ओट्स / राळे खिचडी

Submitted by योकु on 4 October, 2021 - 12:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी ओट्स / राळे
दोन मुठी तूरडाळ
एक मूठ मूगडाळ (पिवळी)
एक टोमॅटो
एक हिरवी मिरची
२ लाल सुक्या मिरच्या
अर्धा चमचा पंचफोरन (सम प्रमाणात मोहोरी, बडीशेप, मेथ्या, ओवा आणि कलौंजी; प्रत्येकी २ चमचे एकत्र करून हवाबंद डब्यात ठेवायचं. बरंच टिकतं; कुठल्याही भाज्यांच्या फोडण्यांकरता वापरता येतं आणि एक वेगळीच सुरेख चव येते)
पाव चमचा ब्याडगी मिरची पूड
पाव चमचा हळद
२ चमचे तेल
चवीनुसार मीठ
७-८ कढीपत्त्याची पानं
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ कप गरम पाणी
लहान कुकर

क्रमवार पाककृती: 

लहानश्या कुकर मध्ये ही रेस्पी पटकन होते. ओट्स असल्यानी करावी आणि खाऊन टाकावी. परत परत गरम करायचा हा पदार्थ नव्हे. तसं केल्यास, ओट्स अन मुगामुळे लगेच चिकट पणा येतो आणि गिळगिळीत लागते.

- हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. डाळी एकत्र करून धूवून चाळणीत पाणी निथळ्याकरता ठेवून द्याव्यात.

- कुकर मध्ये तेल चांगलं गरम करून (आच कमी करून) पंचफोरन घालावं आणि काही सेकंद परतावं (यात बाकी घटक उदा. मेथ्या असल्यानी फोडणी जरा होऊ द्यावी).

- यात लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून जरा परतून घ्यावं. आता यात डाळी घालून त्या चांगल्या लालसर होईतो मंद आचेवर परतावं. मग ओट्स, मीठ, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून नीट ढवळून ३-४ कप गरम पाणी घालावं आणि कुकर बंद करून मोठ्या आचेवर पूर्ण प्रेशर येऊ द्यावं.
नंतर आच कमी करून ५-७ मिनिटांत आच बंद करावी.

- कुकरचं प्रेशर आपोआप कमी झालं की कुकर उघडून खिचडीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि फार घट्ट असेल तर जरा कढत पाणी घालून पळीवाढी करावी.

- पंचफोरनाचा सुरेख स्वाद असलेली सौम्य (ज्याला तिखट हवं तो लाल सुकी मिरची घेऊ शकेल खिचडीतली, चुरून खायला!) अशी जरा वेगळ्या धाटणीची खिचडी तयार आहे. अगदी गरमगरमच खायला घ्यावी. वरून हवं असेल तर जरा साजूक तूप घ्यावं. पापड भाजून, दही, कांदा, काकडी असं सोबत घेता येइल. मग मला दुवा द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
२ सर्वींग्स होतील या प्रमाणात
अधिक टिपा: 

- वर सांगितलंय तसं - ओट्स असल्यानी करावी आणि खाऊन टाकावी. परत परत गरम करायचा हा पदार्थ नव्हे. तसं केल्यास, ओट्स मुळे लगेच चिकट पणा येतो आणि गिळगिळीत लागते.
- ओट्स ऐवजी तितकेच राळे (फॉक्सटेल मिलेट) (फॉर द्याट म्याटर तांदूळही किंवा दलीया सुद्धा) घेता येतील, पण ते धूवून, निथळून घ्यावेत. आणि डाळींसोबतच परतावेत.
- आवडत असेल तर जरा आलं किसून घालता येईल किंवा फोडणीत कांदा, लसूण परतून ही घालता येइल.
- असतील आणि आवडत असतील तर बाकी भाज्यांना सुद्धा प्रवेश देता येइल - मटार, मक्याचे दाणे, फ्लॉवर चे लहान तुरे, श्रावण घेवडा, गाजर इ.

माहितीचा स्रोत: 
उगा केलेले प्रयोग (साखरेचं बंधन असल्यानी भात लिमिट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न आणि म्हणून ओट्स. आणि यामुळे जरा भूकही धरवते)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

योकु, छान रेसीपी.
राळे मी कधी खाल्ले नाहीत, ओट्स बरोबर (न्यूट्रिइंट्सची) तुलना करून ठरवता येईल की राळे ग्रोसरीं लिस्टमध्ये ऍड करावेत का. बाकी ओट्सची खिचडी बऱ्याच वेळा केली जाते आणि आवडते.
(ओट्सची खिचडी करायची झाल्यास whole ओट्स किंवा स्टील कट फक्त चालतील. बाकी रोल्ड किंवा इंन्स्टंट ओट्स खिचडीसाठी उपयोगाचे नाहीत. त्याचं पॉरीज किंवा मसाला ओट्स चवीला छान लागतात. )

या ओटस मधे काय असे न्युट्रीअँट्स असतात? जे सर्वजण इतके रेको करतात..? वेट लॉस ला उपयोगी असतात का? कसे?

राळ्याची खिचडी करता आईने राळा आणला होता. पण लवकर शिजत नाही हा अनुभव आहे. शिजला तरी कचकच लागतो. मउ शिजत नाही. तो जाडसर दळुन मग करतात का?

मस्त रेसिपी ,
पंचफोरन > पहिल्यांदाच ऐकलंय. प्रयोग केला पाहिजे.

ही खिचडी परवाच केली. मस्त होते. मी कांदाही घातलेला. दूध घालून खाल्ली. किंचित बेचव असलेला हा प्रकार फार आवडला.

राळेखिचडी पाकृ मस्तच आहे. पंचफोरन छान कल्पना. सगळे तडतडणारे पदार्थ एकत्र. फोडणी करपायची शक्यता कमी. कुकरला २ शिट्या पुरेश्या आहेत का? योकू पुन्हा बनविल्यास छायाचित्रे द्यायला विसरू नका. सामो तुम्ही तरी एखादे राळेखिचडी छायाचित्र ईकडे द्यायला पाहिजे होते.

लाल मिरच्या, शेंगदाणे, कढिलिंब थोडी भोपळी मिरची हवे ते दडपले आहे. कसलेसे फ्लेक्स होते (बहुधा मिलेट) + तूर डाळ + मूग डाळ सर्व उकडुन, शिजवुन त्यामुळे असा गिचका झालाय. पण मस्त लागते. पौष्टिक व चविष्ट.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWL6E5YNd64qaXuJPYo40iSpVcBmrDi5m80OFzZ4ODGi8MNFXs4YwJ3sECehhLV05gQ4lZ61RmUMcT9WMdhMpL6-fIDvxAr_HszF-2Pke8oE3neE51gLRFZSr8_OrJEpu055JA8us_K63eim6NdQr-VMg=w661-h881-no?authuser=0

हा राळ्यांचा फटू -
Foxtail Millet.JPG

सॉर्ट ऑफ बाजरी सारखं दिसतं, अर्थात रंग वेगळा.
शिजायला जरा वेळ लागतो म्हणूनच आधी डाळींसोबत परतायचं आहे हे. तसं वर रेस्पीत दिलेलं आहे.

ओट्स चा जीआय कमी असतो ना? (तरीही मी ओट्स खायचं कारण म्हणजे फायबरस असल्यानी काही औषध न घेता पोट साफ होतं Wink )

खरंतर, पंचफोरन मध्ये 'राधुनी' वापरायला हवी (सौजन्य - बाँग इट्स युट्यूब चॅनल) पण ते इथे मिळत नाही सो त्याऐवजी ओवा.