यासारख्या वयानं, ज्ञानानं आणि अर्थातच कर्तृत्वानं लहान असलेल्या मुलाबरोबर ते तासनतास घालवत असत. हे सारं कमी म्हणून की काय, माझं नवथर लेखन, माझ्या कविता मी त्यांना वाचायला द्यायचो. आधी वाटणारी भीती तेंडुलकरांना भेटताच दूर व्हायची. तेंडुलकरही अतिशय गंभीरपणे माझं ते कच्चंमच्चं लेखन वाचत. त्यावर साधकबाधक चर्चा करत. त्यात कुठेही तुच्छता नसायची, चेष्टा नसायची किंवा लिखाण वाचून डोळे कधीही ऊर्ध्व लावून त्यांनी 'हे काय लिहिलंस बाबा?' असं आकांडतांडव केलं नाही. या माणसाचा हा फार मोठा गुण मी त्यावेळी पाहिला.

मध्यंतरी त्यांच्या घरी गेलो असता आजची तरूण लेखिका मनस्विनी लता रवींद्र त्यांना कविता वाचून दाखवत होती. मलाही त्यांनी तिची ओळख करून देऊन कविता ऐकायला लावल्या. मग प्रेमपूर्वक आस्थेनं गप्पा मारल्या. प्रथमतः घाबरलेली मनस्विनी जाताना आत्मविश्वासानं गेली. मुख्य म्हणजे तिची पाठ वळल्यावरसुद्धा तेंडुलकर तिच्याबद्दल चांगलंच बोलले. हे रुढीला सोडूनच होतं!! ती गेल्यानंतरही अंतराअंतरानं नवनवी माणसं येतच राहिली. त्यात नवेजुने लेखक, कवी, गावोगावचे कार्यकर्ते. प्रत्येकजण भरभरून काहीतरी सांगत होतं. शिवाय प्रत्येकाचे विषयही वेगवेगळे होते.

तेंडुलकर फक्त साहित्यातून माणूस पाहत नव्हते तर प्रत्यक्ष जगण्यामध्ये तो अनुभवत होते. तुम्ही कुठल्याही गावात जेव्हा जाल, तेव्हा त्या गावातील संवेदनशील माणूस तेंडुलकरांच्या संपर्कात असल्याचं तुम्हाला लक्षात येईल. कुठल्या गावात काय चाललं आहे, याची बित्तंबातमी तेंडुलकरांना असे. आजच्या जगाचे गुंतागुंतीचे नवनवे प्रश्न ते सहानुभूतीने पाहत असत. मला ते थक्क करणारं वाटे. त्यामुळे पिढ्या बदलोत, त्यांची भाषा बदलो, तेंडुलकर कायम समकालीनच वाटतात. आपण सृजनशील राहून इतरांनाही सृजनशील बनवणं, हे तेंडुलकरांचं मोठं योगदान आहे, असं मला वाटतं. जगण्यातले महाभयानक चढउतार आणि चित्रविचित्र घटना अनुभवणारा हा माणूस आजही जगण्याचं बळ देतो. जगण्याचं रखरखीत परखड वास्तव जसं त्यांनी लेखनातून दाखवलं तेच त्यांनी जगण्यातही समजावून घेतलं. स्वतःला त्याच तराजूत तोलण्याचं विलक्षण सामर्थ्य या लेखकानं दाखवलं.

मी त्यांच्यावर माहितीपट करत असताना तेंडुलकरांचं असंच वेगळं दर्शन झाले होते. त्यांनी छायाचित्रांनी भरलेली दोन पोती माझ्यापुढे ठेवली. ती घेऊन मी पुण्याला आलो. फोटो पाहात गेलो आणि आश्चर्यचकित झालो. त्या संग्रहात ते सलमान रश्दी, प्रमोद महाजन, विनय कटियार, मेधा पाटकर, व्ही. पी. सिंग, नामदेव ढसाळ, रामदास आठवले, अण्णा हजारे, खैरनार वगैरे माणसांबरोबर सहजपणे गप्पा मारताना दिसत होते. त्या फोटोतही समोरची, आचारविचारांनी परस्परविरोधी माणसं तेंडुलकरांना सर्व काही सांगताना दिसत होती आणि तेंडुलकर ऐकताना. यातून लक्षात आलं ते म्हणजे, माणूस कुठल्याही जातपातधर्माचा असो किंवा विचारप्रणालीचा असो, तेंडुलकर सर्वांसाठी मोकळे, स्वागतोत्सुक आणि समग्र राहिलेले आहेत. लेखनात त्यांनी हिरो-व्हिलन अशा भेदांपलीकडे व्यक्तिरेखा रंगवल्या तशाच जगतानाही पाहिल्या. होकार-नकार देणारी पुरेशी अलिप्तता त्यांनी अंगी बाणवली. अनेक चळवळींचा आधारस्तंभ राहूनही कोणत्याही विचारदावणीला त्यांनी स्वतःला बांधून ठेवलं नाही. प्रतिगामी मतांविरुद्ध लढले पण म्हणून पुरोगामी मूल्यांना माफही केलं नाही. कंपूबाजी आणि गटबाजी कायम टाळली. भावनिक फसगत करून घेऊन मूल्यनिर्णय करण्याची घाई वाचवली. थोडक्यात ते कुठलेही अमुकवादी-तमुकवादी न राहता तेंडुलकरवादीच राहिले.

तेंडुलकरांच्या अशाच एका वैशिष्ट्याबद्दल आदर वाटतो. ते म्हणजे तेंडुलकरांनी नेहमी भूमिका घेतली आहे. सामाजिक आणि राजकीय भान जागृत ठेवून कोणाचीही भीडमूर्वत न ठेवता स्वच्छ आणि स्पष्ट बाजू घेत ते भांडत राहिले आहेत. समाजात आजूबाजूला चाललेल्या अनेक घटनांनी त्यांना अस्वस्थ केलेलं आहे. ते त्यांनी निर्भीडपणे व्यक्त केलं आहे. आपण लेखक आहोत आणि आत्ममग्नता हा आपला गुण आहे वगैरे त्यांनी कधीच मानलं नाही. समाजाच्या कुठल्याही प्रांतात न्याय्य हक्कांसाठी झगडणार्‍या कुणाही व्यक्ती वा चळवळीशी ते स्वतःला जोडून घेत आले आहेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर, गुजरातच्या दंगलीनंतर अथवा नर्मदा बचाओ आंदोलनात तेंडुलकर लढणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. हे त्यांचं स्वतःला आपणहून व्यक्ती आणि चळवळींना जोडून धरणं मला महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. एका विशिष्ट चौकटीत राहून अनुभवांची मिळणारी शिदोरी पुरेशी असणार नाही हे त्यांना उलगडलेलं असावं.

मात्र याचबरोबर तेंडुलकर लेखनासाठी 'कच्चा माल' म्हणून हा अनुभवांचा साठा आणि लोकसंग्रह करीत राहिले असंही कधी दिसलं नाही. त्यांच्या हातात सतत जगातील आजचं साहित्य असतं. नवनवे लेखक त्यांना आधीच माहित असतात. मध्यंतरी ते त्यांचे दोस्त बाजी कुलकर्णींना नव्या इराणी फिल्म्सबद्दल सांगत असताना मी पाहिले आहे. आठवड्यातून दोन वेळा एकत्र जमून ते एक स्टडी-ग्रूपच चालवत. तेंडुलकरांना याबाबत मी विचारले तर ते म्हणाले की, 'मला नव्याबद्दल इतकी उत्सुकता असते की ते अनुभवण्यावाचून चैनच पडत नाही.' असं विविध स्तरावरून अनुभव घेणं जगण्याच्या अपार ओढीनं आणि श्रद्धेनंच होत असतं.

त्यांच्या रसरशीत जगण्याचं आणि म्हणून लेखनाचं हेच मर्म आहे. आर्थिक ओढग्रस्त असताना त्यांनी लेखनाचं व्रत कधी सोडलं नाही. राज कपूरसारखा दिग्दर्शक स्वतःहून दारी आला. सारं कुटुंब आनंदी झालं. कुटुंबाला वाटलं आता दुष्काळ संपणार आणि सुगीचे दिवस सुरू होणार. पण तुकारामांच्या परंपरेला अनुसरून आलेलं धन अव्हेरून शब्दांचं मोल त्यांनी कायम राखलं. समजावून घेऊन गरिबीच पत्करली. नैतिक हट्टीपणाची ही परंपरा जोपासत असताना आपण लेखक आहोत आणि लेखन हाच आपला धर्म आहे या तत्त्वाचा स्वीकार केला. कितीही किंमत मोजावी लागली तरी आपल्याला रुचेल तेच लिहावं हा त्यांचा जाहीरनामाच होता. लेखनावर अपार प्रेम असल्यावाचून हे शक्यच नाही. 'पक्ष्याने उडावे तितक्या सहजपणे माझा हात लिहितो' असं तेंडुलकर लेखनप्रेमाविषयी म्हणतात ते मग खरंच असतं. वर्तमानपत्रांच्या कचेरीत यंत्रांच्या खडखडाटात, गोंगाटात, धावत्या धडाडत्या लोकल गाडीत तर वेळप्रसंगी घरातल्या बाथरूममध्ये स्वतःला बंद करून घेऊन तेंडुलकरांनी लेखन केलेलं आहे. लेखनप्रक्रियेच्या गूढरम्यतेला त्यांनी फाटाच दिला होता. त्याबद्दल ते म्हणतात ते फार मार्मिक आहे -
'लिहिण्याच्या खास खोलीत टेबलाशी बसून, भोवतालच्या शांततेचा आस्वाद घेत, सुवासिक उदबत्त्या वगैरे लावून मोहोरेदार कागदावर ठेवणीतल्या पेनने मी कधीच लिहिल्याचे मला आठवत नाही. मिळेल ती जागा, असेल ते वातावरण, हाताशी येईल तो कागद आणि पेन हीच माझ्या लेखनाची पद्धत.'

मराठी नाट्यसृष्टीला अभिमान वाटावी अशी तेंडुलकरांची नाट्यनिष्ठा आहे. नाटकाच्या रंगात त्यांनी स्वतःला पूर्ण माखून घेतलं. नाटकातील आशयाविषयी, तंत्राविषयी, नवतेविषयी ते भांडत राहिले. जगातील नाटक समजावून घेताना इथल्या मातीतलं नाटक शोधलं. नवनवे रंगभाषेचे प्रयोग त्यांनी केले. इतर भाषेतल्या नाट्यलेखकांच्या कलाकृती मराठीत अनुवादित करून भारतीय रंगभूमीला जोडून घेतलं. नाटकाला अशा वळणावर नेऊन ठेवलं की त्यांच्या नंतरच्या लेखकांना जगण्याचे नवे आयाम दिसावेत. ही भूमी इतकी सकस केली की त्यातूनच नवनवी ऊर्जा मिळावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता आवश्यक तो मोकळेपणा तेंडुलकरांनीच आणला आहे. जुने संकेत मोडायचे आणि टीका सहन करत नवे परिमाण शोधायला आम्हाला त्यांनीच शिकवले आहे. तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे 'रंगभूमी आणि समाज यांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. रंगभूमी हे एका अर्थानं कलामाध्यम असलं तरी त्याचब्रोबर त्याची मुळं ही जगण्यामध्ये - माणसांच्या त्या त्या काळामधल्या परिस्थितीमध्ये भक्कम रुजलेली असायला हवीत.' तेंडुलकरांच्या साहित्यात आणि अर्थातच जगण्यातही ही पाळंमुळं खोलवर गेलेली आपल्याला दिसतात.

आजच्या युगातलं जीवनविषयक भक्कम तत्त्वज्ञान लेखनातून मांडल्यामुळं आणि माणसांचा व्यापक विचार आणि माणसांचे व्यापक चित्रण करणारे तेंडुलकर हे अस्वस्थ विचारवंत आहेत.

मी माझ्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून तेंडुलकरांना आदरपूर्वक वंदन करीत आहे.

------------------------------------------------------------------------------------

टंकलेखन साहाय्य - अंशुमान सोवनी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अस्वस्थ विचारवंत

व्वा! Happy

चिनुक्स आणि अंशुमान हे पोचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
पेठेंचे विचार फार आवडले. फार नेमकेपणाने व्यक्त झालेत.

मिळेल ती जागा, असेल ते वातावरण, हाताशी येईल तो कागद आणि पेन हीच माझ्या लेखनाची पद्धत>>>
नव्याबद्दल इतकी उत्सुकता असते की ते अनुभवण्यावाचून चैनच पडत नाही>>
तेंडुलकरांनी नेहमी भूमिका घेतली आहे>>
भावनिक फसगत करून घेऊन मूल्यनिर्णय करण्याची घाई वाचवली>>
तीच ओळख जगाला तेंडुलकरांच्या 'सखाराम-घाशीराम'ची आहे>>>

'पक्ष्याने उडावे तितक्या सहजपणे माझा हात लिहितो' >>>
लेखनासाठी 'कच्चा माल' म्हणून हा अनुभवांचा साठा आणि लोकसंग्रह करीत राहिले असंही कधी दिसलं नाही>>>>
लेखननिष्ठा हा घासून गुळगुळीत झालेला शब्द नसून तो मोजक्याच व्यक्तिंच्या बाबतीत वापरला जावा. जर तेंची (मी तेंचे लिखाण वाचलेले नाही) लेखनाबाबतची भुमिका ही होती तर हा शब्द त्यांना नक्कीच शोभून दिसेल.

>> ते म्हणजे तेंडुलकरांनी नेहमी भूमिका घेतली आहे. >>> हे फार फार महत्वाचे वाक्य आहे ह्या लेखातले. ह्या माणसाने नेहेमी भुमिका घेतली आणि म्हणुनच जवळपास सर्व मराठी साहित्यिकांपेक्षा (दुर्गाबाई वगैरे अपवाद सोडल्यास) वेगळे ठरले, सच्चे ठरले.

परंपरेची नाळ जोडत गेल्यास नवतेच्या वाटा अधिक स्पष्ट होत जातात. >>> अप्रतिम !

आपण सृजनशील राहून इतरांनाही सृजनशील बनवणं, हे तेंडुलकरांचं मोठं योगदान आहे, असं मला वाटतं. >>> ही तर साक्षात निसर्गाची ताकद आहे.

ते म्हणजे तेंडुलकरांनी नेहमी भूमिका घेतली आहे. >>> टण्याला अनुमोदन.

  ***
  May contain traces of nuts.

  'तेंडूलकर' इतरांच्या चष्म्यातूनही एक परिपुर्ण माणूस म्हणूनच गवसतात. 'तेंडूलकर' वाचणे सोपे, समजणे 'फार महत्त्वाचे.'
  चिनुक्स व अंशुमान यांचे आभार.
  .........................................................................................................................
  आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
  कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

  चिन्मय, अंशुमन :
  धन्यवाद.... तेंडुलकरांबद्दल खूपच चांगली माहिती वाचायला मिळाली.

  छान!!!
  ~~~~~~~~~~~~~~~~~~
  प्रत्येक नया दिन नयी नाव ले आता है
  लेकिन समुद्र है वही,सिंधु का तीर वहीं
  प्रत्येक नया दिन नया घाव दे जाता है
  लेकिन पीडा है वही ,नयन का नीर भी वहीं

  लागूंपासून पेठेंपर्यंत.. प्रत्येक पिढीच्या प्रतिनिधीला दिसलेले तेंडूलकर..
  जितकी बोलत जातात ही माणसं, तितकं 'तें'भोवतीचं गुढतेचं वलय अधिकच दाट झालेलं दिसतं मला.
  'तें' हे नक्की एकच माणूस होते की एकाच वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य??!! Happy