झिम्मा - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2021 - 07:38

झिम्मा - मराठी चित्रपट

झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.

याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.

ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A

चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही Happy

म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्‍याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.

ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.

सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा Happy

गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.

चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्‍यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.

अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.

बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप Happy

थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला Happy

असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिला... आवडला.
एक तर इतक्या दिवसानंतर सिनेमाघरात गेलो हेच अप्रूप होते. बॉण्ड की ढोमे ह्यात ढोमे जिंकला. बऱ्यापैकी चित्रपट जमला आहे. झिम्मा गाणे फार ग्रूविंग आहे. निर्मिती सावंत ह्यांचा स्क्रीन प्रेसेन्स हशा पिकवतो. इतर कलाकार पण छान.

मस्त आहे सिनेमा.

त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते. >>> +१२३ उगाच रडारड नाही, मस्त हलकाफुलका आहे.

परत नक्की बघणार आहे.

छान आहे झिम्मा! स्पॉइलर असं नाही पण सिनेमा पाहणार असाल तर मग कदाचित पुढची पोस्ट वाचून रसभंग होऊ शकतो.

मला थोडी खटकलेली गोष्ट म्हणजे मृण्मयी गोडबोलेच्या characterची अशी काही आर्क दिसली नाही. ती ट्रिपला का आली होती आणि तिला ट्रिप मधून काय गवसलं असं मला तरी लक्षात आलं नाही. शिवाय आम्ही बाळ होण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणणारी मुलगी दारू पिते हे तर अगदीच कॉमन सेन्स च्या पलिकडे वाटलं! उलट तिला ड्रिंक अॉफर केल्यावर मी पिणार नाहीये असे सांगणारा सीन असता तर ते एकदम पटले असते. ही इतकी साधी गोष्ट कशी काय मिस होते?
बाकीचा सिनेमा खूप छान प्रसन्न झालाय. सगळ्यांची काम उत्तम. मला सगळ्यात आवडलेला प्रसंग म्हणजे सगळ्याजणी बागेत निवांत लोळत असतात आणि कोणी त्यांच्याकडे ढुंकूनही पहात नाही. भारतीय लोकांच्या विशेषतः पुरूषांच्या नजरा हा इतका invasive प्रकार आहे. त्यापासून दूर गेल्यावर जाणवणारा मोकळेपणा फार फार हवासा वाटतो. भारतात एका रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत काही बायका लोळत पडल्या आहेत आणि त्यांच्याकडे कोणी पहात सुद्धा नाहीये असं चित्र मला कल्पनेत सुद्धा दिसत नाही. It's not a big ask really but still women in India don't have this pleasure Sad त्यामुळे हा प्रसंग खूप आवडला!

जिज्ञासा +१
Spoiler:

मला खटकलेली गोष्ट म्हणजे जेव्हा क्षिती जोग हरवते...त्या वेळी स्वतः पत्ता शोधत जाण्यापेक्षा त्यांचा WhatsApp ग्रुप वर का नाही मेसेज करत..कोणतरी तिला न्यायला आले असते..given that finding adress on maps was difficult for her..(फ्लॅशबॅक)

मुलीसोबत पाहिला मी झिम्मा... आम्हाला पण खुप आवडला... हलकाफुलका मस्त.... एकदम साधा , सरळ....

स्पॉईलर :
मीता हरवते तेव्हा स्टेशन वर आलेला काळा माणुस बघुन अरे बापरे आता हा वाईट असणार आणि कोणीतरी तिला वाचवायला येणार किंवा ती फाईट करणार त्याच्याशी वगैरे असं सगळं डोक्यात आलेलं...(thanks to typical cimemas... ) पण तो एकदम साधा , सरळ तिच्या मनात काय चाललेलं असु शकेल हे समजुन घेणारा निघाला... मग पुढे जाउन परत तो दुकानदार पण फसवणार, गेला बाजार मोबाइल तरी हरवणार... असं आलं मनात तर ते पण नाही... मीता ला हॉटेल सापडतं तेव्हा तिच्या सोबत आपल्या पण डोळ्यात पाणी येतं... आपला हरवलेला आत्मविश्वास परत मिळाणं हे feeling किती भारी असेल ना ?
आपण तेच तेच ठराविक सिनेमे बघुन किती गोष्टी गॄहीत धरुन चाललेलो असतो.. पण त्या सगळ्याला छेद देतो हा चित्रपट... कोणी हीरो नाही, कोणी व्हिलन नाही... सगळे आपल्या आजुबाजुला असलेले लोक आहेत...म्हणुनच कदाचित आवडला असेल जास्त...

झिम्मा चे सीन डीस्कस करायला धागा काढा यार... अजुन लिहावसं वाटतय... Happy

इतक्या दिवसाने , थेटरात सिनेमा पाहिला हेच कारण मस्त होतं. त्यामुळे ज्यास्तच उत्साहाने गेलो.
मला सिनेमा आवडला. कथेत काही नाविन्य नाही पण मांडणी आवडली.
निर्मिती सावंत आवडलीच.
स्पॉईलर अलर्ट!!
बाकी, प्रत्येक पात्राची ओळख नीट झाली . रमा ह्या पात्राला सटल दाखवलेय. रमा, कामातून सुटून हा बाहेर फिरण्याचा निर्णय ती घेवु शकली हेच तिच्यासाठी महत्वाची पायरी होती. म्हणूनच जेव्हा कृत्तिका कसलाही विचार न करता पळून जाते तेव्हा तिलाच ज्यास्त अमेझिंग वाटते. कित्येक स्त्रीया कौटुंबीक जबाबदारीत दबल्या असतात की, साधी सुट्टी घेवून जाता येत नाही किंबुहुना त्या स्वतच गृहित धरतात की त्या असे करु शकत नाही. आणि ह्याच स्ट्रेस खाली जगतात व त्या स्ट्रेस्सचा परीणाम फर्टिलीटी वर सुद्धा होतो. बाकी, रमाचे दारु पिणे चुकीचे वाटले.
मीता फोनवर बॅटरी कमी असल्याने फोन चार्ज करण्याचा विचारात गोंधळते. त्यात ती थोडीशी वेंधळीच आहे त्यामुळे आपण कस्काय वर बोलुया लक्षात येत नाही बहुधा.

गमवलेला आत्मविश्वास मिळणे हि अतिशय सुंदर भावना असते.
मला विचारा ना. Happy
असो.

तारक मेहता का उलटा चष्माचे काही एपिसोड असे आहेत. एसेल वल्ड, सिंगापूर, पटेल पुतळा टुअरस.
बॉम्बे टु गोवा कसा होता?
----------–

चित्रपटांत मॅजिक बघायचे असते
लॉजिक नाही. ( खुलासा)

भारतात एका रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत काही बायका लोळत पडल्या आहेत आणि त्यांच्याकडे कोणी पहात सुद्धा नाहीये असं चित्र मला कल्पनेत सुद्धा दिसत नाही.
>>>>>

चित्रपट बघताना हा अँगल लक्षातच आला नाही. अश्या बायका बागेत दिसतात तेव्हा आपण त्याकडे कसे बघतो असाही विचार मनात आला.

पण मला वाटते बरेचदा ती रोखून बघणारी नजर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे दिसतेय ईतकीच असते. एकदा हे वरचेवर आजूबाजूला दिसू लागले की कोणाला याचे कौतुक राहणार नाही. बदल घडवणे आपल्याच हातात असते. जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मर्जीने व्हावी असे वाटत असेल तर कोणी दुसर्‍याने पुढाकार घ्यायची वाट का बघावी... असा विचार प्रत्येकीने करायला सुरुवात करावी.

स्पॉयलर वाचले नाहीत पण सिनेमा नक्की पहायचा आहेच. ट्रेलर खूपच आवडले होते. सिद्धार्थ चांदोकर फार गोड व गुणी कलाकार आहे.

मला ठीक वाटला मुव्ही. अगदी वॉव नाही जेवढा हाईप केला. मराठी चित्रपटाचं लंडनमधे शुटींग एक जमेची बाजू म्हणता येईल.
निर्मिती सावंत आणि सुहास जोशी बेस्ट आहे मात्र.

सुचेता आणि सुहास जोशीचं बळंच भांडण दाखवलंय. एकत्र येण्याचं कारणही परत फुसकंच. सुहास जोशी आणि बाकीच्या वॅकेशन वर दारू पितात तर हिला काय एवढं भांडायचं कारण तेच कळलं नाही. म्हणे अन्याय झाला की बोंबलून उठायचं. इथे कोणी हिला पिण्यासाठी जबरदस्ती करताना दाखवलं का ? मी मिसलं असेल. काही काही तत्वज्ञानं बळंच घुसडली आहेत. एक सिरीयस सिन, एक उपदेश डोस, एक लाफ्टर सीन असं अगदी ओळीत ठरवून आल्यासारखं वाटतं. रमाची काहीच स्टोरी दाखवली नाही. तिला पण बहुतेक त्या सायली संजीव सारखं फ्री जगायचं असतं. एक दोन वेळा भारी आहे हे म्हणते त्यावरून वाटलं.
सोनालीच्या स्टोरीत पण कबीर दुसर्‍या मुलीबरोबर गेला की हिला लगेच कसं निखिलबद्दल वाटा यला लागतं तेही कळलं नाही. निर्मितीचं एकूण सुरवातीचं आणि ओव्हरॉल वागणं बघता हिने एकटीने कसं परदेशात जायचं बुकिंग केलं असं वाटून गेलं. पण तिचं आपणंच आपल्यावर कधी कधी बंधनं घालून घेतो हे वाक्य जाम पटलंय.

फारच लॉजिक ठेवुन गेले का मुव्ही बघायला Proud

हे मा वै म आहे. सगळे याच्याशी सहमत नसू शकतात याची पूर्ण कल्पना आहे.

हो गं.. फँडेगो वर बघ.. पुढच्या शनिवार रविवार १.३० वाज्ता बिग सिनेमा ला आहे.

अंजली यांच्याशी सहमत. मलाही ठिकठाकच वाटला. सुहास जोशी आणि बांदेकर यांचं भांडण कशावरून झालं तेच कळलं नाही आणि मिटलं कसं तेही नाही. कृतिका, रमा, मीरा या नावामध्ये कोण कुठली हे शेवटपर्यंत लक्षात राहिलं नाही. मायलेकीमध्ये नक्की का पटत नाही हेही कळलं नाही. सोनाली कुलकर्णीचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळलं नाही. एकदा वाटलं तिचं जबरदस्ती लग्न करून देतात, एकदा वाटते तिचा बीफ असेल पण तसं काहीच नसतं.
लंडनला किंवा परदेशात आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट शूट झालेत. सुहासची मुलं तिथेच राहतात आणि तीही तिथंच राहते तरी ट्रॅव्हल्स बरोबर फिरायचं प्रयोजन कळलं नाही. म्हणजे एकटी फिरू शकणार नाही अशी ती अजिबातच नाही. मुलांशी व्यवस्थित संवाद नाही हे कारण असू शकतं. अजून दोन जणी होत्या बहुतेक पण त्या फक्त संख्या वाढवायला असतील.

भांडण, ट्रिप मधे पिण्यावरून होतं.
कृतिका - सायली संजीव
रमा - मृण्मयी गोडबोले
बाकी नावं खरचं खूप confusing होते.

मीरा मिता - क्षिती जोग
सुचित्रा बांदेकर - vocal होण्याच्या नादात जिथे तिथे नको त्या गोष्टीवरून पंगे घेणारी व्यक्तीरेखा आहे असं वाटलं. उगीच वाद उकरून काढलेला असतो तिने. पटणेबल!
थोडा तुटक तुटक आहे हे नक्की. थोडा मोठा करून या गॅप्स भरल्या असत्या तर अजून wholesome (परिपूर्ण?) वाटला असता हेमावैम.

सोनाली कुलकर्णीचा काय प्रॉब्लेम असतो तेच कळलं नाही. एकदा वाटलं तिचं जबरदस्ती लग्न करून देतात, एकदा वाटते तिचा बीफ असेल पण तसं काहीच नसतं.
>>>>

बहुधा तिला लग्न करायची ईच्छा नसताना लग्न होत असावे. मुलगा आवडीचा आहे की नाही हे नंतर आले. त्याचा ती विचारही करत नसावी. तिची बस्स लग्नाची ईच्च्छा नसावी. पण लग्नाचे वय झालेय, नकार द्यायला काही ठोस कारण नाही, घरच्यांनी ओळखीचा मुलगा शोधलाय. लग्न होतेय. अश्यात आपले स्वातंत्र्य हरवतेय, कोणीतरी आपल्या डोक्यावर येऊन बसतेय हे नकोसे वाटते.
याऊलट जेव्हा आपण प्रेमात पडून लग्नाचा निर्णय घेतो तेव्हा मात्र कोणीतरी आपल्यावर हक्क गाजवणारे हवे असे वाटत असते.

टूरवर तिची कबीरशी मैत्री होते, सॉफ्ट फ्लर्टींग वगैरे चालू असते. नंतर तो सहजच एका गोर्‍या मुलीच्या मागे निघून जातो. तेव्हा हिला अचानक जाणवते की अशी मैत्रीची नाती आयुष्यभर पुरत नाही. यात स्वातंत्र्य मिळत असले तरी कधीतरी आयुष्याच्या एक टप्यावर कोणीतरी एकच हक्काचा माणूस हवा जो आपल्याला कधीच एकटा पडू देणार नाही. हि जाणीव अचानक तिला होते. आणि ती जो पर्याय समोरून ईंटरेस्टेड आहे अश्या प्रकारच्या नात्यासाठी त्याला एक संधी देते.

खूप ट्रॅक एकत्र झाले आहेत, त्यामुळे सविस्तर खुलवले नाहीत, व्यावसायिक गणित साधायला सिनेमा मनोरंजक करण्यावर भर दिला आहे असे वाटते.

ढोमेच्या आधीच्या च चित्रपटात होते की सगळं लंडन चेच शूटिंग
बघतोस काय मुजरा कर मध्ये>>>>> हो का नव्हतं माहित.

खूप ट्रॅक एकत्र झाले आहेत, त्यामुळे सविस्तर खुलवले नाहीत, >>>>>>>>>>>> ++१११

झिम्मा आला प्राईमवर
आताच आईलाही दाखवला. आम्ही सुद्धा दुसऱ्यांदा पाहिला. आईलाही आवडला. आम्हालाही पुन्हा बघायला आवडला. म्हणजे बघितला असूनही चुकवत नव्हतो. उठावे लागले तर पॉज करत होतो. पुन्हा बघतानाही छान वाटतो.

आणखी काही निरीक्षणे दुसऱ्यांदा बघताना जाणवली
सविस्तर उद्या लिहितो..

कालच रात्री पाहिला, चांगलाय तसा हलकाफुलका. निर्मिती सावंत आवडली, आणि मिताचा रोल आवडला. निर्मिती चे कबीरला आईबद्दल सांगतानाचा आणि मितासोबत चर्चमधला सीन आवडला, नॅचरल एकदम. बाकी पात्रांबद्दल वर जे काही चर्चा झालीये त्याला सहमत.
सोनाली म्हातारी दिसतेय आता, बळेबळेच तरुण दाखवलीय. तिने त्याला भेटायला आल्यावर ज्या प्रकारे झिडकारले ते बघून मला वाटलं हाच लग्न मोडेल आता, पण झालं उलटेच जे अपेक्षित नव्हते.
बाकी निळ्या उर्फ कबीर झकास दिसलाय एकदम आणि त्याने सोनालीला बहीण करून टाकलं ते फारच हसू आलं शेवटी Lol , he was a realistic character and liked him.

अरे काय मस्त पिच्चर आहे झिम्मा.. सुरूवात ते शेवट मस्त पेस मधे चाल्लेला.. background ला ते झिम्माचं टायटल सॅांग अधूनमधून येत राहतं ते पण मस्तच.. निर्मिती सावंतचे सगळेच डायलॅाग्ज आणि काम जबरी. सुहास जोशी मॅाडर्न लूकमध्ये भारीच दिसलीए.. आणि हो, प्रत्येकीचीच स्टोरी खास होती त्यामुळे कोणती जास्त आवडली सांगता येणार नाही..सगळ्याच आवडल्या.. बागेत झोपण्याचा सिन, एकत्र दारू पिण्याचा सीन, शेवटचा सोनाली आणि तीच्या होणाऱ्या नवऱ्यातले संभाषण सगळंच छान होतं.. एकंदरीत, पिच्चर फार आवडला.. थिएटरमध्ये बघायला धम्माल आली असती.
अजून एक, तो हिरो मला आवडत नाही.. गुलाबजाममधेही नव्हता आवडला..म्हणजे त्याची बोलायची स्टाईल नाही आवडत..इरिटेट होतं..पण ह्यात त्याच्याकडे लक्षच गेलं नाही इतका सगळ्याजणींनी छान अभिनय केलाय

झिम्मा आवडला.
निर्मीती सावंत, क्षिती जोग आणि बाकी सर्वांनी छान काम केलंय.
मला त्या गुजराती स्त्री ची बॅक स्टोरी अजून डिटेल मध्ये चालली असती.

गुडेकर च्या लहानपणी चा ट्रॉमा प्रसंग आणि सध्याचं वागणं याची (परखड शब्दात चुकीच्या जाणवलेल्या गोष्टींचा निषेध हा कॉमन मुद्दा सोडून) लिंक मनाला भिडत नाही. बहुतेक 'त्याने मला माण्डीवर बसायला सांगितलं आणि त्याच्या तोंडाला भपकारा येत होता' असं काही ऐकलं असतं तर मनाला क्लोजर मिळालं असतं (चांगल्या जमून आलेल्या कथेत अश्या बाळबोध लिंक लावत बसण्याबद्दल इथे माझाच छोटा निषेध करते.) सुहास जोशी नेहमीप्रमाणेच क्लास. चांदेकर आणि सोकु ने छान दिसत थोडा अभिनय करण्याचं काम चांगलं केलंय.तो होणारा नवरा पण चांगला.

(निर्मीती चं "तुम उससे शादी करेंगा ना" भन्नाट आहे Happy )

एकंदर हलका फुलका पिक्चर, सगळ्या कुटुंबाने, मुलांनी पण एन्जॉय केला.

सगळे कंस बंद केलेत.

Pages