पुस्तकवेड्यांचं वेड

Submitted by कुमार१ on 4 January, 2021 - 21:29

गतवर्षी मार्च ते नोव्हेंबर हा काळ आरोग्य-दहशतीचा होता. त्याकाळात घराबाहेरील करमणूक जवळपास थांबली होती. साहित्य-सांस्कृतिक आघाडीवरही शांतता होती. त्यामुळे घरबसल्या जालावरील वावर जास्तच राहिला. तिथे चटपटीत वाचनखाद्याला तोटा नसतो, पण लवकरच तिथल्या त्याच त्या आणि प्रचारकी लेखनाचा कंटाळा येतो. आता काहीतरी सकस वाचले पाहिजे असे तीव्रतेने वाटत होते. साहित्यिक पुस्तकांची ऑनलाईन खरेदी मी अद्याप केलेली नाही, कारण मला त्याद्वारे पुस्तक निवडीचा निर्णय घेणे कठीण जाते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन थोडेतरी चाळल्याशिवाय मी ते विकत घ्यायचे धाडस करीत नाही.

डिसेंबरमध्ये सामाजिक वावर तसा वाढू लागला. मग ठरवले की आता आपण एखाद्या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यायची. खूप वर्षांनी हा निर्णय घेतल्याने त्याची जबरदस्त ओढ वाटली. मग एका रविवारी प्रदर्शनस्थळी जाऊन धडकलो. सुरुवातीस पुस्तक दालनातून हिंडताना अगदी गरगरले. काही हजार पुस्तके आपल्या आजूबाजूस दिसल्यावर तर आपला खरेदीचा गोंधळ अजूनच वाढतो. तासभर तिथे फिरल्यावर तीन पुस्तके घेऊन आलो. त्यातल्या एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा परिचय आता करून देतो.

या पुस्तकाचे नाव आहे :
लीळा पुस्तकांच्या
लेखक : नीतीन रिंढे

गेल्या काही वर्षांपासून दिवाळी अंक व इतरत्र मी रिंढेंचे काही लेखन वाचले होते. त्यातून त्यांच्या पुस्तक प्रेमाची झलक दिसली होती आणि लेखनशैलीही आवडली होती. आकर्षक रंगसंगतीचे मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक पाहिले, चाळले आणि ते घ्यायचा निर्णय अगदी पक्का झाला. हा लेखसंग्रह आहे. अशा संग्रहाचा एक फायदा असतो. त्यातला प्रत्येक लेख स्वतंत्र असल्याने आपण पुस्तक अनुक्रमेच वाचायची गरज नसते. आपल्या आवडत्या लेखावर आपण आधी झडप घालू शकतो. तसे काही मी करणार तेवढ्यात लक्षात आले, की अरे, या पुस्तकाला लेखकाने तब्बल २० पानी प्रस्तावना लिहिलेली आहे. तिचे शीर्षकच ‘विषयांतर...’ असे आहे असे शीर्षक देण्यामागे ठोस कारण आहे. पुस्तकातील सर्व लेख हे पाश्चात्य पुस्तके आणि लेखकांवर आहेत. त्यातून आपल्याला त्यांच्या पुस्तक संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. तर प्रस्तावना मात्र पूर्णपणे महाराष्ट्रीयांच्या पुस्तक संस्कृतीवर प्रकाश टाकते. थोडक्यात या प्रस्तावनेत लेखक ‘ते’ आणि आपण मराठी माणसे यातला फरक विस्ताराने मांडतो. पुस्तकातील २३ लेख हे सगळे ‘तिकडच्या’ मंडळींवर लिहीलेले असल्याने मला प्रस्तावनेचे हे विषयांतर अधिक महत्त्वाचे वाटले. मग मी ती अगदी आवडीने वाचून काढली. आवडली म्हणून पुन्हा वाचली. आता जर तुम्ही मला असे विचारलेत, की या पुस्तकातील मला सर्वात जास्त काय आवडले, तर माझे प्रामाणिक उत्तर आहे प्रस्तावना ! याचे कारण उघड आहे. ती ‘आपल्या’बद्दल लिहिलेली आहे. त्यातून लेखक आपल्याला त्यांच्या आणि आपल्या पुस्तक संस्कृतीतले फरक हळुवारपणे समजावून देतो.

लेखकाने पुस्तकांबद्दल आदर असणार्‍या व्यक्तींचे दोन गटात वर्गीकरण केलेले आहे - पुस्तकप्रेमी आणि पुस्तकवेडे. वरवर पाहता असे वाटेल, की पहिल्या गटातले अतिरेकी म्हणजे दुसरे असावेत. पण नाही; हे दोन गट भिन्न आहेत. पुस्तकप्रेमी हा काहीतरी माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचतो. तेही अगदी मन लावून. त्याला पुस्तकातील आशयविषयाबद्दल ममत्व असते. याउलट पुस्तकवेडा हा मूलतः संग्राहक असतो. तो सहसा संपूर्ण पुस्तक वाचत नाही. पण एखादे पुस्तक एकदा का त्याच्या नजरेत भरले की काय वाटेल ते करून ते प्राप्त करतो आणि संग्रही ठेवतो. “माझ्याकडे इतकी हजार पुस्तके आहेत”, हा त्याचा सार्थ अभिमान हीच त्याची पुस्तकांतून झालेली कमाई असते. किंबहुना चालू जमान्यातील दुकानात सहज मिळणारी पुस्तके हे त्याचे खाद्य नसते. त्याला ओढ असते ती दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांची. अशा पुस्तकाचा विषय त्याच्या आवडीचा असतोच असे नाही. पुस्तक त्याच्या नजरेत भरायला खालील काही गोष्टी कारणीभूत ठरतात :

• पुस्तकाची पहिली आवृत्ती
• लेखकाची स्वाक्षरी असलेली प्रत
• छपाईचा विशिष्ट कागद, पुस्तकाचा आकार, मुखपृष्ठ अथवा बांधणी
• दुर्मिळता

जर का एखाद्या छापील पुस्तकाचे हस्तलिखित कुठे उपलब्ध असेल तर असा संग्रहक ते मिळवण्यासाठी अक्षरशः जिवाचे रान करतो. वरील वर्णनावरून पुस्तकवेड्यांची कल्पना वाचकांना चांगलीच येते. अशा अनेक वेड्यांचे किस्से पुस्तकात दिले असल्याचे लेखक नमूद करतो. हे सगळे पाहिल्यावर नकळत त्याची तुलना आपल्याकडील पुस्तकनादींशी होते. तिथे एक मूलभूत फरक ठळकपणे पुढे येतो. आपल्याकडील संग्राहक हे मुख्यत्वे पुस्तकप्रेमी (आणि वाचक) आहेत. आवडत्या विषयाचे पुस्तक मनापासून वाचणे हे आपले पुस्तकाबाबतचे स्पष्ट उद्दिष्ट असते. जरी अशा काहीं व्यक्तींचे वैयक्तिक ग्रंथसंग्रह अफाट असले, तरी ते तशा अर्थाने पुस्तकवेडे नसतात. पुस्तकं संग्राहकांच्या या दोन गटातील फरक अगदी सुस्पष्ट होण्यासाठी लेखक त्यांची इंग्लिशमध्येही नावे देतो. ती लिहिण्याचा मोह मलाही आवरत नाही- पुस्तकप्रेमी (bibliophile) आणि पुस्तकवेडा (bibliomane).

या लेखसंग्रहासाठी लेखकाने जी पुस्तके निवडली आहेत ती सर्व ‘पुस्तकांविषयीची पुस्तके’ आहेत. याचाही अर्थ प्रस्तावनेत उलगडून सांगितला आहे. या प्रकारात समीक्षा अथवा टीकात्मक पुस्तके येत नाहीत. पुस्तक ही ‘वस्तू’ समजून त्यावर जी पुस्तके लिहिली जातात, ती म्हणजे अशी पुस्तके. या पुस्तकांचे विषय म्हणजे पुस्तकाचे दृश्यरूप, ते मिळवतानाचे वाचकाचे कष्ट व अनुभव, पुस्तकाची जोपासना आणि त्याबद्दलची आत्मीयता, इत्यादी. अशी ही कुतूहलजनक प्रस्तावना वाचूनच मी आनंदाने निथळलो आणि एका वेगळ्याच जगाचे दर्शन लेखक आपल्याला घडवणार असल्याचे लक्षात आले.

आता वळूया पुस्तकातील लेखांकडे. हे सर्व लेख पुस्तकांबद्दलच्या पुस्तकांशी संबंधित आहेत. तसेच त्यात संबंधित लेखक, वाचक, प्रकाशक आणि ‘वेडे’ संग्राहक यांच्याही गमतीजमती रोचकपणे लिहिल्या आहेत. या २३ लेखांपैकी मला जे दोन विशेष भावले त्याबद्दलच मी अधिक लिहिणार आहे. त्याचे कारणही पुढे स्पष्ट होईल. पुस्तकातील अठराव्या क्रमांकाचा लेख आहे :

न वाचनाचं संकीर्तन”

बघा, शीर्षकच किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता या लेखाचा आशय पाहू. कितीही पट्टीचा वाचक असला तरी वयानुसार त्याच्या वाचनाचा आवाका कमी होतो. पण जर का तो पुस्तकवेडा असेल, तर त्याची पुस्तके जमवण्याची हौस काही कमी होत नाही. त्याचा पुस्तक संग्रह वाढता वाढता वाढे असाच राहतो आणि मग त्यातली कित्येक पुस्तके वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली असतात. अशा या मुद्द्यावर फ्रेंच साहित्य अभ्यासक बायर्ड यांचे एक पुस्तक आहे. त्याचा परिचय म्हणजे हा लेख. जगात एकूण प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या अफाट आहे. त्यामुळे एखाद्या वाचकाने कितीही पुस्तके वाचली, तरी त्यापेक्षा त्याने न वाचलेल्या पुस्तकांचीच संख्या अधिक राहते. म्हणून बायर्ड असे म्हणतात, की पुस्तके वाचली जाण्यापेक्षा ती वाचली न जाणे हीच अधिक नैसर्गिक गोष्ट आहे ! पुढे त्यांनी पुस्तक पूर्ण वाचणारे आणि ते निव्वळ चाळणारे यांची तुलना केली आहे. एखाद्याला पुस्तक ओझरते चाळूनच जर त्यातला आशय समजला असेल तर सगळे पुस्तक वाचत कशाला बसायचे, असा मजेशीर युक्तिवाद त्यांनी केला आहे.

आता माझ्या या लेखाच्या वाचकांना असा प्रश्न पडेल, की या पुस्तकातील हाच लेख मला सर्वात जास्त का आवडला ? तर वाचकहो, त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. पूर्ण पुस्तक वाचणारे आणि चाळणारे या दोन गटांपैकी मी स्वतः दुसऱ्या गटात मोडतो. एखाद्या लेखनातून जी गोष्ट ‘आपलीच’ आहे असे जेव्हा आपल्याला जाणवते, तेव्हा ते लेखन आपल्याला अत्यानंद देते, यात नवल ते कसले ? गेल्या दहा वर्षात मी पुस्तके पूर्णार्थाने खूप कमी वाचली. पण जी काही पुस्तके गाजतात, त्यांचा परिचय अथवा परीक्षणे मी हटकून वाचतो. पूर्वी जेव्हा मी वाचनालय लावलेले होते तेव्हा देखील मी तिथून घरी आणलेल्या पुस्तकांपेक्षा तिथल्या तिथे चाळून परत ठेवून दिलेल्या पुस्तकांचीच संख्या अधिक होती.
आपल्यापैकी जे कोणी वाचक माझ्यासारख्या चाळणाऱ्या गटातील असतील, त्यांनी हा लेख जरूर वाचावा असे सुचवतो. जर का आपल्या मनात पुस्तक पूर्ण न वाचण्याचा अपराधभाव असेल, तर तो या वाचनाने कुठल्या कुठे पळून जाईल.

मला दुसरा भावलेला लेख पंधराव्या क्रमांकावर असून त्याचे नाव आहे :

समासातल्या नोंदी केवळ....”

गाढे पुस्तकवाचक एखाद्या वाचनादरम्यान पुस्तकाच्या पानांवरील समासांमध्ये काही नोंदी करतात. काहींच्या अशा नोंदी इतक्या विस्तृत असतात, की कालांतराने त्या संशोधनाचा विषय होतात. अशा समासातल्या नोंदींना इंग्रजीत marginalia असे म्हणतात. याच शीर्षकाचे पुस्तक एच. जे. जॅक्सन या संपादिकेने लिहीलेले आहे. त्यावर आधारित हा लेख आहे.

या लेखाबद्दल काही सांगण्यापूर्वी थोडा स्वानुभव सांगतो. जर एखादे पुस्तक माझ्या मालकीचे असेल, तर आणि तरच मी त्यात फार तर पेन्सिलने खुणा करतो किंवा काही वाक्ये अधोरेखित करतो. अलिकडे काही चांगले प्रकाशक पुस्तकाच्या शेवटी १-२ कोरी पाने टिपणांसाठी ठेवतात. जर अशी सोय एखाद्या पुस्तकात असेल तर मग मी तिथे काही लिहितो; अन्यथा पुस्तक समासात नाही. एकेकाळी मी जेव्हा वाचनालयातून पुस्तकं आणायचो तेव्हा काही पुस्तकांवर आधीच्या वाचकांनी लिहिलेले अशिष्ट शेरे आठवतात. जसे की, ‘हे पुस्तक वाचू नये’, ‘वाचणारा गाढव’, इत्यादी. सकारात्मक नोंदी म्हणजे पुलं-वपुंच्या पुस्तकांत अनेक सुंदर वाक्याखाली पेनाने वारंवार ओढलेल्या रेघा आणि समासात काढलेल्या पसंतीदर्शक चांदण्या. काही वेळेस तर काही वाक्ये कित्येक वेळा अधोरेखित करून तिथे पुस्तकाचे पान फाटल्यागत झालेले असायचे.

जॅक्सन यांच्या वरील पुस्तकात वाचकांनी पुस्तकांमध्ये केलेल्या समासनोंदींचा अभ्यासपूर्ण परामर्श घेतला आहे. त्यामध्ये वाचकांची लेखकाशी सहमती, पुस्तककौतुक वा शिव्या, चुकीची दुरुस्ती आणि पूरक माहिती अशा विविध नोंदींचा समावेश आहे. सदर पुस्तक लिहिण्यासाठी या संपादिकेने ग्रंथालयातील गेल्या तीनशे वर्षातील २०००हून अधिक नोंदीवाल्‍या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे हे विशेष. अशा विविध नोंदींचा तपशील दिल्यानंतर लेखिका या नोंद सवयीचे विश्लेषण करते. वाचक समासात का लिहितो, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. या नोंदी म्हणजे वाचक व लेखक यांच्यात एक घट्ट नाते निर्माण झाल्याचा पुरावा असतो असे ती म्हणते. या मुद्द्यावरील असे एखादे पुस्तक चक्क वाचकालाच त्याचा नायक बनवते ही गोष्ट यातून आपल्याला समजते. त्यावर रिंढेंनी लिहिलेला हा लेख म्हणूनच मला कौतुकास्पद वाटला.

पुस्तकातील इतर लेखांत पुस्तक संग्रहकांची अवाढव्य कपाटे, संग्राहक व सुताराचा सुखसंवाद, घराचा अपुरेपणा, पुस्तक चोरी व तिचा गुप्तहेरी शोध, लेखक-प्रकाशक हेवेदावे आणि एकूणच पुस्तकवेड्यांचे धमाल किस्से अशा कितीतरी गोष्टींचा समावेश आहे. तो मुळातून वाचण्यातच मजा आहे. या प्रकारचे पुस्तक एखाद दुसऱ्या बैठकीतच बसून संपवू नये असे मात्र वाटते. दिवसाकाठी त्यातला एकच लेख वाचावा आणि त्यातील रोचक किस्सा चघळत बसावा हे जास्त बरे. जर आपण सलगच वाचायचे ठरवले तर मग दोन लेखानंतर एकसुरीपणा आणि काहीसा कंटाळा येऊ शकतो. पुस्तकाची भाषा शास्त्रशुद्ध असून ती ओघवती आणि वाचकाला गुंगवून ठेवणारी आहे. काही ठिकाणी वाक्ये बरीच लांबलचक झालेली आहेत. प्रस्तावनेतील एक वाक्य तर तब्बल पंधरा ओळी व्यापून टाकते !

एका लेखातील झोरान झिवकोविच या लेखकाचे जे मत मनाला भिडले ते आता लिहितो. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत असा त्याचा सल्ला आहे !

हा लेख लिहिताना मी हे पुस्तक तीन चतुर्थांश वाचले आहे. जर का मी ते वाचनालयातून आणलेले असते तर कदाचित या स्थितीत परतही केले असते. पण आता हे विकत घेतलेले असल्याने ‘वसुलीच्या’ भावनेतून कदाचित ते पूर्ण वाचेनही. पण समजा, तसे केले नाही, तरी वर उल्लेखित ‘न वाचनाचं संकीर्तन’ या लेखानुसार माझ्या मनात आता कोणताही अपराधभाव राहणार नाही. या पुस्तकाचे मुखपृष्ठ लाल पिवळ्या रंगात असून त्यावरील शीर्षक पांढऱ्यात तर लेखकाचे नाव काळ्या रंगात आहे. एखाद्या पुस्तकवेड्याला असे आकर्षक पुस्तक संग्रही ठेवण्यासाठी एवढी सामुग्रीसुद्धा पुरेशी आहे, नाही का ?
...............................................
लीळा पुस्तकांच्या : नीतीन रिंढे
दुसरी आ. २०१९
लोकवाङ्मय गृह
२०० पाने, किं. रु. २५०.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय
ललिता प्रीति यांनीही लिहिलंय या पुस्तकाबद्दल.

छानच लेख. माझ्याकडे अशीच घेतलेली चोम्स्कीची दोन तीन पुस्तके आहेत. शिवाय एकच बुक केस आहे पन त्यात जी ए गौरी, पुलं धारप चित्पावन पद्धतीने लग्न समृद्ध वृद्धत्व अशी काय काय आहेत. ते बघुनच मला मस्त वाट्टे. वाचायला वेळ होत नाही.

छान लेख.
तुम्हाला पुस्तक प्रदर्शनात सहभागी होता आलं याचा हेवा वाटला पण. Light 1

छान माहिती. माझ्याकडे pdf मध्ये काही छान पुस्तके आहेत. वेळ मिळेल तसे वाचते.

प्रिंटेड पुस्तक वाचायला घेतल्यावर माझा लहान मुलगा 1-2 पाने फाडतो.
अप्पा बळवंत चौकात गेल्यावर मुलांसाठीच पुस्तक खरेदी होते. खूप सारी गोष्टींची पुस्तके.

प्राचीन,
पुस्तक प्रदर्शनात सहभागी होता आलं >>>

‘अक्षरधारा’च्या प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य होते. जी पुस्तके आपल्या कमरेखालील उंचीच्या कप्प्यांमध्ये ठेवलेली होती, ती नीट बघता यावीत म्हणून बुटक्या आकाराचे सरकते सोफे केलेले आहेत. त्यावर बसून खालच्या उंचीवरील पुस्तके न्याहाळण्याचा अनुभव सुरेख वाटला.

सियोना,
प्रिंटेड पुस्तक वाचायला घेतल्यावर माझा लहान मुलगा 1-2 पाने फाडतो. >>>

अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे मुले लहान असताना इ-पुस्तकांचे वाचन फायद्याचे ठरेल !

मस्त पुस्तक दिसतंय. छान सहजसुंदर परिचय करून दिलात.
धन्यवाद.
डॉ आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तक संग्रहासाठी वेगळे घर बांधल्याचे वाचले होते

Interesting.. Happy

एकेकाळी मी जेव्हा वाचनालयातून पुस्तकं आणायचो तेव्हा काही पुस्तकांवर आधीच्या वाचकांनी लिहिलेले अशिष्ट शेरे आठवतात. जसे की, ‘हे पुस्तक वाचू नये’, ‘वाचणारा गाढव’, इत्यादी. सकारात्मक नोंदी म्हणजे पुलं-वपुंच्या पुस्तकांत अनेक सुंदर वाक्याखाली पेनाने वारंवार ओढलेल्या रेघा आणि समासात काढलेल्या पसंतीदर्शक चांदण्या. काही वेळेस तर काही वाक्ये कित्येक वेळा अधोरेखित करून तिथे पुस्तकाचे पान फाटल्यागत झालेले असायचे.
>>>>>
या शेरेबाजीचा वाचकांवर परिणाम होतो. हे अगदी खरं..

मी एकदा असंच एक हिंदी पुस्तक कॉलेजच्या लायब्ररीतून आणलं होतं. सुरवातीच्या १५-२० पान वाचून झाल्यावर हे" पुस्तक वाचून उगाच वेळ बरबाद करू नये." असं लाल पेनाने कोणीतरी लिहिलेलं होतं. पुढची ३-४ पान वाचून ते पुस्तक मी लायब्ररीत परत केल्याचं आठवतंय मला.. Lol

छान परिचय
पुस्तक वाचायच्या यादीत टाकलं आहे

वरील सर्वांचे अभिप्राय आणि पूरक माहितीबद्दल मनापासून आभार !
.............
या निमित्ताने अभ्यासातील वाचनवेडाचा एक किस्सा लिहितो. हा माझ्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील एका सहकाऱ्याबाबतचा आहे.

अभ्यासक्रमात आम्हाला दोन प्रकारची पुस्तके असायची. त्यातली काही मध्यम आकाराची तर काही अवाढव्य (अगदी 2000 पानांपर्यंत) असायची. साधारणपणे आपण अभ्यास करताना आपल्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकातले आवश्यक तेवढेच वाचतो. प्रत्येक पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचायची विद्यार्थी म्हणून गरज नसते. पण माझा हा मित्र मात्र भारी ! त्याचे एक तत्व होते. जे पुस्तक आपण विकत घेऊ, ते तो अथपासून इतिपर्यंत संपूर्ण वाचणारच. अगदी शेवटच्या सूचीच्या पानांवरही तो पूर्ण नजर फिरवायचा आणि कृतकृत्य व्हायचा.

हेही एक प्रकारचे वेडच….

लोकं पुस्तकांवर लिहुच कसे शकतात हे कळत नाही
स्वतःच्या मालकीचे असले तरी मला पुस्तकावर लिहिणे, रेघोट्या मारणे इतकंच काय पानांचे कोपरे दुमडणे, उघडे पुस्तक पालथे ठेवणे या गोष्टींचा अतीव संताप येतो
कुणी करत असेल तर बघणे असह्य होतं

माझी एक बॉस होती.वाचनाची अतिशय आवड होती,घरी पुस्तकांचा संग्रहही होता.एकदा लायब्ररीमधून आणलेले पुस्तक मला दाखवले.आम्ही दोघी बोलत असता पुस्तक चाळता चाळता,मी पुस्तकाचे दुमडलेले कोपरे सरळ करत गेले.वर म्हटलेही कसं बाई माणसे पाने दुमडतात! तर तीच म्हणाली नाही ग, मीच खुणेसाठी दुमडते.
आता काय बोलणार? तरीही बोलायचे ते बोललेच.

तो श्लोक कोणाला माहीत आहे का?
"तैलात रक्षयेत.......... वदते पुस्तकः". पुस्तक म्हणते की तेल,आग,पाणी यापासून तर वाचवच,पण मूर्ख माणसापासून माझी रक्षा कर.

आशु. , देवकी +१००००

देवकी,
सापडला तो श्लोक :

तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिल बंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

मी मध्ये असे कोपरे दुमडून ठेवणाऱ्या लोकांना बुकमार्क दिले होते गिफ्ट
पण त्यांची सवय काही सुटली नाही त्यामुळे नंतर सोडून दिले प्रयत्न

>>>बुकमार्क >>>
खूप छान सवय. आम्हालाही वडिलांनी लावली .

समाजात सतत कुठे ना कुठे हिंसाचार होतच असतो आणि त्याच्या बातम्या वाचल्या की काही वेळेला भयानक अस्वस्थ वाटते.
यासंदर्भात या पुस्तकात सर्बियन कादंबरीकार मिलोराद पाविच यांचे एक वाक्य आहे. ते खूप आवडले. ते असे :

जोवर जगात पुस्तक वाचणार्‍या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिकांहून अधिक आहे तोवर काळजीचं काहीच कारण नाही.

छान पुस्तक परिचय..
मलाही पुस्तक खराब करायला आवडत नाही....मी कुठपर्यंत वाचलंय हे पान नंबर लक्षात ठेवते आणि पुढच्या वेळी तिथून पुढे सुरू करते किंवा मग बुकमार्क !

मार्क ट्वेन यांचा छान विनोद:

"दुसऱ्याला दिलेले पुस्तक कधी परत येत नाही. म्हणून तसे देऊच नका. मी हे स्वानुभवातून सांगतोय. माझे स्वतःचे ग्रंथालय अशाच (उधार) पुस्तकांतून उभे राहिले आहे !"

‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ संचालित साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालयाचा सतरावा ‘साहित्य साधना पुरस्कार’ ११ फेब्रुवारी २०२३ रोजी जयप्रकाश सावंत यांच्या ‘पुस्तकनाद’ आणि नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकांना विभागून देण्यात आला.

या पुरस्कारविजेत्या लेखकांची मुलाखत :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6675