बारह माह - श्रावण/भाद्रपद - (३)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 06:33

जेष्ठ (मे/ जून)
आषाढ (जून/जुलै)

सहावी पौरी आहे श्रावण म्हणजे पाचव्या महीन्याबद्दल. या महीन्यात मान्सून येतो. वातावरण परत एकदा शीतल आणि आल्हाददायक बनते परंतु वीजांच्या कडकडाटामुळे, ढगांच्या गडगडाटामुळे भीतीही वाटते. आणि याच भीतीचा उपयोग अर्जन दास यांनी त्यांच्या काव्यात वियोगी आत्म्याकरता करुन घेतलेला आहे. हा महीना कवि, तत्वज्ञच काय पण शेतकर्‍यां करताही महत्वाचा महीना आहे.

सावणि सरसी कामणी चरन कमल सिउ पिआरु ॥
मनु तनु रता सच रंगि इको नामु अधारु ॥
बिखिआ रंग कूड़ाविआ दिसनि सभे छारु ॥
हरि अम्रित बूंद सुहावणी मिलि साधू पीवणहारु ॥
वणु तिणु प्रभ संगि मउलिआ सम्रथ पुरख अपारु ॥
हरि मिलणै नो मनु लोचदा करमि मिलावणहारु ॥
जिनी सखीए प्रभु पाइआ हंउ तिन कै सद बलिहार ॥
नानक हरि जी मइआ करि सबदि सवारणहारु ॥
सावणु तिना सुहागणी जिन राम नामु उरि हारु ॥६॥

ज्याप्रमाणे धरित्री हिरवागार शालू नेसते, निसर्ग टवटवीत होउन तरारुन उठतो त्याप्रमाणेच या शिवापासून, वियोग पावलेल्या जीवाची भक्ती उचंबळून येते आणि प्रभुचरणांशी लीन होते. ज्याप्रमाणे निसर्ग हिरवा रंग परीधान करतो त्याचप्रमाणे जीवही ईश्वरभक्तीचा रंग धारण करतो. प्रेममय होउन जातो. त्याचे नाम हाच भक्तांकरता आधार बनतो. नश्वर मायेचा रंग त्याच्याकरता फिका पडतो. माया मिथ्या आणि राख वाटू लागते. पावसाच्या थेंबाथेंबाप्रमाणे, भक्ताचे मन ईश्वराच्या भक्तीरुपी अमृतमयी थेंबाकरता आचवते. परंतु गुरु भेटल्याशिवाय हे अमृतपान भक्त करु शकत नाही. गुरु भेटल्यानंतर, गुरुने सांगीतलेला प्रत्येक शब्द भक्तांकरताभामृततुल्य होतो. ज्या ईश्वराने सार्‍या चराचरात चैतन्याची उधळण केली त्याला भेटण्याकरता, माझे मन व्याकुळते. परंतु फक्त ईश्वराच्या मनात असेल ते भक्तच त्याच्या चरणांपाशी लीन होउ शकतात. त्याकरता ईश्वरी संकल्पच हवा. परत परत मी सच्या, साधू, गुरुंच्या पायी माथा नहारि, त्यांना शरण जातो ( बलिहारी) हे नानक त्या गुरुंच्या शब्दाश्ब्दाला सलाम, नमस्कार , नमन ज्या शब्दांमुळे माझे जीवन धर्मपथावर येउ शकते (मला धर्मलक्ष्मी प्राप्त होउ शकते). या श्रावणात नामस्मरण करणार्‍या , नामची माळ सतत कंठी गुंफणार्‍या, भक्तांच्या आशा पल्लवित होतात.
य अपौरीमध्ये नाम आणि गुरु यांची महती आणि आल्हाददायक श्रावणाची सांगड येते. नवजीवन, नवीन आशा पल्लवित होते.

भादुइ भरमि भुलाणीआ दूजै लगा हेतु ॥
लख सीगार बणाइआ कारजि नाही केतु ॥
जितु दिनि देह बिनससी तितु वेलै कहसनि प्रेतु ॥
छडि खड़ोते खिनै माहि जिन सिउ लगा हेतु ॥
हथ मरोड़ै तनु कपे सिआहहु होआ सेतु ॥
जेहा बीजै सो लुणै करमा संदड़ा खेतु ॥
नानक प्रभ सरणागती चरण बोहिथ प्रभ देतु ॥
से भादुइ नरकि न पाईअहि गुरु रखण वाला हेतु ॥७॥

सहावा महीना भाद्रपद पाहू यात. हा महीना महत्वाचा आहे. या महीन्यात सॄष्टीमध्ये संक्रमण घडते आहे. २ ऋतु अधोरेखित होत आहेत. कधी पावसाच्या धारा तर कधी दमट-उकाडा जाणवतो आहे. हा जो दुहेरी सृष्टीरंग आहे त्याचा भक्ताच्या मनावरही परीणाम होतो आहे. उकाड्यात, दमट हवेत, जीवास अस्वस्थता वाटते आहे. भक्ताची अशी अवस्था तर ज्या कोणास ईश्वराची ओढ अजुनी लागायची आहे असे अभक्त मायेच्या वाटेवर जात आहेत, हरवत आहेत. नानाविध दागिने , पोषाख ते भले परिधान करोत, ते सर्व व्यर्थ आहे. शरीरच नश्वर असल्याने जेव्हा रहाणार नाही तेव्हा या सोसाचा काय उपयोग? सगेसोयरे त्यागच करतील. जेव्हा यमदूत मनुष्याला बोलावणे धाडतील तेव्हा ते गंतव्य स्थानाचा, पत्ता थोडीच सांगणार आहेत? एका क्षणात माया-ममता सारी बंधने गळून पडतील कोणीही बरोबर येणार नाही. मृत्युसमयी पश्चात्ताप करुन काय उपयोग! शरीर जरजर झालेले, थकलेले असेल. रंग उडून जाइल. चेहरा कधी पांढरा फट्ट तर कधी वेदनेने काळानीळा पडेल. शरीर हे कर्मक्षेत्र आहे, जे काही पेराल ते उगवेल. हे नानक, जे कोणी गुरुंवरती श्रद्धा ठेवतील, गुरुंवरती प्रेम करतील ते लोक नरकापासून वाचतील. केवळ गुरुच त्यांना ईश्वरापर्यंत पोचवु शकतील. गुरुरुपी जहाजामधून हा भवसागर ते तरुन जातील.
या पौरीमध्ये अशा रीतीने, पेराल्क ते उगवेल हा संदेश तर दिलेलाच आहे परंतु भौतिक सुखाची क्षणभंगुरताही विषद केलेली आहे. चांगली कर्मे, उत्तम आचरण, ईश्वरभक्ती या मूल्यांचे उदात्तीकरण आढळते.

अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users