विनाशकाले विपरीत दृष्टी

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2022 - 03:31

IMG_20220222_130147.jpg

धाग्याच्या सुरुवातीलाच असा डिस्टर्बिंग फोटो लावला आहे. जसे ते थिएटरमध्ये धूम्रपानाच्या मद्यपानाच्या जाहीरातीत सडलेले आतडे फेफडे दाखवून घाबरवतात आणि व्यसने सोडा नाहीतर तुमचे सुद्धा हे असे होईल याची भिती दाखवतात. पण या मागचा हेतू घाबरवणे नसून विषयाचे गांभीर्य समजावे हा आहे. कारण पुढच्या लिखाणात ते गांभीर्य जपले जाईल याची खात्री नाही. तो माझा पिंड नाही Happy

तर हो,
तो वरचा मनुष्य मीच आहे.
आणि तो डोळा देखील माझाच आहे.

माझ्या आठवणींप्रमाणे साधारण वयाच्या चौदाव्या वर्षी मी पहिल्यांदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो. निमित्त साधे होते. डोळ्यातून काही कारणास्तव सतत पाणी येत होते. त्या आधी नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊन आलो होतो. तेव्हा असे मुद्दाम कुठल्याही स्पेशालिस्टकडे जाण्याची पद्धत नव्हती. स्पेशालिस्ट नुसते हात लावायचे पाचशे रुपये घेतात म्हणत कसलाही त्रास का असेना जनरल फिजिशिअनकडेच जाणे ही मध्यमवर्गीय घरातील पद्धत होती. पण त्यांना उकल न झाल्याने त्यांच्याच सल्याने मग डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणे भाग पडले.

आय स्पेशालिस्ट डॉक्टरांनी त्यांच्या नेहमीच्या तपासण्या केल्या. डोळ्यात टॉर्च मारला. एखाद्या मशीनीत बघायला लावले. नजर चेक करायला समोरची अक्षरे वाचायला सांगितली. जिथे मी बारीकातले बारीक अक्षर सुद्धा लीलया आणि वेगात वाचू लागलो. जणू काही सूक्ष्म अक्षर वाचनाची स्पर्धाच होती.

तेव्हाची लोकंही साधीभोळी होती आणि डॉक्टरही. माझ्या खिश्याची कसलीही कापाकापी न करता त्यांनी एकूण तपासणीअंती डोळे उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. निघता निघता हे सुद्धा म्हणाले की बच्चे की आंखे तो ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. हे माझ्या मनात ईतके ठसले की दहावीच्या बोर्डात ईंग्लिशला ४९ मार्क्स मिळेपर्यंत मी सिरीअसली पायलट व्हायचा विचार करत होतो Happy

डॉक्टरांनी डोळ्यात टाकायला काही ड्रॉप्स आणि घश्यात ढकलायला काही गोळ्या दिल्या. गंगामाई आली, चार दिवस डोळ्यात नांदली, आणि निघून गेली. त्यानंतर माझ्या डोळ्यातले पाणी जणू सुकूनच गेले. पुन्हा कित्येक वर्षे ते काही आले नाही.

आणि मग आयुष्यात क्रॉंज नावाचा आजार आला. तसे म्हटल्यास तो आजार आतड्याचा. जाम छळले त्याने. आणि आयुष्यभर छळणार आहे. ते पुन्हा कधीतरी. पण जेव्हा त्याचे निदान झाले आणि त्याच्या गोळ्या सुरू झाल्या. तेव्हा त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टने म्हणा डोळे पुन्हा रडारवर आले. आता नुसते डोळ्यातून पाणी नाही तर डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. ऑफिसमध्ये काम करता करता अचानक स्क्रीनवरची अक्षरे धूसर दिसू लागली. तर कधी भिरभिरू लागली. ईतके की मी काम थांबवून पंधरावीस मिनिटे जागीच डोळे मिटून बसू लागलो. असे तीनचार वेळा होताच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणत मी पुन्हा माझे क्राँजचे डॉक्टर गाठले. ते पडले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट. ते म्हणाले, नुकत्याच ज्या गोळ्या चालू केल्या आहेत त्या तुला आयुष्यभर घ्यायच्या आहेत. त्याची शरीराला सवय होईस्तोवर काही साईड ईफेक्ट उद्भवणार. जसे की केस गळणे वा पाठीला खाज येणे वा अंगाची आग होणे वगैरे. त्यात स्टेरॉईडस सुद्धा तुर्तास आपण घेत आहोत. तरी डोळ्यांबाबत कसलीही रिस्क न घेता आपण डोळ्यांच्याच स्पेशालिस्टला दाखवूया. मी बर्रं म्हटले..

तेव्हा लग्न फार जुने झाले नव्हते. त्यामुळे बायको म्हणाली आपण विभागातील एखाद्या नामांकित डॉक्टरलाच दाखवूया. त्याने डोळ्यांच्या जरा जास्तच टेस्ट केल्या. त्याचे रेटही जरा जास्तच होते. साधारण सहा-सात हजार रुपये खर्चून काही ग्राफिकल रिपोर्ट तयार करून त्यांनीही अखेर निर्वाळा दिला की डोळ्यांचा काही प्रॉब्लेम नाही. चष्याचा नंबरही नाही. पण ईतकेच बोलून ते थांबले नाहीत. तर पुन्हा तो वर्ल्ड फेमस डायलॉग मारला. बंदे की आंखे ईतनी अच्छी है के प्लेन चला सकता है. पण आता हे ऐकून मी लगेच हवेत उडणार नव्हतो. एव्हाना मी दगडमातीच्या व्यवसायात फसलो होतो.

त्यांनी दिलेल्या औषधामुळे म्हणा वा माझ्या आजाराच्या गोळ्यांची शरीराला सवय झाल्याने म्हणा डोळ्यांचा त्रास आठवड्याभरातच थांबला. पुढे काही काळ, काही वर्षे डोळ्यांचा कसलाही त्रास झाला नाही.

वैयक्तिक आयुष्य पुढे सरकत होते. पोरंबाळं झाली, नोकरीत स्थिरता आली. जॉब प्रोफाईल असे झाले की दिवसभर स्क्रीनसमोर डोळे खपवावे लागायचे. जमानाच स्पार्ट फोनचा असल्याने मोबाईलचा वापरही वाढला. परीणामी अध्येमध्ये पुन्हा डोळ्यातून पाणी येणे सुरू झाले. अश्यावेळी रेल्वेचे लाल दिव्यांचे ईंडिकेटर बघणेही त्रासदायक होऊ लागले. अंधारात मोबाईल बघणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे मी ते टाळू लागलो. पण नजर मात्र अजूनही शार्प होती. कधीतरी पाणी यायचा प्रॉब्लेम सोडल्यास कितीही दूरचे आणि बारीक अक्षर वाचू शकत होतो. सोबत आपली नजर प्लेन चालवायच्या लायकीची आहे हा फाजील आत्मविश्वासही होताच.

पण पुढे कोरोना आला. लॉकडाऊन लागले. वर्क फ्रॉम होम सुरू झाले. डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनजागी लॅपटॉपच्या छोट्या स्क्रीनवर काम होऊ लागले. ते देखील घरूनच असल्याने दिवसरात्र सुरू झाले. ऑफिससारखे टी ब्रेक, लंच ब्रेक, गप्पांचे ब्रेक बंद झाले. कामातून बोअर झाल्यास बसल्या जागीच मोबाईल हातात घेणे हा छंद बनला. कामाचा लोड कमी असतानाही डोळ्यांना आराम न देता कामाच्या अध्येमध्ये नेटसर्फिंग करणे वा सोशलसाईटवर बागडणे असे वाढलेला स्क्रीन टाईम कायम ठेवण्याचे उद्योग सुरू झाले. पोरांच्याही शाळा ऑनलाईन सुरू झाल्याने त्यांचा अभ्यास घ्यायच्या निमित्ताने पुन्हा त्यांचा टॅबच हातात घ्यावा लागायचा. लॉकडाऊन जसा कडक लागायचा तेव्हा रोजचे बाहेर फिरणेही बंद व्हायचे.
जितके घरात अडकायचो तितके स्क्रीन टाईम वाढायचा. या काळात एवढे दिवस नव्हता तो मूवीज आणि वेबसिरीज बघायचा छंद देखील जडला. वेबसिरीजचे आठ आठ एपिसोड एका रात्रीत बघणे होऊ लागले. वर्क फ्रॉम होम सकाळी आरामात घरूनच सुरू होत असल्याने रात्री जागणेही होऊ लागले.

एकूणच या सर्वांचा परीणाम व्हायचा तो झाला. माझ्या नजरेला नजर लागली. मला चष्मा लागला.

काम करताना, वाचताना अडचण होतेय, डोळ्यांचे काहीतरी बिनसलेय हे जाणवत होते. पण चष्मा लागला असेल हे मन मानत नव्हते. बंदा प्लेन चला सकता है यातच अजूनही अडकलो होतो. मग डोकेही दुखू लागलो तसे डोळे चेक करून घेतले. जास्त जवळचा आणि किंचित दूरचा असे दोन्ही नंबर निघाले. हा कदाचित पहिला अलार्म होता. पण तेवढ्यात सुधारेल तो ऋन्मेष कसला. दिनक्रमात जराही फरक पडला नव्हता. उलट चष्म्याच्या रुपाने क्राईम पार्टनर मिळाला. अचानक लक्ख दिसू लागले तसे काय वाचू आणि काय बघू असे होऊ लागले.

चार सहा महिन्यांनी चष्याची ईतकी सवय लागली की जेव्हा पहिला चष्मा हरवला तेव्हा नवीन चष्मा घेईपर्यंत दोन दिवस सुट्टी टाकावी लागली. वर जो पहिला अलार्म वाजलेला, जो मी तात्पुरता स्नूज केलेला, तोच बहुधा पुन्हा वाजला होता. पण मी त्याकडेही दुर्लक्ष करून माझा दिनक्रम कायम ठेवला. जेव्हा कोविड पॉजिटीव्ह निघालो आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची वेळ आली तेव्हा तर मोबाईल देवासमान वाटू लागला. तो नसता तर चार भिंतीत आपला दिवस कसा गेला असता असे प्रश्न पडून मी मोबाईलचे आभार मानू लागलो.

आणि मग एके दिवशी दुसरा अलार्म वाजला. काही दिवस डोळ्यांना त्रास होत होता. जणू एखाद्या फुग्यात ईतकी हवा भरावी की तो फुटू नये पण कधीही फुटू शकेल अश्या स्थितीत आलाय, असे त्या फुग्यावर आलेले प्रेशर आपल्याला जाणवावे. तसे काहीसे डोळ्यांबाबत वाटत होते. कदाचित नंबर वाढल्याने असे होत असावे म्हणत येत्या विकेंडला नवीन चष्मा घ्यायचा विचारही केला होता. पण त्याआधीच हे असे झाले..

शनिवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे घरूनच ऑफिसचे काम चालू होते. तशी शनिवारची सुट्टी असते पण वर्कलोड जास्त असल्यास करावे लागते काम. थोडेसे ऊशीराच ऑनलाईन आलो होतो. साधारण दहा वाजता. तुलनेत आज डोळ्यावर फारसे प्रेशर जाणवत नव्हते. पण थोडी कचकच जाणवत होती. थोडे काम, थोडासा टाईमपास, बसल्या बसल्या नेटसर्फिंग असे करत बारा वाजले. मला शनिवारचे एक्स्ट्रा काम होते, पण बायकापोरांची छान एक्स्ट्रा झोप, एक्स्ट्रा आराम चालू होता. दुपारी बारा वाजता जेवणाचे विचारायला बायको माझ्याजवळ आली आणि माझ्या डोळ्याकडे नजर जाताच जवळजवळ किंचाळलीच. माझा ऑफिसचा कॉल चालू होता, कलीगशी बोलत होतो. पण तिचे दचकणे पाहून मी कॉल होल्डवर ठेऊन उठलो आणि पहिले आरश्यात जाऊन पाहिले. आता हादरण्याची पाळी माझी होती. डोळ्याचा आलूबुखार झाला होता Happy

मी घाईघाईत वॉश बेसिनवर गेलो डोळ्यांवर पाणी मारले. डोळ्यात काहीतरी रंग गेला असेल तो निघेल ही वेडी आशा. ईथे बायकोचे तेवढ्यात गूगलवर असेच रक्ताळलेल्या डोळ्यांचे फोटो शोधत त्यामागची कारणे वाचणे चालू होते. हार्मलेस ते हार्मफुल अश्या सर्व रेंजची कारणे होती. गेले काही दिवस माझ्या डोळ्यांना होणारा त्रास पाहता हे प्रकरण निरुपद्रवी नक्की नाही हे मला पक्के ठाऊक होते.

ईतक्यात आठवण झाली, ऑफिसचा कॉल अजून चालूच आहे. ऑफिसच्या मित्राला माझ्या डोळ्यांचा काय प्रॉब्लेम झालाय याची कल्पना देऊन तो कट केला. डॉक्टरांकडे जाऊन सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आता पुन्हा मी त्या स्क्रीनवर काम करणार नव्हतो. डॉक्टरांची अपॉईंटमेंट संध्याकाळची होती. तोपर्यंत घरात असलेले आयड्रॉप टाकले आणि कापलेली काकडी डोळ्यांवर ठेऊन निपचित पडून होतो. थोडासा थंडावा आणि थोडेसे अश्रू. तासा दोन तासांनी डोळ्यात उतरलेले रक्त वाहून जाईल अशी अजून एक वेडी अपेक्षा.

तसे तर काही झाले नाही. पण प्रकरण वाढलेही नव्हते. अजूनही मला व्यवस्थित दिसत होते. तसेच डोळ्यातली कचकच त्रासदायक झाली नव्हती. हेच देवाचे आभार म्हणण्यात मी धन्यता मानली.

पुन्हा डोळा तपासणीचे सारे सोपस्कार पार पडले. पण यावेळी मी दहशतीत होतो. जसे आपण दातांच्या डॉक्टरकडे खुर्चीत बसल्यावर असतो. साधे नंबर तपासणीच्या वेळीही धडधड होत होती. सोबत बीपी चेक केले. डोळ्यांवरचे प्रेशर चेक केले. सारे काही तुलनेत नॉर्मल निघाले. फक्त डोळ्यांवरचे प्रेशर तेवढे किंचित धोक्याची घंटा दर्शवत होते. दुसरा अलार्म होता खरा, पण पडदा पडायला अजून अवकाश होता. कुठलेही कायमस्वरुपी नुकसान अजून झाले नव्हते. परतायला अजून मार्ग होता. डोळ्यातील एक रक्तवाहीनी फुटून रक्त साकळून डोळ्यात जमा झाले होते. तुर्तास घाबरण्याचे कारण नाही पण आठ दिवस डोळ्यांना आराम दे जरा असे सांगत डॉक्टरांनी औषधे लिहून दिली.

घरी आलो. सर्वात पहिले काय केले असेल तर मोबाईल हाती घेतला. तब्बल सहा तासांनी बघत होतो. प्रेमाने कुरवाळले आणि आवडीचे व्हॉटसप उघडले. जवळपास पंधरा ते वीस व्हॉटसपग्रूपचा मी आजीवन सदस्य होतो. दोनचार ग्रूप वगळता त्यातील ईतर सर्वांना तिलांजली दिली. काही फेसबूक ग्रूप्स उडवले. लॅपटॉपचा ब्राईटनेस कमी केला. मायबोलीवर धागे कमी काढायचे ठरवले. अवांतर पोस्टना टाळायचा पण केला. वर्क फ्रॉम होमची जागा बदलली. जिथून अध्येमध्ये जास्तीत जास्त लांब नजर जाईल अशी जागा पकडली. नुकतेच सुरू झालेले पण तुर्तास डगमगलेले मॉर्निंग वॉल्क नेटाने चालू ठेवायचे ठरवले. जेणे करून सकाळी उठणे होईल, रात्री वेळेवर झोपणे होईल, आणि बदललेल्या वेळापत्रकामुळे स्क्रीन टाईम सुद्धा आटोक्यात राहील. स्क्रीनवरून अधूनमधून डोळे हटवणे, पापण्यांची उघडझाप करणे, झाल्यास जागेवरून उठून फिरून येणे, वगैरे छोटेमोठे पण गरजेचे नियम बनवले. आणि बनवूनच थांबलो नाही तर गेले काही दिवस ते आचरणातही आणू लागलोय.

जेव्हा जळते तेव्हाच कळते असे म्हणतात. मी कुठल्या स्टेजला आहे याची कल्पना नाही. पण, डोळे कायमचे बंद व्हायच्या आधी उघडलेत हे ही नसे थोडके. आता शक्य ती डोळ्यांची काळजी घ्यायचे ठरवलेय. हि वेळ आज वा उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणावरही येऊ शकते. कमी जास्त स्वरुपात आपल्या सर्वांचेच कामाचे स्वरुप असे असावे, आपली लाईफस्टाईल देखील कमी अधिक फरकाने सारखी असावी. कोणाला जास्त फटका बसेल तर कोणाला कमी, पण गाफिल कोणीही राहू नये म्हणून हा अनुभव शेअर करावासा वाटला. कोणालाही घाबरवण्याचा हेतू नाही, तर सावधच करायचे आहे. सुरुवातीच्या फोटोला पाहून जर यीsईंव अय्याई ग्गं झाले असेल तर लेखाच्या समारोपाला एक हलकाफुलका फोटो शेअर करून आवरते घेतो.

IMG_20220222_130658.jpg

(लहानपणी पापण्या वर करून लहान मुलांना घाबरवायचा खेळ हिट होता. आठवडाभर मी तसाच होतो, त्यामुळे पोरंही घाबरायची बंद झाली होती. उलट माझी मजाच घेत होती Happy )

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स धन्यवाद, चेक करतो डॉक्टरांशी. ज्यांच्याकडे ऊपचार चालू आहेत ते नवी मुंबईतील नंबर वन गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. आणि दर दर की ठोकरे खात अखेर नशीबानेच ते मिळाले आहेत. काहीतरी योग्यच सांगतील. तरी तुम्ही सेकंड ओपिनियनला डॉक्टर सुचवल्याबद्दल धन्यवाद.

लेखातही मी लिहिलेच आहे की क्राँजमुळेही डोळ्याला फटका बसू शकतोच. पण गेले दोन तीन वर्षे रेग्युलर गोळ्यांनी तो फारच कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे तो विचार मनात आला नाही. तरी पुढच्या फॉलोअपला क्लीअर करतो.

काळजी घे re, फोटो बघून हादरले, लेख vachlach नाही त्यामुळे.
>>>>>

काही घाबरवण्यासारखा लेख नाही. काही अतिरंजित रक्ताच्या चिळकांड्या वगैरे लिहिले नाही, पोरं घाबरली नाही माझी तर तू कश्याला घाबरतेस Happy

बाकी त्या डोळा लाल झालेल्या आठवड्यातही हलकीशी कचकच सोडल्यास फिट होतो. डोळ्याचा फोटो ऑफिसला शेअर करून कामात सहूलत मिळवली होती. त्या वेळेत पोरांसोबत छान फिरत होतो. गॉगल लाऊन फोटोही काढत होतो. ते फेसबूक व्हॉटसपवर टाकतही होतो. एखादा तू ही पाहिला असशील. फॅमिली सोडून कोणाला काही माहीत नव्हते आणि कळलेही नाही.
मायबोली दुसरे घर वाटते म्हणून ईथेच हे आज शेअर केले.
त्यातही जास्तीच्या स्क्रीन टाईममुळे हे होण्याची शक्यता कमी हे ऐकून आनंदच वाटत आहे. तरीही काळजी घेणे होणारच Happy

सहूलत नाही- सवलत किंवा मुभा किंवा हिंदी शब्द छूट
सहुलियत - हा वेगळा हिंदी शब्द आहे. याचा अर्थ सुकर, सोपे असा काहीसा होतो.
(डोळा लाल आहे, त्याने शब्द आठवायला त्रास होत नाही. महिन्याभराने धागा काढला तर असं का लिहायचं? Happy Light 1 )

जरी स्क्रीन टाईम मुळे असे होण्याची शक्यता फार कमी असली तरी तसे गृहीत धरू नका. स्क्रीन टाईम कमी केल्याने वेळ वापराच्या इतर अनेक शक्यता निर्माण होऊ शकतात, त्या कदाचित अधिक आनंददायक ठरू शकतील. शुभेच्छा आणि सदिच्छा.

दिवसभर मायबोली बंद होती का?
की माझा स्क्रीन टाईम कमी करायला माझ्यासाठीच उघडू नये अशी सेटींग होती Happy

स्क्रीन टाईम कमी केल्याने वेळ वापराच्या इतर अनेक शक्यता निर्माण होऊ शकतात, त्या कदाचित अधिक आनंददायक ठरू शकतील. शुभेच्छा आणि सदिच्छा.
>>>>
धन्यवाद हिरा. सध्या जो स्क्रीन टाईम कमी आनंददायी आहे तोच शोधून आयुष्यातून वजा करणे चालू आहे Happy

Happy एरर ५०० दिसत होती सारखी सारखी. मी मा बो रशियन हल्ल्यास बळी पडली , ओलिस धरली गेली इ इ "मन चिंती व्हॉट मायबोलीज वैरी माईट चिंती" टाईप्स विचार करून आले.
(अर्थात तुझ्यासाठी काय वेगळी सेटींग असेल तर माहिती नाही Happy )

मी माझे ३०-३२ अकाऊंट वापरून ट्राय केले. लॅपटॉप मोबाईल पोरीचा टॅबही वापरला. कुठूनच उघडत नव्हती. मग जाऊ दे म्हटले. आपल्याला काय एवढी पडलीय..

मी मा बो रशियन हल्ल्यास बळी पडली , ओलिस धरली गेली इ इ "मन चिंती व्हॉट मायबोलीज वैरी माईट चिंती"
>>> रशियन हल्ला सिच्युएशन सिरीयस आहे... लेट्स नॉट मेक फन ऑफ इट प्लिज...

ऋ ला आराम मिळआवा म्हणुन माबो बंद होती काय काल?
>>>>
हो, मला काम बरेच मेसेज फोन याच आशयाचे आले. नालायका तुझ्यामुळे माबो बंद झाली. पण खरेच तसे काही नाहीये. निदान मला तरी कल्पना नाही.

यावरून आठवले.... माझी आज्जी असे करायची. तिने बोलावले आणि मी खेळ सोडून आलो नाही तर येऊन सरळ पाणीच टाकायची. आणि सर्वांचाच खेळ बंद करून टाकायची. त्यामुळे आजी बोलवायला येताच माझे मित्रच मला हाकलून लावायचे Happy

काल माबो बंद असल्याने अ‍ॅटॅक येता येता राहीला. एकदम पिसाळल्यागत झाले कारण नवीन धागे काढता येईना. ( मला खाना खुजाना असा नवीन धागा काढायचा होता) नवीन प्रश्न विचारता येईना. नवीन प्रतीसाद टाकता येईना. स्माईल्या देता येईना. प्रतीसादाची संख्या वाढवता येईना. बरेच काही येईना आईना का बायना झाले.

मायबोली बंद पडल्यावर चौकशीसाठी वेगळी साईट असावी. इथे सगळेच मुखवटेधारी असल्याने कुणाला विचारावे हे पण कळत नाही.

आशुचॅंप आणि शांत माणूस,
मराठी भाषा दिन आहे. त्यानिमिताने मायबोलीवर उपक्रम चालू आहेत. तर आपण तिघे तीनचार दिवस थांबूया Happy

Pages