पालकाची पातळ भाजी

Submitted by अस्मिता. on 19 February, 2022 - 20:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
पालक बारीक चिरून तीन ओंजळ , २ वाटी शिजवलेली तूर डाळ, चणा डाळ १ चमचा , भरपूर लसूण तुकडे करून, मुठभर शेंगदाणे, दोन तीन चमचे बेसन/डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ १ चमचा (मी तयार घातला, तो जास्त आंबट असतो. तुम्ही भिजवून केला तर थोडा जास्त लागेल आणि गरम पाण्यात भिजवले तर लवकर होतो ) एक चमचा गूळ, एक चमचा काळा मसाला, तिखट , मीठ, जिरे, मोहरी ,दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे.

क्रमवार पाककृती: 

तेलाची फोडणी(मोहरी जिरे) करून थोडा लसूण, लाल मिरच्या , व चणा डाळ घालून परतून घ्यावे. मग पालक परतून घ्यावा, एक वाफ येऊन थोडा होतो , हळद घालावी , डाळ पाणी घालून पातळ करून घालावी, एक उकळी आली की बेसन अर्धी वाटी पाण्यात नीट मिसळून ते ह्यात घालावे , व थोडे पाणी घालून चिंच, गूळ , काळा मसाला, व मीठ घालून झाकण लावून भरपूर शिजवावे, gas बंद करावा.

मगं पुन्हा भरपूर तेलाची वेगळी फोडणी करावी त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, शेंगदाणे, कढीपत्ता, घालून खुटखुटीत झाले की तिखट घालून थोडे परतून gas बंद करावा. तिखट पटकन जळते. ही फोडणी भाजीवर घालावी. चुर्र् आवाज आला पाहिजे. ही भाजी चिंचेच्या कोळामुळे काळसर दिसते. लसणाचे तुकडे चांगले लागतात, शक्यतो पेस्ट नको.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना दोन वेळी
अधिक टिपा: 

माझ्या साबा पालक कुकरमध्ये शिजवतात तेव्हाच मुठभर चणाडाळही त्यावरच घालतात, मी काही तसे करत नाही, मी बेबी स्पिनॅच वापरते . ही भाजी लोखंडी कढईत केली तर बरे, लोह तयार होते , मी केली नाही मी 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान' मोड मधे आहे.
ह्या भाजीत डाळही आहे त्यामुळे भाजी+वरण आहे. मी बहुतेक वेळा ही भाजी केली की कढी करते ते कॉम्बो मस्त लागते.
*अगदी अशीच मेथीची भाजीही करता येते.

माहितीचा स्रोत: 
मराठवाड्यात घरोघरी होते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सोपी पाकृ! फोटो वरुन भाजी किती मस्त होत असेल याचा अंदाज येतोय. आठवड्यातून एकदा तरी फ्रोजन पालक वापरुन ताकातला पालक, मूग डाल पालक, पालक पनीर आणि साधी बेसन लावलेली गोळा भाजी यापैकी एक प्रकार केला जातो. या पाकृमुळे अजून एक पर्याय मिळाला.

भारी दिसतेय भाजी!
मुद्दा भाजीला अनुमोदन ! साबा कानडी असल्याने ही भाजी लग्नानंतर पहिल्यांदा ओळखीची झाली Happy आता अशीच आवडते. फक्त बेसन नाही घातलं कधी.
लव्ह जिहाद Lol

येक तो हाजी मस्तान नि ही इथे "भाजी मस्तान"... गँगवॉर चालू व्हायचं एका भाजीच्या कढल्यापायी...>>> हेहेहेहे हे सी

20220224_075717-COLLAGE_0.jpg

आज केली ही भाजी ...पण माझी हिरवी दिस्तीय ..बेसन लावल्यामुळे छान एकजीव झालीय..thnx अस्मिता

अस्मिता मी अंबाडीची भाजी तुझ्या पद्धतीने केली काल. यमी!!! पातळ भाजी-वाफ आलेला, तूप घातलेला भात. मस्त!!!

Pages