विनाशकाले विपरीत दृष्टी

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2022 - 03:31

IMG_20220222_130147.jpg

धाग्याच्या सुरुवातीलाच असा डिस्टर्बिंग फोटो लावला आहे. जसे ते थिएटरमध्ये धूम्रपानाच्या मद्यपानाच्या जाहीरातीत सडलेले आतडे फेफडे दाखवून घाबरवतात आणि व्यसने सोडा नाहीतर तुमचे सुद्धा हे असे होईल याची भिती दाखवतात. पण या मागचा हेतू घाबरवणे नसून विषयाचे गांभीर्य समजावे हा आहे. कारण पुढच्या लिखाणात ते गांभीर्य जपले जाईल याची खात्री नाही. तो माझा पिंड नाही Happy

तर हो,
तो वरचा मनुष्य मीच आहे.
आणि तो डोळा देखील माझाच आहे.

माझ्या आठवणींप्रमाणे साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मी पहिल्यांदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो. निमित्त साधे होते. डोळ्यातून काही कारणास्तव सतत पाणी येत होते. त्या आधी नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊन आलो होतो. तेव्हा असे मुद्दाम कुठल्याही स्पेशालिस्टकडे जाण्याची पद्धत नव्हती. स्पेशालिस्ट नुसते हात लावायचे पाचशे रुपये घेतात म्हणत कसलाही त्रास का असेना जनरल फिजिशिअनकडेच जाणे ही मध्यमवर्गीय घरातील पद्धत होती. पण त्यांना उकल न झाल्याने त्यांच्याच सल्याने मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणे भाग पडले.

आय स्पेशालिस्ट डॉक्टरांनी त्यांच्या नेहमीच्या तपासण्या केल्या. डोळ्यात टॉर्च मारला. एखाद्या मशीनीत बघायला लावले. नजर चेक करायला समोरची अक्षरे वाचायला सांगितली. जिथे मी बारीकातले बारीक अक्षर सुद्धा लीलया आणि वेगात वाचू लागलो. जणू काही सूक्ष्म अक्षर वाचनाची स्पर्धाच होती.

तेव्हाची लोकंही साधीभोळी होती आणि डॉक्टरही. माझ्या खिश्याची कसलीही कापाकापी न करता त्यांनी एकूण तपासणीअंती डोळे उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. निघता निघता हे सुद्धा म्हणाले की बच्चे की आंखे तो ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. हे माझ्या मनात ईतके ठसले की दहावीच्या बोर्डात ईंग्लिशला ४९ मार्क्स मिळेपर्यंत मी सिरीअसली पायलट व्हायचा विचार करत होतो Happy

डॉक्टरांनी डोळ्यात टाकायला काही ड्रॉप्स आणि घश्यात ढकलायला काही गोळ्या दिल्या. गंगामाई आली, चार दिवस डोळ्यात नांदली, आणि निघून गेली. त्यानंतर माझ्या डोळ्यातले पाणी जणू सुकूनच गेले. पुन्हा कित्येक वर्षे ते काही आले नाही.

आणि मग आयुष्यात क्रॉंज नावाचा आजार आला. तसे म्हटल्यास तो आजार आतड्याचा. जाम छळले त्याने. आणि आयुष्यभर छळणार आहे. ते पुन्हा कधीतरी. पण जेव्हा त्याचे निदान झाले आणि त्याच्या गोळ्या सुरू झाल्या. तेव्हा त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टने म्हणा डोळे पुन्हा रडारवर आले. आता नुसते डोळ्यातून पाणी नाही तर डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. ऑफिसमध्ये काम करता करता अचानक स्क्रीनवरची अक्षरे धूसर दिसू लागली. तर कधी भिरभिरू लागली. ईतके की मी काम थांबवून पंधरावीस मिनिटे जागीच डोळे मिटून बसू लागलो. असे तीनचार वेळा होताच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणत मी पुन्हा माझे क्राँजचे डॉक्टर गाठले. ते पडले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट. ते म्हणाले, नुकत्याच ज्या गोळ्या चालू केल्या आहेत त्या तुला आयुष्यभर घ्यायच्या आहेत. त्याची शरीराला सवय होईस्तोवर काही साईड ईफेक्ट उद्भवणार. जसे की केस गळणे वा पाठीला खाज येणे वा अंगाची आग होणे वगैरे. त्यात स्टेरॉईडस सुद्धा तुर्तास आपण घेत आहोत. तरी डोळ्यांबाबत कसलीही रिस्क न घेता आपण डोळ्यांच्याच स्पेशालिस्टला दाखवूया. मी बर्रं म्हटले..

तेव्हा लग्न फार जुने झाले नव्हते. त्यामुळे बायको म्हणाली आपण विभागातील एखाद्या नामांकित डॉक्टरलाच दाखवूया. त्याने डोळ्यांच्या जरा जास्तच टेस्ट केल्या. त्याचे रेटही जरा जास्तच होते. साधारण सहा-सात हजार रुपये खर्चून काही ग्राफिकल रिपोर्ट तयार करून त्यांनीही अखेर निर्वाळा दिला की डोळ्यांचा काही प्रॉब्लेम नाही. चष्याचा नंबरही नाही. पण ईतकेच बोलून ते थांबले नाहीत. तर पुन्हा तो वर्ल्ड फेमस डायलॉग मारला. बंदे की आंखे ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. पण आता हे ऐकून मी लगेच हवेत उडणार नव्हतो. एव्हाना मी दगडमातीच्या व्यवसायात फसलो होतो.

त्यांनी दिलेल्या औषधामुळे म्हणा वा माझ्या आजाराच्या गोळ्यांची शरीराला सवय झाल्याने म्हणा डोळ्यांचा त्रास आठवड्याभरातच थांबला. पुढे काही काळ, काही वर्षे डोळ्यांचा कसलाही त्रास झाला नाही.

वैयक्तिक आयुष्य पुढे सरकत होते. पोरंबाळं झाली, नोकरीत स्थिरता आली. जॉब प्रोफाईल असे झाले की दिवसभर स्क्रीनसमोर डोळे खपवावे लागायचे. जमानाच स्पार्ट फोनचा असल्याने मोबाईलचा वापरही वाढला. परीणामी अध्येमध्ये पुन्हा डोळ्यातून पाणी येणे सुरू झाले. अश्यावेळी रेल्वेचे लाल दिव्यांचे ईंडिकेटर बघणेही त्रासदायक होऊ लागले. अंधारात मोबाईल बघणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे मी ते टाळू लागलो. पण नजर मात्र अजूनही शार्प होती. कधीतरी पाणी यायचा प्रॉब्लेम सोडल्यास कितीही दूरचे आणि बारीक अक्षर वाचू शकत होतो. सोबत आपली नजर प्लेन चालवायच्या लायकीची आहे हा फाजील आत्मविश्वासही होताच.

पण पुढे कोरोना आला. लॉकडाऊन लागले. वर्क फ्रॉम होम सुरू झाले. डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनजागी लॅपटॉपच्या छोट्या स्क्रीनवर काम होऊ लागले. ते देखील घरूनच असल्याने दिवसरात्र सुरू झाले. ऑफिससारखे टी ब्रेक, लंच ब्रेक, गप्पांचे ब्रेक बंद झाले. कामातून बोअर झाल्यास बसल्या जागीच मोबाईल हातात घेणे हा छंद बनला. कामाचा लोड कमी असतानाही डोळ्यांना आराम न देता कामाच्या अध्येमध्ये नेटसर्फिंग करणे वा सोशलसाईटवर बागडणे असे वाढलेला स्क्रीन टाईम कायम ठेवण्याचे उद्योग सुरू झाले. पोरांच्याही शाळा ऑनलाईन सुरू झाल्याने त्यांचा अभ्यास घ्यायच्या निमित्ताने पुन्हा त्यांचा टॅबच हातात घ्यावा लागायचा. लॉकडाऊन जसा कडक लागायचा तेव्हा रोजचे बाहेर फिरणेही बंद व्हायचे.
जितके घरात अडकायचो तितके स्क्रीन टाईम वाढायचा. या काळात एवढे दिवस नव्हता तो मूवीज आणि वेबसिरीज बघायचा छंद देखील जडला. वेबसिरीजचे आठ आठ एपिसोड एका रात्रीत बघणे होऊ लागले. वर्क फ्रॉम होम सकाळी आरामात घरूनच सुरू होत असल्याने रात्री जागणेही होऊ लागले.

एकूणच या सर्वांचा परीणाम व्हायचा तो झाला. माझ्या नजरेला नजर लागली. मला चष्मा लागला.

काम करताना, वाचताना अडचण होतेय, डोळ्यांचे काहीतरी बिनसलेय हे जाणवत होते. पण चष्मा लागला असेल हे मन मानत नव्हते. बंदा प्लेन चला सकता है यातच अजूनही अडकलो होतो. मग डोकेही दुखू लागलो तसे डोळे चेक करून घेतले. जास्त जवळचा आणि किंचित दूरचा असे दोन्ही नंबर निघाले. हा कदाचित पहिला अलार्म होता. पण तेवढ्यात सुधारेल तो ऋन्मेष कसला. दिनक्रमात जराही फरक पडला नव्हता. उलट चष्म्याच्या रुपाने क्राईम पार्टनर मिळाला. अचानक लक्ख दिसू लागले तसे काय वाचू आणि काय बघू असे होऊ लागले.

चार सहा महिन्यांनी चष्याची ईतकी सवय लागली की जेव्हा पहिला चष्मा हरवला तेव्हा नवीन चष्मा घेईपर्यंत दोन दिवस सुट्टी टाकावी लागली. वर जो पहिला अलार्म वाजलेला, जो मी तात्पुरता स्नूज केलेला, तोच बहुधा पुन्हा वाजला होता. पण मी त्याकडेही दुर्लक्ष करून माझा दिनक्रम कायम ठेवला. जेव्हा कोविड पॉजिटीव्ह निघालो आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची वेळ आली तेव्हा तर मोबाईल देवासमान वाटू लागला. तो नसता तर चार भिंतीत आपला दिवस कसा गेला असता असे प्रश्न पडून मी मोबाईलचे आभार मानू लागलो.

आणि मग एके दिवशी दुसरा अलार्म वाजला. काही दिवस डोळ्यांना त्रास होत होता. जणू एखाद्या फुग्यात ईतकी हवा भरावी की तो फुटू नये पण कधीही फुटू शकेल अश्या स्थितीत आलाय, असे त्या फुग्यावर आलेले प्रेशर आपल्याला जाणवावे. तसे काहीसे डोळ्यांबाबत वाटत होते. कदाचित नंबर वाढल्याने असे होत असावे म्हणत येत्या विकेंडला नवीन चष्मा घ्यायचा विचारही केला होता. पण त्याआधीच हे असे झाले..

शनिवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे घरूनच ऑफिसचे काम चालू होते. तशी शनिवारची सुट्टी असते पण वर्कलोड जास्त असल्यास करावे लागते काम. थोडेसे ऊशीराच ऑनलाईन आलो होतो. साधारण दहा वाजता. तुलनेत आज डोळ्यावर फारसे प्रेशर जाणवत नव्हते. पण थोडी कचकच जाणवत होती. थोडे काम, थोडासा टाईमपास, बसल्या बसल्या नेटसर्फिंग असे करत बारा वाजले. मला शनिवारचे एक्स्ट्रा काम होते, पण बायकापोरांची छान एक्स्ट्रा झोप, एक्स्ट्रा आराम चालू होता. दुपारी बारा वाजता जेवणाचे विचारायला बायको माझ्याजवळ आली आणि माझ्या डोळ्याकडे नजर जाताच जवळजवळ किंचाळलीच. माझा ऑफिसचा कॉल चालू होता, कलीगशी बोलत होतो. पण तिचे दचकणे पाहून मी कॉल होल्डवर ठेऊन उठलो आणि पहिले आरश्यात जाऊन पाहिले. आता हादरण्याची पाळी माझी होती. डोळ्याचा आलूबुखार झाला होता Happy

मी घाईघाईत वॉश बेसिनवर गेलो डोळ्यांवर पाणी मारले. डोळ्यात काहीतरी रंग गेला असेल तो निघेल ही वेडी आशा. ईथे बायकोचे तेवढ्यात गूगलवर असेच रक्ताळलेल्या डोळ्यांचे फोटो शोधत त्यामागची कारणे वाचणे चालू होते. हार्मलेस ते हार्मफुल अश्या सर्व रेंजची कारणे होती. गेले काही दिवस माझ्या डोळ्यांना होणारा त्रास पाहता हे प्रकरण निरुपद्रवी नक्की नाही हे मला पक्के ठाऊक होते.

ईतक्यात आठवण झाली, ऑफिसचा कॉल अजून चालूच आहे. ऑफिसच्या मित्राला माझ्या डोळ्यांचा काय प्रॉब्लेम झालाय याची कल्पना देऊन तो कट केला. डॉक्टरांकडे जाऊन सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आता पुन्हा मी त्या स्क्रीनवर काम करणार नव्हतो. डॉक्टरांची अपॉईंटमेंट संध्याकाळची होती. तोपर्यंत घरात असलेले आयड्रॉप टाकले आणि कापलेली काकडी डोळ्यांवर ठेऊन निपचित पडून होतो. थोडासा थंडावा आणि थोडेसे अश्रू. तासा दोन तासांनी डोळ्यात उतरलेले रक्त वाहून जाईल अशी अजून एक वेडी अपेक्षा.

तसे तर काही झाले नाही. पण प्रकरण वाढलेही नव्हते. अजूनही मला व्यवस्थित दिसत होते. तसेच डोळ्यातली कचकच त्रासदायक झाली नव्हती. हेच देवाचे आभार म्हणण्यात मी धन्यता मानली.

पुन्हा डोळा तपासणीचे सारे सोपस्कार पार पडले. पण यावेळी मी दहशतीत होतो. जसे आपण दातांच्या डॉक्टरकडे खुर्चीत बसल्यावर असतो. साधे नंबर तपासणीच्या वेळीही धडधड होत होती. सोबत बीपी चेक केले. डोळ्यांवरचे प्रेशर चेक केले. सारे काही तुलनेत नॉर्मल निघाले. फक्त डोळ्यांवरचे प्रेशर तेवढे किंचित धोक्याची घंटा दर्शवत होते. दुसरा अलार्म होता खरा, पण पडदा पडायला अजून अवकाश होता. कुठलेही कायमस्वरुपी नुकसान अजून झाले नव्हते. परतायला अजून मार्ग होता. डोळ्यातील एक रक्तवाहीनी फुटून रक्त साकळून डोळ्यात जमा झाले होते. तुर्तास घाबरण्याचे कारण नाही पण आठ दिवस डोळ्यांना आराम दे जरा असे सांगत डॉक्टरांनी औषधे लिहून दिली.

घरी आलो. सर्वात पहिले काय केले असेल तर मोबाईल हाती घेतला. तब्बल सहा तासांनी बघत होतो. प्रेमाने कुरवाळले आणि आवडीचे व्हॉटसप उघडले. जवळपास पंधरा ते वीस व्हॉटसपग्रूपचा मी आजीवन सदस्य होतो. दोनचार ग्रूप वगळता त्यातील ईतर सर्वांना तिलांजली दिली. काही फेसबूक ग्रूप्स उडवले. लॅपटॉपचा ब्राईटनेस कमी केला. मायबोलीवर धागे कमी काढायचे ठरवले. अवांतर पोस्टना टाळायचा पण केला. वर्क फ्रॉम होमची जागा बदलली. जिथून अध्येमध्ये जास्तीत जास्त लांब नजर जाईल अशी जागा पकडली. नुकतेच सुरू झालेले पण तुर्तास डगमगलेले मॉर्निंग वॉल्क नेटाने चालू ठेवायचे ठरवले. जेणे करून सकाळी उठणे होईल, रात्री वेळेवर झोपणे होईल, आणि बदललेल्या वेळापत्रकामुळे स्क्रीन टाईम सुद्धा आटोक्यात राहील. स्क्रीनवरून अधूनमधून डोळे हटवणे, पापण्यांची उघडझाप करणे, झाल्यास जागेवरून उठून फिरून येणे, वगैरे छोटेमोठे पण गरजेचे नियम बनवले. आणि बनवूनच थांबलो नाही तर गेले काही दिवस ते आचरणातही आणू लागलोय.

जेव्हा जळते तेव्हाच कळते असे म्हणतात. मी कुठल्या स्टेजला आहे याची कल्पना नाही. पण, डोळे कायमचे बंद व्हायच्या आधी उघडलेत हे ही नसे थोडके. आता शक्य ती डोळ्यांची काळजी घ्यायचे ठरवलेय. हि वेळ आज वा उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणावरही येऊ शकते. कमी जास्त स्वरुपात आपल्या सर्वांचेच कामाचे स्वरुप असे असावे, आपली लाईफस्टाईल देखील कमी अधिक फरकाने सारखी असावी. कोणाला जास्त फटका बसेल तर कोणाला कमी, पण गाफिल कोणीही राहू नये म्हणून हा अनुभव शेअर करावासा वाटला. कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही, तर सावधच करायचे आहे. सुरुवातीच्या फोटोला पाहून जर यीsईंव अय्याई ग्गं झाले असेल तर लेखाच्या समारोपाला एक हलकाफुलका फोटो शेअर करून आवरते घेतो.

IMG_20220222_130658.jpg

(लहानपणी पापण्या वर करून लहान मुलांना घाबरवायचा खेळ हिट होता. आठवडाभर मी तसाच होतो, त्यामुळे पोरंही घाबरायची बंद झाली होती. उलट माझी मजाच घेत होती Happy )

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

....

..

....

काळजी घ्या, लवकर बरे व्हा
आणि देव करो तुम्हाला पाईल्स ना होवो

निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा

बापरे.
आठवडाभर तसाच होतो म्हणजे आता नॉर्मल आहे ना डोळा? मग शेवटचा फोटो नॉर्मल डोळ्यांनिशी टाक ना.

अजिबात लाईटली घेऊ नकोस हे.
अगदी जवळच्या नातेवाईकाला अच्नक पुर्ण अंधत्व आलंय. तो त्रास बघतेय.
डोळयांची काळजी घ्यावीच.
शिर्षक अजिबात आवडलेलं नाहीये.

चांगल्या डॉक्टरला दाखवा.
सध्या एका डोळ्याने प्रतिसाद देण्याची किंवा धागे काढण्याची प्रॅक्टिस करा. त्रास होत असेल तर टंकलेखनासाठी सहायक ठेवावा. बाबूराव अर्नाळकर यांनी दृष्टी गेल्यावर टंकलेखिका नेमून अखंडित साहित्य सेवा केली होती. कृपया गैरसमज नसावा.

माझा डोळा पण काही वेळा लाल झाला होता. स्क्रीन टाईम कमी करून मोकळ्या हवेत चालणे सुरू केले. डॉक्टरांकडे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. फरक पडला. गंभीर काही असेल तर मग शक्यतो अनुभवी डॉक्टरांकडे जा. पुण्यात केळकर, संगिता वाघ असे खूप छान डॉक्टर्स आहेत. डोळ्यात पण वेगवेगळे स्पेशलायझेशन असते हे आईच्या ट्रीटमेंटच्या वेळी समजले. मुंबईत तर प्रश्नच नाही.
एक हार्श कमेंट जी गरजेची आहे.
डोळा जर गंभीर जखमी असेल तर डॉक्टर न गाठता पहिल्यांदा मायबोलीवर येऊन सांगावेसे वाटणे हे नॉर्मल नाही. डोळ्याच्या तपासणी सोबत व्यसनमुक्ती केंद्राला भेट द्या किंवा मानसोपचार तज्ञ गाठा.

गंभीर काही असेल तर मग शक्यतो अनुभवी डॉक्टरांकडे जा. पुण्यात केळकर, संगिता वाघ असे खूप छान डॉक्टर्स आहेत. डोळ्यात पण वेगवेगळे स्पेशलायझेशन असते हे आईच्या ट्रीटमेंटच्या वेळी समजले. मुंबईत तर प्रश्नच नाही.
एक हार्श कमेंट जी गरजेची आहे.
डोळा जर गंभीर जखमी असेल तर डॉक्टर न गाठता पहिल्यांदा मायबोलीवर येऊन सांगावेसे वाटणे हे नॉर्मल नाही. डोळ्याच्या तपासणी सोबत व्यसनमुक्ती केंद्राला भेट द्या किंवा मानसोपचार तज्ञ गाठा. >>>>> +११११

आमच्या वरच्या मजल्यावरच्या काकु. वय वर्षे ६८. मुली लग्न होऊन जवळच रहातात. घरी नवरा, सुन, मुलगा व नातवंडे. करमत नाही, बाहेर फिरणे झेपत नाही म्हणून संध्याकाळी ७ ते रात्री १० असे एकाच जागी बसुन सतत मालिका पहायला सुरुवात केली. हे टिव्ही व्यसन इतके वाढले की पाहिलेल्या मालिका परत दुसर्‍या दिवशी पहायला सुरुवात केली. परीणाम : र्‍ऋन्मेषच्या डोळ्या सारखा डोळा झाला. त्यातुन रक्त यायला लागले. डॉ हादरले, म्हणाले आजी वेड्या झाल्या का तुम्ही? थोडक्यात वाचल्यात. आता बंद करा हे. घरचे म्हणाले की सांगुनाही ऐकत नाही. डॉ म्हणाले आंधळ्या झाल्या तर मुले बाळे पण दिसायची नाहीत. तेव्हा आजी गप्प बसल्या. आता पहाणे मर्यादेत आहे.

तात्पर्यः - रात्री अपरात्री जागुन धागा काढणे सोड.

काळजी घे. मायबोलीवर नाही आलास तरी चालणार आहे. स्वतःची दृष्टी शाबूत असताना
उगीच सनसनाटी नाव द्यायचे म्हणून हे शीर्षक दिले आहेस याची कल्पना आहे तरीही खरे अंधत्व हे किती अवघड असते हे जवळून पाहिले आहे त्यामुळे दुहेरी विषाद वाटला. असो, शुभेच्छा!

उगीच सनसनाटी नाव द्यायचे म्हणून हे शीर्षक दिले आहेस याची कल्पना आहे तरीही काळजी घे.
मायबोलीवर, फेसबूकवर ई. कुठेही नाही आलास तरी चालणार आहे.

मायबोलीवर, फेसबूकवर ई. कुठेही नाही आलास तरी चालणार आहे.>> खरंय.
मायबोलीचे कसे होईल, धाग्यांचं काय असली टेण्शनं नकोत. कटप्पा, भन्नाट भास्कर टीना, अर्चना नमस्कार, गरीबांचा बापू आळीपाळीने ते काम करतीलच. पासवर्ड संपर्कातून पाठवले तरी चालेल.

बापरे..डोळ्यांबाबत सावधानीच बाळगायला हवी.. मोबाईल, लॅपटॉप कमी हाताळला तरी चालतय.. कामाच्या वेळेखेरीज..
असा डोळा कुणाचा पाहिला होता तेव्हा.. घरगुती इलाजात रक्तचंदन उपयोगी येतं.

जपा ऋन्मेष... थोडा ब्रेक घ्या आता... आयपील येत आहे... व्यवस्थित बरे व्हा... आणि शीर्षक बदला... सिरीयस टॉपिक आहे त्याची गम्मत करू नका...

शीर्षक - माझा अंधत्वाचा प्रवास, हे माझा नाचाचा प्रवास या धाग्यावरून घेतलेले.
खरे तर याच शीर्षकाच्या धर्तीवर माझा मॉर्निंग वॉल्कचा प्रवासही मला लिहायचा होता. पण ईतक्यात हे प्रकरण उद्भवले. आणि ते लिहायचे राहिले. त्याच सिरीजमध्ये म्हणून वरील शीर्षक डोक्यात आले ईतकेच.
तरी लोक भावनेचा आदर करत बदलतो. ते ही नाही रुचले तर तसेही सांगा.

दारू सिगारेटच्या व्यसनाने ज्याला फटका बसला त्याने तो ईतरांना सांगावा जेणेकरून ईतरही त्यापासून दूर राहतील असा माझा आग्रह असतो.
आज मला लॅपटॉप मोबाईलच्या व्यसनाचा फटका बसलाय तर मी देखील ते शेअर करावे असे मला वाटले.

सर्वांच्याच प्रतिसादांचे आभार.

मग शेवटचा फोटो नॉर्मल डोळ्यांनिशी टाक ना.>>> नॉर्मल डोळा माझ्या ईतर कुठल्याही फोटोत/डीपीत दिसतोय तसा नॉर्मलच आहे. तोच काय पुन्हा दाखवायचा म्हणून टाकला नाही Happy
काही दिवस झालेत या प्रकरणाला. तुर्तास डोळा ठिक आहे. ना कचकच आहे, ना ताण आहे. सध्याचे औषधोपचार पुर्ण झाले आहेत.

@ धागे कमी काढलेस तरी चालेल >>> शेवटचा धागा २९ जानेवारी दिसतोय. तेव्हापासून हा पहिलाच धागा आहे. धागे, वादविवाद, अवांतर पोस्ट शक्य तितके टाळतोय. अर्थात मायबोली हि एक जागा आहे. व्हॉटसप ग्रूपवरील वापर जवळपास शून्य केलेय. अपवाद क्रिकेटच्या गप्पा. ते मांसाहाराईतकेच प्रिय आहे. ते सुटणे अवघड. फेसबूक जे मुळातच कमी होते ते सोडलेय. वेबसिरीज सोडलेय. चित्रपट मोजकेच. वॉशरूममध्ये मोबाईल घेऊन जायची सवय होती ती सुद्धा सोडलीय. थोडक्यात ओवर ऑल छंदासाठी जे मोबाईल/लॅपटॉप स्क्रीनचा वापर होता तो २५ टक्क्यांवर आलाय. पुढे न वाढवता आटोक्यातच राहील हे बघेन.

प्रश्न आहे ऑफिसच्या कामाचा. त्यांनाही सध्या कळवलेय की अजूनही घरूनच काम करेन. आणि कामाच्या अध्येमध्ये माझ्या हिशोबाने ब्रेक घेत जाईन. कोणाला काही प्रॉब्लेम नाही. पण किती दिवस. काहीतरी कायमस्वरुपी उपायही हवा. त्यामुळे याच फिल्डमध्ये राहून येत्या पाच सहा वर्षांत स्वतःचा जॉब प्रोफाईल काय करता येईल किंवा पोटापाण्यासाठी फिल्डच चेंज करता येईल का जिथे स्क्रीन टाईम कमीत कमी असेल, उदाहरणार्थ एखादे मेडिकल शॉप वगैरे टाकणे हा विचारही डोक्यात घोळत आहे. बघूया कसे जमते..

दारू सिगारेटच्या व्यसनाने ज्याला फटका बसला त्याने तो ईतरांना सांगावा जेणेकरून ईतरही त्यापासून दूर राहतील असा माझा आग्रह असतो.
आज मला लॅपटॉप मोबाईलच्या व्यसनाचा फटका बसलाय >>> यातली पहिली ओळ इथे देण्याची गरज नव्हती. शासनाने दारूला परवानगी दिली या धाग्यावर उगीचच प्रतिसाद वाढवण्यासाठी जो काही मित्रांना दारू सोडायला सांगा म्हणून थयथयाट केला होता, त्याची कुठे बोच वाटली असेल तर मग स्वागतच आहे. त्या वेळीही माझा पॉईण्ट होता कि ते दारूच्या आहारी गेलेत, व्यसनी झालेत हे माहीत नसताना असला फाजीलपणा बरा नाही. अर्थात धागा सुपरहीट होण्यासाठी कमरेचं सोडून जे प्रतिसाद दिले होते त्यात व्यसनाची पण टिंगलच झाली होती.

मी तिथेही सांगितले होते की तुम्हाला आता स्क्रीनचे व्यसन लागलेले आहे जे दारूपेक्षाही भयंकर आहे, ते सोडा म्हटले तर सोडाल ? दुर्दैवाने तुम्ही माझा पॉईण्ट प्रूव्ह केला. दारूच्या आहारी गेलेला मनुष्यही जोपर्यंत त्याचे नुकसान होत नाही तोपर्यंत जागा होत नाही. काही त्यानंतरही जागे होत नाहीत. तुम्ही वेळेत सावरताय याबद्दल मनापासून अभिनंदन !

जे कोणतीही गोष्ट लिमिट मधे करतात त्याला व्यसन म्हणत नाहीत हे तुम्हाला त्या वेळीही माहिती होतं, हे इथे सांगायला आता काहीही हरकत नाही. माहिती असताना वाद घालण्याच्या या सवयीमुळे पुढे प्रतिवाद केला नाही. मुळातच ते प्रकरण असंवेदनशील होतं. हे आता समजत असेल ही अपेक्षा !

डोळा व्यवस्थित झालेला असताना अशा पद्धतीने अंधत्वाकडे प्रवास असे शीर्षक देऊन केवळ अटेण्शन नाही तर सिम्पथी सुद्धा मिळवण्याच्या प्रयत्नाबद्दल निषेध ! मागे एका आयडीला प्रतिसाद देताना खूप आजारी आहे, जगेन की नाही हे सांगता येत नाही असे विपूत लिहीलेले होते. त्यानंतर भन्नाट भास्कर आला होता. आताही कोणत्या नव्या आयडीचं लाँच असेल तर शुभेच्छा !

Pages