परीक्षा

Submitted by पराग र. लोणकर on 26 January, 2022 - 05:31

परीक्षा

गाडी चालवत असलो तरी डोक्यात विचारचक्र चालूच होतं.

माझी पत्नी- प्रिया सीए चा अभ्यास करतेय.

म‍ाझे आई-वडील गावी असतात. पुण्यात आम्ही दोघंच. त्यामुळे मी तिला अभ्यासाला पूर्ण वेळ देतो. पण सीएच्या परिक्षांसाठीचा अभ्यास म्हणजे दिवस-रात्र अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. पुन्हा पुढचे पुढचे अटेंम्प्ट्स देताना आधीच केलेल्या अभ्यासाची तिच तिच उजळणी. एखाद्याला वेडच लागायचं या अतीअभ्यासानं.

प्रियाचा आज इंटरमिजीएटचा दुसर्‍या ग्रुपचा पहिला पेपर. प्रिया सीए फाऊंडेशन पहिल्या प्रयत्नात क्लीअर झाली. इंटरमिजीएटचा पहिला ग्रुप क्लीअर व्हायला तीन अटेंम्प्ट लागले. आता दुसर्‍या ग्रुपसाठीचाही हा आजचा तिसरा अटेंप्ट.

मी प्रियाला परीक्षा केंद्रावर घेऊन चाललोय. सध्या तर तिला दिवसही गेलेले आहेत. त्यामुळे गाडीत नेहमीप्रमाणं पुढे न बसता मागे बसलीये ती.

मी मनात तिच्याबद्दल आलेल्या प्रेमभावनेनं मागे वळून पाहिलं.

अरे!!! मागची सीट तर रिकामी आहे. फक्त मी नेहमी वापरतो ती सॅक सीटवर पडलेली आहे.

मला धक्काच बसला. प्रिया कुठे गेली? वाटेत एके ठिकाणी झेराॅक्स काढायच्या होत्या. त्या ठिकाणी ती उतरली आणि मी तंद्रीत पुढे आलो की काय!

मी डोक्याला हात लावला. या वयात असला प्रकार बरा नाही. डोकं दाखवून घ्यायला हवं एखाद्या चांगल्या डाॅक्टरला!

परीक्षेचं सेंटर हडपसरच्या एका शाळेत होतं. मी तिथपर्यंत पोहोचलोही होतो.

मी गाडी पार्क केली. गाडीतून बाहेर आलो आणि प्रियाला फोन लावला. लावत राहिलो. पण फोन नाॅट रिचेबल.

प्रिया दुकानातून बाहेर पडल्यावर मला तिथे न बघून जाम वैतागली असणार. मला फोनही लावले असतीलच बहुतेक. पण तसं म्हटलं तर माझ्या फोनवर एकही मिस काॅल नाहीये. आणि आता तर तिचाच फोन आऊट आॅफ रिच लागतोय.

माझ्या मनावरचा ताण फारच वाढू लागला. प्रियानं परीक्षा केंद्रावर यायला रिक्षा पकडली असेल आणि रिक्षावाल्यानं तर कुठे भलतीकडेच नेलं नसेल.

मी खरं तर आता घाबरलोच होतो. अजून परीक्षेस आलेले विद्यार्थी गेटबाहेरच थांबले होते. त्यांना अजून आत सोडले नव्हते. मी त्या गर्दीत प्रियाला शोधू लागलो. मी गाडी पार्क वगैरे करेपर्यंत ती रिक्षानं आली असेल कदाचित, या विचारानं.

काही वेळानं गेट उघडलं तसे विद्यार्थी-विद्यार्थिनी आत जाऊ लागले. दोन वाजले. परीक्षा सुरु झाल्याची घंटा वाजली तरी प्रियाचा पत्ता नाही. मी अडीचपर्यंत गेटपाशी थांबलो आणि शेवटी घराकडे परत यायला निघालो.

मनात नको नको ते विचार येत होते. कदाचित माझ्या बावळटपणाने संतापून किंवा बराच वेळ रिक्षा वगैरे न मिळाल्याने प्रिया घरी गेली असावी अशी मी मनाची समजूत करुन घेतली.

हडपसर ते पद्मावती हा माझा परतीचा प्रवास किती ताणात गेला ते मी शब्दांत व्यक्त करु शकत नाहीये.

कसाबसा मी आमच्या बिल्डिंगपाशी पोचलो. सोसायटीत गाडी पार्क केली आणि अंगात आणि मनात त्राण शिल्लक नसतानाही माझ्या फ्लॅटकडे धाव घेतली.

आमच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या अलिकडच्या खिडकीतून आमचे स्वयंपाकघर दिसते.

गॅसच्या शेगडीसमोर प्रिया काहीतरी करत उभी दिसली.

प्रियाला सुखरुप बघून मला एकदम हायसं वाटलं. अर्थात आता दार उघडताच तिची बोलणी खायला लागणार हे नक्की.

मी आता चांगलाच सावरलो होतो. Attack is the best kind of defense हे माझे आवडते तत्व मी वापरायचे ठरवले आणि दाराबाहेरची बेल वाजवली.

प्रियानं याही अवस्थेत लगबगीनं दार उघडलं आणि मला समोर बघून ती काही बोलणार इतक्यात मीच तिच्यावर डाफरलो-
"फोन कुठे आहे तुझा? मगापासून इतके फोन लावतोय. सारखा नाॅट रिचेबल लागतोय."

"अहो हॅंगच झाला आहे फोन. पाॅवर बटण कितीदा तरी दाबून बघितलं. पण चालूच होत नाहीये. आता लगेच सर्व्हीस सेंटर मधे न्यावं लागेल. हल्ली फोन बंद म्हणजे फारच अस्वस्थ व्हायला होतं. अहो पण तुम्ही आत्ता कसे घरी? परीक्षा तर पाच वाजेपर्यंत होती ना?"

प्रिया काय म्हणतीये ते मला काही क्षण समजलंच नाही. जेव्हा समजलं तेव्हा मी मटकन् खालीच बसलो.

"प्रिया, पाणी देतेस प्यायला?"

प्रिया पाणी आणायला आत गेली.

मीही आता पूर्ण भानावर आलो होतो.

प्रियाचा मोबाइल दुरुस्त करण्यापूर्वी माझं डोकं डाॅक्टरला दाखवणं आता अगदीच आवश्यक होतं. उद्या सकाळीच!

मी उठलो. माझ्या खोलीत गेलो आणि माझी ती सगळी सीए ची पुस्तकं आणि वह्या कायमच्या माळ्यावर टाकून देण्यासाठी त्यांचं गाठोडं बांधायला घेतलं...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सही जमलीय.
तुमचा फोटो जरा क्रिपी वाटतोय मला, नीट बघितला तर.

बापरे!
क्रिपी फोटो>> खांद्यावर नुसता हात दिसतोय म्हणून असेल.

मस्त कथा... फार छान ट्वीस्ट...!!

वाटले होते की प्रिया अस्तित्वातच नसेल वगैरे पण वेगळाच शेवट पहायला मिळाला...

वाटले होते की प्रिया अस्तित्वातच नसेल वगैरे पण वेगळाच शेवट पहायला मिळाला... >> मला वाटलं होत C. A च्या परीक्षेला जाताना प्रियाचा अपघात झाला आणि त्यामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल.

मला वाटलं होत C. A च्या परीक्षेला जाताना प्रियाचा अपघात झाला आणि त्यामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल + 1