झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुडेकर च्या लहानपणी चा ट्रॉमा प्रसंग आणि सध्याचं वागणं याची (परखड शब्दात चुकीच्या जाणवलेल्या गोष्टींचा निषेध हा कॉमन मुद्दा सोडून) लिंक मनाला भिडत नाही.>>> +१ त्यांच्यातले भांडण उगाच फार ओढून ताणून मोठे केल्यासारखे वाटते. जो तो आपल्या मर्जीने पीत असतो, कोणी कोणाला घेच म्हणून मागे लागलेले नसते. मधेच उठून कोणावर तरी अन्याय होत असल्यासारखे चिडचिड करत ही बडबडते आणि निघून जाते.

खरं तर फक्तं नावं चललि असती. आड्नावांची गरज नव्हती.

सोनालिचा नवरा अति अति नम्र दाखविला अहे.

सोनाली त्या हीरोच्या फार मागेपुढे गोंडा घळताना दाखवलीये. ऑर मे बी शी ईज जस्ट फ्रेन्ड्ली.’ चांदेकर चक्क कटवतो तिला

मराठी सिनेमा म्हणून तसा आवडला.... पण तरी something is missing असं सतत वाटत राहिलं.
शेवटी सि.चां.चं स्वगत आहे (क्लायंट्सना घेऊन गेलो होतो, मैत्रिणींना घेऊन परत आलो) ते कथानकातून प्रेक्षकांना आपसूक कळायला हवं होतं... त्याची खात्री न वाटल्याने ते स्वगतातून सांगितलंय असं वाटलं.

टूर ऑपरेटर, त्यात पहिलीच टूर यामानाने तो अगदी निवांत दाखवलाय.

निर्मिती सावंत आणि क्षिती जोगचं काम खूप आवडलं.

शेवटचं whatsapp chat भारी आहे एकदम Lol

सायली संजीवचं कॅरेक्टर चांगलं आहे, पण तिच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वात त्यासाठीचं zest, energy अजिबातच नाहीये, त्यामुळे ते पात्र फ्लॉप गेलेलं वाटलं शेवटी.

सो.कु.(२) चा वॉर्डरोब आवडला, पण ती बघवत नाही स्क्रीनवर.

हेमंत ढोमे नाटकात भारी वावरतो, सिनेमात जरा अवघडल्यासारखा वाटतो.

शेवटचं whatsapp chat भारी आहे एकदम Lol >>> हो, मी ते थिएटरलाही पुर्ण वाचलेले आणि परवा घरी बघतानाही मजेने वाचत होतो. तेवढ्यात बायको टीव्ही बंद करून निघून गेली. तसे मी तिच्यावर चिडलो. तर माझ्याकडे चक्रम बघितल्यासारखे बघायला लागली Proud

सिनेमा चालला का..?
>>>>>>

Is Jhimma hit or flop?
Yes, Jhimma has been making solid business and declared as the superhit film at the box office.
Jhimma completed 50 days in cinemas with many records and the film has collected ₹14.07 crore.
8/10 · IMDb
95% liked this film

प्राईमवर आला आहे त्यामुळे ४५ मिनिटं रेटत रेटत कसाबसा बघितला. काही संगतीच लागेना कशाची कशाला. नशीब थेटरात जायचा शहाणपणा नाही केला. जाऊ दे झालं!!

अजिबात आवडला नाही. दोन तास वाया गेले असं वाटलं.
एक निर्मिती सावंतांचा अभिनय एवढीच काय ती जमेची बाजू आहे, बाकी धन्य आहे!

रिव्हर्स इंजिनिअरिंग करुन मिळालेल्या सोल्यूशन्सना प्रॉब्लेम चिकटवून केलेला चित्रपट. वर कोणीतरी म्हणालंय तसं कुठल्या पात्राचा काही ग्राफच दिसत नाही.
आधी सगळ्यांनी मिळून मिसळून वागायचं. मग एका पॉईंट नंतर अचानक कचाकचा भांडयचं. मग सोप्पं तर होतं आपणंच उगाच कॉम्प्लिकेट करतो वालं काही तरी सोल्युशन काढायचं आणि मग शेवट गोड तर सगळ गोड. यात आपलं कॅरेक्टर काय, त्याचे स्वभाव, आवडी काय, वागण्याला आणि बदलाला काही सारासार विचार हवा का नको, तो तसा होण्यासाठी काही दृश्य अदृश्य प्रसंगांची जोड हवी की नको... तर नकोच. कन्विनिअंटली गळ्यात गळे घालायचं ठरलंय ना? मग घालूच या! त्यात तो निखिल दिग्दर्शकही आहे म्हणे. त्याच्याकडे सोकू ने गेलंच पाहिजे धरुन चालू.... तर जायला कारण करंट क्रश आपल्याशी फ्लर्ट करत नाही? बस्स?
त्या बब्बूच्या गुज्जू बायकोला शेवटी समुद्रावर उलटी होणार, आणि तिचा ही मा बनायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं मला फार वाटलं होतं. ते मात्र झालं नाही. सो तिचा काही तरी वेगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असणार बहुतेक.
पटकथाच फ्लॉड होती. अभिनय वगैरे चांगलं असून काय फायदा!

अगदी अगदी हेच मनात आले, असह्य झाले चित्रपट संपेपर्यंत यांचे गुऱ्हाळ बघताना

क्षिति जोग हरवते आणि गुगल मॅप वापरून परत हॉटेल वर येते तो प्रसंगही बळच, सोनाली ला कळत की आपण तिला सोडूम आलोय, पटकन टूर ऑपरेटर सांगितले असते की लास्ट आम्ही इथे थांबलो होतो, गाडी काढली असती घेऊन आले असते
विषय संपला असता, जर तुमचं तुम्हालाच मॅनेज करायचं तर टूर ऑपरेटर काय फिरायला येतो का
अशा प्रसंगा साठीच तर असतो ना

ती सायली संजीव पळून का जाते तेही कळत नाही
तो ऑपरेटर काय नाही म्हणणार का
तिचे पैसे भरून झालेले आहेत, आता ती म्हणाली मी नाही येत इथून
तो म्हणेल ठिके, तसे लिहून द्या की आमची जबाबदारी संपली, मग कुठेही तडफडा जाऊन
यात त्याने चिडचिड करण्यासारखे काय आहे, म्हणे बदनामी होईल म्हणे

ट्रेलर पाहून मला हा पिक्चर अजिबात आवडणार नाही असे वाटले होते. पण बघणेबल वाटला. वरती ज्या गोच्या लोकांनी लिहील्या आहेत त्यातील काही मला बघताना जाणवल्या पण बर्‍याचश्या इथे वाचताना जाणवल्या.

त्या बब्बूच्या गुज्जू बायकोला शेवटी समुद्रावर उलटी होणार >>> लोल हे जबरी आहे.

त्या दोन तीन रॅण्डम मुली म्हंटले तर ग्रूप मधे आहेत म्हंटले तर नाहीत अशा का अधूनमधून दिसतात माहीत नाही. बहुधा रोल्स नंतर एडिट केले असावेत.

कामे निर्मिती सावंत सर्वात भारी. नंतर सुहास जोशी, क्षिती जोग. बाकी साधारण एकाच लेव्हलला.

सोनाली कुलकर्णी चा रोल मृण्मयी गोडबोलेला जास्त सूट झाला असता. कदाचित सायली संजीवचाही. तिने काम चांगले केले आहे पण मिसकास्ट वाटते. हेमंत ढोमेचा रोल ऑल्मोस्ट "सुबोध" (दिल चाहता है) च्या वळणावर जातोय असे वाटले.

आणि लेको तुम्ही सिनेमा दाखवत आहात. जो सीन प्रेक्षकांपुढे सादर झाला आहे तो पुन्हा नाट्यवाचन केल्यासारखा प्रेक्षकांना पुन्हा सांगायची गरज नाही. पब्लिकला समजावून घेउ दे.

फिरण्याची आवड या एका कारणाने जर लोक ट्रॅव्हल कंपन्या काढत असतील तर त्या हिशेबाने मी रेल्वे इंजिन ड्रायव्हर (लोक पायलट का काय ते) किंवा गार्ड व्हायला हवे होते Happy

एवढे असूनही बघताना कंटाळा आला नाही हे नक्की. एक दोन प्रसंग जेन्युइन आवडले. लक्षात नाहीत - सुहास जोशी (तिचे क्षिती जोगला "आमचे पण मिस्टर गेलेत, म्हणून काय कायम रडत बसणार का..." उत्तर अफलातून होते) किंवा निर्मिती सावंतचे एक दोन संवाद होते.

हो हो. मला काही काही प्रसंगात जाम हसू आलेलं. सुरुवातीचे पण एक दोन होते.
बांदेकर आणि ती टीन टॉवेल सीन बद्द्ल बोलत असताना सो.कु. येते आणि बडबड चालू करते तर ती म्हणून "तू चालत्या गाडीत चढू नको' Proud

बापरे..! ताज्या प्रतक्रिया वाचल्यावर हा सिनेमा टिव्ही लागला तरी बघावा की नाही असा प्रश्न पडला आहे.

ऋन्मेष ने स्वतंत्र धागा काढून एवढा भारी झिम्मा का खेळला असावा..? सिनेमात त्याचा पण एखादा रोल असावा अशी शंका येते..! Wink

सुहास जोशी (तिचे क्षिती जोगला "आमचे पण मिस्टर गेलेत, म्हणून काय कायम रडत बसणार का..." उत्तर अफलातून होते) किंवा निर्मिती सावंतचे संवाद होते>> तो निर्मिती सावंत आणि क्षिती जोग चा चर्चमधला संवादही छान होता.. त्याच बरोबर तीचं टेक्निकली चॅलेंज्ड असणं आणि मग त्यातून मार्ग काढणं हे फेक वाटत असलं तरीही अशा बऱ्याच जणी बघते मी..म्हणून तेही आवडलं.. प्लस तो रात्रीचा स्टेशनवरचा सीनही मस्त वाटला.. बहुतेकदा आफ्रिकन लोकांना आपल्याकडची लोकं घाबरतात पण ते सगळेच वाईट नसतात हे छान प्रकारे मांडलंय.. आफ्रिकन्सची इमेज खराब होऊ दिली नाही.

सोनाली ला कळत की आपण तिला सोडूम आलोय, पटकन टूर ऑपरेटर सांगितले असते की लास्ट आम्ही इथे थांबलो होतो, गाडी काढली असती घेऊन आले असते>>> बऱयाचदा हुशार लोकांचाही कॅामनसेन्स गंडतो.. लवकर ट्यूब पेटत नाही म्हणून तो सीन उगाचच वाढवलाय असं नाही वाटला

मलाही नाही आवडला, जेवढा उदो उदो होतोय तेवढा तर अजिबातच नाही, निर्मिती सावन्त आणी सुहास जोशी सोडल्या तर एकाही कॅरेक्टरला निट एस्टब्लिश केलेल नाही , सुरवातिपासुन बरेचसे सवान्द खुप नाटकी वाटतात, सोकुला पॉन्डस देण्यापेक्षा निर्मितीला दिली असति तर जास्त बरोबर ठरले असते.सोकुचा वॉर्डरोब सुरेख आहे.
सायली सन्जिव त्या सगळ्या मॉडर्न अवतारात अजुन बावळट दिसते त्यापेक्षा म्रुण्मयिने तो रोल जास्त चान्गला केला असता.

क्षिति जोग हरवते आणि गुगल मॅप वापरून परत हॉटेलवर येते तो प्रसंगही बळच >>> अगदी !!

सुहास जोशीला स्वत:चा मुलगाच एका ठिकाणी दिसतो हे सुद्धा ओ.ता. वाटलं.

आणि लेको तुम्ही सिनेमा दाखवत आहात. जो सीन प्रेक्षकांपुढे सादर झाला आहे तो पुन्हा नाट्यवाचन केल्यासारखा प्रेक्षकांना पुन्हा सांगायची गरज नाही. पब्लिकला समजावून घेउ दे. >>> परफेक्ट Lol पण प्रेक्षकांना समजेल का याचीच खात्री नाही दिसली कुठे.

सि.चां.चा प्रत्येकीबरोबर एकतरी लहानसा का होईना इन्टेन्स सीन हवा होता... निर्मिती सावंत आणि त्याचा आहे (मायेची माणसं वगैरे) तसा... त्यातून क्लायन्ट --> मैत्रिणी हा प्रवास दिसला असता.
सो.कु.बरोबरचे त्याचे सीन्स तसा फक्त भास निर्माण करतात... पण ते फारच वरवरचे आहेत.

सायली संजीवचं पात्र खरंच मृण्मयी गोडबोलेनं जास्त चांगलं केलं असतं.

बघताना खूप काही कंटाळा आला नाही हे खरं, पण स्क्रिप्टवर आणखी काम करायला हवं होतं.

१. सुहास जोशीचं कॅरेक्टर इतकं सॉर्टेड आणि फटकळ आहे तर ती खोटं न बोलताही लंडन फिरू शकली असतीच की
२. निर्मिती सावंतचं कॅरेक्टर परस्पर टूर बुक करून नवर्‍याला 'इन्फॉर्म' करण्याइतकं स्वतंत्र ऑलरेडी आहे - मग शर्टाचं काय एवढं
३. गुज्जू बाई 'तिला वाटलं, ती गेली!' म्हणून इम्प्रेस होते - मग स्वतः आलीच आहे की टूरवर स्वतःला वाटलं म्हणून
४. सोकु आधी वैतागलेली का असते आणि मग काय बदलतं तिचं तिलाच माहीत
५. क्षिती जोगच्या नवर्‍याने डिप्रेस्ड असतानाही तिला जन्मभर पुरेल इतका - अगदी लंडन ट्रीप होईल इतका - पैसा मागे ठेवला होता? बाकी ती हरवण्याच्या प्रसंगाबद्दल आशूचँप यांनी लिहिलंच आहे.
६. बांदेकरांच्या चाइल्डहुड ट्रॉमाचा सिनेमातल्या भांडण्याच्या प्रसंगाशी काय संबंध आहे? तिला कोणी फोर्स करत असतं का? आणि मग दिलजमाई होते तिला काही बेसिस?
७. चांदेकर आधी वैतागलेला का असतो आणि शेवटी 'तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी झालात ' असं का म्हणतो? त्यांच्यात नक्की काय बॉन्डिंग झालं आणि कधी आणि कुठे?
८. सग्गळ्यांचे प्रॉब्लेम्स नवरा, मुलं, लग्न याचभोवती कसे फिरतात? हॉर्टीकल्चरची आवड असणारी बाई झाडापानांकडे एकदाही निरखून पाहात नाही आणि फॅशन डिझायनर असणारी बाई फॅशन्सकडे. एकमेकींना कपडे/टोप्या वेगळ्याच बाया घेऊन देतात.
एकूण प्रोफेशन हा विषय बायांनाच का चांदेकरालाही नाही. टूर ऑर्गनाइझ करतो म्हणजे नक्की काय? 'हे कथिड्रल आहे - म्हणजे यांचं देऊळ' ही 'माहिती'?!!
९. चांदेकराच्या रूममध्ये मुलींनी जाऊन लोळणं (आणि सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात करणं) आणि ज्येनांनी दारवा पिऊन शर्टपॅन्ट घालणं हे लिबरेशन म्हणायचं का?
असो. Proud

झिम्मा पूर्ण बघवला हे खरे. वर लिहिलेल्यात तशा काही फनी मोमेन्ट्स आहेत, निर्मिती सावंत चे काम भारीय! गोष्टीत पोटेन्शियल होते पण लेझी डायरेक्शन मुळे वेस्ट गेला असे म्हणेन.
गोष्टीवर अन हाताशी असलेल्या चांगल्या कलाकारांवर संतुष्ट होऊन मग दिग्दर्शकाने हातच झटकले बहुतेक. सिनेमा खुलवायला मेहनतच घेतलेली नाही. अन वर प्रॉडक्ट प्लेसमेन्ट्स ?!! Uhoh सॅनिटरी पॅड्स ची जाहिरात वगैरे कै च्य कै!
सुहास जोशीची दोन्ही मुलं इंङ्लंड ला असतात ना? त्यांच्याकडेच तिला रांधा वाढा नतवंडाना सांभाळा ड्यूटि करावी लागत असते? मग ती भारतातून कशी आलेली दाखवली आहे?
निर्मिती सावंत चे कॅरेक्टर आवडले, क्षिति जोग चे पण ठीक , जरा तरी लॉजिकल, रीलेट झाले. पण बाकी कुणाचे प्रॉब्लेम्स झेपलेच नाहीत. त्यावरचे सोल्युशन्स तर अजूनच तकलादू.

स्वाती लक्तरं काढलीस Happy
खूप फ्लॉज आहेत हे बाकी खरे आहे.
पण फक्त गंभीर किंवा फक्त गोडगोड आणि रोमॅंटिक सिनेमांपेक्षा आवडला.

>> क्षिती जोगच्या नवर्‍याने डिप्रेस्ड असतानाही तिला जन्मभर पुरेल इतका - अगदी लंडन ट्रीप होईल इतका - पैसा मागे ठेवला होता? >> इथे आधी लाईफ इंशुरन्सवाल्यांची जाहितात घातलेली होती. त्यांनी आयत्यावेळी पैसे दिले नाही म्हणून तो पार्ट उडवला.

अमित Lol

- निर्मीती सावंत, बंजी जंपिंग बद्दल बोलताना सायली संजीवला जे हसू येतं ना - ते खरं तर संतापजनक आहे.
- सुहास कुलकर्णी जोशी यांचे सतत खोटे बोलणे, "मी तिला सांगीतलं पण माझ्या म्हातारीचं ऐकेल तर ना" वगैरेचा खरं तर रागच येतो. कशाकरता खोटं बोलत बसायचं?
- सुहास कुलकर्णी जोशी छान दिसल्यात. मला त्यांचा वॉर्डरोब आवडला.
- सोकु म्हातारी नाही वाटली मला. आताशा लग्ने जरा उशीराच होतात.

ती क्षिती जोग हरवते त्याचं कोणालाच काहीच वाटत नाही, पण 'आमच्यातली भांडणं सोडव नाहीतर वाईट रीव्ह्यू देऊ' म्हणे! Lol

>>> ते खरं तर संतापजनक आहे
सगळा सिनेमाच संतापजनक आहे. Proud

बापरे . झिम्मा ची एकदम धिंड च काढली आहे इथे..
मी थिएटर मध्ये जाऊन पहिला तेव्हा खरंतर मला आवडला होता तेव्हा.
पण इथे वाचून आता इथे लिहिलेलं पण पटायला लागलंय.. Wink

दोन वर्षांच्या गॅप नंतर चित्रपटगृहात जाऊन बघितलेला पहिला चित्रपट हे कदाचित चित्रपट आवडण्याचं खरं कारण असावं माझ्याबाबतीत Wink Happy

सुहास जोशी सामो Happy

वरचे सगळे दोष मान्य आहेत, पण मला आवडला हा सिनेमा.
अजून चांगला होऊ शकला असता, पण अजून खूप वाईट होण्याचीही संधी होती, तसं झालं नाही. अति बटबटीतपणा, अति टीपिकलपणा, अति पुस्तकी वाक्यं वगैरे नाहीत फारशी.

खरंतर इतक्या जणी घेऊन मस्त बनला असतं की वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या विविध वयोगटातील बायका एकत्र येऊन कशी धमाल करतात, त्यांचे प्रिज्युडीस कसे मोडतात वगैरे
उगाच प्रॉब्लेम आणि रडारड घातलीय
निर्मिती सावंत बद्दल अनुमोदन त्यांनी मस्त केलाय रोल
साहेब म्हणतात तो 90चा द्या
आणि नंतर प्यायला हवं असतं पण कस म्हणावं हे कळत नसल्याने होत असलेली घालमेल मस्त घेतली आहे
आई बद्दल चे संवाद पण त्यांनी मस्त घेतले आहेत

बाकी क्षिती जोग चे पात्र अगदी ऐन वेळी घुसडून दिले असे त्यांनीच मुलाखतीत सांगितले
मला तर फक्त ट्रेलर च आवडला, तेवढाच होता सिनेमा Happy

>>> सुहास जोशीची दोन्ही मुलं इंङ्लंड ला असतात ना? त्यांच्याकडेच तिला रांधा वाढा नतवंडाना सांभाळा ड्यूटि करावी लागत असते? मग ती भारतातून कशी आलेली दाखवली आहे?
ती यात्रेचं कारण सांगून भारतात जाते आणि उलटपावली लंडन फिरायला येते (:कपाळबडवती:)

Pages