बारह माह - जेष्ठ/आषाढ - (२)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 17:18

चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)

पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -

हरि जेठि जुड़ंदा लोड़ीऐ जिसु अगै सभि निवंनि ॥
हरि सजण दावणि लगिआ किसै न देई बंनि ॥
माणक मोती नामु प्रभ उन लगै नाही संनि ॥
रंग सभे नाराइणै जेते मनि भावंनि ॥
जो हरि लोड़े सो करे सोई जीअ करंनि ॥
जो प्रभि कीते आपणे सेई कहीअहि धंनि ॥
आपण लीआ जे मिलै विछुड़ि किउ रोवंनि ॥
साधू संगु परापते नानक रंग माणंनि ॥
हरि जेठु रंगीला तिसु धणी जिस कै भागु मथंनि ॥४॥

सर्वजण ईश्वराच्या पाया पडतात आणि या जेष्ठ महीन्यात आपणही ईश्वरचरणी माथा टेकविला पाहीजे. आणि आपण जर प्रभुचरण घट्ट धरले तर यमाचा फासही आपल्याभोवती पडू शकणार नाही. यमाच्या त्रासापासून आपली सुटका निश्चित आहे. लोक रत्ने, हीरे, मोती, जवाहर, माणिक सारे काही जमवितत व नंतर चोरीची भीती बाळगतात. पण देवाचे नाव हे असे मौल्यवान धन आहे ज्याची चोरी होऊ शकत नाही. या जगातील नानविध आश्चर्ये, सौंदर्य हे नामामुळे द्विगुणीतच होइल. हेही लक्षात घेतले पाहीजे ईश्वराचे पाईक , ईश्वराच्या मर्जीशिवाय काहीही करत नाहीत. त्याला रुचेल असेच ते वागतात. ईश्वराची स्तुती आपल्याला सन्मानच देईल. परंतु ईश्वर प्राप्ती ही फक्त आपल्या स्वत:च्या इच्छेने व प्रयत्नांनीच साध्य होत नाही. कारण तसे असते तर मग अनेक जीव ईश्वर वियोगात दु:खी कष्टी झालेच नसते. हे नानक, ज्यांना गुरुची प्राप्ती झाली त्यांनाच केवळ ईश्वरप्राप्ती होऊ शकते. आणि अशा लोकांचेच भाग्य उजळेल व त्यांना जेष्ठ महीना आनंददायक जाइल. ते ईश्वरास प्राप्त करुन घेतील.
अशा रीतीने या पौरीमध्ये अर्जनदासजी नामस्मरण व गुरुप्राप्तीचे महत्व विषद करतात. जे कोणी नामस्मरण करतात त्यांना इह लोकी व परलोकी सन्मानाचे आयुष्य मिळू शकते.

आता जो महीना येतो तो आहे आषाढाचा. पाचव्या पौरीमध्ये या महीन्याचे वर्णन येते. हा महीना फारसा सुखद नसतो. असह्य दमटपणा हवेत असल्याने उकडते. त्यामुळे ऐहिक व अध्यात्मिक अस्वस्थता दाटुन येते.

आसाड़ु तपंदा तिसु लगै हरि नाहु न जिंना पासि ॥
जगजीवन पुरखु तिआगि कै माणस संदी आस ॥
दुयै भाइ विगुचीऐ गलि पईसु जम की फास ॥
जेहा बीजै सो लुणै मथै जो लिखिआसु ॥
रैणि विहाणी पछुताणी उठि चली गई निरास ॥
जिन कौ साधू भेटीऐ सो दरगह होइ खलासु ॥
करि किरपा प्रभ आपणी तेरे दरसन होइ पिआस ॥
प्रभ तुधु बिनु दूजा को नही नानक की अरदासि ॥
आसाड़ु सुहंदा तिसु लगै जिसु मनि हरि चरण निवास ॥५॥

आषाढातील गर्मी त्या जीवरुपी वधूंना असह्य होते ज्या आपल्या पतीस विसरलेल्या आहेत. आपल्या ईश्वररुपी पतीस विसरुन अन्य लोकांवरती विसंबणाऱ्या या वधूंना उकाडा सहन होत नाही. अस्वस्थ वाटत रहाते. ईश्वरास विसरुन अन्य लोकांवर अधिक विश्वास टाकणे हे अधर्मी आहे आणि यमाच्या फंद्यास आमंत्रण आहे. जे स्वत: नश्वर आहेत ते इतरांना मदत काय करणार तेव्हा अशा नश्वरतेच्या मागे लागणे शहाणपणाचे नाही. आणि अशा जीवांच्या भाळी फक्त अवहेलना लिहीलेली असते. या लोकांना पश्चात्तापाशिवाय अन्य काहीही मिळत नाही. आणि शेवटी हृदय विदीर्ण होउनच असे लोक जगाचा त्याग करतात, मृत्यूस सामोरे जातात. याउलट गुरुस शरण गेलेले लोक इह व पर लोकातही सन्मान पावतत. देवा मला सतत तुझी भक्ती दे, तुझ्या प्राप्तीच्या इच्छेत मला आनंद दे. तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाउ? अशा रीतीने ईश्वरास शरण गेलेल्या जीवास आषाढाचा उष्ण महीनाही बिना कष्टाचा जातो. आणि बाह्य जगातील घडामोडींचा त्यांच्यावर शून्य परिणाम होतो.

श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users