पालकाची पातळ भाजी

Submitted by अस्मिता. on 19 February, 2022 - 20:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
पालक बारीक चिरून तीन ओंजळ , २ वाटी शिजवलेली तूर डाळ, चणा डाळ १ चमचा , भरपूर लसूण तुकडे करून, मुठभर शेंगदाणे, दोन तीन चमचे बेसन/डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ १ चमचा (मी तयार घातला, तो जास्त आंबट असतो. तुम्ही भिजवून केला तर थोडा जास्त लागेल आणि गरम पाण्यात भिजवले तर लवकर होतो ) एक चमचा गूळ, एक चमचा काळा मसाला, तिखट , मीठ, जिरे, मोहरी ,दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे.

क्रमवार पाककृती: 

तेलाची फोडणी(मोहरी जिरे) करून थोडा लसूण, लाल मिरच्या , व चणा डाळ घालून परतून घ्यावे. मग पालक परतून घ्यावा, एक वाफ येऊन थोडा होतो , हळद घालावी , डाळ पाणी घालून पातळ करून घालावी, एक उकळी आली की बेसन अर्धी वाटी पाण्यात नीट मिसळून ते ह्यात घालावे , व थोडे पाणी घालून चिंच, गूळ , काळा मसाला, व मीठ घालून झाकण लावून भरपूर शिजवावे, gas बंद करावा.

मगं पुन्हा भरपूर तेलाची वेगळी फोडणी करावी त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, शेंगदाणे, कढीपत्ता, घालून खुटखुटीत झाले की तिखट घालून थोडे परतून gas बंद करावा. तिखट पटकन जळते. ही फोडणी भाजीवर घालावी. चुर्र् आवाज आला पाहिजे. ही भाजी चिंचेच्या कोळामुळे काळसर दिसते. लसणाचे तुकडे चांगले लागतात, शक्यतो पेस्ट नको.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना दोन वेळी
अधिक टिपा: 

माझ्या साबा पालक कुकरमध्ये शिजवतात तेव्हाच मुठभर चणाडाळही त्यावरच घालतात, मी काही तसे करत नाही, मी बेबी स्पिनॅच वापरते . ही भाजी लोखंडी कढईत केली तर बरे, लोह तयार होते , मी केली नाही मी 'दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान' मोड मधे आहे.
ह्या भाजीत डाळही आहे त्यामुळे भाजी+वरण आहे. मी बहुतेक वेळा ही भाजी केली की कढी करते ते कॉम्बो मस्त लागते.
*अगदी अशीच मेथीची भाजीही करता येते.

माहितीचा स्रोत: 
मराठवाड्यात घरोघरी होते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! फोटो पण भन्नाट आहे. #ताटलीगँग
बेबी स्पिनॅच मिळतो तो कुकरमध्ये करायची गरज पडत नाही पण कदाचित इतर प्रकारचा पालक कुकरमध्ये शिजवला तर रेषा शिजून बरा घाटला जात असेन. मुहूर्त कधी माहिती नाही पण नक्की करून बघेन व अपडेट देईन.

ते लिहिणार होते , मी बेबी स्पिनॅचच वापरते. कोवळा आणि ताजा छान लागतो अशीच मेथीची भाजीही करता येते. ते टिपांमधे घालते.

मस्त रेसिपी.. तसंही मला नुसत्या पालकाची भाजी बनवायला जीवावर येतं..ड्रमभर पालक घेतला तरी तीघांपुरती भाजी बनते Happy
बाकी फोटो पण जबरदस्त आलाय #कॅलेंडरखानादोगॅंग

मस्त! लौकर मुहूर्त काढतो करण्याचा.

हीच भाजी पालका ऐवजी मेथीची केली तर काही बदल करावा लागेल का की अगदी अशीच करता येईल?

पालक मला खुप्पच आवडतो, (मी चिकन टिक्का मसाला ऐवजी, प्लेन पालक आणि चिकट टिक्का ड्राय ऑर्डर करून दोन्ही मिक्स करून खाणारा महाभाग) पण युरिक ऍसिड प्रॉब्लेममुळे पालक आता फारच कमीवेळा खाता येतो, महिन्यातून एखाद्या वेळेस.

हीच भाजी पालका ऐवजी मेथीची केली तर काही बदल करावा लागेल का की अगदी अशीच करता येईल?
>>> मी अगदी अशीच करते मानवदादा.

छान दिसते आहे भाजी. नक्की करुन बघणार.

नेहमीचा पालकपण खरंतर कुकर मध्ये शिजवायची गरज नाही त्यातली जीवनसत्त्वे निघून जातात. चनाडाळीमुळे भाजी कुकरला करावी लागत असेल तर चणाडाळ फोडणीत घातल्यावर एक वाफ आणून मग पालक घातला तर चालावं. चणा डाळ भिजवलेली असली पाहिजे.

मस्त ह्यालाच मुद्दा भाजी पण म्हणतात ना, मला सेम अशीच आवडते, फक्त आम्ही बेसन घालत नाही , पुढल्या वेळी घालेन. शेंगदाणे आणि भरपूर लसूण हवा आणि तिखट तेलाच्या वेगळ्या फोडणीतच घालायचे. ताकातला पालक नाही आवडत, असाच आवडतो.

मस्त मी पण हेच म्हणणार होते की ही मुद्दा भाजी वाटते आहे.
भाडीपच्या 'आईच्या हातचं' मध्ये मृण्मयी गोडबोलेच्या आईने अशीच भाजी केली होती त्यात मुद्दा भाजी नाव पहिल्यांदा ऐकले.
मला करुन पहायचीच आहे एकदा.

छान चव येईल.

तुरीबरोबर शिजवून डाळ पालक करणे
बेसन पीठ लावून पालक भाजी करणे

ह्या दोन भिन्न पाककृतींचा लव्ह जिहाद केला आहे , असे वाटते

वर्षा +१
तुझी रेसिपी पण इंटरेस्टिंग वाटते आहे .पालक पण घरात आहेच अनायासे ..करून बघणार..तूरडाळ आणि बेसन दोन्ही लावून कधी करून बघितली नाहीये

मी पण साधारणपणे याच पाककृती ने करते फक्त बेसन न घालता. पालक जरा जास्त वापरते. फ्रोजन, बेवी, नेहमीची पालकजुडी यांपैकी काहीही वापरते. जुडीतला पालक वेगळा शिजवून घ्यावा लागतो.

ताकातला पालक केल्यास बेसन लावते (म्हणजे ताकात घालते).

वा काय भन्नाट फोटो आहे. ही भाजी अनेक वेळा खाल्ली आहे, पण रेसीपीची पर्वा केली नव्हती. आता स्वतःच करू शकेन.
गरमागरम इंद्रायणी भात + साजुक तुप + बरोबर मस्त फ़ोडणी घातलेली पालकची पातळ भाजी = स्वर्ग. Esp थंडीत किंवा बाहेर बदबदा पाऊस पडत असताना हे जेवण म्हणजे सुख.

(शेंगदाणे शत्रूपक्षात असल्याने भाजी कायम मायनस दाणे खाल्ली आहे)

धन्यवाद सर्वांना ! Happy
चैत्रगंधा, चणाडाळ भिजवली नाही मी , कधी भिजवते कधी नाही.
लंपन, हो , बेसन आणि तूर डाळ दोन्ही आळतं व संध्याकाळ पर्यंत मुद्दा होते. मुद्दा पोळीसोबत आणि जरा पातळ भातासोबत छान लागते. लसणाची फोडणी हवीच.
भरत, तुमची पाककृतीही छान आहे, वाचली.
सोनाली, पालक कमी करून अशी करून बघ.
वर्षा आणि केया, मी बघितलायं तो एपिसोड हीच भाजी आहे ती !
Black cat, साबानी केलाय हा लव्ह जिहाद, आई नुसतंच बेसन लावून करायची.
मीरा, शेंगदाणे वगळून करून बघ, हाकानाका.
Happy
थँक्यू सी, म्हाळसा, मानवदादा, मोरोबा, मृ , जाई, वत्सला, उदय Happy
पहिल्या फोडणीत सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत ज्या वर लिहायला विसरलेय. ते बदलतेय.

वा वा.. फारच मस्त फोटो आलाय. #आयतीभाजीपाठवालकायगँग (वर बायांनी आपापल्या गँगचं नाव लिहिलेलं दिसलं म्हणून आमचीही जाहिरात)

मला आवडते अशी भाजी. मुख्य म्हणजे केली की भाजी आणि आमटी असे दोन पक्षी एकाच दगडात मारले जातात म्हणून जास्त आवडते.
फोटो तोंपासू आहे. रंग छान आलाय भाजीला. Happy

अश्शी दिसतेय भाजी Happy मस्त भुरका मारावा.
वरती कोणीतरी पालकाच्या मुद्दा भाजी ची आठवण काढलीये, ( मी मुद्दा भाजी हा शब्द सासरी येऊनच ऐकला होता) पण मुद्दा भाजी ची रेसिपी वेगळी आहे. पालक फोडणीत टाकून शिजवून घ्यायचा मग जरा हाटून घ्यायचा डावाने. मग बेसन भुरभूरवायचं, तिखट मीठ घालायचं. जेवढं पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आधीच. शिजू द्यायचं. नंतर भाजी झाली की तेलात लसणीचे छोटे छोटे तुकडे तळून ते पानात वाढताना वरून घालून घ्यायचे.

Pages