झपाटलेल्या संग्राहकाचा खडतर ग्रंथशोध

Submitted by कुमार१ on 16 January, 2022 - 22:54

गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता (https://www.maayboli.com/node/77708). वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली. अक्षरधारा-प्रदर्शनामधून केलेल्या मागच्या पुस्तक खरेदीला आता वर्ष उलटून गेले होते. जसे हे वर्ष सुरू झाले तशी माझी पावले आपसूक पुन्हा एकदा त्या दालनाकडे ओढली गेली. सुदैवाने मला हे पुस्तक तिथे मिळाले. त्याच्या मुखपृष्ठावरील शीर्षक, उपशीर्षक आणि चित्रकार वसंत सरवटे यांनी केलेले सुरेख रेखाटन पाहताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. 'ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध' असे उपशीर्षक असलेले हे छोटेखानी पुस्तक म्हणजे टिकेकर यांच्या ग्रंथमय जीवनाचा सुरेख आढावा आहे. त्याचे वाचन हाडाच्या पुस्तक अभ्यासक आणि संग्राहकाला एक सुंदर ग्रंथयात्रा घडवून आणते.

टिकेकर आपल्याला एक साक्षेपी वृत्तपत्र संपादक, इंग्रजी साहित्याचे आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढे संशोधक म्हणून परिचित होते. त्यांच्या संशोधनास उपयुक्त अशा जुन्या, छपाईबाह्य आणि दुर्मिळ ग्रंथांचा शोध घेणे हा त्यांचा आयुष्यभराचा छंद होता. त्यासाठी त्यांनी देश-विदेशातील अनेक पुस्तकांचे अड्डे पालथे घातले. त्या दरम्यान त्यांना आलेल्या विलक्षण अनुभवांचा धांडोळा त्यांनी या लेखनातून घेतलाय. या पुस्तकाचे दोन विभाग आहेत : ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध.
यापैकी ग्रंथ-शोध हे लेखन पूर्वी दैनिक लोकसत्ताच्या लोकमुद्रा या सांस्कृतिक पुरवणीत सन 2001 मध्ये लेखमालेच्या रूपात प्रसिद्ध झाले होते. तर 1996मध्ये त्यांनी ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर जे व्याख्यान दिले होते त्याचे संस्कारित लिखित रूप म्हणजे वाचन-बोध हा दुसरा विभाग.

ग्रंथशोध
हा पुस्तकाचा मुख्य भाग असून त्याचा सारांश लेखकाच्या शब्दात असा:

“माणसं ग्रंथांची जागा घेऊ शकत नाहीत, ग्रंथ माणसांची जागा घेऊ शकतात”.

(हे विधान पटेल अथवा न पटेल, परंतु ते विचार करायला लावते खरे. ग्रंथ हाही माणसेच लिहितात ना? असा युक्तिवाद त्यावर होऊ शकतो).
एखाद्या दर्दी ग्रंथवाचकाच्या आवडीचे तीन टप्पे त्यांनी सांगितले आहेत. आधी छंद, पुढे त्याचा नाद होणे आणि शेवटी त्याची नशा चढणे. या संदर्भात मद्य आणि पुस्तक वाचन या दोन्हीमुळे चढणाऱ्या नशांची सुंदर तुलना त्यांनी केली आहे. एखाद्या घरात ग्रंथ नेटकेपणाने मांडून सुंदर सजावट करता येते, मात्र मद्याच्या बाटल्या कपाटात दडवून ठेवाव्या लागतात ! या विवेचना शेजारीच तो मजकूर चित्रबद्ध करणारे सरवटे यांचे सुंदर रेखाटन छापलेले आहे(एखाद्या मद्यप्रेमीला हा मुद्दा जरी पटला नाही तरी ते चित्र अगदी बघण्यासारखे आहे Happy . एखाद्या ग्रंथबाजाच्या नशेच्या अवस्था त्यांनी सुरेख वर्णिल्या आहेत. त्या मुळातूनच वाचण्यात मजा आहे.

दुर्मिळ पुस्तकांचा एखाद्याने घरी संग्रह केल्यानंतर त्यांची निगा राखणे हे जिकीरीचे काम असते. त्यासाठी कुठल्याही रासायनिक पावडरी न वापरता वेखंडाच्या मुळ्या पुस्तकाच्या कप्प्यांमध्ये ठेवण्याची नामी शक्कल त्यांनी सुचवली आहे. दुर्मिळ ग्रंथ आयुष्यभर मिळवत राहणे हे कष्टप्रद काम असते. त्यासाठी त्यांनी मुंबई-दिल्लीपासून सातारा-नाशिक पर्यंत तसेच विदेशातही वणवण केली. त्यासाठी अनेक पदपथ, रद्दीची दुकाने व खास जुन्या पुस्तक विक्रीची दुकाने पालथी घातली. या उद्योगातून संबंधित ग्रंथविक्रेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे अनेक उत्तमोत्तम जुने ग्रंथ त्यांना मिळवता आले. त्यांची अशा ग्रंथांविषयीची असोशी या वाक्यातून स्पष्ट होते :

‘ग्रंथ जितका जुना आणि दुर्मिळ, तितके त्याच्यातील शब्द अधिक बोलके होतात’.

एखादे जुनेपाने पुस्तक मिळाल्यानंतर त्याच्या पहिल्या पानावर काही विशेष नोंदी आढळतात. त्याच्या बऱ्याच आठवणी त्यांनी लिहिल्यात. एका पुस्तकाच्या पानावर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची स्वाक्षरी होती, तर जमशेदजी टाटा यांच्या चरित्रात जेआरडी टाटांनी ती प्रत गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांना भेट दिल्याची नोंद व स्वाक्षरी होती. जुन्या पुस्तकांच्या पानांमध्ये काही वेळेस लपवून ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू मिळतात. कधी ते एखादे मागच्या शतकातील टपाल तिकीट असते तर कधी एखादे मोरपीस. त्यांच्या एका मित्राला अशा ग्रंथातून इंदिरा गांधींची लग्नपत्रिका मिळाली होती.

दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्विक्रीची किंमत कशी ठरवायची हा या व्यवहारातील एक बिकट प्रश्न असतो. ग्रंथप्रेमीने असा ग्रंथ हातात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव दर्दी विक्रेता अचूक ओळखतो आणि मग किंमत चढवतो. त्यावर मुरलेला वाचकसुद्धा काही कमी नसतो. तो ती किंमत जोरदार पाडून मागतो ! असे घासाघीसीचे अनेक किस्से पुस्तकात आहेत. १८८३मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया इन १९८३’ या पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. त्या पुस्तकात ‘ब्रिटिशांना 1983मध्ये भारत सोडवा लागेल’ असे भाकित केले होते. त्यामुळे त्यावर ब्रिटिश सरकारने जप्ती आणली होती. असे दुर्मिळ पुस्तक त्यांना अवघ्या दहा रुपयात मिळाल्याने परमानंद झाला होता. कधीकधी दुर्मिळ ग्रंथांबाबत अनभिज्ञ असलेला विक्रेता एखाद्या ग्रंथाची किंमत खूपच कमी सांगे. अशा वेळेस लेखक त्याचे महत्त्व जाणून असल्याने स्वतःहून मोठ्या मनाने त्या विक्रेत्याला वाढीव किंमत द्यायचे.

मुंबईच्या दुर्मिळ ग्रंथविक्री करणाऱ्या दुकानदारांविषयी पुस्तकात सविस्तर आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे. एकेकाळी या व्यवसायात इस्मायली खोजा ही मंडळी प्रामुख्याने होती. अशा मंडळींशी लेखकाचे नाते निव्वळ ग्राहक विक्रेता असे न राहता अगदी घरोब्याचे झाले होते.
पुणे-मुंबईच्या प्रत्येकी एका पुस्तक दुकान आणि दुकानदारांबद्दल एकेक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात आहे.

पुण्याचे दुकान म्हणजे इंटरनॅशनल बुक सर्व्हिस. त्याचे मालक विठ्ठल दीक्षित यांचे एकेकाळी पुलंनी ‘इंटरनॅशनल दीक्षित’ असे नामकरण केले होते. ते दुकान नसून पुस्तक मंदिर होते. तेथे नेहमी लेखक-प्रकाशक, संशोधक, क्रीडापटू आणि वैज्ञानिक या सर्वांची उठबस असे. पानशेतच्या पुराच्या तडाख्यात सापडूनही ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले होते. तिथे येणाऱ्या अभ्यासकांना हवा तो ग्रंथ मिळवून देण्याची हमी दीक्षित घेत असत, मात्र ‘किमतीत सवलत’ हे शब्दही तिथे उच्चारायला बंदी होती ! मुंबईच्या ‘strand बुक स्टॉल’चा उल्लेख ‘प्रवेशमूल्य नसलेली एक नामांकित शिक्षणसंस्था’ असा गौरवाने केला आहे. यात सर्व काही आले. त्याचे मालक टी एन शानभाग. ते स्वतः अनेक देशांत जाऊन तिथून पुस्तके खरेदी करून आणत. त्यांनी दुकानाचा ५० वा आणि स्वतःचा ७५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या दोन्ही वेळेस त्यांनी महा-ग्रंथप्रदर्शने भरवली. तेव्हा त्यांनी अनेक जागतिक ग्रंथ तब्बल 40 ते 80 टक्के सवलतीत ग्राहकांना दिले. एवढे केल्यावरही तेव्हाची पुस्तकविक्री काही कोटी रुपयांची झाली. शानभाग यांच्या ग्रंथसेवेबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ने गौरवलेले आहे.

विविध संशोधन ग्रंथांच्या जोडीने काही वैशिष्ट्यपूर्ण जाडजूड शब्दकोशांचाही पुस्तकात उल्लेख आहे इंग्लिश शब्दकोशांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे ‘को-बिल्ड डिक्शनरी’. (या शब्दाचे मला कुतूहल वाटल्याने त्याबद्दल जालावरून वाचन केले. या प्रकारचा कोश सर्वप्रथम 1987 मध्ये प्रकाशित झाला. ‘को’ चा अर्थ कॉर्पस ड्रिव्हन’ असा आहे. कोशाच्या या प्रकारात दैनंदिन जीवनात लोक जसे बोलतात व लिहितात त्याची समर्पक उदाहरणे दिलेली असतात). इंग्लिशचे मिळतील तेवढे शब्दकोश त्यांनी विकत घेतले होते. इंग्लिशमध्ये सदोदित नवनवीन प्रकारचे कोश तयार झाल्याने ती समृद्ध ज्ञानभाषा झाल्याचे मत ते नोंदवतात. त्याचबरोबर मराठीत मात्र आपण जुन्या पिढीतील त्याच त्या कोशांचे पुनर्मुद्रण करीत असल्याची खंतही व्यक्त करतात.

एकदा त्यांच्या मित्राला भारतीय सणांवरचे दुर्मिळ पुस्तक 10 रुपयाना मिळाले होते. पण त्या पुस्तकावर मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा शिक्का होता. मग कर्तव्यभावनेने त्यांनी ते पुस्तक त्या ग्रंथालयात जाऊन परत केले. अधिक चौकशी करता एक धक्कादायक माहिती मिळाली. ज्या व्यक्तीने ते वाचण्यासाठी नेले होते तिचा नंतर खून झाला होता.

जातिवंत ग्रंथसंग्राहकांना ग्रंथांची नशा चढलेली असते. अशा काही मंडळींचे मजेदार, विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक किस्से पुस्तकात आहेत. Ann Fadiman या लेखिकेने ‘मॅरीइंग लायब्ररीज’ या निबंधात तिच्या वैवाहिक आयुष्याच्या आरंभावर लिहिले आहे. ती आणि तिचा पती हे दोघेही लग्नापूर्वी दर्दी ग्रंथसंग्राहक होते. लग्नानंतर दोघांचे संग्रह एका घरात आले. ते एकत्रितपणे रचताना लक्षात आले की ५० पुस्तके ही दोघांच्याही संग्रहात आहेत. आता अशा दोन-दोन प्रतिंपैकी कोणाची एक काढून टाकायची यावर जोरदार खडाजंगी झाली ! अखेर कसाबसा समझोता झाला. निबंधाच्या शेवटी त्या म्हणतात की, जेव्हा त्याच्या व माझ्या पुस्तकांचे सुयोग्य मीलन झाले तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही विवाहबद्ध झालो.
हेलन हॅन्फ ही अमेरिकी लेखिका लंडनच्या एका ग्रंथविक्रेत्यांशी 1949 ते 1969 अशी तब्बल 20 वर्षे पत्रव्यवहार करते. ती सर्व पत्रे ‘84 चेरिंग क्रॉस रोड’ या नावाने पुढे पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. ते प्रकाशित होताच त्यावर ब्रिटिश ग्रंथप्रेमींच्या अक्षरशः उड्या पडल्या.

असे किस्से सांगितल्यावर, ग्रंथप्रेमींचा देश म्हणून इंग्लंडची जागतिक कीर्ती असल्याचे मत लेखक नोंदवतात. इंग्लंडच्या वेल्श परगण्यात हे-ऑन-वाय हे छोटेसे गाव तर ग्रंथांचे (आद्य)गाव म्हणून प्रसिद्ध आहे. रिचर्ड बूथ नावाच्या ग्रंथप्रेमी विक्रेत्याने चाळीस वर्षांच्या परिश्रमातून या गावाला तशी जागतिक ओळख मिळवून दिलीय. दरवर्षी जगभरातून पाच लाख ग्रंथप्रेमी या गावाला भेट देतात. असंख्य विषयांची नवीजुनी पुस्तके तिथे मिळतात. आपण हवी ती पुस्तके घ्यायची, त्यांची किंमत आपणच मोजायची आणि तेवढे पैसे काचेच्या भांड्यात टाकायचे, अशी ही विक्रीची अभिनव पद्धत. नंतर जगभरात या कल्पनेचे अनुकरण करून ३० ग्रंथगावे निर्माण केली गेली आहेत. (कालांतराने 2017 पासून महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्धी पावले आहे).
हे-ऑन-वायला प्रत्यक्ष भेट देऊन आल्यानंतर टिकेकर म्हणतात, की त्यांची आयुष्याची ‘हज यात्रा’ आता पूर्ण झाली आहे; आता ‘अंतिम’ प्रवासाची तयारी करायला हरकत नाही !

अनेक ग्रंथप्रेमींच्या संग्रहाचे त्यांच्या निधनानंतर काय होते याचा छडा लावणे हाही लेखकाच्या छंदाचा एक भाग होता. असे काही ग्रंथप्रेमी आयुष्याच्या अखेरच्या अवस्थेत आपला संग्रह नामवंत ग्रंथालयाला भेट देतात. अन्य काही जण तसे मृत्युपश्चात देण्याचे इच्छापत्र करून ठेवतात. अशा संग्रहांचे चांगले जतन होते. मात्र काहींच्या बाबतीत असे काहीच न घडल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या संग्रहाची वाताहत होते. बरेचदा त्यांचे वारस असे ग्रंथ सरळ रद्दीत टाकताना दिसतात. समाजाचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या ग्रंथांचे असे मातेरे होऊ नये म्हणून लेखक त्यासाठी धडपड करीत. त्यामागची त्यांची तळमळ या लेखनातून जाणवते. महाराष्ट्रातील काही मोजक्या सांस्कृतिक अभ्यासकांचे ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर नामवंत संस्थांनी जतन केले आहेत. त्यामध्ये द वा पोतदार, रावसाहेब मंडलिक आणि अ का प्रियोळकर ही ठळक उदाहरणे आहेत. अर्थात त्या संग्रहांची आताची ‘अवस्था’ मात्र फारशी चांगली नाही. खुद्द टिकेकरांनीही वयाची साठी उलटल्यानंतर त्यांचा निम्मा अधिक ग्रंथसंग्रह मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला भेट दिलेला आहे. आपले सांस्कृतिक संचित मोठ्या प्रमाणात सुयोग्य जतन करण्यासाठी समाजातील धनिकांनी पुढे यावे तसेच या कामी सरकारचेही व्यापक धोरण असावे अशी सूचना त्यांनी केली आहे.

....असा आहे हा पुस्तकाचा आत्मा असलेला पहिला भाग.
या सर्व रसाळ विवेचनात लेखकाने जुन्या काळच्या ग्रंथांना ‘ग्रंथ’ म्हणूनच संबोधले आहे; ‘पुस्तक’ हा शब्द क्वचित वापरलेला दिसतो. यातून लेखकाच्या मनात असलेला ग्रंथांविषयीचा कमालीचा आदर आणि आपुलकी जाणवते.
…….
वाचनबोध

दुसऱ्या भागातील हे लेखन मुळात त्यांच्या व्याख्यानावरून बेतलेले असल्याने ते काहीसे आवेशपूर्ण आहे. वाचन म्हणजे काय, वाचकांचे व साहित्याचे प्रकार आणि स्वानुभव अशा विविध अंगांनी ते नटलेले आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असे :

• रिकामा वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जे वाचले जाते ते वाचन नव्हे. आपल्या आवडीनिवडीच्या विषयाचे आवर्जून केलेले वाचन ते खरे वाचन. असे वाचन वाचकाला बौद्धिक पातळीवर नेते.

• चांगल्या वाचनाची सवय लागण्यासाठी वाचनगुरू लाभल्यास उत्तम. हेच जर गुरुविना आपणच धडपडत शिकलो तर त्यात आयुष्यातील बराच वेळ वाया जातो.

• ‘हल्लीचे लोक वाचत नाहीत’ हे रडगाणे आपण शंभरहून अधिक वर्षांपासून गात आहोत. ते थांबवावे. आपापल्या आवडीचे वाचणारे अनेक जण समाजात असतात.

वाचकांचे चार गट पाडता येतील :
१. हा वर्ग वाचत असतो, पण काय वाचावं याचे निकष त्याच्यापाशी नसतात. या वर्गाचे प्रमाण ९० टक्के असू शकेल.

२. हा वर्ग वाचतो आणि चांगले किंवा वाईट साहित्य कशाला म्हणायचे हेही तो जाणतो. हल्ली वाचक कमी झालेत अशी ओरड करण्यापेक्षा आपण या वर्गाची टक्केवारी कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे

३. समीक्षकांचा वर्ग : यामध्ये कोणीही उठून जगातील कुठल्याही विषयाची समीक्षा करू नये. प्रत्येक समीक्षकाचा आपापला अभ्यासाचा प्रांत असावा आणि त्यानुसार त्याने संबंधित विषयाची समीक्षा करावी
४. न वाचता वाङमयीन मते अधिकारवाणीने सांगणारा वर्ग ! हा तर घातकच.

साहित्याचे अभ्यासक या नात्याने ही त्यांनी केलेली वर्गवारी आहे. एखाद्या सामान्य वाचकाने वरीलपैकी पहिल्या का दुसऱ्या गटात रहायचे, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न राहील.

पुढील लेखनात जीवनासाठी कला की कलेसाठी कला या साहित्यिक वादावर जडभारी विवेचन आहे. ते सामान्य वाचकाला फारसे भावेल असे नाही. आयुष्यातील वाचनप्रकाराचे टप्पे त्यांनी सांगितले आहेत. काव्य, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र आणि शेवटी तत्त्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत. हा त्यांचा अनुभव आहे. काही अंशी तो काही वाचकांना लागू होईल. पण यात व्यक्तीभिन्नता नक्की राहील. कोणाला एखादाच वाचनप्रकार कदाचित आयुष्यभर आवडू शकेल. इंग्लिशमधील काही चांगले ग्रंथ वाचून त्यांना स्वतःला काय बोध झाला याचे त्यांनी सुरेख वर्णन केलेले आहे. ‘Learning to philosophize’, ‘U and non-U revisited’ अशा काही रोचक व मार्गदर्शक पुस्तकांचा त्यांनी विशेष उल्लेख केलाय. त्यातील U and non-U मधील ‘बोलणे आणि सामाजिक स्तर’ याबाबतचे मुद्दे रंजक आहेत.

...
हे पुस्तक वाचल्यावर मीच माझ्या मनाला असा प्रश्न विचारला,
" मला यातून काय बोध झाला?"
याचे माझ्या मनाने दिलेले उत्तर असे,
"लेखन-वाचन संस्कृती या विषयांवरील लेखन मला आकर्षित करते. म्हणून मी ते आवर्जून व आवडीने वाचतो. त्यातल्या काही भागांचे पुनर्वाचन करतो. मला या विषयावर विचार करावासा वाटतो. हा खरा आनंद व हेच खरे समाधान".

तर वाचकहो,
या विषयाची जर तुम्हाला आवड असेल, तर हे पुस्तक, विशेषतः त्याचा मुख्य भाग असलेला 'ग्रंथ-शोध' वाचायला हरकत नाही. ग्रंथ संग्राहकांच्या दृष्टीने हे वाचन एक पर्वणी असेल. पारंपरिक पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा आकार (म्हणजे लांबी-रुंदी) लहान आहे. छपाईच्या अक्षरांचा आकार ज्येष्ठांना सुखावणारा आहे (आजकाल छापील पुस्तकांमध्ये हे दुर्मिळ होत चाललेले आहे). या अभ्यासपूर्ण पुस्तकाला अक्षरनिष्ठांची मांदियाळी हे समर्पक शीर्षक टिकेकर यांच्या संपादकीय सहकारी अपर्णा पाडगावकर यांनी सुचवले होते. त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख प्रस्तावनेत केलेला आहे हेही एक विशेष.
……….
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
अरुण टिकेकर
दुसरी आवृत्ती २०११
१७३ पाने, किंमत ₹ १७५
रोहन प्रकाशन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक लेख, विषय कधीही जुना न होणारा व माहितीही नवीन ! Happy
'अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे शीर्षक खरंच आकर्षक व सुंदर आहे.

>>आवडला!!!!>> + ९९
निरंजन घाटे यांनी पण या विषयावर मागे लिहिले होते

सर्वांचे आभार

निरंजन घाटे यांनी पण या विषयावर >>
'वाचत सुटलो त्याची गोष्ट' असे ते पुस्तक आहे

>>'वाचत सुटलो त्याची गोष्ट' >>> छान.
>>>> ‘इंडिया इन १९८३’ या पुस्तकाबद्दल>>> त्याचा लेखक अनामिक दाखवलाय गुगलवर
https://books.google.co.in/books/about/India_in_1983.html?id=iZOYzQEACAA...

* त्याचा लेखक अनामिक दाखवलाय गुगलवर
>>>
ते पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावर फक्त प्रकाशकाचे नाव होते; लेखकाचे नाही.
बऱ्याच काळानंतर त्याचे लेखक हे तत्कालीन सिंध प्रांताचे न्यायाधीश टी हार्ट डेविस असल्याचे कळले होते.

छान पुस्तक परिचय अणि ओघाने आलेली माहिती....
मला पाडगावकरांचे काही काव्यसंग्रह हवे होते. बुकगंगा, मॅजेस्टिक शोधले पण पुस्तकं उपलब्ध नाहीत... कवी पाडगावकरांना जाऊन जास्त दिवस नाही झाले. त्यांच्यासारख्या लोकप्रिय कवीच्या वाट्याला असे दिवस यायला नकोत...हे वाचक घटल्याचं लक्षण...की कविता वाचनाला असलेला आधीच उल्हास...बघायला गेलं तर कवितेचे वाचक कमीच असतात...
तसं मायबोलीवरही काही लोक किंडल किंवा pdf पसंत करतात.
गद्य वाचनही कमी झालंय...
लेखन-वाचन संस्कृती लय पावत चाललीय की काय असे वाटते... अर्थात मायबोलीकर एक सन्माननीय अपवाद आहे.
बाकी खप असेल तर पुस्तकांच्या नवीन आवृत्ती प्रकाशित करता येतात.

जिज्ञासा, दसा
धन्यवाद.
आधीच उल्हास...बघायला गेलं तर कवितेचे वाचक कमीच असतात...

हे बाकी खरं आहे Happy

छान लेख.
अरुण टिकेकर लोकसत्तेचे संपादक होते तेव्हा त्यांनी बरीच जड सदरे सुरू केली होती.

फेसबुकवरून दुर्मीळ पुस्तके आहे लेबल लावून विकणारी दोन पेजेस आहेत.
सहज कानी न पडणारी नावं तिथे वाचायला मिळतात.

दत्तात्रय साळुंके, पाडगावकरांचे कोणते संग्रह हवेत तुम्हांला?

मला कधीतरी माझ्याकडची पुस्तके कमी करायची आहेत, तेव्हा तुम्हांला देऊ शकेन.

भरत खूप धन्यवाद....
तुमच्या कडे बोलगाणी, आनंदऋतु, तुझे गीत गाण्यासाठी यापैकी काही असेल तर मला विपु अथवा मेल करा....

बोलगाणी आणि तुझे गीत गाण्यासाठी आहेत. आता लगेच नाही काढत आहे. पण या वर्षी नक्की.

@ भरत
ठिक... पुनश्च खूप धन्यवाद, तत्काळ दखल घेतलीत...

सर्वांचे आभार !
यानिमित्ताने इच्छुक लोकांमध्ये ग्रंथांची देवघेव होत आहे हे पाहून आनंद वाटला. Happy

खूपच सुंदर परिचय....
नुकतच त्यांचं इति-आदि हे दैनंदिन वस्तूंबद्दल रोचक आणि कुतुहल जनक माहिती देणार पुस्तक वाचलं
त्यांचं अनेक विषयावरील वाचन, ज्ञान आणि त्याची मानवी जीवनाशी घातलेली सांगड हे त्यातून प्रकर्षाने दिसून येतं.
लोकसत्तेच्या लोकमुद्रामध्ये त्यांचं स्थल-काल हे खूप सुंदर सदर होत

आभार !
इति-आदि हे दैनंदिन वस्तूंबद्दल रोचक आणि कुतुहल जनक माहिती देणार पुस्तक

>>> त्याबद्दल कुतूहल निर्माण झालंय ! रोचक.