खमंग कुरकुरीत शेव

Submitted by मनीमोहोर on 31 October, 2021 - 05:08
Shev,  मराठी शेव
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.

जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.

अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.

शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.

दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.

अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.

लागणारे साहित्य :
चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत )
2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,
३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे , ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण.
4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार, पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती .

परातीत बेसन ,तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
नाही सांगता येणार.
अधिक टिपा: 

1) बारीक जाळी वापरून शेव छान होते.
2) तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
3९ शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
3) शेव पटकन तळून होते. चकली सारखा शेव तळायला वेळ लागत नाही.
4) फार लालसर काढू नये ,रंग नंतर थोडा चढतो.
5) सोऱ्यात पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळी धुवून पुसून घ्यावी.
6) ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेमा ,

थॅंक्यु सो मच. एक तर माझ्या सारख्या एका सामान्य माबो कराच्या शंकेची इतक्या लवकर दखल घेतलीत आणि मला समजेल अश्या सोप्या भाषेत समजावून ही सांगितलंत ...खूप छान वाटलं.

ही पाकृ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी म्हणून आपल्या व्यग्र स्केडुल मधून वेळ काढून तो फोटो अनुक्रमाणिके मध्ये आणलात हे वाचून तर आपल्या बद्दलचा आदर आणि मायबोली बद्दल वाटणारा अभिमान द्विगुणित झाला आहे.

पाककृतींची जी टेम्प्लेट आहे ती संगणकाशी निगडित काही विशिष्ट कारणासाठी बनवली आहे. त्यात सरमिसळ झाली तर वाचकांना आणि संगणकाला शोधायला अवघड जाते. उदा. वर. "साहित्य " हे तुम्ही क्रम वार पाककृती विभागात लिहिले आहे. ते "लागणारे जिन्नस" विभागात असण्याची गरज आहे . तुमची हरकत नसेल तर मी ते योग्य जागी ठेवावे म्हणतो. ,>> अजून थोडा त्रास होईल आपल्याला पण प्लिज कराल का ?

पुढच्या वेळी पाकृ लिहिताना क्रम बरोबर राहिल हे मी कसोशीने पाहीन. आत्ता आपल्याला झालेल्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि आपण फोटो हेडर मध्ये दिल्याबद्दल कृतज्ञता.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

काल ठरल्याप्रमाणे कुरकुरीत शेव केली. चव हॉटेल सारखी छान झाली. पण चेहरा नाही.
पहिल्यांदा मिश्रण थोड पातळ (अती सैलसर)असल्याने सलग शेव पडली नाही. मग थोड पीठ घालून कमी सैलसर केल्यावर सलग पाडता आली. (तज्ञांचा सल्ला घ्यावा लागलाच).
पण एकाच वेळेस वरन हँडल गोल फिरवायच आणि सोर्‍या पण गोल फिरवायचा याच काळ , काम , वेग भलतच अवघड असत अस समजल. दाबून चकली पाडायच लाकडाच यंत्र आई वापरायची ते जास्त छान होत अस वाटून गेल, पण सल्ला मिळाल्यामुळे बोललो नाही. Happy

फोटो खाउ गल्लीत टाकतो. इथे नको. तुमच्या सुंदर दिसणार्‍या शेवेत भेसळ होईल. Happy

विक्रमसिंह , अपडेट बद्दल धन्यवाद. शेव डायरेक्ट तळणीत पाडायची असल्याने तिथे दुरुस्ती वैगेरे काही होऊ शकत नाही म्हणून पहिल्यांदा जरा ट्रीकी वाटत. पण एवढं ही कठीण नाहीये ते. तुमचा खाऊ गल्लीतला फोटो पाहिला मी. छान झालीय शेव. दोन नं च्या फोटोत तर परफेक्ट फुल दिसतंय शेवेच. तर तुम्हाला ईनंती आहे की खाऊ गल्लीतली शेव इथे ही आणा प्लिज. तुम्ही घरी करून बघितलीत ह्याच खूप अप्रूप वाटतय.

SharmilaR , सामो धन्यवाद.

मनीमोहोर, तुमच्या आग्रहा खातर इथे फोटो टाकायच धारिष्ट्य करतोय. पहिला फोटो पातळ मिश्रण झाल असता काय झाल याचा आहे. सलग शेव पडत नसल्याने तुकडे तुकडे झाले होते.
दुसर्‍या चित्रात मिश्रण जरा घट्ट करून आणि थोड मोठ छिद्र असणारा (दोन्ही गोष्टी तज्ञांच्या सल्ल्याने रेस्क्यू ऑपरेशन) सोर्‍या वापरून पाडलेली शेव आहे.
चव दोन्हीची छान होती. थोड्या शेवेसाठी मी तिखट आणि मिरी पण मिसळली होती.
20211104_064412[1].jpg20211104_064442[1].jpg
प्रोत्साहना बद्दल मनीमोहोर यांना धन्यवाद. दिवाळीत मिरवून घेतले. Happy

थॅंक्यु विक्रमसिंह इथे ही शेव आणल्याबद्दल. दुसरा फोटो परफेक्ट दिसतेय शेव. कोणत्याही गोष्टीला थोडी प्रॅक्टिस लागतेच. मुळात आवड आणि इचछा हवी ज्या तुमच्या कडे आहेत त्यामुळे पुढच्या वर्षी एकदम सुगरण शेव बनवाल तुम्ही.

मनीमोहोर, मी दिवाळीत शेव केली तुमच्या कृतीने. आयुष्यात शेव हा प्रकार पहिल्यांदा मी घरी केला. लेकीसाठी कमी तिखट आणि बाकीच्यांसाठी तिखट शेव केली. अफलातून छान झाली. तुम्ही एवढी परफ़ेकट कृती दिलीय कि चुकायची गुंजाईश च नाही. आता विकतची कधी आणणारच नाही Happy
थँक्यू सो मच

सामी थॅंक्यु ...शेव वाटते तेवढी कठीण नाही उलट खूप सोपी आहे. शेव मिळते बाजारात कायम आणि छान ही असते पण फुलं नाही मिळत शेवेची , मोडलेली मिळते. शेवेच्या फुलला दिवाळीच्या फराळात खूप डेकोरेटीव value आहे. म्हणून एरवी नाही तरी दिवाळीत तरी करायची.

जाई, इंदूसुता धन्यवाद.

तुमच्या कृतीने शेव केली. खूपच छान झाली >> असेल तर फोटो तरी दाखवा.

वा! आज वाचला लेख!

ममो शेव खरच सोपी आहे करायला! अनुमोदन!
मी १०वीत असताना शिकले शेव सुट्टीत तेंव्हापासून कधीच बिघडली नाही! शेव पीठ फक्त घट्ट भिजवायचे. ते सोर्‍या दाबून शेव पाडणेच थोडे जड जाते.
तांदळाच्या पीठाबद्दल नव्ह्ते माहीत आता यंदा करुन पाहिन!

बेसन असले की बरोबर तांदळाचे पीठ असावेच का ? म्हणजे बेसनाच्या लाडूत घालतात म्हणजे लाडू टाळूला चिकटत नाही, भजीमध्ये पण थोडे घालतात भजी कुरकुरीत व्हाव्या म्हणून.. आपली एक शंका!

दसरा झाला दिवाळी आली ... धनवंती बरं झालं धागा वर आणला ते . बघा करून करायला सोपी खायला कुरकुरीत शेव घरी करून ह्या वर्षी.

म्हणजे बेसनाच्या लाडूत घालतात म्हणजे लाडू टाळूला चिकटत नाही, भजीमध्ये पण थोडे घालतात भजी कुरकुरीत व्हाव्या म्हणून.. आपली एक शंका! >> मस्त निरीक्षण निकु.

मध्यंतरी मुलीकडे गेले होते. तिच्या मुलांबरोबर शेव करायची म्हणून साचा ही नेला होता इकडून. आमचा शेवेचा खेळ मस्तच रंगला. तेलंच ( तेलाच) बोट साच्याच्या आतून फिरवून वगैरे साग्रसंगीत सगळं करून ताटलीत शेव पाडून सगळं पीठ संपवलं. मग उत्साह ही ओसरला. मग मी ते पीठ परत साच्यात घालून शेव पाडली , गरम गरम कुरकुरीत शेव अंगणात बसून खात enjoy केली दोघांनी ही. मला पण मजाच आली खूप.

हा तिच्याकडे केलेल्या शेवेचा फोटो .

20220728_220922_0.jpg

<<<मध्यंतरी मुलीकडे गेले होते. तिच्या मुलांबरोबर शेव करायची म्हणून साचा ही नेला होता इकडून. आमचा शेवेचा खेळ मस्तच रंगला. तेलंच ( तेलाच) बोट साच्याच्या आतून फिरवून वगैरे साग्रसंगीत सगळं करून ताटलीत शेव पाडून सगळं पीठ संपवलं. मग उत्साह ही ओसरला. मग मी ते पीठ परत साच्यात घालून शेव पाडली ,>>>
हे सगळे एक आज्जीच करू जाणे....

एक शंका आहे. याच पद्धतीने केली तरी माझी शेव दुसर्‍या दिवशी मऊ पडते..ती का?
थंड झाल्यावर भरली तरी....

मऊ पडते म्हणजे एकतर मोहन कमी पडतंय किंवा ते मिसळताना पुरेसं कडकडीत गरम नव्हतं किंवा शेव योग्य आचेवर (मोठ्या आचेवर घाईत तळलेले पदार्थ वरून ब्राउन होतात आणि आतून मऊ राहातात) पुरेशी खमंग तळली गेली नाही असं वाटतंय.

ममो, मळलेल्या पिठाचा फोटो असेल तर टाका ना. माझे पीठ नेहमीच जाळीच्या बाजूने बाहेर येते आणि फाफड्यासारखी पट्टी पडते.

मी काल पहिल्यांदाच शेव केली. अजूनपर्यंत घरी शेव करण्याचे धाडस नव्हते पण तुमची कृती वाचली आणि करुनच बघुया म्हणून झटकन तयारी करुन पटकन केली. Happy
Screenshot_20221019-131109_Gallery.jpgScreenshot_20221019-131036_Gallery.jpg

हे सगळे एक आज्जीच करू जाणे.... >> +१ >> बरोबर आहे. त्यांची आई ही मला म्हणतच होती , "आई, किती पसारा करतायत , डायरेक्ट शेव च दे ना त्याना खायला अस …"

मऊ पडते म्हणजे एकतर मोहन कमी पडतंय किंवा ते मिसळताना पुरेसं कडकडीत गरम नव्हतं किंवा शेव योग्य आचेवर (मोठ्या आचेवर घाईत तळलेले पदार्थ वरून ब्राउन होतात आणि आतून मऊ राहातात) पुरेशी खमंग तळली गेली नाही असं वाटतंय. >> स्वाती बरोब्बर लिहिलं आहेस. आणखी एक सुचतय म्हणजे शेवेचा डबा पण घट्ट झाकणाचा हवा. झाकण घट्ट नसेल तर आतून किचन टॉवेल लावून ही आपण ते घट्ट करू शकतो.

ममो, मळलेल्या पिठाचा फोटो असेल तर टाका ना. माझे पीठ नेहमीच जाळीच्या बाजूने बाहेर येते आणि फाफड्यासारखी पट्टी पडते. >> निल्सन , मी केली तर मी दाखवीन फोटो , पण कोणी केली तर पिठाचा फोटो प्लिज इथे दाखवा.
साच्यातली चकती प्रत्येक घाण्याच्या वेळी पाण्याने धवुन आणि पुसून घ्यावी लागते.

निधी, शेव जबरदस्त दिसतेय. फोटो बद्दल थॅंक्यु.

Pages