बारह माह - अश्विन/कार्तिक - (४)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 09:01

श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)

भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -

असुनि प्रेम उमाहड़ा किउ मिलीऐ हरि जाइ ॥
मनि तनि पिआस दरसन घणी कोई आणि मिलावै माइ ॥
संत सहाई प्रेम के हउ तिन कै लागा पाइ ॥
विणु प्रभ किउ सुखु पाईऐ दूजी नाही जाइ ॥
जिंन्ही चाखिआ प्रेम रसु से त्रिपति रहे आघाइ ॥
आपु तिआगि बिनती करहि लेहु प्रभू लड़ि लाइ ॥
जो हरि कंति मिलाईआ सि विछुड़ि कतहि न जाइ ॥
प्रभ विणु दूजा को नही नानक हरि सरणाइ ॥
असू सुखी वसंदीआ जिना मइआ हरि राइ ॥८॥

विरही जीव म्हणतो आहे दमट , उकाड्याच्या भाद्रपदानंतर आता या गुलाबी थंडीत माझ्या प्रियकरावाचून मला करमेनासे झालेले आहे. त्याला भेटायची ओढ माझ्या मनात व्याकुळ होते आहे. माझ्या तनामनाची तहान आणि तगमग आता फक्त प्रियकराच्या भेटीनेच शांत होइल. कोणी तरी मला माझ्या नाथाची भेट घडवुन द्या. मी ऐकून आहे की संतसज्जनांच्या सहवासानेच माझा ईश्वर मला भेटू शकणार आहे. आता मला त्यांच्या पायी शरण येण्या खेरीज अन्य मार्ग दिसत नाही. माझ्या पतीशिवाय आता मला अन्य कुठेही शांती मिळेलसे वाटत नाही. एकदा का ईश्वराच्या भेटीची आस भागली, त्याला एकदा जरी भेटले तरी मग इहलोक तुच्छ वाटू लागतो असे मी ऐकून आहे. आणि मग असे संत फक्त एकच मागणे देवाकडे मागतात आता आम्हाला तुझा दुरावा सहन होणार नाही. आम्हाला दूर लोटू नकोस. आम्हाला चिरविश्रांती फक्त तुझ्या पायाशीच प्राप्त होउ शकते. आमचे मन आता जगात लागत नाही. ज्या विरही जीवांवरती ईश्वर दयेचा वर्षाव करतो अशाच विरहीणि अश्विन महीन्यात मनःशांती मिळवतात. अन्य सारे विरहाग्नीत पोळूनच निघतात.
अश्विन महीन्यात जीवाचा, विरही भाव फार टोकदार झाल्याचे जाणवते. म्हणजे बाह्य जगात थंडी असली तरी विरहाग्नीमध्ये विरहीण पोळते आहे. या महीन्यात अर्जनदासजी हेच अधोरेखित करतात की संत साधू सज्जनांना शरण जा.

कतिकि करम कमावणे दोसु न काहू जोगु ॥
परमेसर ते भुलिआं विआपनि सभे रोग ॥
वेमुख होए राम ते लगनि जनम विजोग ॥
खिन महि कउड़े होइ गए जितड़े माइआ भोग ॥
विचु न कोई करि सकै किस थै रोवहि रोज ॥
कीता किछू न होवई लिखिआ धुरि संजोग ॥
वडभागी मेरा प्रभु मिलै तां उतरहि सभि बिओग ॥
नानक कउ प्रभ राखि लेहि मेरे साहिब बंदी मोच ॥
कतिक होवै साधसंगु बिनसहि सभे सोच ॥९॥

कार्तिक आहे आठवा महीना आणि या महीन्याचे वर्णन करणार्‍या नवव्या पौरीत गुरु अर्जनदास म्हणतात -
या आल्हाददायक, मनोहर कार्तिक महीन्यात जर एखादा जीव , ईश्वरापासून विलग असेल तर तो केवळ त्याच्या स्वतःच्या कर्मामुळे. कार्तिक महीन्यात देवभक्तीस पराड्मुख होणे हे निव्वळ करंटेपणाचे लक्षण आहे. आणि अशा व्यक्तीच्या भविष्यात संकटे, अडचणी, दु:खे ही अनिवार्य आहेत. या जन्मी जर तुम्ही ईश्वर भक्ती केली नाहीत तर अनेक जन्म त्रास आणि विरहच भोगावा लागेल. मग अन्य कोणाची मध्यस्ती चालणार नाही. आणि या जन्मीच्या करंटेपणामुळे पुढील अनेक जन्म विरह सहन करावा लागेल. परंतु जर सुदैवाने प्रत्यक्ष देवाने कृपा केली तरच हे दु:ख हरण होउ शकेल. नानक प्रार्थना करतात - या मायेपासून आम्हाला मुक्ती दे. आमचे कल्याण कर. जर या महीन्यात तुम्हाला सत्संगती लाभली तर मात्र विरहाच्या पोळण्यातून तुम्हाला आराम मिळू शकेल.
या पौरीमध्ये गुरु हेच सांगतात की ईश्वराच्या मर्जीनेच सत्संगतीची प्राप्ती होते. तिथेही ईश्वरी संकल्पच जरुरी असतो.

मार्गशीर्ष(नव्हेम्बर/डिसेंबर)
पौष(डिसेंबर/जानेवारी)

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users