विनाशकाले विपरीत दृष्टी

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2022 - 03:31

IMG_20220222_130147.jpg

धाग्याच्या सुरुवातीलाच असा डिस्टर्बिंग फोटो लावला आहे. जसे ते थिएटरमध्ये धूम्रपानाच्या मद्यपानाच्या जाहीरातीत सडलेले आतडे फेफडे दाखवून घाबरवतात आणि व्यसने सोडा नाहीतर तुमचे सुद्धा हे असे होईल याची भिती दाखवतात. पण या मागचा हेतू घाबरवणे नसून विषयाचे गांभीर्य समजावे हा आहे. कारण पुढच्या लिखाणात ते गांभीर्य जपले जाईल याची खात्री नाही. तो माझा पिंड नाही Happy

तर हो,
तो वरचा मनुष्य मीच आहे.
आणि तो डोळा देखील माझाच आहे.

माझ्या आठवणींप्रमाणे साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मी पहिल्यांदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो. निमित्त साधे होते. डोळ्यातून काही कारणास्तव सतत पाणी येत होते. त्या आधी नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊन आलो होतो. तेव्हा असे मुद्दाम कुठल्याही स्पेशालिस्टकडे जाण्याची पद्धत नव्हती. स्पेशालिस्ट नुसते हात लावायचे पाचशे रुपये घेतात म्हणत कसलाही त्रास का असेना जनरल फिजिशिअनकडेच जाणे ही मध्यमवर्गीय घरातील पद्धत होती. पण त्यांना उकल न झाल्याने त्यांच्याच सल्याने मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणे भाग पडले.

आय स्पेशालिस्ट डॉक्टरांनी त्यांच्या नेहमीच्या तपासण्या केल्या. डोळ्यात टॉर्च मारला. एखाद्या मशीनीत बघायला लावले. नजर चेक करायला समोरची अक्षरे वाचायला सांगितली. जिथे मी बारीकातले बारीक अक्षर सुद्धा लीलया आणि वेगात वाचू लागलो. जणू काही सूक्ष्म अक्षर वाचनाची स्पर्धाच होती.

तेव्हाची लोकंही साधीभोळी होती आणि डॉक्टरही. माझ्या खिश्याची कसलीही कापाकापी न करता त्यांनी एकूण तपासणीअंती डोळे उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. निघता निघता हे सुद्धा म्हणाले की बच्चे की आंखे तो ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. हे माझ्या मनात ईतके ठसले की दहावीच्या बोर्डात ईंग्लिशला ४९ मार्क्स मिळेपर्यंत मी सिरीअसली पायलट व्हायचा विचार करत होतो Happy

डॉक्टरांनी डोळ्यात टाकायला काही ड्रॉप्स आणि घश्यात ढकलायला काही गोळ्या दिल्या. गंगामाई आली, चार दिवस डोळ्यात नांदली, आणि निघून गेली. त्यानंतर माझ्या डोळ्यातले पाणी जणू सुकूनच गेले. पुन्हा कित्येक वर्षे ते काही आले नाही.

आणि मग आयुष्यात क्रॉंज नावाचा आजार आला. तसे म्हटल्यास तो आजार आतड्याचा. जाम छळले त्याने. आणि आयुष्यभर छळणार आहे. ते पुन्हा कधीतरी. पण जेव्हा त्याचे निदान झाले आणि त्याच्या गोळ्या सुरू झाल्या. तेव्हा त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टने म्हणा डोळे पुन्हा रडारवर आले. आता नुसते डोळ्यातून पाणी नाही तर डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. ऑफिसमध्ये काम करता करता अचानक स्क्रीनवरची अक्षरे धूसर दिसू लागली. तर कधी भिरभिरू लागली. ईतके की मी काम थांबवून पंधरावीस मिनिटे जागीच डोळे मिटून बसू लागलो. असे तीनचार वेळा होताच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणत मी पुन्हा माझे क्राँजचे डॉक्टर गाठले. ते पडले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट. ते म्हणाले, नुकत्याच ज्या गोळ्या चालू केल्या आहेत त्या तुला आयुष्यभर घ्यायच्या आहेत. त्याची शरीराला सवय होईस्तोवर काही साईड ईफेक्ट उद्भवणार. जसे की केस गळणे वा पाठीला खाज येणे वा अंगाची आग होणे वगैरे. त्यात स्टेरॉईडस सुद्धा तुर्तास आपण घेत आहोत. तरी डोळ्यांबाबत कसलीही रिस्क न घेता आपण डोळ्यांच्याच स्पेशालिस्टला दाखवूया. मी बर्रं म्हटले..

तेव्हा लग्न फार जुने झाले नव्हते. त्यामुळे बायको म्हणाली आपण विभागातील एखाद्या नामांकित डॉक्टरलाच दाखवूया. त्याने डोळ्यांच्या जरा जास्तच टेस्ट केल्या. त्याचे रेटही जरा जास्तच होते. साधारण सहा-सात हजार रुपये खर्चून काही ग्राफिकल रिपोर्ट तयार करून त्यांनीही अखेर निर्वाळा दिला की डोळ्यांचा काही प्रॉब्लेम नाही. चष्याचा नंबरही नाही. पण ईतकेच बोलून ते थांबले नाहीत. तर पुन्हा तो वर्ल्ड फेमस डायलॉग मारला. बंदे की आंखे ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. पण आता हे ऐकून मी लगेच हवेत उडणार नव्हतो. एव्हाना मी दगडमातीच्या व्यवसायात फसलो होतो.

त्यांनी दिलेल्या औषधामुळे म्हणा वा माझ्या आजाराच्या गोळ्यांची शरीराला सवय झाल्याने म्हणा डोळ्यांचा त्रास आठवड्याभरातच थांबला. पुढे काही काळ, काही वर्षे डोळ्यांचा कसलाही त्रास झाला नाही.

वैयक्तिक आयुष्य पुढे सरकत होते. पोरंबाळं झाली, नोकरीत स्थिरता आली. जॉब प्रोफाईल असे झाले की दिवसभर स्क्रीनसमोर डोळे खपवावे लागायचे. जमानाच स्पार्ट फोनचा असल्याने मोबाईलचा वापरही वाढला. परीणामी अध्येमध्ये पुन्हा डोळ्यातून पाणी येणे सुरू झाले. अश्यावेळी रेल्वेचे लाल दिव्यांचे ईंडिकेटर बघणेही त्रासदायक होऊ लागले. अंधारात मोबाईल बघणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे मी ते टाळू लागलो. पण नजर मात्र अजूनही शार्प होती. कधीतरी पाणी यायचा प्रॉब्लेम सोडल्यास कितीही दूरचे आणि बारीक अक्षर वाचू शकत होतो. सोबत आपली नजर प्लेन चालवायच्या लायकीची आहे हा फाजील आत्मविश्वासही होताच.

पण पुढे कोरोना आला. लॉकडाऊन लागले. वर्क फ्रॉम होम सुरू झाले. डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनजागी लॅपटॉपच्या छोट्या स्क्रीनवर काम होऊ लागले. ते देखील घरूनच असल्याने दिवसरात्र सुरू झाले. ऑफिससारखे टी ब्रेक, लंच ब्रेक, गप्पांचे ब्रेक बंद झाले. कामातून बोअर झाल्यास बसल्या जागीच मोबाईल हातात घेणे हा छंद बनला. कामाचा लोड कमी असतानाही डोळ्यांना आराम न देता कामाच्या अध्येमध्ये नेटसर्फिंग करणे वा सोशलसाईटवर बागडणे असे वाढलेला स्क्रीन टाईम कायम ठेवण्याचे उद्योग सुरू झाले. पोरांच्याही शाळा ऑनलाईन सुरू झाल्याने त्यांचा अभ्यास घ्यायच्या निमित्ताने पुन्हा त्यांचा टॅबच हातात घ्यावा लागायचा. लॉकडाऊन जसा कडक लागायचा तेव्हा रोजचे बाहेर फिरणेही बंद व्हायचे.
जितके घरात अडकायचो तितके स्क्रीन टाईम वाढायचा. या काळात एवढे दिवस नव्हता तो मूवीज आणि वेबसिरीज बघायचा छंद देखील जडला. वेबसिरीजचे आठ आठ एपिसोड एका रात्रीत बघणे होऊ लागले. वर्क फ्रॉम होम सकाळी आरामात घरूनच सुरू होत असल्याने रात्री जागणेही होऊ लागले.

एकूणच या सर्वांचा परीणाम व्हायचा तो झाला. माझ्या नजरेला नजर लागली. मला चष्मा लागला.

काम करताना, वाचताना अडचण होतेय, डोळ्यांचे काहीतरी बिनसलेय हे जाणवत होते. पण चष्मा लागला असेल हे मन मानत नव्हते. बंदा प्लेन चला सकता है यातच अजूनही अडकलो होतो. मग डोकेही दुखू लागलो तसे डोळे चेक करून घेतले. जास्त जवळचा आणि किंचित दूरचा असे दोन्ही नंबर निघाले. हा कदाचित पहिला अलार्म होता. पण तेवढ्यात सुधारेल तो ऋन्मेष कसला. दिनक्रमात जराही फरक पडला नव्हता. उलट चष्म्याच्या रुपाने क्राईम पार्टनर मिळाला. अचानक लक्ख दिसू लागले तसे काय वाचू आणि काय बघू असे होऊ लागले.

चार सहा महिन्यांनी चष्याची ईतकी सवय लागली की जेव्हा पहिला चष्मा हरवला तेव्हा नवीन चष्मा घेईपर्यंत दोन दिवस सुट्टी टाकावी लागली. वर जो पहिला अलार्म वाजलेला, जो मी तात्पुरता स्नूज केलेला, तोच बहुधा पुन्हा वाजला होता. पण मी त्याकडेही दुर्लक्ष करून माझा दिनक्रम कायम ठेवला. जेव्हा कोविड पॉजिटीव्ह निघालो आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची वेळ आली तेव्हा तर मोबाईल देवासमान वाटू लागला. तो नसता तर चार भिंतीत आपला दिवस कसा गेला असता असे प्रश्न पडून मी मोबाईलचे आभार मानू लागलो.

आणि मग एके दिवशी दुसरा अलार्म वाजला. काही दिवस डोळ्यांना त्रास होत होता. जणू एखाद्या फुग्यात ईतकी हवा भरावी की तो फुटू नये पण कधीही फुटू शकेल अश्या स्थितीत आलाय, असे त्या फुग्यावर आलेले प्रेशर आपल्याला जाणवावे. तसे काहीसे डोळ्यांबाबत वाटत होते. कदाचित नंबर वाढल्याने असे होत असावे म्हणत येत्या विकेंडला नवीन चष्मा घ्यायचा विचारही केला होता. पण त्याआधीच हे असे झाले..

शनिवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे घरूनच ऑफिसचे काम चालू होते. तशी शनिवारची सुट्टी असते पण वर्कलोड जास्त असल्यास करावे लागते काम. थोडेसे ऊशीराच ऑनलाईन आलो होतो. साधारण दहा वाजता. तुलनेत आज डोळ्यावर फारसे प्रेशर जाणवत नव्हते. पण थोडी कचकच जाणवत होती. थोडे काम, थोडासा टाईमपास, बसल्या बसल्या नेटसर्फिंग असे करत बारा वाजले. मला शनिवारचे एक्स्ट्रा काम होते, पण बायकापोरांची छान एक्स्ट्रा झोप, एक्स्ट्रा आराम चालू होता. दुपारी बारा वाजता जेवणाचे विचारायला बायको माझ्याजवळ आली आणि माझ्या डोळ्याकडे नजर जाताच जवळजवळ किंचाळलीच. माझा ऑफिसचा कॉल चालू होता, कलीगशी बोलत होतो. पण तिचे दचकणे पाहून मी कॉल होल्डवर ठेऊन उठलो आणि पहिले आरश्यात जाऊन पाहिले. आता हादरण्याची पाळी माझी होती. डोळ्याचा आलूबुखार झाला होता Happy

मी घाईघाईत वॉश बेसिनवर गेलो डोळ्यांवर पाणी मारले. डोळ्यात काहीतरी रंग गेला असेल तो निघेल ही वेडी आशा. ईथे बायकोचे तेवढ्यात गूगलवर असेच रक्ताळलेल्या डोळ्यांचे फोटो शोधत त्यामागची कारणे वाचणे चालू होते. हार्मलेस ते हार्मफुल अश्या सर्व रेंजची कारणे होती. गेले काही दिवस माझ्या डोळ्यांना होणारा त्रास पाहता हे प्रकरण निरुपद्रवी नक्की नाही हे मला पक्के ठाऊक होते.

ईतक्यात आठवण झाली, ऑफिसचा कॉल अजून चालूच आहे. ऑफिसच्या मित्राला माझ्या डोळ्यांचा काय प्रॉब्लेम झालाय याची कल्पना देऊन तो कट केला. डॉक्टरांकडे जाऊन सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आता पुन्हा मी त्या स्क्रीनवर काम करणार नव्हतो. डॉक्टरांची अपॉईंटमेंट संध्याकाळची होती. तोपर्यंत घरात असलेले आयड्रॉप टाकले आणि कापलेली काकडी डोळ्यांवर ठेऊन निपचित पडून होतो. थोडासा थंडावा आणि थोडेसे अश्रू. तासा दोन तासांनी डोळ्यात उतरलेले रक्त वाहून जाईल अशी अजून एक वेडी अपेक्षा.

तसे तर काही झाले नाही. पण प्रकरण वाढलेही नव्हते. अजूनही मला व्यवस्थित दिसत होते. तसेच डोळ्यातली कचकच त्रासदायक झाली नव्हती. हेच देवाचे आभार म्हणण्यात मी धन्यता मानली.

पुन्हा डोळा तपासणीचे सारे सोपस्कार पार पडले. पण यावेळी मी दहशतीत होतो. जसे आपण दातांच्या डॉक्टरकडे खुर्चीत बसल्यावर असतो. साधे नंबर तपासणीच्या वेळीही धडधड होत होती. सोबत बीपी चेक केले. डोळ्यांवरचे प्रेशर चेक केले. सारे काही तुलनेत नॉर्मल निघाले. फक्त डोळ्यांवरचे प्रेशर तेवढे किंचित धोक्याची घंटा दर्शवत होते. दुसरा अलार्म होता खरा, पण पडदा पडायला अजून अवकाश होता. कुठलेही कायमस्वरुपी नुकसान अजून झाले नव्हते. परतायला अजून मार्ग होता. डोळ्यातील एक रक्तवाहीनी फुटून रक्त साकळून डोळ्यात जमा झाले होते. तुर्तास घाबरण्याचे कारण नाही पण आठ दिवस डोळ्यांना आराम दे जरा असे सांगत डॉक्टरांनी औषधे लिहून दिली.

घरी आलो. सर्वात पहिले काय केले असेल तर मोबाईल हाती घेतला. तब्बल सहा तासांनी बघत होतो. प्रेमाने कुरवाळले आणि आवडीचे व्हॉटसप उघडले. जवळपास पंधरा ते वीस व्हॉटसपग्रूपचा मी आजीवन सदस्य होतो. दोनचार ग्रूप वगळता त्यातील ईतर सर्वांना तिलांजली दिली. काही फेसबूक ग्रूप्स उडवले. लॅपटॉपचा ब्राईटनेस कमी केला. मायबोलीवर धागे कमी काढायचे ठरवले. अवांतर पोस्टना टाळायचा पण केला. वर्क फ्रॉम होमची जागा बदलली. जिथून अध्येमध्ये जास्तीत जास्त लांब नजर जाईल अशी जागा पकडली. नुकतेच सुरू झालेले पण तुर्तास डगमगलेले मॉर्निंग वॉल्क नेटाने चालू ठेवायचे ठरवले. जेणे करून सकाळी उठणे होईल, रात्री वेळेवर झोपणे होईल, आणि बदललेल्या वेळापत्रकामुळे स्क्रीन टाईम सुद्धा आटोक्यात राहील. स्क्रीनवरून अधूनमधून डोळे हटवणे, पापण्यांची उघडझाप करणे, झाल्यास जागेवरून उठून फिरून येणे, वगैरे छोटेमोठे पण गरजेचे नियम बनवले. आणि बनवूनच थांबलो नाही तर गेले काही दिवस ते आचरणातही आणू लागलोय.

जेव्हा जळते तेव्हाच कळते असे म्हणतात. मी कुठल्या स्टेजला आहे याची कल्पना नाही. पण, डोळे कायमचे बंद व्हायच्या आधी उघडलेत हे ही नसे थोडके. आता शक्य ती डोळ्यांची काळजी घ्यायचे ठरवलेय. हि वेळ आज वा उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणावरही येऊ शकते. कमी जास्त स्वरुपात आपल्या सर्वांचेच कामाचे स्वरुप असे असावे, आपली लाईफस्टाईल देखील कमी अधिक फरकाने सारखी असावी. कोणाला जास्त फटका बसेल तर कोणाला कमी, पण गाफिल कोणीही राहू नये म्हणून हा अनुभव शेअर करावासा वाटला. कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही, तर सावधच करायचे आहे. सुरुवातीच्या फोटोला पाहून जर यीsईंव अय्याई ग्गं झाले असेल तर लेखाच्या समारोपाला एक हलकाफुलका फोटो शेअर करून आवरते घेतो.

IMG_20220222_130658.jpg

(लहानपणी पापण्या वर करून लहान मुलांना घाबरवायचा खेळ हिट होता. आठवडाभर मी तसाच होतो, त्यामुळे पोरंही घाबरायची बंद झाली होती. उलट माझी मजाच घेत होती Happy )

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळजी घ्या सर्वांनी.
काही वर्षे स्क्रीनटाइम मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा.
E-Ink display फोन आणि लॅपटॉप येतील काही वर्षात असे वाटते (जाणकारांनी कन्फर्म करावे) तेव्हा डोळ्यांना अपाय कमी होईल. याचा आस्वाद घेण्यास डोळे शाबूत ठेवा.
स्क्रीन समोर असताना २०-२०-२० चा नियम पाळा.

आणि यावर आरारा यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.

एकतर प्रसिद्धी चा प्रचंड हव्यास, त्याचे असलेले व्यसन आणी अटेन्शन सिकिंग वृत्ती. यातुन ऋन्मेष कधी सुटेल माहीत नाही.

नाही सुटणार, त्याने लेटेस्ट प्रतिसादात तेच तर लिहिले आहे

त्याला जे हवे होते ते या धाग्यातून त्याने साध्य केलं आहे
आता तरी त्याच्या किमान काही चाहत्यांचे डोळे उघडले असतील अशी आशा आहे

शांत माणूस - तुम्ही नका त्रास करून घेऊ, सर या सगळ्यांच्या पलीकडे पोचलेले आहेत, त्यांना खरोखरच व्यसनमुक्ती ची गरज आहे हे दिसतंच आहे, पण ते आपल्या हातात नाहीये
त्यांच्या घरच्यांनी मनावर घेतले तरच काही होऊ शकेल

स्क्रीन समोर असताना २०-२०-२० चा नियम पाळा.
Submitted by मानव पृथ्वीकर on 22 February, 2022 - 19:29
>>>

हो. हे डॉक्टरांनीही सांगितले गप्पांच्या ओघात..
Try your best to remember to follow the 20-20-20 rule. Set a timer to remind you to look away every 20 minutes at an object that is about 20 feet away for a full 20 seconds.

हा फंडा २० आकड्यासह अचूक नाही. पण पाळू लागलोय.
ॲट ए स्ट्रेच जास्त वेळ लॅपटॉपवर काम करणे वा मोबाईल हातात घेणे टाळू लागलोय.
ब्रेक वाढलेत त्यामुळे चहाचे प्रमाण वाढलेय हा वेगळा साईड ईफेक्ट. पण तुर्तास चलता है Happy

हो Happy

Digitox screen time नावाचे एक ॲप वापरते आहे. त्याने तुमचा मोबाईलवर कसा आणि किती वेळ जातो हे कळते. नाही नाही म्हणत आपण बराच वेळ फोनचा स्क्रीन बघत असतो हे लक्षात आलं माझ्या. उपयोगी ॲप आहे.

स्क्रीन पाहून काही होत नाही. लख्ख उजेडातच पाहावा.
------
तुरटीच्या पाण्याने धुतले की लाली जाते. विशेष काही नाही.

Digitox screen time नावाचे एक ॲप
>>>>
ईंटरेस्टींग आहे. केले डाऊनलोड. मायबोली वा वॉटसप ॲपवाईज किती वापरले जाते ते समजेल. पोरगी मोबाईल घेते तेव्हा ती यूट्यूब वा तिचे ईतर गेम्सचे ॲप वापरते. त्याचा वापर समजेल. तासानुसारही ग्राफ येतोय. दिवसाच्या कुठल्या वेळेत सलग वापर होतोय हे सुद्धा समजेल. ऊपयुक्त आहे. आठवडाभर नॉर्मल वागून तो डेटा गोळा करून ॲनालाईज करून वापर कसे कमी करता येईल ते बघून मग कमी होतोय का खरेच हे पुढच्या आठवड्यात बघता येईल. एकदा कमी वापराची सवय झाली मग सतत हे ॲप चेक करावेही लागणार नाही. ऊपयुक्त आहे.
एक दिशा मिळाली. धन्यवाद

Digitox screen time नावाचे एक ॲप वापरते>>>जि बरे झाले सांगितलेस.. down load केल लगेच..

ऋन्मेष, आठवडाभर नॉर्मल वागायची गरज नाही. ॲप install केले की आपला गेल्या 7 दिवसांचा डेटा लगेच बघता येतो.
केया, Happy

ॲप install केले की आपला गेल्या 7 दिवसांचा डेटा लगेच बघता येतो.
>>>
ओके, असावे तसे. मला टूडे म्हणत रात्री बारापासूनचा दिसला तो चेक केला. आधीचाही असावा. चेक करतो सावकाश. तेवढ्यासाठी आता लगेच मोबाईल हाती घ्यायला नको Happy

अँड्रॉइड वर गूगलचे डिजिटल वेल बीइंग मध्ये app वापराची माहिती मिळते. त्यात एक फीचर आहे, ज्यात तुम्ही २४ तासात एखादे app किती वेळ वापरणार हे ठरवता येते. वेळ पूर्ण झाल्यावर त्या दिवसातील राहिलेले तास ते app वापरता येत नाही. मध्यरात्री १२ नंतर काउंटर रीसेट होऊन वापर सुरु करता येतो.

I would suggest you visit your gastroenterologist. Crohn's disease affects eyes.
If possible, please consult Dr. Amit Maydeo. You can google his number.
I hope you are not on steroids right now.
There are a few support groups for Crohn's disease. Being a part of such groups usually helps.
Stress affects the gut microbiota to cause flare-ups and relapse.
Please take care of your health.

चिनूक्स +१११. उत्तम सल्ला.
मलाही हेच लिहायचे होते. अति स्क्रीन टाईममुळे अपाय होतो हे खरे, पण इतक्या टोकाला क्वचितच जात असेल प्रकरण. शिवाय अशा घटना तुरळक असतात. त्यामुळे स्क्रीन टाईम शिवाय दुसरे कारण नक्कीच आहे. आणि ते जठरात किंवा आतड्यात आहे.

नुसतं स्क्रीनकडे बघुन असं होईल असं वाटलं न्हवतं. इतका डीटेल लेख वाचला नाही त्यामुळे काही लिहिलं नाही.
काळजी घ्या!

Pages